रक्ताचे मोल
 महा एमटीबी  17-Nov-2017


 

’घेताना तर आमच्याकडून फ़ुकट रक्त घेता ना ?

मग आता त्यासाठी इतके मोठे पैसे का मोजायचे आम्ही ?

ही शुद्ध लुटालुट आहे. तुमची एकदा तक्रारच केली पाहिजे, इ. इ. -----’

 

बोलणारा सामाजिक कार्यकर्ता अगदी तावातावाने बोलत होता आणि अर्थातच मनापासूनही बोलत होता. त्याची प्रामाणिकता मी जाणून होतो. पण हे प्रसंगच असे असतात, ज्यावेळी त्रासून गेलेल्या रुग्णाच्या नातलगास स्पष्टीकरणांपेक्षा संवेदनेची फ़ुंकर जास्त गरजेची असते. हाही कार्यकर्ता एका परिचित रुग्णासाठी रक्तपिशवी घेण्यास आला होता. आपण सामाजिक कार्यकर्ते असल्याने आपल्याला रक्तपिशवी फ़ुकटच मिळणार, या समजुतीने आलेल्या या कार्यकर्त्याचा ’रक्तपिशवीचे प्रक्रियाशुल्क द्यावे लागेल’ असे सांगितले गेल्याने चांगलाच भ्रमनिरास झाला होता. याच उद्विग्नतेपायी त्याचे वाक्ताडन चालले होते. रक्तपेढीत काम करताना असे अनुभव अगदी हमखास येतातच आणि अर्थातच अशा वेळी आम्हासारख्यांचा खरा कस लागतो.

 

रक्तदानासाठी शिबिरे लागतात तेव्हा ’रक्तदान श्रेष्ठदान’, ’रक्तदान यज्ञ’ अशा उपमांनी गौरविले गेलेले रक्तदानाचे कर्तव्य रक्तपेढीतून रुग्णासाठी रक्तघटक घेताना एकदम अधिकारांची जागा घेते. वर उल्लेख केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला थोडे शांत करुन मी एक प्रश्न विचारला,

 

’रक्तपेढ्यांना मिळालेले रक्त जसेच्या तसे रुग्णास द्यायचे असेल तर रक्तपेढ्यांचे प्रयोजनच काय ? हे काम रुग्णालयेच करु शकणार नाहीत काय ?’

 

यावर तो जरा गोंधळला. मी पुढे म्हणालो, ‘रक्तदान शिबिरातील रक्तदान ते थेट रुग्णाला रक्तघटकांची गरज असताना होणारं या रक्ताचं वितरण, या दोनच प्रसंगी आपला रक्तपेढीशी संबंध येतो. या दोन्हींच्या मध्ये रक्ताचं नक्की काय होतं, याबद्दल आपण अनभिज्ञच असतो आणि म्हणूनच असे गोंधळ होतात’. - असं म्हणून मी त्याला काहीशा आग्रहानेच रक्तपेढीच्या प्रयोगशाळेत घेऊन गेलो. रक्तगट तपासणीची स्वयंचलित यंत्रणा, घातक संसर्गांची तपासणी करण्यासाठी एलायजा आणि नॅट नावाची अद्ययावत उपकरणे, रक्तविघटनासाठी लागणारी यंत्रसामुग्री, रक्तघटक साठवण्यासाठी लागणारे विविध तापमानांचे फ़्रीजेस आणि मुख्य म्हणजे रक्तजुळवणी आणि वितरण इ. साठी चोवीस तास कार्यरत असणारी मुख्य प्रयोगशाळा हा सर्व व्याप बघितल्यानंतर ’हे सर्व’ आपण प्रथमच पाहिल्याचे या कार्यकर्त्याने बोलुन दाखविले. यानंतर मात्र आमच्या संवादाची गाडी समजुतीच्या रुळावर आली.

 

रक्तदान शिबिरे घेत असताना आपण एक शब्द कायम वापरतो. ’स्वेच्छा रक्तदान’ हा तो शब्द आहे. काय अर्थ आहे या शब्दाचा ? ’माझे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मी रक्तदान करीत असून यातून माझी कोणतीही अपेक्षा नाही’ हा स्वेच्छा रक्तदानाचा थोडक्यात आणि स्पष्ट अर्थ आहे. त्यामुळे रक्तदानाची कृती करीत असताना समाजाबद्दल वाटणारी कृतज्ञता इतकीच निखळ भावना असावी. रक्तदानाच्या या कृतीला जर आपण आपल्या अपेक्षांशी जोडु लागलो तर ’दान’ या शब्दालाच बाधा येणार आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे रक्तदान आणि रक्तवितरण या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवूनच पहायला हव्यात. शिवाय रुग्णांचा असाही फ़ार मोठा वर्ग रक्तपेढीकडे येत असतो, ज्यांचा आयुष्यात कधीही रक्तदानाशी संबंध आलेला नसतो. रक्तदान सर्वांनीच करावं, हे जरी खरं असलं तरी ज्यांना रक्त घेण्याची गरज पडते अशा रक्तग्राहकांनी म्हणजेच रुग्णांनीही क्वचितच रक्तदान केलेलं असतं, हे वास्तव समजून घेण्याची गरज आहे. यात मोठ्या प्रमाणावर थॅलेसेमियाग्रस्त बालके, डायलिसिसचे रुग्ण आणि महिलांचाही समावेश आहे. अशादेखील सर्व रुग्णांना रक्तघटकांचा आवश्यक तो पुरवठा करण्यास रक्तपेढीला बांधील असावंच लागतं, किंबहुना ते रक्तपेढीचं कामच आहे. म्हणजे सामान्यत: रक्तदान न करु शकणाऱ्या अशा आपल्याच पीडित समाजबांधवांसाठी नियमित रक्तदान करणारे रक्तदाते एक प्रकारे संजीवनी देणाऱ्या देवदुताचेच काम करीत असतात, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

 

दुसऱ्या बाजुला हेही नीटपणे समजून घ्यायला हवे की, म जेव्हा रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचतो आणि त्यामुळे त्याचे कुटुंब पुन्हा हसु-खेळु लागते, तेव्हा या रक्ताची किंमत कुठल्या संजीवनीपेक्षा कमी भरेल काय ? त्यामुळे केवळ रक्तच नव्हे तर ज्या ज्या म्हणून दैवी देणग्या निसर्गाने आपणास दिल्या आहेत, त्या कशाचीही किंमत करता येऊ शकत नाही, आणि अशी किंमत जर कुणी करु पहात असेल तर तो ठार अज्ञानी म्हणावा लागेल. मात्र असे असले तरीही शास्त्रीय पद्धतीने रक्त संकलित करणे, रक्तगट तपासणी, रक्तावाटे एच.आय.व्ही, कावीळ इ. घातक संसर्गांचे संक्रमण रुग्णास होऊ नये यासाठी त्याची तपासणी, रक्तघटकांची निर्मिती, त्यांची विशिष्ट तापमानाला साठवणूक - अशा रक्ताशी संबंधित विविध प्रक्रियांचे मूल्य चुकविणे मात्र क्रमप्राप्त असते. किंबहुना हा खर्च तर अपरिहार्यच आहे, कारण तो केल्याखेरीज संकलित रक्त रुग्णासाठी सुरक्षित आहे अथवा नाही, हे ठरवताच येणार नाही. शिवाय या प्रत्यक्ष खर्चाबरोबरच वाहतुक, वीज, देखभाल, मनुष्यबळ असे अप्रत्यक्ष पण अत्यावश्यक असेही खर्च असतातच. या सर्वांचा मेळ बसवून सामान्य रुग्णाला परवडेल असे रक्तघटकांचे वाजवी प्रक्रियाशुल्क आकारणे ही रक्तपेढ्य़ांसाठी एक कसरतच असते. रक्तघटकांचे प्रक्रियाशुल्क किती घ्यायला हवे याबाबत सरकारी पातळीवरुनही मार्गदर्शक तत्वे ठरवलेली असतात, जी रक्तपेढ्यांसाठी बंधनकारक आहेत. अलिकडेच म्हणजे २०१४ साली आलेली नवीन मार्गदर्शक तत्वे तर अत्यंत पारदर्शक आणि तांत्रिकतेला धरुन आहेत. त्यामुळे या तत्वांच्याच आधारे प्रक्रियाशुल्क आकारले जात असल्याचे पडताळून पाहणे आता कुणालाही शक्य आहे. एक जागृत ग्राहक म्हणून अशी पडताळणी करण्यातही गैर असे काहीच नाही. पण अर्थात ही फ़ारच पुढची बाब झाली. मुळात ’रक्त फ़ुकट घेतले जाते, म्हणून ते फ़ुकटच द्यायला हवे’ हा गैरसमज मात्र एक प्रकारे रक्तदात्याचाही अवमान करणारा आहे, आणि ज्या रक्तपेढ्या दिवसरात्र डोळ्यात तेल घालून रुग्णाला सुरक्षित रक्त अन तेही वाजवी प्रक्रियामूल्यात मिळावे, यासाठी काम करतात, अशा रक्तपेढ्यांचेही गैरमूल्यांकन करणारा आहे.

 

वरील प्रसंगानंतर या सर्व बाबींवर आम्ही चर्चा केली आणि काही महत्वाच्या गोष्टी प्रथमच लक्षात आल्याचे सांगत हा सामाजिक कार्यकर्ता मला म्हणाला, ’पण मग रक्तदात्यांना रक्तदान केल्याबद्दल काहीच मिळणार नाही का ?’

 

’सर्वात प्रथम, काहीतरी मिळण्यासाठी रक्तदान करायचे असते, हा घातक समज रक्तदात्यांमध्ये रुजणार नाही, याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी’, मी म्हणालो, ’कारण असे झाल्यास समाजातील सौहार्दाची घडीच विस्कटून जाईल. शिवाय वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या रक्तदात्यांनी केवळ ’काहीतरी मिळेल’ या विचाराने रक्तदान केल्यास पुढे त्या रक्ताच्या सुरक्षिततेलाही आव्हान निर्माण होईल, ते निराळेच. पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रक्तदान आणि रक्तवितरण या दोन गोष्टींचा वेगवेगळा विचार केल्यास या प्रश्नाचे उत्तर कठीण नाही, किंबहुना जनकल्याण रक्तपेढीकडे याचे उत्तर आहेच.’

 

’म्हणजे ?’ माझ्या बोलण्याचा रोख लक्षात न येऊन हा कार्यकर्ता म्हणाला.

 

’म्हणजे असं, की रुग्णाची आर्थिक स्थिती, रुग्ण ज्या रोगाने पीडित आहे त्या रोगाचे गांभीर्य आणि रक्तघटकांची सातत्याने भासणारी गरज या निकषांवर सर्व रुग्णांना आवश्यक त्या सवलतीत अथवा मोफ़त रक्तघटक वितरित करायचे, हे आपल्या रक्तपेढीचे धोरणच आहे.’ मी उत्तरलो.

 

’म्हणजे मग मी आता ज्यांच्यासाठी रक्त घेऊन जायला आलो आहे, त्यांना आवश्यक ती सवलत मिळेल ? कारण या गृहस्थांची आर्थिक स्थितीही अत्यंत बिकट आहे,’ कार्यकर्त्याने मला विचारलं.

 

’का नाही मिळणार ? त्यासाठीच तर आपण हा व्याप उभा केला आहे.’ असे म्हणून या रुग्णास योग्य ती सवलत मिळेल अशी मी व्यवस्था केली. इथे ’व्यवस्था केली’ हेच शब्द योग्य आहेत कारण अशा दिलेल्या सवलती जर पैशात मोजायच्या झाल्या तर दर वर्षी तीस ते पस्तीस लाख रुपयांच्या सवलती रक्तपेढी देत असते आणि या सवलती देता याव्यात याकरिता आम्ही समाजापुढे पसरलेली झोळी रिकामी राहणार नाही, याची काळजीही समाजच घेत असतो. त्यामुळे आमचे काम ’व्यवस्था करणाऱ्याचेच’ असते. रक्तपेढीही या गोष्टीची नित्य जाण ठेवते.

 

जाता जाता हा सामाजिक कार्यकर्ता आवर्जून मला म्हणाला, ’सवलतींच्या बाबतीत या दृष्टीने आम्ही कधी विचारच केला नव्हता. पण विचारांची हीच दिशा अधिक योग्य आहे आणि यामुळेच खऱ्या गरजूंना आवश्यक त्या सवलतींचा लाभ होऊ शकेल.’

 

खरेच आहे. ’मी कुणीतरी आहे’ म्हणून सवलतींवर हक्क सांगणे आणि खऱ्या गरजूंना सवलत मिळावी म्हणून कुठल्याही व्यक्तिगत अपेक्षेशिवाय सातत्यपूर्ण आर्थिक सहयोग देत रहाणे या दोन भिन्न वैचारिक दिशा आहेत. त्याचप्रमाणे –

 

’अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये’

 

या बहिणाबाई चौधरींच्या उक्तीप्रमाणे संसाराला लोटा म्हणायचे की राऊळाचा कळस हे जसे ज्याच्या त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते त्याचप्रमाणे रक्तदात्याने रक्तदान करताना व्यवहार म्हणून करायचे की पवित्र दान म्हणून करायचे हेही आपल्या दृष्टीकोनावरच अवलंबून असते. सुदैवाने रक्तदानाची कृती संस्कार म्हणून करणाऱ्या रक्तदात्यांची आणि रक्तदान शिबिराचे आयोजनही यज्ञाच्या पावित्र्याने करणाऱ्या शिबिर संयोजकांची संख्याच अधिक आहे, हा आमचा अनुभव आहे.

 

 रक्ताचे मोल होते, ते असे !

 

- महेंद्र वाघ