विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार भाग - ३८
 महा त भा  06-Oct-2017


 

अवंती: काकू...काकू...काकू...सॉरी...सॉरी...सॉरी...!!..रागावू नकोस हं...नाहीतर मी रडेन...!!..सांग ना...नाही ना रागावणार...!?..अगं काल, मोहना आणि चिन्मयी दोघींचा जन्मदिवस होता...आणि त्या दोघींनी शाळेतून घरी येताना मला सांगितले कि त्यांचा जन्मदिवस त्या एकत्र साजरा करणार आहेत आणि मला त्या कार्यक्रमाला जायचंय...!!..मग माझी धावपळ झाली...आणि मी कालचा अभ्यास चुकवला...!!..पुन्हा एकदा सॉरी...सॉरी...सॉरी...मेधाकाकू...!!..         

  

मेधाकाकू: हं...समजलंय मला...कालच, तुझी आई भेटली होती भाजीवाल्याच्या ठेल्यावर...!!..एक बरं झाले...मस्त विषय काढलास आजच्या अभ्यासासाठी...मित्र-मैत्रिणी-मैत्री-स्नेह...!!..अवंती...अलीकडे काही वर्षांपासून, फ्रेन्डशिप – रिलेशन – रिलेशनशिप अशा शब्दाना फार महत्व दिलं जाताना दिसतंय...!!..मात्र या इंग्लीश शब्दांचा नेमका अर्थ काय याचा कोणीच विचार करतांना दिसत नाहीये. तुमच्या पिढीत तर याचे फारच प्रस्थ झालेलं आहे. पांच हजार वर्षांपासून आपल्या चाणाक्ष समाज धुरिणांनी, दोन व्यक्तींमधील  या स्नेह भावनेचा – मैत्र धारणेचा सखोल अभ्यास अभ्यास केला आहे. हजारो वर्षांपासून कृष्ण-सुदाम्याची गोष्ट, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक आजी-आई, आपल्या मुला-नातवंडाना सांगत आल्या आहेत. कृष्ण-सुदाम्याची हि गोष्ट, उत्तम मैत्री-स्नेहभावनेचे भारतिय प्रतिक, अजरामर झाले आहे. आता या दोन म्हणींची गम्मत बघुया.     

जिकडे सुई तिकडे दोरा.

दिवटी बरोबर बुधली.   

 

आई-वडिलांपासून दूर, गुरुकुलात राहणारे दोन किशोर असतील किंवा गावातल्या समवयस्क दोन छोट्या मुली असतील, कायम एकत्र सापडणार्या अशा मित्र-मैत्रिणीच्या अनेक जोड्या आजही दिसतात आपल्याला. अत्यंत गाजलेल्या ‘शोले’ या सिनेमातील ‘जय आणि विरू’ हि अमिताभ+धर्मेंद्र यांची जोडी आणि त्यांची मैत्री हे जणू ‘मैत्रीचे’ प्रतिक बनले आहे. जणू एकच जीव, दोन शरीरात असावा असे यांचे सख्य असते, अशा मित्र-मैत्रीणीना एकमेकांशिवाय एक क्षणभर सुद्धा चैन पडत नाही...!! अशाच घनिष्ट  ‘मैत्री’ चे चपखल वर्णन या दोन म्हणींमधे केले आहे. ‘सुई+दोरा’ या जोडीचा वेगळा संदर्भ देण्याची गरज नाही, इतकी हि जोडी अतूट आहे. ‘दिवटी+बुधली’ ची हि जोडी आपल्याला शतकापूर्वीच्या काळात घेऊन जाते, ज्या काळात विजेचा वापर होत नसे. दिवटी म्हणजे लहान-मोठ्या आकाराच्या मशाली, ज्यांना सतत तेल-वात करावी लागत असे.  दिवेलागणीला घराच्या आत आणि बाहेर उजेडासाठी या दिवट्या वापरत असत.  या दिवटीत रोज तेल घालावे लागे म्हणून तेलाची बुधली या दिवटीच्या जवळच ठेवलेली असे. या दोन्ही जोड्यामधे, एका शिवाय दुसर्याला काहीच महत्व नाही, हे तुझ्या लक्षात आलेच असेल. या रोजच्या वापरातील वस्तूंच्या वैशिष्ट्याचा वापर करून, नेमक्या फक्त तीन चार शब्दांमधे, दोन व्यक्तींमधील स्नेह्भावनेचे यथार्थ वर्णन केले गेले, हेच म्हणीचे वैशिष्ट्य असते.        

        

अवंती: मेधाकाकू...एकदम सही आहे हे सगळं आणि या म्हणीसुद्धा चाबुक आहेत. इतक्या वेगवेगळ्या माध्यमात या चतुर पूर्वजांनी कायकाय शब्द खजिने भरून ठेवलेत ते तुझ्यामुळे समजतंय मला...!!

 

मेधाकाकू: अवंती...या लोकसाहित्यात, स्नेह-मैत्री संदर्भातील, अशाच तीन-चार शब्दातून किती प्रकारच्या भावना-धरणांचा अनुभव आपल्याला मिळतोय ते पाहूया आपण. वरच्या दोन म्हणी, चिरकाल टिकणाऱ्या मैत्रीचा परिचय देतात, तर या पुढच्या दोन म्हणी, दूर गेलेल्या मित्रांची आणि तुटलेल्या मैत्रीची गोष्ट सांगतात.  

जाते फुटले नाते तुटले.   

 

घरातलं ‘जात’, याचे वैशिष्ट्य असे कि याला दोन पाटे असतात आणि ते दोन्ही असल्याशिवाय जात्यावर दळण दळता येत नाही. मिक्सर-ग्राइंडर यायच्या आधी, घराघरात हे जाते असायचेच. यातल्या एका तुटलेल्या पाट्यांचे प्रतिक, तुटलेल्या-मोडलेल्या मैत्रीसाठी, या म्हणीत वापरले आहे. हे प्रतिक इतके स्पष्ट आहे कि ज्याला जात्याचे काम माहीत आहे त्याला हे सहज पटेल. अशीच एक वेगळी म्हण बघ, काय सांगत्ये आपल्याला...!!..   

तापल्या पाण्यास चव येत नाही.

 

कुठल्याही दोन जीवश्च- कंठश्च म्हणजे घनिष्ठ मित्रांच्या जीवनात निर्माण होणारा प्रसंग. शहरात गेलेल्या एका मित्राची प्रगती होते आणि त्याला संपन्नता प्राप्त होते. गावातच राहिलेल्या दुसर्या मित्राला सामान्य परिस्थितीतच दिवस काढावे लागत असतात. अशा वेळी निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेतून, दोघांच्याही मनात तणाव आणि तेढ निर्माण होते, घेतलेल्या शपथ आणि दिलेल्या वचनांचा विसर पडतो, त्या परिस्थितीचे अचूक वर्णन हि म्हण करते... ‘तापल्या पाण्यास चव येत नाही’...!!..तापवलेले पाणी, तोंडाची चव गेलेल्या आजार्यालाच दिले जाते...निरोगी माणूस माठातले पाणी पितो...!!..आरोग्य बिघडलेल्या मैत्रीचा उत्तम दृष्टांत...!!..  

 

अवंती: मेधाकाकू...माझे डोळे उघडतायत आणि स्नेह-मैत्री किंवा फ्रेन्डशिप-रीलेशन या विषयीच्या माझ्या समजुती बदलतायत...!!..नक्की वर्णन करता येणार नाही कदाचीत, पण आम्ही मुलं किती संकुचित झालोय हे लक्षात येतंय माझ्या...!!..  

 

मेधाकाकू: अवंती...इतके विविध पैलू या म्हणीन मधून स्पष्ट झालेले दिसतायत आपल्याला आणि मग असेही लक्षात येतंय कि इतकी सूक्ष्म निरीक्षणे करणारा आपला तत्कालीन समाज किती प्रगल्भ होता...!!.. ‘मैत्री’ हि भावना आणि त्यातून कालांतराने  निर्माण होणारे प्रसंग यांचा अभ्यास आणि त्याला, रोजच्या वापरातील निर्जीव वस्तूंच्या संदर्भाने दिलेल्या उपमा किंवा दृष्टांत, हे खूप प्रगल्भ समाजाचे लक्षणं आहे...!!..

फुटली घागर न जडे.

 

मैत्री तुटायला, स्नेह विरळ व्हायला कोणते कारण झाले ते कधीच स्पष्ट होत नाही, याची कारणमीमांसा करता येत नाही. अशा दूर गेलेल्या दोन व्यक्ती कधीच पुन्हा जवळ येत नाहीत...!!..अशाच एका वास्तवाचे वर्णन या म्हणीत केले गेले आहे... ‘फुटली घागर न जडे’....!!..

 

- अरुण फडके.