जागतिक पुरुष दिनानिमित्त रेणुका शहाणेंच्या खास शुभेच्छा
 महा एमटीबी  19-Nov-2017

 

आज १९ नोव्हेंबर अर्थात जागतिक पुरुष दिन. ८ मार्च हा जागतिक महिला दिन तर सर्वांना माहित असतो मात्र पुरुष दिनाविषयी फारच कमी माहिती लोकांना असते. जगभरात आजच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातही काही सामाजिक संस्था संघटनांनी जागतिक पुरुष दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आजच्या दिवसानिमित्त समस्त पुरुषांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा हा दिवस साजरा करुन आपण 'लिंग समानते'कडे एक पाऊल पुढे वाढवूयात असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केले आहे. जागतिक पुरुष दिनानिमित्त संपूर्ण पुरुष वर्गाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.#HeForShe & #SheForHe अशा दोन हॅशटॅग्सच्या माध्यमातून त्यांनी लिंग समानतेवर भाष्य केले आहे. लिंग समानतेला नेहमी महिलांच्याच दृष्टीकोनातून बघितले जाते. महिला आणि पुरुष यांच्यात कुठेतरी महिलांना दुय्यम समजल्यामुळे नेहमी लिंग समानतेच्या गोष्टी महिलांसाठी असतात, मात्र आजच्या काळात जर खरच समानतेविषयी बोलायचे असेल तर पुरुषांचा आणि महिलांचा समानतेने विचार देखील केला गेला पाहीजे. त्यामुळे ज्याप्रमाणे महिला दिन साजरा करण्यात येतो, त्याच प्रमाणे जागतिक पुरुष दिन देखील साजरा करण्यात यावा असा संदेश त्यांनी या व्हिडियोच्या माध्यमातून दिला आहे.

जागतिक पुरुष दिनाची सुरुवात त्रिनिदाद आणि टोबैगो येथे वर्ष १९९९ मध्ये करण्यात आली. त्यानंतर सुमारे ६० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जावू लागला. भारतात सर्वप्रथम या दिवसाला १९ नोव्हेंबर २००७ रोजी साजरे करण्यात आले, आज त्या घटनेला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. समाजात केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील मोठ्या प्रमाणात त्याग करतात, त्यांना त्यांच्या परिवारासाठी, समाजासाठी अनेकदा त्याग करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या या त्यागाला मानवंदना देण्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो. पुरुषांमधील सकारात्मकेला वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.