माई झाल्या‘ग्लोबल’ !
 महा एमटीबी  13-Nov-2017ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची आई सिंधूताई सपकाळ उर्फ माई यांचा आज ७० वा वाढदिवस. सापडलेल्या अनाथांना सर्वार्थाने सनाथ करणार्‍या माई आता केवळ महाराष्ट्र वा देशापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्यांच्या कार्याची कीर्तीपताका सातासमुद्रापलिकडेही गेली आहे. त्या अर्थाने ‘लोकल’ असलेल्या माई आता ‘ग्लोबल’ झाल्या आहेत.


‘‘पारखून घेतलं तर कुणीच आपलं नसतं...आणि
समजून घेतलं तर कुणीच परकं नसतं...’’

या सार्वकालीन सत्याची प्रचिती म्हणजे अनाथांची आई सिंधूताई सपकाळ - सर्वांच्या ‘माई’. रस्त्याच्या कडेला, कचराकुंडीत, अडगळीच्या जागेत जेथे - जेथे म्हणून त्यांना अनाथ मूल आढळले तेथून त्याला पोटाशी धरुन त्यांनी आपल्या छत्रछायेत आणले. त्याला आपले नाव दिले, वाढवले. शिक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कारित केले. अशी कितीतरी त्यांची लेकरे आज समाजात सन्मानाने आणि अत्यंत स्वाभिमानाने जगत आहे, इतरांना आपल्या जगण्याचा आदर्श घालून देत आहेत.


खरेतर, विदर्भातील वर्धा या तुलनेने फार विकसित नसलेल्या जिल्ह्यातील जन्मभूमीपासून ते आजच्या पुण्यापर्यंतच्या त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारी अनेक पुस्तके, लेख, डॉक्युमेंटरी आणि चित्रपटही आलेत. त्यातून माईंच्या संघर्षशील जीवनाचे चित्रण करण्यात आलेय. पण तरीही त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाची त्यातून ओळख झाली, असे कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही, इतके त्यांचे जीवन आणि जगण्याची शैली विलक्षण आहे. संघर्ष ज्यांच्या पाचवीलाच पूजलेेला आहे त्यांना दुसरा पर्याय तरी कुठला असू शकतो? सत्यासाठी संघर्ष करणे, त्यात विजय मिळवणे आणि त्यानंतर दुसर्‍या संघर्षासाठी सिध्द होणे हेच त्यांचे प्राक्तन दिसते. परंतु त्यामुळे माई कधी गलितगात्र झाल्या आहेत, असे दिसत नाही. प्रारंभीचा काळ वजा केला तर त्यानंतरच्या पुढच्या सर्व वाटचालीत एकीकडे माईमधील मातृहृदयी आईचे जसें दर्शन घडले, तसेच कतर्व्यकठोर, दक्ष, सुसंस्कृत आणि सजग माताही दिसते. त्याच बळावर पुण्याला सन्मती बालनिकेतनची निर्मिती होऊन अनाथांना छत्र दिले. त्यासाठी शासन दरबारी लढा दिला. या अबोध मुलांचे पालनपोषण करतांना येणार्‍या सरकारी नियमांच्या अडचणीवर मात केली. त्यासाठी पुन्हा संघर्ष. मात्र अखेर विजय झाला तो माईंचाच.


जेमतेम चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण झालेल्या माईंना काही दुर्लभ गोष्टी जन्मजात मिळाल्यात. उत्तम स्मरणशक्ती, आकलन क्षमता, कमावलेले वक्तृत्व आणि गोड गळा. ज्याचा उपयोग त्यांना भटकंतीच्या काळात झाला. आकलन क्षमतेने त्यांना माणसं ओळखता आली आणि गोड गळ्याने त्यांना पोट भरण्याइतके का होईना, पैसे दिले. ‘गाण्याने मला खाणे दिले, म्हणून जगता आले’ असे जरी आज त्या गमतीने म्हणत असल्या तरी, या शब्दांच्या मागे केवढ्या वेदना, केवढे दुःख, केवढा अवमान, केवढी अग्निपरीक्षा होती हे त्यांच्याशिवाय कोण जाणू शकेल? त्यातून माई खंबीर होत गेल्या. मुलींसाठी अनाथाश्रम, गोशाळा यासोबतच या मुलांच्या भवितव्यासाठी सदैव भटकंती करणार्‍या माईंना प्राणांतिक आजारालाही सामारे जावे लागले. त्यातून त्यांची इच्छाशक्ती अधिकाधिक तीव्र, तेजस्वी होत गेली. कामाचा व्याप वाढला. त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून ते देशभर पसरले आणि पाहता पाहता देशाच्याही सीमारेषा त्यांच्यासाठी अपुर्‍या पडून ते पार सातासमुद्रापार गेले. परदेशात असलेल्या भारतीयांनाही त्यांचे आकर्षण वाटू लागले.


माईंनी पहिला परदेश प्रवास केला तो विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. अमेरिकेत झालेल्या या साहित्य संमेलनात लौकिकार्थाने साहित्यिक नसलेल्या माईंनी आपल्या सादरीकरणाने आणि अचाट वक्तृत्वाने सर्वांनाच अचंबित केले होते. नऊवारी परिधान केलेल्या माईंना पाहण्यासाठी भारतीयांसोबतच अमेरिकन नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘लोकल’ वरुन ‘ग्लोबल’ झालेल्या माईंचा हा पहिला परदेश विजय होता. त्यानंतर २०१४-२०१५ मध्ये अहमदिया पीस फाऊंडेशनने त्यांना लंडन येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित केले होते. पुढे २०१५ मध्येच त्यांना दुबईहून व्याख्यानाचे निमंत्रण आले होते. तेथे भारतीय समुदायाने त्यांचे जे देवदुर्लभ स्वागत केले होते ते शब्दातीत आहे. थायलंड, सिंगापूर येथेही त्यांच्या व्याख्यानाने सर्वांना मोहिनी घातली होती. नुकत्याच म्हणजे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान त्या रशियाचा दौरा करुन परतल्या आहेत. या दौर्‍यात तेथील भारतीयांसोबतच रशियन लोकांनाही त्यांनी जो लळा लावला, भारतीय संस्कृतीतील मातृत्व आणि मातृत्वप्रेमाचे जे अमोघ दर्शन घडविले, आपल्या भारतीयत्वाची आणि वक्तृत्वाची जी चुणूक दाखवली त्यामुळे रशियन नागरिकही माईंपुढे नतमस्तक झालेत. मातृभावनेला शब्दांची नव्हे तर संवेदनेची गरज असते, हेच यातून सर्व जगाने पाहिले. आता २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान माईंना पुन्हा एकदा दुबईचे बोलवणे आले आहे. तेथे झबिल पार्कमध्ये होणार्‍या एका भव्य समारोहात माईंची अस्सलित मराठीतून शेरोशायरी, कवितायुक्त वक्तृत्वाची मेजवानी उपस्थितांना लाभणार आहे. माईंचे हे ‘ग्लोबल’ पणही असे दीपवणारे आहे. ८०० हून अधिक पुरस्कार अन् देश - विदेशातील गणमान्य संस्था आणि व्यक्तींनी गौरविलेल्या माईंची लेकरं मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे अभीष्टचिंतन करतांना ‘मातृदिन’ आणि ‘बालदिन’ ही एकाचवेळी साजरा करणार आहेत. त्यासाठी कुठं - कुठं विखुरलेली ही पिलं या घरट्याकडे परतू लागली आहेत. कारण कुठलेही बालक ‘दीन’ राहू नये हीच तर माईंनी आयुष्यभर काळजी घेतलीय, आजही घेताहेत ! मातृप्रेमाचा हा कल्पवृक्ष सदैव असाच बहरत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना...!


दिनेश दगडकर