ई-मार्केटिंग अलिबाबाची गुहा उघडणारी कार्यशाळा
 महा एमटीबी  15-Nov-2017
 
 
नेहमी घाईत असणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आज काहीसे वेगळे भासत होते. रेल्वेच्या आयआरसीटीसीने ’टिस’ आणि ’भारतीय स्त्री शक्ती’च्या मदतीने बचतगटांसाठी कार्यशाळा घेतली होती. संघटितरित्या हातच्या कलाकौशल्याचा वापर करत व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आणि कार्य करू इच्छिणार्‍या महिला मोठ्या उत्साहाने यावेळी उपस्थित होत्या. 
 
’भारतीय स्त्री शक्ती’च्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि या कार्यशाळेच्या समन्वयक सीमा देशपांडे म्हणाल्या, ’’या कार्यशाळेमध्ये बचतगटातील महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा, मार्गदर्शन मिळेल, असे विषय आयोजित केले गेले. उदाहरणार्थ
 
१) महिलांना या संधी कशा मिळू शकतील?
 
२) त्याकरिता बचतगटांनी काय तयारी करायला हवी?
 
३) कुठल्या प्रकारचे आर्थिक साहाय्य त्यांना या व्यवसायात मिळू शकेल व कोणाकडून मिळू शकेल ?
 
तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून ई-मार्केटिंग, ई-केटरिंग, वित्तपुरवठा,  अन्नसुरक्षा अशा विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन मिळाले. या कार्यशाळेला अतिशय अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ९ राज्यांमधून १७७  महिला या कार्यशाळेला उपस्थित होत्या.  ९ राज्यातून ६९ बचतगट यात सामील झाले तसेच भारतीय रेल्वे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या चार राज्यांतील ४९ स्टेशन या उपक्रमाला जोडले गेले. महिलांनी प्रचंड उत्साहाने या कार्यशाळेत भाग घेतला. बहुतेक महिलांनी ई-केटरिंगच्या माध्यमातून  आय.आर.सी.टी.सी.च्या या उपक्रमात सामील होण्याची इच्छा प्रदर्शित केली.’’
 
 
महिलांच्या विकासासाठी अहोरात्र झटणार्‍या ’भारतीय स्त्री शक्ती’ने या कार्यशाळेचे आयोजन केले. त्याला साथ दिली ती ’टिस’ने. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रा.डॉ. मेधा सोमय्यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेतला. आयआरसीटीसीमध्ये जेवण पुरविण्यासाठी बचतगटांसमोरील आव्हाने कोणती? त्या समस्या दूर कशा कराव्या? यासाठीचे एक अतिशय महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण  पुस्तिकाच त्यांनी तयार केली. सुटसुटीत आणि बारीकसारीक समस्यांचा आढावा घेऊन तयार केलेली ही पुस्तिका बचतगटांसाठी ई-मार्केटिंग क्षेत्रासाठी अमूल्य शिदोरीच आहे. प्रा.डॉ. मेधा म्हणाल्या,’’ भारतातील बचतगटांना बाजारातील स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर स्वतःला सर्वशक्तीनिशी विकसित करत समर्थपणे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण अतिशय आवश्यक आहे. काळाची गरज ओळखून बचतगटांनी पावले टाकायला हवीत. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ, व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयआरसीटीसी, ऍमेझॉन, देशी-विदेशी, झोमॅटो असे अनेक ई-मार्केटिंगचे पर्याय आहेत. या संधीचा फायदा घेऊन सर्व बचतगटांनी स्वतःला आधुनिक जगासोबत विकास करण्यास सज्ज व्हायला हवे.’’
 
 
तर नाबार्डचे जी. आर. चिंताला यांनी कार्यशाळेमधील आपल्या मनोगतात सांगितले की, ’’८५ लाख बचतगट नाबार्डच्या अंतर्गत कार्यरत आहेत तसेच आतापर्यंत बचतगटांतील महिलांनी ६० हजार करोड रुपयांचे कर्ज घेऊन ते फेडलेदेखील आहे. परंतु, बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू केले नाहीत. बचतगटातील महिलांची ही अफाट क्षमता लक्षात घेऊन आयआरसीटीसीने बचतगटांना मदतीचा हात पुढे केला आहे. नाबार्डचे आर्थिक पाठबळ या महिलांना मिळणार आहे. ’’
 
 
असो, दूरच्या टप्प्यात रेल्वेने प्रवास करताना मोठी अडचण येते ती जेवणाखाण्याची. रेल्वेनमध्ये ऑर्डर देऊन रेल्वेनमधूनच जेवण मागविण्याची सोय असते पण त्यात ठराविक चवीचे ठराविक पदार्थच असतात. भारतीय जीव मुळातच खवय्या मनोवृत्तीचा. त्यामुळे रेल्वेचे जेवण जिव्हेला आणि मनालाही बहुतेकदा न रूचणारे. त्यातच आपल्याकडे प्रत्येक प्रदेश प्रत्येक जिल्हा अगदी गावही विशिष्ट  खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध. पिठलं भाकरी, शेवभाजी, मालवणी वडे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, ढोकळा, खमण,  बाटीचोखा, सरसोका साग, आलू के पराठे वगैरे खाद्यपदार्थ डोळ्यासमोर आले की डोळ्यासमोर विशिष्ट राज्य, विशिष्ट प्रदेश चटकन येतात. रेल्वेने प्रवास करताना त्या त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्याचे स्पेशल चव असलेले खाद्यपदार्थ मिळाले तर.. हो,हे आता शक्य आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसीने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा विडा उचलला आहे. त्याची अंमलबजावणी सावंतवाडी आणि मध्य प्रदेशमधल्या एका जिल्ह्यात सुरू आहे. याबाबत माहिती देताना आयआरसीटीसीचे डेप्युटी मॅनेजर उमेश नायडू म्हणाले की, ’’भारतीय रेल्वे नेहमी प्रवाशांचे हित पाहते. प्रवाशांना चांगल्या चवीचे उत्तम घरच्यासारखे अन्न तेही परवडणार्‍या दरात कसे मिळेल हाच आमचा प्रयत्न असतो. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांनाही या व्यवसायात संधी मिळावी म्हणून सरकारने एक नवे पाऊल उचलले. त्यानुसार इच्छुक बचतगट रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून अर्ज करू शकतात. बचतगटांचे मेन्यू, त्यांचे दर आणि सेवा यानुसार त्यांना कंत्राट दिले जाणार आहे. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते  मध्य प्रदेशपर्यंतचा रेल्वेप्रवास घेऊ. यादरम्यान ५० प्रमुख रेल्वे स्थानके येत असतील. तर त्यादरम्यान प्रवाशांना जेवण उपलब्ध होऊ शकेल. या स्थानकाच्या परिसरातील महिला बचतगटांना प्रवाशांनी दिलेल्या खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली जाईल. या संपूर्ण कामात पारदर्शकता आहे. त्यामुळे त्या त्या परिसरातील बचतगटांना अर्थाजन प्राप्त होईल. त्या त्या परिसरातल्या संस्कृतीची चव रंग घेऊन तयार होणार्‍या खाद्यपदार्थांना प्रसिद्धीसोबतच  बाजारपेठही मिळेल.  रेल्वे प्रवाशांना त्या त्या परिसरातले चांगले अन्न योग्य दरात उपलब्ध होईल. योग्य आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणार्‍या, दर्जेदार चविष्ट अन्न, खाद्यपदार्थ बनविणार्‍या बचतगटांचे रेल्वे आयआरसीटीसीकडून स्वागतच आहे.
 
 
स्वयंरोजगाराची कल्पना घेऊन ऊर्जा देणार्‍या या कार्यशाळेला महिला बचतगट आणि स्वंयसेवी संस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला हे काय सांगायला हवे ?
 
 
 
ई- तिकिटांच्या माध्यमातून ई मार्केटप्रणाली लोकप्रिय झालेलीच आहे. त्याचप्रमाणे ई- केटरिंग व ई-मार्केटिंग हे दोन उपक्रम इंडियन रेल्वे केटरिंग ऍण्ड टुरिझम  कॉर्पोरेशन (आय. आर. सी. टी. सी.) ने सुरू केले व त्याकरिता बचतगटातील महिलांना प्राधान्य देऊन त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. जास्तीत जास्त बचतगट या उपक्रमात जोडले जावे आणि ई-केटरिंग व ई- मार्केटिंगच्या व्यवसायात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे या उद्देशाने  भारतीय स्त्री शक्तीने इंडियन रेल्व केटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन आणि  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या मदतीने ’एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ म्हणत  ४ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वेच्या ऑडिटोरियममध्ये बचतगट आणि स्वयंसेवी संस्थांचे ’ई-मार्केटिंगसंबंधी सक्षमीकरण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. स्वयंप्रेरणेने स्वावलंबनाची दीक्षा घेऊन संघर्ष करणार्‍या बचतगट आणि स्वयंसेवी संस्थांसाठी ही कार्यशाळा म्हणजे सध्याच्या स्पर्धात्मक युगात मार्ग दाखविणारा दीपस्तंभच.
 
- योगिता साळवी