डाळिंबाचे दाणे रगडिता तेलही गळे
 महा एमटीबी  17-Nov-2017


 

हल्लीची पिढी नवीन काहीतरी करण्याच्या शोधात नेहमीच असते. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीपाद पाटील. शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि लोणावळ्यातील एका नामांकित कंपनीत सध्या चांगल्या पगाराची नोकरी. तरीसुद्धा काहीतरी वेगळे करण्याचा डोक्यातील किडा श्रीपादला काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हता. श्रीपादच्या वडिलांची सोलापूरमध्ये तशी वीस एकर शेती आणि ते स्वत: सिद्धेश्वर पाटील भीमा साखर कारखान्यातून एक निवृत्त लिपिक आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष केंद्रीत केले. तिकडे श्रीपादने लोणावळ्यातील कंपनीमधील नोकरी सोडली आणि घरी आला, पण त्याने नोकरी करावी, चार पैसे कमवावे म्हणून घरच्यांचा आग्रह. शेवटी त्यांच्या आग्रहाखातर श्रीपादने भीमा साखर कारखान्यातच ‘असिस्टंट ट्रेनी इंजिनिअर’ म्हणून काम करायला सुरुवात केली, पण तिथेही तीच परिस्थिती होती की, श्रीपादचे अजिबात मन लागत नव्हते. आपल्या घराची पार्श्वभूमी शेतीची असल्याने त्यात काही करता येईल का, असा विचार श्रीपादच्या मनात चालू होता. दरम्यान, त्यांच्या आसपासच्या भागात डाळिंबाला जास्त भाव मिळत नाही, हे त्याच्या लक्षात आले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र डाळिंबाचे असल्याने त्यावर प्रक्रिया उद्योगाची कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्यानुसार ते कामाला लागले. इंजिनिअर झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याविषयी शास्त्रीय कारणे शोधण्याचे श्रीपादच्या जणू रक्तातच भिनले होते. त्यानुसार त्याने सोलापूरमधील डाळिंब उत्पादनाचे क्षेत्र, त्यासाठी असलेली मागणी, त्यापासून तयार होणारी उत्पादने या सर्वांविषयी माहिती गोळा केली. २०१३ मध्ये श्रीपादला समजले की, एकट्या सोलापुरात ८० हजार हेक्टरहून जास्त क्षेत्र डाळिंबाच्या लागवडीखाली आहे. तेथे प्रक्रिया उद्योगासाठी डाळिंब सहज उपलब्ध होईल. त्याची ही खटपट पाहून अखेर घरच्यांनीही त्याला पाठिंबा दिला. श्रीपादचा मोठा भाऊ मनोज एमएस्‌सी ऍग्री करत होता. त्यामुळे त्यालाही या उद्योगामागील महत्त्व पटले. शिवाय वहिनी प्रिया ही भूमिअभिलेख अधिकारी (Land records officer) असल्याने तिनेही पाठिंबा दर्शवला. श्रीपादने आधी सोलापूरमधील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रातून डाळिंब प्रक्रियेबाबत माहिती मिळवली. डाळिंबापासून काय काय बनू शकते? त्याची मशिनरी कोणती?, त्याचा एकूण खर्च किती? ही सगळी माहिती काढून शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेतले. डाळिंबाचे ज्यूस आरोग्यासाठी तर चांगले असतेच, शिवाय त्याच्या बियांचे तेल हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हितकारी ठरते. त्यामुळे श्रीपादने डाळिंबाचे ज्यूस व त्यापासून पुढे पेय बनवण्यास सुरुवात केली. 

 

अशाप्रकारे श्रीपादच्या अथक प्रयत्नानंतर ’पोमेगा’ या ब्रॅण्डचा उदय झाला, ज्याला ‘फूड सेफ्टी ऍण्ड स्टॅण्डर्ड ऍथोरिटी ऑफ इंडिया’ या संस्थेचे प्रमाणपत्रही मिळाले. प्रक्रियेसाठी लागणारी पल्पर, जॅकेटेड केटल आणि बॉयलर या तीन मशिनरी पुण्यातील भोसरी येथून श्रीपादने खरेदी केल्या. प्रतिदिन दोन टन डाळिंबांवर प्रक्रिया करण्याची क्षमता या मशिनरीमध्ये आहे. ज्यामधून सातशे लिटर ज्यूस निघते आणि दोनशे किलो डाळिंब दाण्यांपासून १८ ते २० लिटर तेलही मिळते. “तेलाचे उत्पादन अद्याप प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. त्याच्या विक्रीचे अद्याप नियोजन झालेले नाही. जागतिक बाजारात तेलाला प्रति लिटर २० हजार रुपये दर आहे,’’ अशी माहिती श्रीपादने दिली. या प्रकल्पासाठी आठ लाख रुपये बजेट असल्याचे लक्षात आल्यावर श्रीपादने टाकळी सिकंदर आणि पंढरपूर येथे राष्ट्रीय बँकेच्या शाखेमध्ये कर्जाची मागणी केली. मात्र, व्यावसायाची जागा बिगरशेतीमध्ये येत नाही, असे कारण पुढे करुन बँकांनी श्रीपादला कर्ज देणे टाळले. शेवटी त्याला सुरभी पतसंस्थेचे आर्थिक साहाय्य लाभले. त्यांनी श्रीपादला दीड लाखांचे कर्ज दिले आणि उर्वरित रक्कम नातेवाईकांकडून मिळवली आणि शेतीच्या पलीकडे जाऊन त्याला उद्योगाची साथ दिली. तेव्हा, आजची पिढी शेतीमध्ये नफा नाही म्हणून तोंड फिरवत असली तरी श्रीपादसारख्या काही तरुणांनी मात्र आपल्या कृषी प्रकल्पांतून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. पुढील प्रवासासाठी श्रीपादला भरपूर शुभेच्छा...

 

- पूजा सराफ