अपघाती मृत्यूप्रकरणी १ कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश
 महा एमटीबी  16-Nov-2017

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल


 

अकोला : अपघातात मरण पावलेल्या मृतकाच्या परिवारास महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने १ कोटी १ लाख ७२ हजार रुपये नुकसान द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश अहमद ख्वाजा यांनी दिला.


या प्रकरणाची माहिती अशी की, बार्शिटाकळी तालुक्यातील जांभरूण येथील डॉ संतोष तुकाराम डाखोरे हे चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. २७ एप्रिल २०१६ रोजी डॉ डाखोरे ब्रह्मपुरी ते वरोडा जाणार्‍या एसटी बसने प्रवास करत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या शंकरपूर चिमूर रोडवर एसटी क्रमांक एमएच ०७ सी ७७२७ ने विरुद्ध येणार्‍या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यावेळी एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एसटी रस्त्याच्याकडेला उलटली. यात डॉ डाखोरे यांचा मृत्यू झाला होता. भिसी पोलिसांनी एसटीचालक संतोष काकपुरेवर गुन्हा दाखल करून अटक केली. अकोल्यातील अ‍ॅड. वखरे, अ‍ॅड. नरेंद्र बेलसरे, अ‍ॅड. दिनेश गढे यांनी संतोष डाखोरे यांच्या वतीने एसटी महामंडळावर नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. मृतक हा एमबीबीएस उत्तीर्ण व रेडिओलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता तसेच मृतकाला ७० हजारांपेक्षा जास्त पगार होता ही बाब दावाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.


या खटल्यात मृतकाची आई सुमन, वडील तुकाराम विष्णू आणि विजय यांना ही रक्कम विभागून देण्यात आली. एवढी मोठी नुकसान भरपाई मिळाल्याची ही अकोला न्यायालयातील पहिलीच घटना आहे.