रिबार स्टील कपलर - बांधकाम क्षेत्रातील एक उपयुक्त उत्पादन
 महा एमटीबी  17-Nov-2017

 
 
 
माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजांचा समावेश होतो. त्यातील ‘निवारा’ ही गरज जितकी महत्त्वाची, तितकीच त्याची पूर्तता करणे तेवढेच कठीण. तरीही गरीब आणि मध्यमवर्गीयांचे आपले स्वतःचे एक हक्काचे घर असावे, हे स्वप्न असते आणि अनेकदा ते स्वप्न स्वप्नच राहून जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे, बांधकामाच्या गगनाला भिडणार्‍या किमती. मात्र, नवीन तंत्रज्ञानामुळे बांधकामक्षेत्रातील स्टीलच्या खर्चात बचत होऊ शकते. त्यामुळे घर बांधणीतील स्टील खर्चात सुमारे ४० टक्के बचत होऊ शकते. इतकेच नव्हे तर घराच्या बरोबरीने विविध इमारती आणि रस्तेदेखील बांधले जातात. यात हॉस्पिटल, कारखाना, शाळा, हॉटेल अशा अनेक इमारतींचा समावेश असतो. यामध्ये पाटबंधारे, धरणे, विमानतळ, मेट्रो रेल्वे, गगनचुंबी मोठ्या इमारती, व्यापारी संकुले अशा विविध ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरता येते.
 
 
बांधकाम खर्च कमी करण्यासाठी परदेशात नित्यनवे संशोधन होत असते. त्यात ‘कपलर’ या नव्या तंत्राचा वापर केला जातो. आपल्याकडे त्याचा फारसा प्रसार नाही. मात्र, मूळचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी, सध्या पुण्यात वास्तव्य असलेले सुमित नेरकर यांनी आपल्या अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी आणि वोल्वो कार कंपनीतील अनुभवानंतर याबाबत विविध प्रयोग सुरू केले. त्यात त्यांना यश मिळाल्यानंतर पुण्यात त्यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्याला आज चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘न्यू ग्राईड वेल’ (स्पेशल परफॉर्मर) असे त्यांच्या कंपनीचे नाव असून ‘रिबार स्टील कपलर’ हे त्यांच्या उत्पादनाचे नाव आहे. अथक प्रयत्नातून या उत्पादनाला ‘इंडियन सिव्हिल असोसिएशन’च्या मदतीने सुमित नेरकर यांनी भारतीय मार्केटमध्ये आणले. आता तर या उत्पादनाच्या उपयुक्ततेमुळे परदेशातूनदेखील मागणी वाढत आहे. परदेशात त्याचा वापर वाढल्यास मोठ्या प्रमाणावर परकीय चलनदेखील देशाला मिळणार आहे.
 
 
या उत्पादनाचे वैशिष्ट्य म्हणजे, बांधकामात त्याचा वापर केला असता वाया जाणारे स्टील (पोलाद) साहित्य त्यामुळे वाचते आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त बचत होते. एखाद्या घरासाठी जे साहित्य लागते, त्यात इतकी बचत होत असेल तर ही खूपच मोठी बाब म्हणायला हवी. मोठ्या बांधकामात तर त्याचे मूल्य केवळ अनमोल आहे. बांधकामाची शक्ती वाढणे, उत्पादनक्षमता वाढणे, बांधकामडिझाईनमध्ये या उत्पादनाच्या वापरामुळे अधिक लवचिकता आणता येते, तसेच मजुरीवरील खर्च कमी होऊ शकतो. हीही या उत्पादनाची जमेची बाजू आहे. कल्पकता आणि नवे काही करण्याची धडाडी यामुळे या उत्पादनाला चांगला प्रतिसाद दूरदूरहून मिळत आहे. नाशिक, पुणे, मुंबई येथे ’न्यू ग्राइंड वेल’ कंपनीच्या शाखा आहेत.
 
 
भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या उपस्थितीत बांधकामक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेल्या या ‘कपलर’चे प्रात्यक्षिक त्यांनी नुकतेच उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांना दाखविले. याबाबतची माहिती घेतल्यावर मंत्रिमहोदय प्रभावित झाले. यावेळी उत्पादक सुमित नेरकर, सल्लागार यशवंत वेसिकरदेखील उपस्थित होते. बांधकामातील स्टील खर्चात ४० टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याने या ‘कपलर’चा उपयोग शासकीय कामातील बांधकामात व्हावा, अशी विनंती यावेळी त्यांनी केली. याबाबत सकारात्मक विचार करू, असे पोटे यांनी त्यांना सांगितले. याबाबत बोलताना प्रदीप पेशकार यांनी सांगितले, की, ‘‘शासनाच्या विविध योजनांचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा आणि स्वतः प्रगती करून समाजापर्यंत प्रगतीचा लाभ पोहोचवावा. तसेच अन्य उद्योजकांपुढेदेखील चांगले उदाहरण घालून द्यावे, यासाठी आपण प्रयत्नशील असून अनेक उद्योजकांना शासनाच्या नवीन योजना आणि तरतुदी यांचा लाभ मिळाला आहे. मंत्रिमहोदयांनी सरकारच्या माध्यमातून उत्पादनास संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे.’’
 
 
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या ‘स्टार्ट अप’ तसेच ‘मुद्रा’ योजनांचा लाभ या उत्पादनास मिळणार आहे. या क्षेत्रात अनेक नव्या संधी असून त्या ओळखल्या तर सुमित नेरकर यांच्याप्रमाणे अन्य उद्योजकांनादेखील त्यांचा लाभ होऊ शकतो. आपला उद्योग-व्यवसाय करताना देशासाठी काहीतरी करण्याची संधी त्यातून मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक तरुण उद्योजकतेकडे आकृष्ट झाले तर नवल वाटायला नको. 
 
- पद्माकर देशपांडे