विख्यात गझलगायिका बेगम अख्तर यांना गुगलची मानवंदना
 महा त भा  07-Oct-2017


जगप्रसिद्ध गझलगायिका बेगम अख्तर यांच्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना मानवंदना दिली आहे. आजच्या गुगल डूडलमध्ये बेगम अख्तर यांचे चित्र साकारण्यात आले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुगलने हे डूडल तयार केले आहे. अख्तर यांची आज १०३ वी जयंती आहे.

 

बेगम अख्तर यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१४ रोजी उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यात झाला. त्यांना अख्तरबाई फैजाबाई असेही म्हणत असत. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. फिरत्या नाटक कंपनीतील एक गायिका चंद्राबाई यांच्या गाण्याचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. पुढे पाटणा घराण्याचे ज्येष्ठ व्हायोलिन वादक उस्ताद इमदाद खान यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पटियाला घराण्याचे मोहम्मद खान यांच्याकडे त्यांचे संगीताचे शिक्षण सुरु राहिले. त्यानंतर कलकत्त्याला स्थलांतरीत झाल्यावर त्यांनी अब्दुल वहीद खान, उस्ताद जुनैद खान यांच्याकडे पुढील शिक्षण सुरु केले.

 

वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपला पहिला कार्यक्रम केला. त्यानंतर त्यांनी गझल, दादरा, टप्पा, ठुमरी या उपशास्त्रीय संगीत प्रकारात विशेष नैपुण्य मिळवले. त्यानंतर अत्यल्प कालावधीतच त्यांचा नावलौकिक सर्वत्र पसरला व मलिका-ए-गझल अशी सर्वत्र ख्याती पसरली. शास्त्रीय संगीतातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी पार्श्वगायन केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांतून अभिनयही केला. आकाशवाणीवरूनही त्यांनी अनेक गायनाचे कार्यक्रम केले आहेत. ३० ऑक्टोबर १९७४ या दिवशी अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

 

बेगम अख्तर यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. १९७२ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना मिळाला होता. तसेच १९७५ मध्ये त्यांना मरणोपरान्त पद्मविभूषण या नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना मलिका-ए-गझल या किताबाने गौरवले होते.