ईश्वर सेवा..
 महा एमटीबी  17-Nov-2017


 

नुकताच मुंबईतील ‘बेस्ट’ समितीने ‘बेस्ट’च्या भाडीवाढीला हिरवा कंदील दाखविला. खरंतर कुठल्याही सेवा देताना तिचे शुल्क आकारले जाते, त्यामुळे सेवेचा दर्जा वाढतो. अर्थशास्त्रात कुठलीही गोष्ट फुकट नसते, त्याचे मूल्य प्रत्यक्षरित्या, अप्रत्यक्षरित्या कुणीतरी अदा करत असतं. वाजवी शुल्क आकारून सेवा दिल्यास त्याचा फायदा हा सेवा देणाऱ्यास आणि ग्राहकालाही होत असतो. पण आपल्याकडे भाडेवाढ म्हणजे ‘सामान्य माणसांवर बोजा’ अशी ओरड केली जाते. अजून समितीने संमत केलेली भाडेवाढ अमलात आलेली नाही. ही भाडेवाढ फक्त लांब पल्ल्याच्या म्हणजेच साधारणतः सहा कि.मी.च्या पुढे १ ते १२ रुपये वाढ अशी आहे. यात मासिक पासचाही समावेश आहे. म्हणजेच सध्या १४ रुपये भाडे असल्यास आता १५ रुपये आकारले जातील, तर जिथे ४६ रुपये भाडे असल्यास तिथे ५७ रुपये आकारले जातील. पण ही भाडेवाढ का करावी लागली, याचा विचार करणे गरजेचे आहे आणि त्याचे कारण म्हणजे तोट्यात धावणा-या ‘बेस्ट’ला नफ्यात आणणे. आयुक्तांनी जे प्रस्ताव मांडले होते, त्यापैकी एक भाडेवाढीचा प्रस्ताव होता. त्यांनी बसेस भाड्याने देणे, तोट्यातील मार्ग बंद करणे, कर्मचाऱ्यांचे भत्ते गोठवणे असे प्रस्तावही मांडले होते. यामुळे बेस्टचे ८०० कोटी वाचले असते, पण या प्रस्तावांना समितीकडून केराची टोपली दाखवली गेली. पण, शिक्षणासाठी पाल्यांनादेण्यात येणारी आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, गृहकर्जावरील अर्थसहाय्य, व्याजाची योजना, वाहतूक भत्ता व वाहन कर्ज देणे बंद केले असून ‘अ’ श्रेणी अधिकाऱ्यांची संख्या कमी करणे, नैमित्तिक रजेचे रोखीकरण बंद करून प्रोत्साहन भत्ते गोठविणे, याशिवाय ‘अ’ व ‘ब’ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा प्रवास भत्ताबंद करण्यात आला. हे प्रस्ताव मान्य केले म्हणजेच हे ही नसे थोडके. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की, ‘बेस्ट’ची सुविधा नागरिकांसाठी आहे. त्यात लोकांना रोजगारही मिळावा हाही हेतू आहे. पण फक्त यात कर्मचाऱ्यांचा फायदा होत असेल आणि संस्थेला आणि नागरिकांना तोटा सहन करावा लागत असेल तर कर्मचाऱ्यांचे हित ही दुय्यम बाब आहे. नेमकी हीच बाब ‘बेस्ट’मध्ये आजवर दुर्लक्षित केली गेली. आता या भाडेवाढीची मात्रा लावल्याने ‘बेस्ट’चा परिवहन विभाग नफ्यात येईलच, हे सांगता येत नाही. कारण, यापूर्वीही अनेकदा भाडेवाढीचे अस्त्र उगारुनही ‘बेस्ट’च्या नफ्यात वाढ झाली असली तरी तोटा मात्र भरुन निघालेला नाही. तेव्हा, खाजगी असो वा शासकीय सेवा, ‘ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा’ हा मूलमंत्र जपल्याशिवाय संस्थेची भरभराट होणे नाही, याचे भान सेवा देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनीही ध्यानात घ्यायला हवे.

 

 

अद्ययावतीकरण काळाची गरज

कुठलाही समाज किती समृद्ध आहे याचे मोजमाप करायचे असेल, तर ज्ञानाचा निकष हा सर्वप्रथम लावला पाहिजे. आर्थिक समृद्धी आली म्हणजे समाज संपूर्ण संपन्न होत नाही. बऱ्याचदा तर आर्थिक समृद्धीमागे चंगळवाद दब्या पावलांनी नकळत प्रवेश करता होतो. पण समाजातील ज्ञानाची समृद्धी कितीही वाढत गेली तरी चंगळवादाचा त्याला स्पर्श होत नाही. कारण, ज्ञान हे व्यक्ती, समाज आणि एकूणात देशाला प्रगल्भतेकडे घेऊन जाते. अशा या मराठी भाषेला ज्ञानाचा समृद्ध वारसा लाभला आहे. या ज्ञानाचीच मंदिरे म्हणजे महाराष्ट्रातील वाचनालयं आणि ग्रंथसंग्रहालयं. अशी कित्येक ग्रंथसंग्रहालये आहेत, ज्यांनी शतकोत्तर टप्पे गाठले आहेत. अनेक धक्के पचवून ती आजही मानाने उभी आहे. या ग्रंथसंग्रहालयांनी समकालीन वृत्तपत्रं, मासिकं, पुस्तके जतन करून ठेवली आणि ती अभ्यासकांना, संशोधकांना उपलब्ध करून दिली. यामुळे आपला ज्ञानाचा वारसा अधिक समृद्ध होण्यात खूप मोठा हातभार लागला. पण कुठलाही वारसा टिकवण्यासाठी किंवा अधिक समृद्ध करण्यासाठी त्याला आधुनिकीकरणाची जोड द्यावी लागते. असाच प्रयत्न ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाने केला आहे. डिजिटायझेशनच्या प्रकल्पातून संग्रहालय १८ लाख पानांचे डिजिटायझेशन करणार आहे. या ग्रंथसंग्रहालयात १,७७७ एवढी दुर्मीळ पुस्तकं आहेत. सध्या दररोज १० हजार पाने स्कॅन करण्याचे लक्ष्य आहे. ग्रंथसंग्रहालयातील पुस्तकांच्या एकूण १८ लाख पानांचे डिजिटायझेशन होणार आहे. यासाठी तब्बल ५० लाखांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला आहे. निश्चितच, या डिजिटायझेशनचा संशोधकांना खूप फायदा होणार आहे. तसेच आता हे ग्रंथ जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून वाचणे अधिक सहज आणि सोपे होणार आहे. काही ग्रंथालयांनी या अगोदरच आधुनिकीकरणाची कास धरली असली तरी अनेक छोट्या-मोठ्या ग्रंथालयांनीही वाचनाचा हा डिजिटल मार्ग आता स्वीकारलाच पाहिजे. तसेच सगळी ग्रंथसंग्रहालये एका छताखाली, एका क्लिकवर कशी वाचकांपर्यंत उपलब्ध होतील, याचाही विचार व्हायला हवा. आजच्या काळात पुस्तकांनीही आधुनिक रूपडे धारण केले आहे आणि याचा पुरेपूर फायदा हा संशोधक आणि अभ्यासकांना होतो आहे, यात शंकाच नाही. यासाठी ग्रंथालयांनीही व्यापक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. साहित्यसूची इंटरनेटवरून आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध केल्यास गरजेच्या पुस्तकांसाठी वाचकांची वणवण थांबेल. याचा फायदा ग्रंथालयांनाही होईल. दुर्मीळ पुस्तकं फाटतात. त्यांची निगा राखणे नेहमीच शक्य होत नाही. त्यामुळे डिजिटायझेशनमुळे ही पुस्तकं जतन करणे सहजसोपे होईल. आधुनिकीकरणामुळे ग्रंथालयांच्या समृद्धीत भर पडेल, हे नक्की!

 

- तुषार ओव्हाळ