एकनाथजींच्या जीवनावर आधारित चित्रपट
 महा एमटीबी  18-Nov-2017

 

मुंबई : विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांच्या जीवनावर आधारित माहितीपट उद्या (१९ नोव्हेंबर) प्रदर्शित होत आहे. एकनाथ रानडे यांच्या प्रयत्नातून कन्याकुमारी येथे साकार झालेल्या विवेकानन्द शिलास्मारकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ५० ठिकाणी हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्रातही मुंबई, औरंगाबाद, नागपूरसह ८ शहरांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

 

सुदर्शन अरवमुधन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अजय रोहिला यांनी एकनाथ रानडे यांची मुख्य भूमिका केली आहे. या चित्रपटाचा विशेष खेळ यापूर्वीच ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत मुंबईत करण्यात आला होता. मात्र आता उद्यापासून हा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

 

१९ नोव्हेंबंर हा एकनाथजींचा जन्मदिवस असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित न करता १९ नोव्हेेबरला येत्या रविवारी प्रदर्शित करण्यात येत आहे असे विवेकानंद केंद्रातर्फे कळवण्यात आले आहे. या चित्रपटाची अधिक माहिती 'बुक माय शो' या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

 

सरसंघचालकांच्या उपस्थितीत विशेष प्रदर्शन -

दरम्यान येत्या सोमवारी (२० नोव्हेंबर) नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या एका विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चित्रपटातील एकनाथजींच्या मुख्य भूमिकेतील कलाकार अजय रोहिला व दिग्दर्शक सुदर्शन हे देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विवेकानंद केंद्राने दिली आहे.