नांदेड मधील प्रत्येक गरीबाला त्याचे हक्काचे घर मिळायला हवे : मुख्यमंत्री
 महा त भा  09-Oct-2017

 


नांदेड (मराठवाडा) :  नांदेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून अशोक चव्हाण यांची सत्ता आहे, मात्र त्यांनी सामान्य माणसाच्या गरजांचा विचारच केला नाही. आपले सरकार आल्यावर नांदेड येथे प्रत्येक गरीबाला त्याचे घर मिळायलाच हवे, त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत." असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

 अशोक राव कुठे 'चंपत' व्हायचे कळायचेही नाही :

यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत म्हटले की, " नांदेडची भोळी भाभडी जनता 'अशोकराव अशोकराव' करत त्यांना सलाम ठोकायची मात्र अशोकराव चव्हाण भ्रष्टाचार करुन कुठे चंपत व्हायचे कळायचे देखील नाही." तसेच "इतके वर्षांपासून अशोकरावांनी सत्ता उपभोगली मात्र त्यांच्या मनात कधीच नांदेडच्या ५० हजार लोकांच्या डोक्यावर छत्र देण्याचा विचार नाही आला, आजही ते ५० हजार लोक बेघर आहेत. त्यांना हक्काचे घर देण्याचे कार्य राज्यसरकार करेल." असेही ते यावेळी म्हणाले.

'उद्धव'जी नांदेडची जनता तुम्हाला २ आकड्यात देखील नगरसेवक देणार नाही :

"नांदेड येथे कांग्रेस केवळ सत्ता उपभोगण्याचे कार्य करत आहे, आणि शिवसेना देखील त्यांच्या मदतीत आहे, मात्र नांदेड येथे शिवसेनेची अवस्था काय आहे, हे येथील जनतेला देखील माहित आहे, त्यामुळे 'उद्धव जी' येथील नागरिक तुम्हाला २ आकड्यात देखील नगरसेवक निवडून देणार नाही." असे म्हणत त्यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

परिवर्तन हा निसर्गाचा नियम :

गेली २० वर्षे नांदेड येथे कांग्रेसची सत्ता आहे. तुम्ही तुमच्याशी नाते सांगून ते तोडणाऱ्या लोकांना आजमावले आहे. मात्र परिवर्तन हा निसर्गाचा नियम असल्यामुळे विकासासाठी परिवर्तन आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी कार्य करणारी सरकार निवडा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सरकार आल्यावर नांदेडच्या कचऱ्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था तसेच घरांची व्यवस्थाही मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.