लवकरच अवतरणार मोबाईल ई-डिलिव्हरी बाईकचे युग
 महा एमटीबी  10-Nov-2017
 

 
 
’स्टार्टअप’ योजना जाहीर केल्यानंतर सुमारे वर्षभराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात सांगितले होते की, ’’स्टार्टअपमध्ये जे यशस्वी झाले आहेत, ते केवळ स्वयंउद्योजक नाही, तर साहसी वृत्ती त्यांच्या स्वभावात आहे. त्यामुळेच ते हे धाडस करू शकले. ‘स्टार्टअप’साठी केवळ उद्यमशीलतेची गुणवत्ता उपयोगी नाही, तर धोका पत्करण्याची तयारी, साहसी वृत्तीचा पक्का इरादा याचीही गरज असते आणि हे सगळे जेव्हा एकत्र होते, तेव्हाच ‘स्टार्टअप’ यशस्वी होऊ शकते.’’ ‘स्टार्टअप’, ‘मुद्रा’ योजना या सरकारी योजना नसून त्याची अंमलबजावणी किती जोमाने केली जात आहे, याची अनेक उदाहरणे आहेत. भारतात ‘स्टार्टअप’ आणि ‘मुद्रा’ योजनेची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामागे भाजप महाराष्ट्र उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत. नव्या उद्योजकांना पुढे येण्यासाठी सरकारी लाल फितीचा अडथळा दूर होण्यासाठी अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज असते.
 
 
कल्पकतेला उत्तेजन देऊन व्यवहार्य योजना राबविता येते आणि तीही शासकीय तरतूदीतून. हे तर पूर्वी दुर्मीळ असलेले चित्र पाहायला मिळू लागले आहे. त्याचे दृश्य रूप म्हणजे मोबाईल ई-डिलिव्हरी बाईकचा प्रकल्प.
 
 
इंटरनेट आता मोबाईलच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहे. कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल तर बाजारात जायची गरज उरलेली नाही. भविष्यात अशा ऑनलाईन शॉपिंगमध्ये वाढ होणार आहे. इतकेच नव्हे, तर सध्याच्या मार्केटिंग पद्धतीत देखील त्यामुळे बदल घडवावे लागणार आहेत. कोणतीही वस्तू घरपोच मिळण्याची सवय लोकांना झाली की, ही व्यवस्था अधिकच बळकट होणार आहे. आज आपण पाहतो की, ऍमेझॉन, डीटीडीसीसारख्या अनेक विविध कुरिअर कंपन्या, डॉमिनॉज पिझ्झा, पिझ्झा हट, मॅक्‌डोनाल्ड अशा अनेक प्रसिद्ध कंपन्या घरपोच डिलिव्हरी देताना दिसतात. खाद्यपदार्थांबाबत बोलायचे झाले, तर सर्व प्रमुख वस्ती आणि शहरातील ठिकाणे येथे आता पार्सल पॉईंट झाली आहेत. तेथून भाजीपोळी किंवा वरण-भात आणि नुकतीच भारतीय खाद्य म्हणून जाहीर झालेली ‘खिचडी’ देखील मागविली जाते. या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना डिलिव्हरी बॉयची आणि वाहनांची गरज असतेच.
 
 
नेमकी हीच गरज ओळखून ‘मोबाईल ई- डिलिव्हरी बाईक’ची निर्मिती करण्यात आली आहे. नागपूर येथील आदित्य गांजापुरे, अंगद शिंगी, महेंद्र सेंगर, चिन्मय चांगदे या तरुणांनी लिथोस मोटर प्रा.लि. कंपनी स्थापन केली असून या बाईकची निर्मिती करणारा प्रकल्प उभारला जात आहे. या ग्रुपमधील एक आदित्य दिलीप गांजापुरे नाशिक येथे आले असता या प्रकल्पाची सविस्तर माहिती मिळाली.
 
 
नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑटोमोबाईल विषयात बी. ई. करीत असताना आदित्य आणि त्याचा मित्र अंगद गौतमशिंगी यांनी बनविलेल्या ‘सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअर्स’च्या पुणे येथे झालेल्या प्रकल्प स्पर्धेत फोल्डेबल इलेक्ट्रिक बाईक या उपकरणास प्रथमक्रमांक मिळविला. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांनी लिथोस मोटर्स प्रा.लि. ही कंपनी स्थापन केली. डिलिव्हरीसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त असून त्यात लिथियमआयर्न बॅटरी वापरली जाते. एकदा चार्ज केल्यावर ८७ किलोमीटर वाहन चालते. या वाहनाची २५०० किमी इतकी चाचणी करण्यात आली असून कच्च्या, पक्क्या कोणत्याही रस्त्यावर ते चालते. त्यास किलोमीटरमागे खर्च फक्त ५७ पैसे इतका येतो. चार्जिंग करण्यास तीन तास लागतात. १२० किलो वजन वाहून नेण्याची या बाईकची क्षमता आहे. तशी २५ किमी वेगाने वाहन धावू शकते. त्यासाठी लायसन्सची गरज भासत नाही. पर्यावरणाचे रक्षण करणारी ही बाईक आहे. ही बाईक बनवून डिलिव्हरी करणार्‍या कंपन्यांना भाड्याने देण्याची कंपनीची योजना आहे. वातावरणात ’लिथोस’ हा ओझोनच्या वर एक थर आहे. पर्यावरण रक्षणासाठी ओझोन वाचायला हवा, असे म्हटले जाते. या युवकांची दूरदृष्टी इतकी आहे की, त्यावरील लिथोसचे रक्षण करणार्‍याचे दायित्व त्यांनी स्वीकारले आहे. या प्रकल्पाचे अभिनव स्वरूप पाहून अनेकांनी त्यांना सहकार्य केले असून त्यातून एक क्रांती घडेल, अशी स्थिती आहे. सहकार्य करणार्‍यात डीटीडीसी कुरिअर कंपनी, मार्गदर्शक प्राजक्त राऊत, उद्योजक सुंदरराजन, अपूर्व अग्रवाल, फणीराज आदींचे अमोल सहकार्य मिळत असल्याचे आदित्य यांनी सांगितले. त्याबरोबरच नाशिक येथे वास्तव्य असलेले भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांचा सातत्याने पाठपुरावा आणि कोणत्याही वेळी सहकार्य करण्याची तयारी यामुळे प्रकल्प आकार घेत आहे.
 
 
ई-बाईकची वैशिष्ट्ये
 
- कमी खर्च
 
- पर्यावरण संरक्षण
 
- लायसन्स नाही, वापरण्यास सुलभ
 
- जवळच्या अंतरावरील प्रवासासाठी उपयुक्त
 
- कोणत्याही रस्त्यावर चालू शकते
 
 
- पद्माकर देशपांडे