रिक्षाचालक ते यशस्वी उद्योजक...
 महा एमटीबी  16-Nov-2017
 
 

 
 
 
आपल्याकडे शिक्षण कमी म्हटले की, लगेच त्या व्यक्तीबद्दल नको ते आणि नको तितके ग्रह करायला सुरुवात होते, पण त्याने शिक्षण का अर्धवट सोडले त्याचे कारण किती जणांना माहीत असते ? अमर सिंग. राजस्थानमधील एक इसम. अकरावीनंतर शाळा सोडली आणि बरेच उद्योग करून पाहिले, पण मनासारखे काही जमले नाही. रिक्षा चालवली, फोटो स्टुडिओ सुरू केला, प्रवासी वाहतूक केली, काहीच जमले नाही. अखेर त्यांनी आवळ्याची लागवड केली आणि त्यापासून पदार्थ बनविण्याचा उद्योग सुरू केला आणि आता त्यांची ’अमर मेगा फूड प्रा. लि.’ नावाची मोठी कंपनी आहे, ज्याची वर्षभराची उलाढाल जवळजवळ २६ लाखांच्या घरात आहे. शिवाय, १५ नोकरदार त्यांच्या हाताखाली कामाला आहेत.
 
 
१९७६-७७ सालची गोष्ट, जेव्हा अमर सिंगचे वडील वृंदावन सिंग वारले. त्यानंतर आई, दोन भाऊ आणि बहिणीची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांच्या पदरी एक एकर जमीन होती. अमर यांनी मग शेती करायला सुरुवात तर केली, मात्र त्यांचं मन शेतीत रमत नव्हतं. मग शेती सोडून त्यांनी रिक्षादेखील चालवली. मात्र, त्यातून जेमतेम दिवसाला ५०० रुपये मिळायचे. त्यानंतर १९८४-८५ मध्ये ते अहमदाबादमध्ये मामाकडे राहायला गेले. तिथे मामाच्या मदतीने अमर यांनी फोटो स्टुडिओ सुरू केला. दुसरीकडे गावी त्यांच्या आईने शेतीची कामे करायला हाताशी ठेवलेल्या कामगारांनी फसवणूक करायला सुरुवात केल्यानंतर अमर यांना परत माघारी येण्यास सांगितले. ते परत गावाकडे आलेही, पण त्यांनी शेतीत लक्ष न घालता स्वतः एक महिंद्रा व्हॅन खरेदी केली. ज्यातून ते स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतूक करू लागले आणि तेव्हाच त्यांचे आयुष्य बदलणारा एक किस्सा घडला. तो म्हणजे ते एका बसस्टॅण्डजवळ प्रवाशांसाठी उभे असताना त्यांना रस्त्यावर वर्तमानपत्राचा एक तुकडा सापडला. त्यावर ’आवळ्या’बद्दल एक लेख लिहिला होता. तो वाचून आपणही आपल्याकडे असलेल्या जागेवर आवळ्याची रोपे लावू शकतो, असा विचार अमर यांच्या डोक्यात आला आणि तिथून त्यांच्या ‘आवळा लागवडीच्या मिशन’ला सुरुवात झाली. त्यांनी अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यांनी भरतपूर बागायती विभागाला विनंती करून आणि आगाऊ रक्कम भरून ६० आवळ्याची १९.५० रुपये दराने रोपे घेतली आणि ती २.२ एकर जागेत लावली. एका वर्षानंतर त्यांनी अजून ७० रोपांची लागवड केली. त्यांच्या शेतात रोपांना पाणी देण्याची उत्तम सोय होती. अविरत मेहनतीच्या चार-पाच वर्षांच्या कालावधीनंतर अमर यांना त्यांच्या झाडांना फळे दिसू लागली आणि त्या वर्षी त्यांनी अक्षरशः सात लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर त्यांनी किरकोळ बाजारात जाऊन आवळ्याचा भाव काढला. तेव्हा त्यांना मोठ्या आकाराच्या आवळ्यांना प्रति किलो मागे १० रुपये आणि मध्यम आणि लहान आकाराच्या आवळ्यांना प्रति किलोमागे ५ ते ८ रुपये भाव मिळाला. आधी काही वर्ष जोरदार चालणारा उद्योग थोड्या वर्षांनी मंदावला. कारण, व्यापार्‍यांनी त्यांना योग्य तो भाव देणे बंद केेले. तेव्हा त्यांनी स्वतः अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे ठरवले. स्थानिक सेवाभावी संस्था ‘लुपिन ह्यूमन वेल्फेअर रिसर्च ऍण्ड फाऊंडेशन’च्या मदतीने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आवळ्याच्या पाककृती करण्यास सुरुवात केली आणि २००५ मध्ये ‘अमर सेल्फ हेल्प ग्रुप’ची स्थापना झाली. या छोट्या ग्रुपचे २०१२ मध्ये ‘अमर मेगा फूड प्रा. लि.’ या मोठ्या कंपनीत रुपांतर झाले. तिथे आजघडीला १५ नोकरदार आहेत, ज्यात १० महिलांचाही समावेश आहे. या कंपनीबद्दल सांगताना अमर म्हणातात की, ’’प्रत्येक गोष्ट अगदी लागवड, प्रक्रिया, पॅकिंग आणि उत्पादनांची ने-आण करणे सर्व काही इथूनच होते. आता मला व्यापार्‍यांकडे जावे लागत नाही, तर तेच माझ्याकडे येतात.’’
 
 
- पूजा सराफ