गिरणगावातील संघ
 महा एमटीबी  18-Nov-2017
 

 
 
गेल्या ९०  वर्षांच्या वाटचालीत रा. स्व. संघ अगदी तळागाळात पोहोचला. गावखेड्यापासून ते शहरापर्यंत संघाच्या शाखांचा विस्तार झाला. स्वयंसेवकांचे ऋणानुबंध अधिकाधिक दृढ झाले. तेव्हा, मुंबई आणि परिसरातील अशाच ज्येष्ठ स्वंयसेवकांच्या ‘ज्येष्ठ स्नेहमिलना’चे संघाच्या कोकण प्रांताच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १९ नोव्हेंबरला मुंबईतील चेंबूर नाका येथील चेंबूर हायस्कूलच्या मैदानावर संध्याकाळी ४ ते रात्री ८.३० या वेळेत हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या निमित्ताने गिरणगावातील संघकार्याचा घेतलेला हा आढावा...
 
 
सध्या ठाण्याच्या आमच्या शाखेवर एकच विषय आहे. ७ जानेवारी- ‘हिंदू चेतना संगम’. सज्जनशक्तीला जागृत करण्याच्या प्रयत्नांना गती आलेली दिसत आहे. नव्या-जुन्या स्वयंसेवकांच्या नोंदणीला जोर येत आहे. दरिद्री नारायणाच्या सेवाकार्यातून समरसतेचा भाव जागवून, गेली ९० वर्षे चाललेल्या हिंदू संघटनेने अनेक उपक्रमांतून नवनवीन आयामउभे केले आहेत. अवहेलना, विरोध यांना समर्थपणे तोंड देऊन उभ्या राहिलेल्या हिंदू संघटनेचा समाजाने स्वीकार केला आहे. अपेक्षाही केल्या आहेत. स्पर्धा, हाव, चढाओढ, मत्सर, भ्रष्टाचार, बोथट संवेदना यातून मानवी जीवनाला, मूल्यांना हादरे बसत आहेत. असुरक्षितता व अशांतता वाढीस लागली आहे. रा. स्व. संघाकडे जनता आशेने बघत आहे. संघ स्वयंसेवकांबाहेरही समाजात सकारात्मक विचार करणारे अनेक कर्तृत्ववान सज्जन आहेत. त्यांना राष्ट्रकार्यात जोडण्याचा हा उपक्रमआहे. मी ज्यावेळी साठीच्या दशकात संघकार्यात होतो, त्यावेळीही असे उपक्रमहोत असत. त्या काळातील झपाटलेले कार्यकर्ते आणि कार्यक्रम, संघ कार्यकर्त्यांची समाजातील पत आणि पोच, विशेषतः गिरणगावातील संघाचा अभाव, त्यांच्या आठवणी आणि प्रसंग दृष्टीसमोरून हलत नाहीत.
 
   
कामाठीपुरा-कुंभारवाड्यापासून प्रभादेवी-दादर आणि माझगाव-चिंचबंदरपासून शिवडी-वडाळा हा गिरणगाव म्हणजे कामगार वस्ती. राजकीय क्षेत्रात, कामगार क्षेत्रात डाव्यांचा प्रभाव असला तरी सांस्कृतिक, सामाजिक चळवळीत संघाचाच दबदबा अधिक. सार्वजनिक गोविंदा, गणपती, नवरात्री यांचा उत्सव असो किंवा सत्यनारायणाची पूजा, ज्ञानेश्वरीची पारायणे असो; त्यात भरवशाचा, विश्वासाचा कार्यकर्ता म्हणजे संघाचा स्वयंसेवक, हेच समीकरण बनले होते. बाल-तरुणांच्या फुललेल्या शाखा, शिस्त, घरोघरचे मित्रत्वाचे संबंध यातून रा. स्व. संघाला गिरणगावात आदराचे स्थान प्राप्त झाले. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांशी स्नेहाचे संबंध, वस्तीतील व्यापारी, डॉक्टर, मिल कारखान्यातील अधिकारीवर्ग, भजनी मंडळी, व्यायामशाळा, खेळाडू यांना संघ दूरचा वाटला नाही. गिरणगावातील आवडत्या हुतूतू-कबड्डीत संघ स्वयंसेवक आघाडीवर. पूज्य गुरुजींनी एका हुतूतूच्या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचे कौतुक केल्याचे अनेकांनी पाहिले आहे. कॉ. कृष्णा देसाई, भाई कांदळगावकर, गुलाबराव गणाचार्य, बापूराव जगताप, डॉ. मटकर, महापौर वरळीकर, परशुरामपुप्पाला, सयाजीराव सिलम, एन. एम. कांबळे, के. एल. देसाई अशा अनेक राजकीय नेत्यांना संघ कार्यकर्त्यांचे वावडे नव्हते. विचार भिन्न असले तरी संबंध सौहार्दाचे. डॉ. लीला अल्वारिस, अहिल्याताई रांगणेकर, प्रमिला दंडवते यांच्याकडे सहज उठून जाण्यासारखे दृढ संबंध. या अनेकांच्या आपुलकीचा अनुभव आम्ही घेतला आहे. कधी गोवामुक्ती आंदोलनात, तर कधी संयुक्त महाराष्ट्र समितीत, गोरक्षणासाठी सह्या संकलनात, रामपादुका पूजनात त्यांचे सहकार्यही लाभले आहे. संघाचे अनेक कार्यकर्ते गिरणी कामगारांच्या संघटनात, पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉकच्या युनियनमध्ये पदाधिकारी असत. आंदोलनाचे नेतृत्व करीत. पदरचे पैसे खर्च करणे, समाजसेवेसाठी वेळ देणे व कशाचीही अपेक्षा न करणे; हे संघ स्वयंसेवकच करतील यावर त्यांचा भरवसा. त्याग, प्रामाणिकपणा, परिश्रमआणि सर्वांशी मिळवून घेण्याची वृत्ती याची शिकवण त्यांना संघशाखेवरच मिळाली. ’समरसता’ हा शब्द त्यांच्या कोषात नव्हता, पण आपण एकमेकांचे बंधू आहोत, याची जाणीव त्यांना होती. हिंदी, मराठी, तेलगू या भाषांत कधी भांडण नव्हते, नाराजी नव्हती. त्यांना जातीचे वावडे नव्हते. बहुतेक सर्वजण मागासवर्गीय होते, पण हिंदुत्व खणखणीत आणि अस्सल होते. बौद्धिक वर्गातून आणि कार्यक्रमातून ते घट्ट झाले.
 
 
कामगार भागातील कमी शिकलेल्या, अशिक्षित, वंचित समाजात हिंदुत्वाचा विचार रुजविणे, कोणतीही मागणी समोर नसताना आपल्या व्यवहारातून हिंदुत्वाचे, समानतेचे विचार रुजविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचा उल्लेख न करणे कृतघ्नपणाचे ठरेल. गिरणगावाबाहेरून संघ कार्यासाठी शाखा सुरू करण्यासाठी कामगार वस्तीत येऊन येऊन जे त्यांच्याशी एकरूप झाले, त्यात मुकुंदराव दामले, तात्या बापट, अण्णा सोहनी, बाळासाहेब जोग, दत्ता प्रधान, चंदू बर्वे यांचा उल्लेख केलाच पाहिजे. त्यांनी कामगार वस्तीतून कार्यकर्त्यांचा संच उभा केला. नामदेवराव घाडगे, वामनराव परब, आबा मयेकर, रमणभाई शहा, भाई कांबळी, माधव पालांडे, जनार्दन नलावडे, राममयेकर, मामा चव्हाण, तात्या रेडकर, प्रभाकर केळुसकर, गजानन भोवर, लक्ष्मण मराठे, दत्ता गंधम, शंकर गोखले, रामधामापूरकर, कृष्णा पाटील, मारुती खोत, लक्ष्मण केळकर आणि कितीतरी. समज, शिस्त, निरपेक्षता, अविश्रांत परिश्रमांनी त्यांनी संघ झोपडपट्टीत नेला, चाळीत पोहोचविला. होतकरू तरुण-बालांना सर्व प्रकारच्या अडचणीत मदत करून सबल बनविले. समाजात संघाचा प्रभाव वाढला, तो याच कार्यकर्त्यांच्या व्यवहारातून.
 
 
x या कार्यकर्त्यांच्या आठवणीबरोबर त्या भागात झालेल्या कार्यक्रमांनाही विसरता येणार नाही. मी वरळी भागाचा कार्यवाह होतो. १९५९ साली प्रांताचा उपस्थिती दिन होता. भागातील सुमारे १० हजार कुटुंबांच्या संपर्कातून २५०० तरुण आणि २००० बाल संघ स्थानांवर उपस्थित होते. वरळी शाखेत तरुणांची उपस्थिती ११२५, तर महालक्ष्मीच्या सायंशाखेत ४०० वर बालांची उपस्थिती. दोन महिने एकच विचार ‘उपस्थिती दिन.’ नैमित्तिक कार्यक्रमाबरोबर गणवेश, उपस्थिती, शिबीर या सर्वात आघाडीवर राहण्याचा प्रयत्न. कार्यकर्ते अशिक्षित असले तरी निष्ठा अजोड. वरळी शाखेने गुरुदक्षिणा १००० रुपये करण्याचे ठरविले. त्यावेळी कामगारांचा पगार होता दरमहा ६२ रुपये. गणशिक्षक व वरच्या स्तरावरील कार्यकर्त्यांनी किमान २५ रुपये गुरुदक्षिणा अर्पण करण्याचे शाखा कार्यवाहनी ठरविले. एके दिवशी सकाळी ८ वा. कार्यवाह गंगारामहणमल्ला माझ्या डॉ. वसतिगृहाच्या निवासावर आले. हॉस्पिटलची ड्युटी असल्याने मीही घाईत होतो. गुरुदक्षिणा उत्सव व समर्पणाची माहिती त्यांनी मला दिली. अपेक्षाही व्यक्त केली. मी भाग कार्यवाह असलो तरी वरळी शाखेचा स्वयंसेवक होतो. त्यांची गंमत करण्यासाठी मी म्हटले, ‘‘मला हे कसे शक्य आहे? मला घरून येणार्‍या मनिऑर्डरचे पैसे संघ कामासाठी प्रवासातच खर्च होतात.’’ कार्यवाह चिंतेत. ते म्हणाले, ‘‘आपण घेतलेल्या निर्णयाचे पालन केलेच पाहिजे. उत्सवाच्या अगोदर मी तुम्हाला २५ रुपये आणून देतो, पण त्याची वाच्यता नको.’’ अशिक्षित, गरीब गिरणी कामगारांचे निर्णय पाळण्याचे, आपल्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचा मान राखण्याची समज व स्वतः खस्ता खाण्याचा व्यवहार, हा संस्कार त्यांना संघ शाखेने कधी दिला, माहिती नाही. एका शाखेवर धुळे जिल्ह्याचे कार्यवाह भगवा ध्वज दिसला म्हणून आले. शाखा विकीर झाल्यावर त्यांनी चौकशी केली धर्मशाळेची वा मंदिराची. मुंबईत ते आले होते हायकोर्टाच्या केसकरिता. नातेवाईकाकडे उतरायचे असे ठरवून आले. नातेवाईकाच्या घराला कुलूप पाहून ते अस्वस्थ झाले. मुक्कामकोठे करायचा? प्रश्नच. शाखेचा मुख्य शिक्षक तेलगू भाषिक. त्याने पाहुण्यांची पिशवी हातात घेतली. ‘‘चला माझ्या घरी,’’ म्हणून त्यांना घरी नेले. घर म्हणजे १० १२ची बीडीडी चाळीची खोली. जेवू-खावू घातल्यावर घरच्या चौपाईवर त्यांची विश्रांतीची सोय करून पत्नी आणि २ मुलांना पाठविले सार्वजनिक गॅलरीत. सकाळचा चहा, फराळ झाल्यावर कामावर न जाता त्यांना हायकोर्टापर्यंत सोबत केली. ना नाते, ना परिचय, भाषा भिन्न, जातही वेगळीच.
     
 
अपरिचित स्वयंसेवकाची सोय करण्यासाठी पदराला चाट लावण्याचे शिक्षण, संस्कार देणारी शाळा कोणती? असा विचार मनात आला, तर गैर नाही. बंधुत्वाचा विचार व्यवहारात उतरणे सोपे नाही. गिरणगावात असे अनेक निष्ठावान, शिस्तीचे पालन करणारे, सातत्याने जीवन जगणारे स्वयंसेवक मला उमगले. अडीअडचणीत, सुखदुःखात दैनंदिन शाखा न चुकविणारा स्वयंसेवक अशाच शाखेत आपणाला दिसेल की, ज्याला उच्च तत्त्वज्ञान, धार्मिक चर्चा, अध्यात्मकळत नाही, पण प्रतिज्ञेचे पालन करण्यावर तो ठामअसतो. शाखेचा कार्यवाह संघस्थानावर उशिरा आल्यावर त्याची चौकशी होणारच. शाखेवर जिल्हा प्रचारक शिवरायजी तेलंगांचा प्रवास. कार्यवाह धावत आले. ध्वज प्रणामकरून घरी जाण्यासाठी शिक्षकांना प्रणामकरून घरी जात असताना शिवरायजींचे लक्ष त्यांच्याकडे गेले. ‘‘अरे, तुम्ही कार्यवाह उशिरा आलात आणि ताबडतोब जाता?,’’ कार्यवाह रामुलु छिदुमल्ला म्हणाले, ’’घरात मुलाचे प्रेत ठेविले आहे. अंत्यविधीला वेळ असल्याने किमान ध्वजप्रणामतरी व्हावा, म्हणून शाखेत आलो. आता जाणे जरुरीचे आहे.’’ शाखा कार्यवाह निघून गेल्यावर शिवरायजी म्हणाले, ’’कर्मठपणाचे, प्रसंगी स्वतःसंबंधी कठोर व्हायचे शिक्षणसंस्कार त्यांच्याकडूनच घेतले पाहिजेत. ही निष्ठा, सातत्य, कणखरता तो कोणत्या विद्यापीठात शिकला?’’
 
 
अनेक प्रसंग, आठवणी उसळून वर येतात. गिरणगावात अशिक्षित, अडाणी, गरीब पण माणुसकी जगणारे स्वयंसेवक भेटले. त्याग, समज, आपुलकी आणि हिंदुत्वाचा अभिमान बाळगणार्‍या स्वयंसेवकांचा सहवास प्राप्त झाला. अहो भाग्यम! आता गिरणगाव उद्ध्वस्त झाले. गिरण्यांचा भोंगा बंद झाला. चाळींची जागा मॉल आणि गगनचुंबी इमारतींनी घेतली. गिरणगावची संस्कृती नष्ट झाली. माणसं तर केव्हाच परागंदा झाली. उरल्या आठवणी, माणुसकीच्या! 
 
 
- डॉ. पां. रा. किनरे