जितेंद्र जोशीचा आक्रमक निर्णय,  'इफ्फी'ला उपस्थित राहणार नाही 
 महा एमटीबी  13-Nov-2017


नोव्हेंबर महिन्याच्या २० तारखेपासून गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी-२०१७) सुरु होत आहे. या महोत्सवाची सुरुवात बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाने होणार होती. रवी जाधव यांनी  दिग्दर्शित केलेला 'न्यूड' या चित्रपटाने 'इफ्फी'च ओपनिंग होणार होतं विशेष म्हणजे ज्युरींनीच या चित्रपटाची निवड केली होती. परंतु तरीदेखील माहिती प्रसारण खात्याने 'न्यूड' आणि ससीधरण यांचा 'सेक्सी दुर्गा' हे चित्रपट 'इफ्फी' मधून वगळण्याचे ठरवले. यानंतर चित्रसृष्टीमधून याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी याने चक्क 'इफ्फी'ला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे आज सोशल मीडियावरून कळवले आहे. 

जितेंद्रची मुख्य भूमिका असणारा 'व्हेंटिलेटर' हा चित्रपटही 'इफ्फी-२०१७'साठी निवडला गेला आहे. तरीदेखील जितेंद्रने माहिती प्रसारण विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हे पाऊल उचलले आहे. तो म्हणतोय, ''या मुस्कटदाबीला उत्तर कसे देता येईल असा विचार मनात सुरु आहे आणि त्यातच एक गोष्ट लक्षात आली की याचा निषेध म्हणून यंदा माझा सिनेमा महोत्सवात असूनही मी तिथे हजेरी लावणार नाही. कारण आज रवी आणि ससीधरन यांच्यावर आलेली वेळ उद्या माझ्यावरही येऊ शकते आणि परवा आणखी कुणावरही.''
 
 
न्यूड चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी यानिमित्ताने महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. जाधव म्हणतात, ''चित्रपट कोणासाठी करायचा? प्रेक्षकांसाठी की मिनीस्ट्रीसाठी?''
 
 
नुकताच सुपरहिट ठरलेल्या 'मुरंबा' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तर हा मूर्खपणाचा कळस असल्याचे नमूद केले आहे. 
 
 
 
''कमालीचे भिकारबुध्दी लोक आहेत हे. राग नाही किव येते असल्या अडाण्यांची.'' अशा तिखट शब्दांमध्ये दिग्दर्शक विजू माने याने 'इफ्फी'च्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.