आपल्याकडे ग्रंथालयांचा योग्य प्रचार आणि प्रसार झाला नाही : श्याम जोशी
 महा एमटीबी  13-Nov-2017


 

मराठी भाषा, वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, अशी ओरड चालू असताना श्याम जोशी यांनी वाचनाचा आणि भाषेचा वसा घेतला आहे. तो वसा ग्रंथसखा वाचनालय आणि मराठी स्वायत्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून ते समर्थपणे चालवत आहे. त्यांच्या या कार्यासाठी नुकताच त्यांना ‘याज्ञवल्क्य’ हा पुरस्कार जाहीर झाला. भाषा संवर्धन, वाचनसंस्कृती, वाचनालय आणि विद्यापीठ चालवताना येणा-या अडचणी याविषयी जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली त्यांच्याशी ही खास बातचीत. 

 

‘ग्रंथसखा’ या वाचनालयाची सुरुवात कशी झाली?

  

२००४ साली मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात नोकरी न करता जवळच्या १० हजार ग्रंथसंपदेसह एक वाचनालय आणि ट्रस्ट स्थापन केला. मराठीतले प्रत्येक पुस्तक वाचकाला उपलब्ध झाले पाहिजे, या हेतूने ‘ग्रंथसखा’ या वाचनालयाची सुरुवात झाली. सुरुवातीला वाचकांची कमतरता होती, नंतर आम्ही मंगेश पाडगावकरांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. वाचनालयाची ग्रंथसंपदा पाडगावकरांनी पाहिली आणि आपल्या भाषणात त्याचा गौरव केला. यामुळे आमची सभासद संख्या वाढून चार आकडी झाली. त्यानंतर काही कार्यक्रमांचे आयोजन आम्ही केले. उदा. वाचन कार्यशाळा, दिवाळी अंकासंबंधी कार्यशाळा, सांस्कृतिक उपक्रम आम्ही घेतले आणि पाहता पाहता ‘ग्रंथसखा’ची ख्याती महाराष्ट्रभर पोहोचली.

 

मराठी स्वायत्त विद्यापीठाची सुरुवात कशी झाली?

  

ग्रंथालयासाठीचा लोकांचा प्रतिसाद आणि संपर्क वाढला. त्यानंतर ७-८ वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी काही मान्यवरांकडून प्रयत्न करण्यात आले. ते प्रयत्न फार तोकडे पडले. मग आमच्या लक्षात आले की, अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेचा दर्जा सुधारणार नाही. त्यासाठी भाषेत संशोधन होणे गरजेचे आहे. नवनवीन सोपे पारिभाषिक शब्द भाषेत येणे गरजेचे आहे. यासाठी काही प्राध्यापक मंडळी आमच्याकडे येतात आणि नव्या पारिभाषिक शब्दांची भर घालतात. उदा. लिफ्टसाठी आम्ही ‘उचलजिना’ हा शब्द सुचवला तर पेव्हरब्लॉकसाठी ‘फरसबंदी.’ हा शब्द आपल्याकडे १०० वर्षे जुना आहे. हल्ली मुलांच्या तोंडी इंग्रजी शब्दच असतात. त्यासाठी शब्द पेरावे लागतात, शब्दांची शेती करावी लागते. हे कामकुणीतरी करावे लागते, कुणीतरी करण्यापेक्षा आपणच सुरुवात करावी म्हणून स्वायत्त मराठी विद्यापीठाची सुरुवात झाली. स्वायत्त या अर्थाने की शासनाची कुठलीही बांधिलकी नाही. शासनाचे अनुदान न घेता भाषेसाठी जे कार्य करू इच्छिणारे लेखक, विचारवंत, नोकरदार आहेत त्यांच्या साहाय्याने शब्दकोशांची आम्ही निर्मिती करतो. उदा. १९३२ साली राजवाडे यांनी धातूकोशाची निर्मिती केली त्यानंतर तसे कोणी प्रयत्न केले नाही. मराठी स्वायत्त विद्यापीठात धातूकोशाच्या निर्मितीचे कार्य चालू आहे.

 

वाचनालय आणि विद्यापीठ चालवताना काय अडचणी येतात?

      

तीन मोठ्या अडचणी येत आहेत. सर्वप्रथम आर्थिक अडचण आहे. शासनाची कुठलीच मदत घ्यायची नाही. असे आम्ही ठरवले आहे. कारण शासनाने प्राधान्याने पायाभूत सुविधा देण्यावर भर द्यावा. त्यामानाने पुस्तके हा घटक दुय्यम आहे. शासनालासुद्धा मर्यादा आहेत. ग्रंथप्रिय लोकांनी मिळून वाचनालये चालवावीत. एवढे मोठे वाचनालय चालवताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागतेय, जागा घेण्यासाठी एक कोटी रुपये लागतात. पुस्तकं ठेवण्यासाठी जागा महत्त्वाची आहे. दुसरं लोकांची वृत्ती प्रामाणिक राहिलेली नाही. वाचक नेलेले पुस्तक महिने दोन महिने आणून देत नाही, यामुळे दुस-या वाचकाचा खोळंबा होतो. वाचकांना ताकीद दिल्यानंतर, माणूस पाठवल्यानंतर वाचनालयात पुस्तक जमा होतं. तसेच लोकांना शिस्तच नाही.पुस्तकांवर पेनाने लिहितात, पानं फाडतात. दिवाळी अंकात आपलं राशी भविष्य असेलेले पान पूर्ण फाडून आपल्याकडे ठेवतात. अशा लोकांच्या वागणुकीमुळे फार मोठी अडचण होते.पुस्तकांवर किराणा मालाची यादी लिहितात. अशा पुस्तकांचे आम्ही प्रदर्शनच भरवले होते. पुस्तक साक्षरता आपल्याकडे नाही. तिसरी अडचण अशी की, वाचनालयाच्या पुस्तकांसाठी पुण्यात जावं लागतं, मुंबई, ठाणे या जवळच्या शहरात उपलब्ध होत नाही. नागपुरात प्रकाशित झालेल्या पुस्तकाची मागणी वाचक करतो, पण ती जवळच्या शहरात उपलब्ध होत नाही कारण त्या पुस्तकांचा खप नाही. तरी या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न असतो. पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांची वैचारिक भूक भागविण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो.

 

सध्या किती पुस्तकं आपल्या वाचनालयात आहेत आणि त्यात किती दुर्मीळ पुस्तकांचा समावेश आहे?

 

सध्या २ लाख पुस्तकं ग्रंथसखामध्ये आहेत. जवळपास १०० पुस्तकं ही १९ व्या शतकातली आहेत. १८०५ ते १८८५ या कालखंडात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा समावेश आहे.ब्रिटिश अधिका-यांनी जी मराठी पुस्तकं लिहून घेतली, अशी दोलामुद्रित पुस्तकं आमच्याकडे आहेत. ही पुस्तकं आम्ही विकत घेतली. काही लोकांनी आमच्या कार्यावर खुश होऊन हे दुर्मीळ ग्रंथ आमच्याकडे सुपूर्द केले.

 

वाचनालयासाठी काय योजना आहेत? 

 

वाचनालयाच्या राज्यभर शाखा उघडल्या पाहिजे. याचा फायदा संशोधक, अभ्यासक यांना होईल. चांगले संदर्भ ग्रंथ हे ग्रामीण भागात उपलब्ध होत नाहीत. मागे आमच्याकडे एक पालघरचं दाम्पत्य आलं होतं. बाई पी. एच.डीच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांना मुंबईत संशोधनासाठी कुणीच पुस्तकं द्यायला तयार नव्हतं. आमच्याकडे निवासाची सोय असल्याने ते दोघे तीन दिवस राहिले आणि सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत आमचे संदर्भ साहित्य वापरून गरजेचा मजकूर उतरवून घेतला. अशा सोयी संपूर्ण राज्यात उपलब्ध व्हायला पाहिजे पण आपल्याकडे नेमकी रविवारच्या दिवशी ग्रंथालये बंद असतात. एखादा नोकरदार व्यक्ती काम सोडून कसा काय ग्रंथालयाला भेट देईल? त्यांना सुट्टीच्या दिवशीच वेळ असतो. म्हणून आमच्याकडे सार्वजनिक सुटीच्या दिवशीसुद्धा ग्रंथालय चालू असतं. यामुळेच आमच्या सभासदांची संख्या ही ५ हजारांहून अधिक आहे.

 

वाचनसंस्कृती कमी होत चालली आहे, असे तुम्हाला वाटते का?

 

लोकांना वाचण्याची इच्छा आहे, परंतु लोकांमध्ये पुस्तकांसाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता नाही. पुढची पिढी इंग्रजी माध्यमात शिकत असते, पुढे ते मराठी वाचणार नाही, एकदा पुस्तक वाचून झाले की,ती रद्दी होते, असा लोक विचार करतात. त्यामुळे याचा परिणामवाचनसंस्कृतीवर झाला आहे. हल्ली टी.व्ही. मालिकांमुळे वाचायला वेळच मिळत नाही. इंटरनेटने मासिकं, पुस्तकं आणि वृत्तपत्रांची जागाच संपवली. मुद्रित शोधन, कागदाचा व्यापारी,छापण्यावर पुढे वस्तू आणि सेवा कर लावल्याने अडचणीत भर पडली आहे. पुस्तकं विक्रीचे प्रमाण घटल्याने एका पुस्तकाच्या दोनशे - तीनशे प्रती छापल्या जातात. दिवाळीत आम्ही हजार रुपयांचे फटाके खरेदी करतो पण दिवाळीतच दिवाळी अंक, पुस्तकं आम्हीविकत घेत नाही. इंग्रजी माध्यमात मुलांना दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याने पुढच्या १०-१५ वर्षांत मराठी पुस्तक छापणे हे जोखमीचे काम असणार. मेहता प्रकाशन आता इंग्रजी पुस्तकं छापतात आणि शेवटी त्यांना व्यवसाय करायचा आहे, शेवटी व्यापा-याला स्पर्धेत टिकायचे आहे. ज्या वस्तूला विक्रीमूल्य आहे अशाच वस्तू व्यावसायिक विकणार. जर्मनी, इंग्लंड या पाश्चात्त्य देशात मोठमोठी वाचनालये आहेत. माझा मित्र जर्मनीत आहेत तिथे वाचनालये २४ तास सेवा देतात. आपल्यापेक्षा पाश्चात्त्य देशात इंटरनेटच्या सोयी सुविधा चांगल्याआहेत. तरी तिथे वाचन संस्कृती चांगली आहे. आपल्याकडे अशा पद्धतीची वाचनसंस्कृती रुजलीच नाही अजून. आपल्याकडे ज्या प्रमाणात ग्रंथालयांचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवाहोता, तो दुर्दैवाने झाला नाही.

 

शब्दांकन, 

तुषार ओव्हाळ