डाव्यांच्या हिंसेचा चित्रमय दस्तावेज
 महा एमटीबी  19-Nov-2017

 
विचारविश्वात अन्य विचारसरणीच्या हिंसेवर ‘जातीयवादी’ म्हणून हिणकस आरोप करणारे डावे. या डाव्यांचा बुरखा फाडण्याचे काम‘आहुती : केरळमधील त्यागाच्या अकथित कहाण्या’ या पुस्तकाने केले आहे. जवळजवळ २६० स्वयंसेवकांच्या हत्या केरळमध्ये झाल्या आहेत. यातील २३२ मार्क्सवाद्यांकडून तर उरलेल्या मुस्लीममूलतत्ववाद्यांकडून झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या मोठ्या आकाराच्या पुस्तकात केरळमध्ये डाव्यांच्या हिंसाचारात बळी पडलेल्या स्वयंसेवक व परिवार कार्यकर्त्यांची विविध सूत्रांमध्ये एकत्र माहिती देण्यात आली आहे. केरळच्या जाहिराती करताना ‘देवभूमी’ म्हणून जाहिरात करायची आणि कृत्ये दानवांनाही लाजवेल अशी करायची, ही डाव्यांची रितच होऊन बसली आहे. राष्ट्रीय विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विचारांचा प्रभाव वाढवू नये, म्हणून त्यांना संपवून टाकण्याचा मार्ग डावे कसे अवलंबतात, त्याचे सचित्र दर्शन या पुस्तकात घडते. 
 
डाव्यांचे शहरी भाईबंद ज्या मूल्यांची पोपटपंची माध्यमांमध्ये करतात, ती मूल्ये केरळमध्ये कशी दिवसाढवळ्या पायदळी तुडविली जातात, याचे पुरावेच हे पुस्तक देते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मुस्लीमलीगशी युती करून १९६५ साली पहिला बळी घेतला. त्यानंतर मुस्लीमलीग सोबत असो किंवा नसो, डाव्यांचे थैमान सुरूच आहे. जयकृष्णन या शिक्षकाची हत्या त्याच्या विद्यार्थ्यांसमोरच करण्यात आली. इकडे डावे महिलांच्या असमानतेविरूद्ध व्यवस्थेला दोष लावतात आणि तिथे कौसल्या आणि अम्मुअम्मा या दोन महिलांचा खून पाडला असताना मूग गिळून गप्प बसतात. अनुप नावाच्या पर्यावरणाच्या कामात स्वत:ला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्याला गावठी बॉम्बच्या साहय्याने उडविण्यात आले. कारण, पश्र्चिमघाटाच्या संवर्धनासाठी त्याने केले आव्हान मार्क्सवाद्यांना रुचले नाही. कार्यकर्त्यांच्या एका मोठ्या चमूने हा दस्तावेज पूर्ण केला आहे. ‘केसरी साप्ताहिक’, ‘दैनिक जन्मभूमी’, ‘संवाद डॉटकॉम’, ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी संशोधन प्रतिष्ठान’ या सर्व संस्थांनी मिळून हा दस्तावेज साकारला आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमितभाई शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तकाला विशेष संदेश दिले आहेत. केरळमध्ये रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून कामकलेल्या जे. नंदकुमार यांनी या पुस्तकाचा विषय प्रवेश लिहिला आहे. इतरांना ‘फॅसिस्ट’ म्हणविणारे लोक स्वत:ची पूर्णसत्ता असलेल्या ठिकाणी कसे वागतात, याचा पर्दाफाश त्यांनी केला आहे. केवळ व्यक्तिगत उपयोगासाठी असलेल्या या पुस्तकाच्या काही मर्यादित प्रति उपलब्ध आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात भरत राऊत यांच्याशी संपर्क साधल्यास हे पुस्तक उपलब्ध होऊ शकेल.