विलोभनीय तितकाच श्रवणीय 'हंपी'!
 महा एमटीबी  18-Nov-2017

 
एखादा चित्रपटाची सुरुवात तुम्ही कशी करता यावरही रसिकांचा त्या चित्रपटामध्ये रस निर्माण होत आधारित असतं. या वर्षात बघितलेल्या बऱ्याच चित्रपटांपैकी 'मुरंबा'ची सुरुवात मला जबरदस्त आवडली होती. आणि आता त्यानंतर थेट 'हंपी'ने तो मान मिळवला. संपूर्ण स्क्रीन वर ४-५ उंचच्या उंच नारळाची झाडं, एक लांब लचक पूल आणि नायिकेचा प्रेक्षणीय 'हंपी'च्या दिशेने सुरु झालेला प्रवास. हा पहिलाच सीन पाहून आपसूकच मुखातून व्वा! अशी प्रतिक्रिया उमटून गेली. कालांतराने ही प्रतिक्रिया वारंवार उमटू लागली आणि अखेरीस लक्षात आलं की हेच 'हंपी' या चित्रपटाचं बलस्थान आहे. मुळात 'हंपी' हे लोकेशनच असं आहे की तुम्ही तिथल्या दृश्यांमध्ये आकंठ बुडून जाता. पण हीच प्रेक्षणीय स्थळं अमलेंदू चौधरी याने ज्या पद्धतीने टिपली आहेत आणि तितक्याच सफाईने ते संपादित करून आपल्यासमोर मांडली आहेत, त्याला खरच सलाम! 
 
बहुतांश वेळा एखाद्या चित्रपटाचे समीक्षण करताना आधी कथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत आणि मग छायाचित्रण या पद्धतीने बोलले जाते. पण 'हंपी' हा चित्रपट माझ्या मते खरोखरीच या पद्धतीला अपवाद ठरला आहे. चित्रपटेच्या कथेत म्हणावा तितका दम नाहीये किंबहुना ज्या व्यक्तिरेखा चित्रपटात दाखवल्या आहेत त्यामध्ये खूप लवकर आपण गुंतत नाही किंवा त्या 'रिलेट'ही होत नाहीत (अर्थात जे हंपीला जाऊन आलेत ते कदाचित रिलेट करू शकतील). चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर उत्सुकता नक्कीच वाढल्या होत्या. 'लव्ह-ट्रॅव्हल' या  विषयावर मराठीत काही तरी वेगळं बघण्याची संधी मिळेल असं वाटलं होतं. मध्यंतरापर्यंत 'हंपी' त्याच वेगळेपण टिकून ठेवण्यात यशस्वी झाला आहे, पण पूर्वार्धात मात्र तो नेहमीच्या प्रेमाच्या सरधोपट मार्गावर जातो आणि म्हणूनच त्यातला रस आपसूकच कमी होतो. पण या सगळ्यात मोठ्या स्क्रीन वरचे आकर्षक चित्रणाची आपल्याला इतकी भुरळ पडलेली असते की कथेमधील या त्रुटी फारशा लक्षात राहत नाही. 
 
Embeded Object
 
'हंपी'चं आणखी एक वैशिट्य म्हणजे नरेंद्र भिडे व आदित्य बेडेकर यांनी या चित्रपटाला दिलेलं  संगीत लाजवाब आहे. 'लागी लगन लगन लागी सावरी लगन' हे गाणं पण खूपच सुंदर लिहिलं आहे आणि ते तितकाच सुमधुर पद्धतीने आपल्या समोर सादर केलं आहे. हंपीच्या विविध कोनातून फिरणारा कॅमेरा आणि आपल्या कानात घुमणारे कर्नाटकी-महाराष्ट्रीयन संगीत या दोन गोष्टींमुळे एक उच्च कलाकृती पहिल्याचा अनुभव नक्की येतो. कथेमध्ये आणखी थोडी रंजकता आणली असती किंवा उगाच तत्वज्ञान झाडण्याचा प्रयत्न थोडा कमी केला असता तर 'हंपी' अधिक यशस्वी होऊ शकला असता. 
 
Embeded Object
 
 
Embeded Object
 
प्रकाश कुंटे या दिग्दर्शकाचं वेगेळेपण हे असतं की तो चित्रपट बऱ्यापैकी चकचकीत, फ्रेश बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा 'कॉफी आणि बरंच काही' किंवा 'जरा हटके' या चित्रपटातून ते दिसून आलंय. 'हंपी'देखील त्याला अपवाद ठरलेला नाही. प्रकाशचं दिग्दर्शनचं कौशल्य याही चित्रपटातून दिसून आलाय. शेवटी अभिनयाबाबत बोललाच पाहिजे. ललीत प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव या चौघांची कामं उत्तम झालीयेत. पण त्यांच्या कामापेक्षा ललीत आणि सोनालीचा 'लुक' जास्त लक्षात राहतो. त्यातल्या त्यात विजय निकम २-४ सीन मधून भाव खाऊन जातात. 
 

 
एकूणच हंपीला कधीही भेट दिली नसेल आणि तुमच्या शहरात बसून हंपीचे सौंदर्य दोन तासात अनुभवायचं असेल तर प्रकाश कुंटेंच्या 'हंपी'ची चित्रपट गृहात जाऊन एकदा अवश्य भेट घ्या. पण छायाचित्रण आणि संगीत या पलीकडे फारसं वेगळं काही हाती लागेल याची अपेक्षा बाळगू नका, म्हणजे झालं!