गवयाचे पोर...
 महा एमटीबी  10-Nov-2017


 

गवयाचे पोरसुद्धा सुरात रडतं, असं म्हणतात. अतिशयोक्ती सोडली तरी आपल्या आई-वडिलांच्या कलेचा वारसा मूल घेत असतं. पण फक्त आई-वडिलांकडून मिळालेले कलागुण कलाकाराला पुढे नेत नसतात. साधना करून उपजत गुणात भर घालून कलाकार समृद्ध होत असतो. असाच एक कलाकार ज्याने निसर्गाच्या सान्निध्यात राहून कलेची साधना केली आणि आपल्या कलेच्या माध्यमातून निसर्गाचे रंग कागदावर उतरवले तो म्हणजे देवदत्त पाडेकर. त्यांचे वडील दत्ता पाडेकर हे मोठे चित्रकार. देवदत्त जेव्हा लहान होते, तेव्हा त्यांचे पालक त्यांना पाठ्यपुस्तकांसह पेन्सिल आणि स्केचपेन्स द्यायचे. देवदत्त पुस्तकांपेक्षा त्या स्केचपेनच्या रंगात जास्त रमायचे. शाळेत असताना त्यांनी काही स्तरावर चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. त्यात त्यांना पुरस्कारसुद्धा मिळाले. देवदत्तला कळले की, आईवडिलांनी दिलेले प्रोत्साहन वेगळे आणि लोकांची पोचपावती मिळणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. दहावीनंतर ते जे जे स्कूल आर्टमध्ये दाखल झाले. तिथले सर्व वातावरण त्यांच्या शिक्षणाला पूरक असे ठरले, असे ते सांगतात. तिथली झाडे, वेली, पक्षी त्यांच्यातील कलाकाराला खुणावत होत्या. मग पाडेकर आरे संकुलात जात. तिथले निसर्गसौंदर्य आपल्या कुंचल्यातून कागदावर रेखाटत. अगदी तिथे असलेल्या तबेल्यातील गायी-म्हशी त्यांच्या कुंचल्यातून सुटत नसत. जे. जे. मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना याच क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्यात रस होता. परंतु, तो अभ्यासक्रम भारतात शिकवला जात नव्हता. म्हणून त्यांनी लंडनची वारी केली, पण तिथले शिक्षण त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. मग त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण पूर्ण केले. त्यांना युरोपातील निसर्ग खुणावत होता. २०१३ पासून त्यांनी फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया, जर्मनी येथील आल्प्स पर्वतरांगा पाहिल्या आणि त्या आपल्या कागदावर रंगवल्या. 

 

इटलीत ‘फ्लोरेन्स डान्स सेंटर’ या संस्थेत देवदत्त यांच्या चित्राचे प्रदर्शन होते. त्या संस्थेचे संचालक केथ फेरोन पाडेकरांच्या चित्राचे वर्णन करताना म्हणतात की, “त्यांचे चित्र पाहून निसर्गाची अनुभूती होते. चित्रात असलेली थंडी जाणवते. थंड श्वास जाणवतो. कोवळे ऊन त्वचेला स्पर्श करुन जाते.’’ पाडेकरांच्या चित्रात मुख्यत्वेकरून मानव आणि निसर्गाचे संबंध चितारलेले असतात. हाडाचा कलाकार स्वस्थ बसत नसतो, चित्रकार तर नाहीच नाही. पाडेकर मग भारतीय हिमालयातील पर्वतरांगांत वास्तव्यास आले आणि हिमालय पर्वतरांग त्यांनी आपल्या कलाविष्कारातून कागदावर उतरवली. त्यांनी आल्प्सवर १५ तर हिमालयावर पाच अशी चित्र रेखाटली आहेत. प्रत्येक चित्रात पर्वतरांगाचे बदललेले रूप त्यांनी दाखवले आहे. आल्प्स आणि हिमालय पर्वतरांगाच का? या प्रश्नावर पाडेकर म्हणतात की “या दोन्ही पर्वतरांगा एकाच देशात नाही. त्या विभिन्न देशात विभागलेल्या आहेत.दोन्ही पर्वतरांगांत विभिन्न प्रकारचे लोक राहतात, त्यांची विभिन्न संस्कृती असते. मी हा सुरू केलेला प्रवास अजून संपलेला नाही.’’ मुंबईत आणि दिल्लीत त्यांच्या चित्रांचे दोनदा प्रदर्शन भरवले गेले. तसेच २०१० मध्ये इटलीतसुद्धा फक्त त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. त्यांना एकूण पाच राष्ट्रीय आणि तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. २००६ साली एलिझाबेथ ग्रीनशील्ड फाऊंडेशन पुरस्काराचा समावेश आहे. अशा चित्रकाराचा प्रवास हा निरंतर राहो, ही सदिच्छा.

 

- तुषार ओव्हाळ