धगधगते केरळ
 महा एमटीबी  18-Nov-2017

 
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी
 
केरळ आणि डाव्या विचारसरणीचा ‘दहशतवाद’ हे समीकरणच जुळलेले आहे. देशभर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहिष्णुतेबद्दल गळा काढणारे केरळबद्दल सोयीस्करपणे गप्प बसलेले असतात. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी केरळची राजधानी तिरुवंनतपूरम् येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची महारॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत जळगावमधून सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा तेथील अनुभव शहारे आणणारा आहे. आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि केरळमधील दडपशाही याचा अनुभव त्यांनी घेतला. 
 
 
अभाविपच्या महारॅलीसाठी जिल्ह्यातून ३७ आणि महाराष्ट्र प्रांतातून ३०७ कार्यकर्ते रवाना झाले. हे आंदोलन केरळच्या विरोधात नव्हे तर तेथील वामपंथीय दलाच्या दहशतवादाविरूध्द आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे होत असलेले हनन याबद्दल असल्याने देशभरातून कार्यकर्ते आले होते. जळगावहून तिरुवंनतपूरम् ला जातांना १० रोजी कन्नूर जिल्हा पार करत असतांना अभाविप कार्यकर्त्यांचा फोन आला की, तिरुवंनतपूरम् येथे भित्तीचित्र लावण्यावरून अभाविपच्या कार्यकर्त्यावर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्याचा हात कापला. यामुळे वातावरण गंभीर आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या गाडीच्या प्रत्येक बोगीजवळ स्वयंसेवक उपस्थित झाले होते. रॅलीत सहभागी प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करण्यात आले होते.
 
 
४० हजार कार्यकर्त्यांची व्यवस्था तीन जिल्हयांमध्ये करण्यात आली. राज्यनिहाय निवासव्यवस्था करण्यात आली होती. जळगावच्या कार्यकर्त्यांची निवासव्यवस्था ग्रामीण जिल्ह्यात भारती विद्यालयात करण्यात आली होती. कम्युनिस्टांची प्रचंड दहशत असल्याने सुरक्षेसाठी विद्यालयाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती.
 
 
११ नोव्हेंबर रोजी केरळची राजधानी तिरुवंनतपूरम् येथे अभाविपची महारॅली होती. यात देशभरातून ४० हजारापेक्षा कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांनी रॅली ५ कि.मी. पायी चालून दुपारी १ वाजेला समारोप स्थळी पोहचली. येथील नागरिकांनी रॅलीतील भारतमातेचे भरभरून स्वागत केले. रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी मंचावर अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री विनय बिदरे, राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, राष्ट्रीय मंत्री आशिष चव्हाण यांनी या जनसमुदायास मार्गदर्शन करतांना राजकीय हेतू ठेवून २८४ राष्ट्रीय विचारधारेच्या कार्यकर्त्यांची हत्त्या वामपंथीदलाने केली आहे आणि अजूनही होत आहेत. याची चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, अशी मागणी करण्यात आली.
 
 
कम्युनिस्टांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी
 
रॅली दरम्यान जेथे - जेथे अभाविपचे भित्तीचित्र लावण्यात आले होते. त्या प्रत्येक भित्तीचित्राच्यावर कम्युनिस्टांचे भित्तीचित्र लावण्यात आले होते. जेथे जेथे अभाविपचे ध्वज लावण्यात आले होते, त्या ध्वजांच्या वर कम्युनिस्टांचे ध्वज लावण्यात आले होते. जेथे राष्ट्रीय विचारधारेच्या ज्या कार्यकर्त्यांची हत्त्या झाली आहे त्यांचे छायाचित्र लावले होते त्या ठिकाणी अशा हत्त्या झाल्याच नसल्याचे कम्युनिस्टांनी पोस्टर्स लावले होते. यावर कळस म्हणजे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असे पोस्टर्स कम्युनिस्टांनी जागोजागी लावलेले होते.
 
 
महारॅलीच्या दुसर्‍याच दिवशी हत्त्या
 
११ रोजी महारॅलीचा समारोप झाला आणि १२ रोजी देशभरातून आलेले कार्यकर्ते परतीला निघाले होते. जळगावचे कार्यकर्ते सकाळी ९.३० वाजेच्या गाडीने निघाले आणि दुपारी २ वाजेच्या सुमारास त्रिशूर येथे २६ वर्षीय आनंद या राष्ट्रीय विचारधारेच्या कार्यकर्त्याची निघृण हत्त्या करण्यात आल्याची माहिती दुपारी २ वा. मिळाली. यामुळे वातावरण गरम झाले. रात्री १० वाजेच्या सुमारास स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे टी शर्ट परिधान केलेले सुमारे ४० कार्यकर्ते गाडीत घुसले आणि युवकांना उठवून तुम्ही अभाविपचे कार्यकर्ते आहात काय ? अशी विचारणा करू लागले. गाडीत महाराष्ट्र आणि राजस्थानचे सुमारे ७०० ते ८०० अभाविपचे कार्यकर्ते असल्याने एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. पण मार्गात कोठेही हल्ला होवू शकतो म्हणून रात्री ३ वाजेपर्यंत कार्यकर्ते झोपले नाहीत. त्रिशूर येताच कार्यकर्त्यांनी कोणताही गोंधळ न करता घोषणांनी आनंदच्या हत्त्येचा निषेध केला. कर्नाटकची सीमा लागल्यानंतरच कार्यकर्त्यांनी निद्रा घेतली.
 
 
केरळची राजधानीच कम्युनिस्टांच्या दहशतवादाचे माहेरघर
 
कोणत्याही राज्याची ओळख त्या राज्याच्या राजधानीवरून अधिक होत असते. राज्याची राजधानी कशी आहे, तेथील वातावरण कसे आहे यावरून राज्यातील वातावरणाचा कयास लावला जातो. तिरूवअनंतपूरम् येथेच कम्युनिस्टांची दहशत आहे. त्यांच्या दडपशाहीमुळे देशभरातून आलेले कार्यकर्ते तिरूवअनंतपूरममध्ये भ्रमणसुध्दा करू शकले नाही. येथे आलेल्या कार्यकर्त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? याची जाणीव येथे झाली. कम्युनिस्ट राजवट वगळता अन्य ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा र्‍हास म्हणून काही लोक गळे काढतात. परंतु केरळबद्दल कोणी बोलत नाही. अशा कथित समाजसेवकांनी केरळमध्ये येवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन पहावा, राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत हक्कांचा खून कशा प्रकारे येथे होतो? याचा अनुभव त्यांनी घेवून पहावा, असाच विचार येथे आलेल्यांच्या मनाला शिवला.
 
 
माझ्या डोळ्यांनी डावे दिसतच नाहीत....
 
या महारॅलीत मंचावर उपस्थित असलेले सनुपजी यांनी २००८ ला विद्यापीठाची निवडणूक लढवून ते विजयी झाले. म्हणून कम्युनिस्टांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा डावा डोळा निकामी केला. नकली डोळा त्यांनी सभेतच मंचावर काढून दाखवला. डाव्यांनी केलेल्या कृत्यामुळे अधिक गतीने राष्ट्रीय विचारधारेच्या कामास लागलो आहे. डावा डोळाच नसल्याने डावे दिसतच नाही आणि उजवेच दिसतात असे विधान त्यांनी केले.
 
 
राष्ट्रीय विचारधारेचा स्वीकार म्हणून पाय कापले...
 
मंचावर उपस्थित असलेले सदानंद मास्टर हे वामपंथीं विचारधारा मानत नाहीत आणि राष्ट्रीय विचारधारा स्वीकारली तसेच ते काम करतात म्हणून त्यांचे दोन्ही पाय गुढघ्यापासून खाली कापून टाकण्यात आले. त्यांना व त्यांच्या परिवाराला वामपंथीदलाने त्रास दिला. त्यांनी देखील याप्रसंगी मार्गदर्शन केले.
 
 
तीन दिवस तीन हजार कार्यकर्ते अहोरात्र झटले
केरळमधील कम्युनिस्टवाद जगासमोर यावा, यासाठी अभाविपची महारॅली आयोजित करण्यात आली होती. त्यात देशभरातून ४० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी ३ हजार स्वंसेवक सलग तीन दिवस झटत होते. त्यांनी या तीन दिवसात विश्रांती घेतली नव्हती. आम्ही कम्युनिस्टांना दररोज सहन करतो. तुम्ही आमच्यासाठी येथे आला आहात. तुम्हाला धक्का लागता कामा नये, या विचाराने हे कार्यकर्ते परिश्रम घेत होते. ज्या तलावावर कार्यकर्ते अंघोळीसाठी जात होते तेथील सुरक्षेसाठी सकाळी ४ वाजेपासून स्वंयसेवक तत्पर असत. येथील भगिनींनी ५० हजार कार्यकर्त्यांच्या भोजनासाठी पोळया केल्या हे विशेष.
 
 
सिध्देश्‍वर लटपटे
 
 
शब्दांकन - निलेश वाणी