अवघे धरु सुपंथ
 महा एमटीबी  10-Nov-2017


 

जनकल्याण रक्तपेढीमध्ये काम करायला सुरुवात होऊन जेमतेम दोन/तीन महिने लोटल्यावरच माझ्यावर मोठा बाका प्रसंग गुदरला होता. म्हणजे झालं असं – ‘ उद्या सकाळी आपल्याला एका मीटींगसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या रक्तपेढीत जायचं आहे’ असा आदेश रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी एका संध्याकाळी मला सुनावला. एका राज्यस्तरीय सी. एम. ई. (continual medical education) बाबत ही मीटींग असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापेक्षा जास्त मलाही काही माहीत नव्हतं आणि सांगितलं असतं तरी त्यावेळी ते कळलंच असतं असंही नाही. म्हणून नुसतं ‘ठीक आहे’ म्हणत मी घरी निघालो.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्या वेळेला मी तिथे पोहोचलो. डॉ. कुलकर्णी अद्याप यायचे होते. ‘मी जनकल्याणमधून आलो आहे’ असे म्हणताच दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजीव केतकर यांनी ‘अरे वा, या - या बसा’ असे अगदी अनौपचारिक स्वागत करीत मला आपल्या शेजारीच बसवून घेतले. सह्याद्री, केईएम, रुबी हॉल, ससून अशा अन्य रक्तपेढ्यांचेही काही पदाधिकारी तिथे आलेलेच होते. जनकल्याण सोडून अन्य रक्तपेढ्यांच्या अधिकाऱ्यांसोबत भेटण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. यथावकाश रुग्णालयामधल्याच एका सभागृहात ही बैठक संपन्न झाली. आय. एस. बी. टी. आय. (इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ़्यूजन ॲड इम्युनोहिमॅटोलॉजी) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या महाराष्ट्र शाखेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या व्यवस्था ठरविण्याबाबतची ही बैठक होती. या कार्यशाळेचे यजमानपद पुण्याकडे असल्याने स्वाभाविकपणे पुण्यातील रक्तपेढ्यांनी मिळून या व्यवस्था कराव्यात, यासाठी महाराष्ट्र शाखेच्या काही पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच जनकल्याणचे माजी संचालक डॉ. दिलीप वाणी, सह्याद्री रुग्णालय रक्तपेढीच्या डॉ. स्मिता जोशी, डॉ. पूर्णिमा राव यांनीच या बैठकीचे आयोजन आणि संचालन केले होते. या बैठकीत सभागृह, सजावट, नोंदणी, खानपान अशा सर्व व्यवस्था मार्गी लागल्यानंतर डॉ. राव डॉ. अतुल कुलकर्णींना म्हणाल्या, ‘अतुल, या सी.एम.ई. चे ॲकरिंग मात्र चांगले झाले पाहिजे हं, त्यासाठी तूच एखादा माणूस सुचव !’ यावर ताबडतोब माझ्या खांद्यावर हात ठेवत डॉ. कुलकर्णी उत्तरले, ‘हो, त्यात काय ? हा करेल की ॲकरिंग.’ इतका वेळ मी तसा नुसताच बैठकीत बसून होतो, पण आता मात्र माझ्या पायाखालची जमीन एकदम सरकली आणि ‘अहो…अहो…’ म्हणेस्तोवर या सर्व लोकांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले सुद्धा. विशेष म्हणजे माझ्याशी तशी फार ओळख नसतानासुद्धा अन्य रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींनीदेखील डॉ. कुलकर्णी सांगताहेत एवढ्यावरच माझ्या नावाला केवळ मान्यताच दिली असे नव्हे तर मला प्रोत्साहनही दिले. मला कार्यक्रमांमधून बोलायचा अनुभव नव्हताच असे नव्हे, परंतु सुमारे चार-पाचशे लोकांच्या समोर आणि त्या मानाने पुष्कळच नीटनेटक्या कार्यक्रमातील निवेदन करण्याचे काम मात्र माझे दडपण वाढविणारेच होते. शिवाय हे निवेदन असणार होते इंग्रजीतून. हे आणखी अवघड. कारण आमचे इंग्रजी म्हणजे कामचलाऊ, त्यामुळे मेहनत तर बरीच घ्यावी लागणार होती. काम करताना कधी कधी अशा वेळा नक्कीच येतात, ज्यावेळी आपण स्वत:च्या क्षमतेबद्दलच साशंक होतो. पण अशा वेळी ज्या मोठ्या लोकांवर आपला विश्वास असतो, त्यांचे म्हणणे डोळे झाकून ऐकावे असा एक शिरस्ता मी आपला पाळत आलेलो आहे. ही माणसे आपले मूल्यांकन निश्चितच आपल्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करत असतात. यथावकाश ही राज्यस्तरीय कार्यशाळा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पार पडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यातील सर्वच रक्तपेढ्यांचे आपसांत किती चांगले नाते आहे, याचा मला चांगलाच प्रत्यय आला. प्रत्येक जण आपले काम व्यवस्थित होण्यासाठी अगदी घरचे कार्य असल्यासारखा मनापासून झटत होता. वास्ताविक, एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांमध्ये अथवा व्यवसायांमध्ये स्वाभाविकपणे स्पर्धेची भावना असते. पण इथे मला पहायला मिळत होतं ते निराळंच. एकमेकांशी होणाऱ्या संवादांमध्ये संस्थात्मक अभिनिवेशाचा आणि स्पर्धादी भावनांचा लवलेशही मला इथे पहायला मिळाला नाही. सर्वच रक्तपेढी प्रमुखांच्या अत्यंत ज्ञानी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वांचे एक सुंदर दर्शन मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले. कदाचित या मंडळींच्या प्रगल्भतेमुळेच रक्तपेढ्यांचे परस्परांतील संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण राहिले असावेत. आधी ठरल्याप्रमाणे मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमानंतर सर्वच रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या या कामाबद्दल माझं अगदी भरभरुन कौतुक केलं. अर्थात या कौतुकात या सर्वांच्या अंगभूत मोठेपणाचाच भाग अधिक होता, हे निश्चित.

 

 

या सर्व रक्तपेढ्यांमधील परस्परसौहार्द हे केवळ एखाद्या कार्यक्रमापुरते मर्यादित नाही, हे नंतरही अनेकवेळा माझ्या प्रत्ययास येत गेलं. रक्तदान, रक्ततपासणी, रक्तसंक्रमण अशा सर्व प्रक्रियांमधली तांत्रिकता जपताना तत्संबंधी ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान खूप उपयुक्त असते. अशा आदान-प्रदानाचा उपयोग थेट रुग्णांनाच होत असतो. रुबी हॉस्पिटल रक्तपेढीच्या डॉ. स्नेहल मुजुमदार, केईएम चे डॉ. आनंद चाफेकर, दीनानाथचे डॉ. केतकर, सह्याद्रीच्या डॉ. जोशी आणि डॉ. राव, जहांगीरचे डॉ. आदिल इलाविया, इनलॅक्सचे डॉ. आर्ते, आचार्य आनंदऋषीजी रक्तपेढीच्या हिना गुजर आणि जनकल्याणचे डॉ. कुलकर्णी अशा सर्वांनाच असे बौद्धिक आदानप्रदान करताना मी अनेकदा पाहिलं आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या तांत्रिक सल्लगार समितीमध्ये तर पुण्यातील प्रमुख रक्तपेढ्यांचे संचालकच आहेत, हे विशेष. मला आठवते, जनकल्याण रक्तपेढीमध्ये रक्ततपासणीचे जगातील सर्वांत सुरक्षित तंत्रज्ञान नॅट (न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग) आणण्याबाबतची चर्चा नुकतीच सुरु झाली होती. तेव्हादेखील डॉ. अतुल कुलकर्णी यांनी पुण्यातील सर्व प्रमुख रक्तपेढ्यांच्या संचालकांसोबत एक डिनर मीटींग आयोजित करुन त्यात नॅटबद्दल तांत्रिक चर्चा घडवून आणली होती आणि जनकल्याणमध्ये अशी प्रयोगशाळा सुरु करण्याबाबत सर्वांची मते समजून घेतली होती. या चर्चेनंतरच नॅट प्रयोगशाळा सुरु करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळेच ‘नॅट’ प्रयोगशाळा जनकल्याणमध्ये सुरु झाली असली तरी ही सुविधा संपूर्ण पुणे शहराची आहे, अशीच आमची भावना त्यामागे राहिली. त्याचप्रमाणे आमच्याकडे रक्तविकिरण प्रयोगशाळा म्हणजेच इरॅडिएशन लॅब सुरु करतानाही अशी सुविधा आधीच ज्यांच्याकडे आलेली होती त्या दीनानाथ मंगेशकर आणि रुबी हॉलच्या रक्तपेढ्यांनीही त्याबद्दल अगदी भरभरुन माहिती आम्हाला दिली. ‘दीनानाथ’ च्या डॉ. केतकरांशी तर माझ्या खूपच गाठीभेटी यावेळी झाल्या. केवळ या प्रयोगशाळेबद्दलच नव्हे तर एकूणच रक्तपेढी-व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, मूल्यांकन अशा अनेक गोष्टींबद्दल डॉ. केतकरांनी अगदी आपुलकीने आणि स्वत: होऊन अत्यंत मोलाची माहिती वेळोवेळी मला दिली, जिचा अर्थातच पुढे खूप उपयोग झाला.

 

 

जनकल्याण रक्तपेढीच्या बाबतीत तर या सर्वच रक्तपेढ्यांच्या फारच चांगल्या भावना आहेत. त्या मी वेळोवेळी अनुभवत असतो. २०१३ सालची एक घटना मला आठवते. हे वर्ष स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीचं वर्ष होतं. देशभरात अनेक कार्यक्रमांची योजना या निमित्ताने होत होती. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद सार्ध शती समितीच्या माध्यमातून पुणे शहरात ‘अभिवादन यात्रे’ चं आयोजन केलं होतं. यात अनेक नागरिक, विद्यार्थी, सेवासंस्था उत्साहाने सहभागी होत होत्या. जनकल्याण रक्तपेढीनेही यात सामील होण्याचे ठरवले. मात्र इतके ठरवण्यावरच न थांबता आम्ही काही रक्तपेढ्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आणि त्यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. आनंदाची बाब म्हणजे जनकल्याण रक्तपेढी सोडून एकूण सहा रक्तपेढ्या आपापली वाहने आणि सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स यांचा संच घेऊन या अभिवादन यात्रेत सहभागी झाल्या आणि स्वेच्छा रक्तदान चळवळीच्या वतीने स्वामीजींना एक अनोखी मानवंदना आम्ही या दिवशी दिली.

 

 

सर्वच रक्तपेढ्यांमध्ये काही ना काही कार्यक्रम, प्रशिक्षण वर्ग, तांत्रिक सुधारणा वगैरे गोष्टी सातत्याने चालुच असतात. अशा सर्व कार्यक्रमांसाठी हक्काने परस्परांचे सहकार्य घेणे आणि देणे हे अगदी सहजतेने व्हावे असे वातावरण सर्वच रक्तपेढ्यांनी जपले आहे. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णास सुरक्षित रक्तघटक मिळावेत यासाठी सर्वच जण प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने एकत्र भेटत राहणे, त्यावर चिंतन करणे, विचार-विनिमय करणे अशी एक चांगली परंपरा पुण्यातील रक्तपेढ्यांनी निर्माण केली आहे. रक्तपेढ्यांमधील अशा परस्परसौहार्दाचा उपयोग रुग्णांना चांगली रक्तसेवा मिळण्यासाठी निश्चितच होतो. एकमेकांकडे कायम स्पर्धक म्हणूनच पहाण्याची सवय लागलेल्या तद्दन व्यावसायिक जगात असे चित्र पहायला मिळणे तसे दुर्मीळच. यासंदर्भात डॉ. अतुल कुलकर्णींनीच एकदा मला सांगितले होते, ‘आपली स्पर्धा केवळ आपल्याशीच, अन्य कुणाशीही नाही. आपण स्पर्धा वगैरेंमध्ये न अडकता केवळ आपले काम मनापासून आणि व्यवस्थितपणे केले तरी आपोआपच सर्वांनाच चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते आणि याचा लाभ समाजाला मिळतो.’ असाच विचार पुण्यातील सर्व रक्तपेढ्यांनी जपला आहे, जोपासला आहे. त्यामुळेच ‘अवघे जण सुपंथा’ वर अग्रेसर आहेत आणि समाज खऱ्या अर्थाने लाभान्वित होत आहे.

 

रक्ताच्या नात्याचा महिमा काही निराळाच असतो, हेच खरे !

 

- महेंद्र वाघ