तृतीयपंथीयांचे अभिनंदन   
 महा एमटीबी  14-Nov-2017

 
मतदान करा रे, मतदार यादीमध्ये नाव नोंदवा रे,’ असे कानीकपाळी ओरडूनही मतदार यादीत नाव टाकायला लोक का कू करतात. आताच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या वार्‍यामध्ये पदवीधर मतदार नोंदणी संख्याही रोडावली आहे, हेच चित्र आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्याच्या मतदार यादीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी तीन वर्षांत दुप्पट  झाली आहे. २०१३ साली ती ९०० होती. आता ती संख्या १७०१ झाली आहे. भडक रंगाचा मेकअप केलेले, टाळ्या पिटणारे ते दिसले की, लोक दुर्लक्ष करतात किंवा नको यांची बद्दुआ म्हणून त्यांना चिल्लर देऊन फुटवून टाकतात. हे सगळं सुरू असताना अत्यंत विखारी नजरेने, अत्यंत कुचेष्टेने टिंगल टवाळी करणारेही तिथे उपस्थित असतातच असतात. तृतीयपंथी म्हणून जन्माने जणू त्यांचा सात पिढ्यातला न फिटणारा गुन्हाच असतो. आजही स्त्रियांनंतर अपराधिक प्रवृत्तीने लैंगिक शोषण कुणाचे होत असेल तर यांचेच. त्यांनी भीक मागत जगावे किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होणे यात वावगे काहीच नाही, असा ठाम समज समाजाचा असावा. छे! समाजाचा समज तरी कसा म्हणावा? कारण यांना समाजाचे स्वीकारणे तर दूरच समजूनही घेतले गेलेले नाही. तृतीयपंथी व्यक्तीला इच्छा असो वा नसो तृतीयपंथीयांच्या घेट्टोत जावेच लागते, त्यानंतरचे जीवन, त्याला जीवन तरी कसे म्हणावे? भीक किंवा देहविक्रीशिवाय पर्याय नाहीच. असेही आढळून आले आहे की, नशेखोर चर्सुले, गर्दुल्ले किंवा वाया गेलेले आणि संघटितपणे रात्र जागवणारे किशोरवयीन मुलं किंवा तरुण केवळ विकृतीची हौस पूर्ण व्हावी म्हणून एकट्यादुकट्या तृतीयपंथीयाला अक्षरशः पळवून नेतात आणि त्या असहाय्य तृतीयपंथी व्यक्तीचे लैंगिक शोषण करत  असह्य मानसिक, शारीरिक यातना देतात. बरं त्यानंतर त्या पीडिताने दाद तरी कुठे मागावी? उपचारासाठी जावे तरी कुठे? लैंगिक आजाराने त्यातल्या त्यात एड्सने हकनाक मरणार्‍यांमध्ये बिचार्‍यांचा अंत होतो.
 
 समाजाने युगानुयुगे त्यांना मरणयातनाच दिल्या, पण तरीही कुणी कुठे ऐकले आहे का  की समाजाने युगानुयुगे मरणप्राय वेदना दिल्या म्हणून कुणा तृतीयपंथीयाने समाजद्रोह किंवा देशद्रोह केला? असे झाले असेल तरी अपवाद असेल. त्यामुळेच देशाशी प्रामाणिक राहत, मोठ्या अपेक्षेने मतदार यादीत नाव नोंदवणार्‍या तृतीयपंथीयांचे खरंच अभिनंदन..!
 
 
 
 संयुक्त कुटुंब....
 
 टना चेंबूरची,  ९ वर्षांच्या चिमुरडीवर या निचांची नजर पडली. पहिल्यांदा तिच्यावर त्या चौघांनी सामूहिक अत्याचार केले. पाप पचले असे समजून या नालायकांनी तिच्या छोट्या ६ वर्षांच्या बहिणीवरही अत्याचार करणे सुरू केले. त्यानंतर त्यांची राक्षसी विकृत नजर पडली या दोघींच्या तीन वर्षांच्या भावावर. त्यालाही त्यांनी सोडले नाही. हातपाय बांधून या चिमुकल्यांवर अत्याचार सुरू होते.  याचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. तब्बल २३ दिवस हे सैतानी कृत्य सुरू होते. या मुलांची आई कामावर जायची. मुलांमधला बदल तिला जाणवला. मुलांना विश्‍वासात घेेतल्यावर तिला मुलांची दुर्दशा कळली. दुसरी घटना घाटकोपरची. आपल्या दोन कोवळ्या मुलींवर प्रत्यक्ष बापच वर्षानुवर्षे बलात्कार करायचा.  लहान मुलगी तीन वर्षांपूर्वी या नरकयातनेपासून सुटका व्हावी म्हणून पळून गेली. बापाने (छे! या नराधमाला बाप तरी का म्हणावे?) मगरीचे अश्रू ढाळत पोलिसांत तक्रार केली, माझी छोटी मुलगी हरवली. तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी आता पोलिसांना सापडली. त्यावेळी टाहो फोडत तिने घरी जाण्यास नकार दिला. तिने नराधम बापाचे घाणेरडे कृत्य सांगितले. पोलिसांना विश्‍वास बसला नाही. या मुलीच्या मोठ्या बहिणीनेही पोलिसांच्या चौकशीत कबूल केले की, प्रत्यक्ष बाप जीवे मारण्याची धमकी देत या दोघींवर अत्याचार करायचा. 

भयंकर..अर्थात अशा घटनांचे प्रमाण कमी असले तरी हेही सत्य आहे की, उजेडात येणार्‍या घटना म्हणजे हिमनगाचे टोकही असतील. माणूसकी, नातीगोती यांना काळिमा फासत अत्याचार करणारे हे नराधम. यांना जगभरातल्या सर्वच भाषांतले शिव्या, जगभरातल्या क्रूर कृत्यांवर दिल्या जाणार्‍या शिक्षाही कमीच होतील.  बलात्कार, छेडछाड, अपहरण या अशा घटनांनी समाजाची घडी विस्कटत आहे. याचे कारण काय? कायदे आहेत, कायद्याचे रक्षक आहेत, पण समाज कायद्याच्या चौकटीत जगत नाही हेच सत्य आहे. वेगाने होणार्‍या जागतिकीकरण, पाश्‍चिमात्त्यकरणाच्या मार्‍यामुळे मूळचे समाजभान अस्वस्थ झाले आहे. ही अस्वस्थता कशी दूर होईल? या दोन्ही घटनांबाबत पाहू, या दोन्ही घटनांमध्ये विभक्त कुटुंबपद्धती होती. घरात काय चालले आहे असे अधिकारवाणीने पाहणारे कुणी नव्हते. आजी, आजोबा, काका, काकी अर्थात सध्याच्या काळात संयुक्त कुटुंबपद्धती म्हणजे दिवास्वप्नच वाटू शकेल. पण समाजसुरक्षेसाठी आणि घरातल्या कोवळ्या निरागस कळ्यांसाठी संयुक्त कुटुंबाचे कुंपण ही काळाची गरज आहे.
 
योगिता साळवी