दिव्यत्वाची तेथ प्रचीती
महा त भा   06-Oct-2017


 

गेल्याच वर्षीची गोष्ट. आमच्या जनकल्याण रक्तपेढीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून चिपळूणजवळील लोटे परशुराम या गावी असलेल्या एका डीएमएलटी महाविद्यालयातील सहा मुली तीन महिन्यांसाठी आल्या होत्या. हे प्रशिक्षण अर्थातच तांत्रिक बाबींचे असणार होते. परंतु तीनमहिने हा तसा बऱ्यापैकी कालावधी असल्याने तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच एखाद्या संवादसत्राव्दारे त्यांना या प्रकल्पाच्या सामाजिक पैलुंचीदेखील ओळख करुन द्यावी, असा विषय आमच्या नित्य बैठकीत झाला. असे संवादसत्र मी घ्यावे, असे सांगितले गेल्याने एक निश्चित वेळठरवून या मुलींशी मी संवाद केला. हा संवाद खूपच चांगला झाला. माझ्या बोलण्यात ’जनकल्याण रक्तपेढीच्या स्थापनेची पार्श्वभूमी, स्थापना, कार्याची तत्वे, तांत्रिक अद्ययावतता, प्रकल्पाने जपलेली सामाजिकता’ असे काही मुद्दे मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला.रक्तपेढीच्या स्थापनेचा विषय झाल्याने ज्यांनी खऱ्या अर्थाने जीवापाड कष्ट उपसून जनकल्याण रक्तपेढीसारखा, एक मानदंड ठरावा असा हा प्रकल्प उभा केला त्या डॉ. शरद जोशी – जे सर्वत्र ’शरदभाऊ’ या घरगुती नावानेच परिचित आहेत – यांचा उल्लेख होणे केवळ अपरिहार्यहोते. याबरोबरच रक्तपेढीचे आधारस्तंभ आणि ज्यांच्या स्वत:च्या वास्तुत रक्तपेढी पहिल्यांदा उभी राहिली असे आदरणीय वैद्य प. य. खडीवाले म्हणजेच सर्वांचे दादा, विख्यात सिव्हिल इंजिनियर आणि रक्तपेढीच्या पायाभरणीत मोलाचे योगदान दिलेले श्री. आप्पासाहेब वज्रम,रक्तपेढीविज्ञानातील ऋषितूल्य व्यक्तिमत्व डॉ. दिलीप वाणी अशाही काही व्यक्तिमत्वांचा उल्लेख अत्यंत स्वाभाविकपणे माझ्याकडून झाला. एका चांगल्या वातावरणात आमचे हे सत्र संपले.

 

यानंतर दुसऱ्याच दिवशी दुपारच्या वेळेत या मुली पुन्हा मला भेटायला आल्या. रितसर ’तुमच्याशी थोडं बोलायचं आहे’ वगैरे विचारुन त्या माझ्यासमोर आल्या आणि त्यांच्यातल्या एकीने प्रातिनिधिक स्वरुपात एक मागणी माझ्यापुढे ठेवली. ही मुलगी मला म्हणाली, ’सर, आम्हाला डॉ. शरदभाऊ जोशींना भेटण्याची खूप इच्छा आहे. आम्ही त्यांना भेटु शकतो का ?’ ही मागणी माझ्या दृष्टीने अगदीच अनपेक्षित होती. या मुलींच्या निवासाची व्यवस्था रक्तपेढीच्या इमारतीतच केलेली असल्याने निवासाच्या व्यवस्थेसंबंधी काही मागणी करण्यासाठी या मुलीभेटणार असतील असा काहीसा वेगळाच अंदाज मी बांधत होतो. पण त्यांची डॉ. शरदभाऊ जोशींना भेटण्याची इच्छा पाहून मला फ़ारच आनंद वाटला.’अजूनही म्हणजे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षीही शरदभाऊ ठरवून रक्तपेढीत येतात. एड्स या रोगाविषयी संशोधनाचे त्यांचे कामयाही वयात अखंडपणे चालु आहे’, ही माहिती मी कालच बोलताना या मुलींना दिलेली होती. यामुळेच त्या खूपच प्रभावित झाल्या आणि डॉ. शरदभाऊंना भेटण्याची, त्यांना पाहण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छा या सर्वच मुलींना अगदी आतून झाली. निश्चितपणे ही फ़ारचचांगली घटना होती. या गोष्टीला ’नाही’ म्हणण्याचे काही कारणच नव्हते. मी ही मागणी तातडीने आमचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांच्या कानावर घातली. अपेक्षेप्रमाणेच ’लवकरात लवकर ही भेट ठरवा’ असे उत्तर त्यांच्याकडून आले. मग फ़ोन झाला थेटशरदभाऊंनाच. त्यांनाही हे सर्व सांगितल्यानंतर खूपच आनंद वाटला आणि त्याच आठवड्यातील एक दिवस त्यांनी आम्हाला या भेटीकरिता दिला.

 

डॉ. शरदभाऊ जोशी हे खरोखरीच एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पाच-साडेपाच फ़ुटाच्या आत बाहेरची उंची, सततच्या कष्टांनी अत्यंत काटक बनलेले शरीर, खूप साधा वेष, बोलके डोळे, संथ आणि स्पष्ट शब्दोच्चार, शब्दा-शब्दांत जाणवणारी कार्याबद्दलची तळमळ आणि हातीघेतलेले काम प्राणपणाने पार पाडण्याची जबरदस्त जिद्द आणि इच्छाशक्ती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शरदभाऊ यांचे तर अद्वैतच. संघाचे काम हे आयुष्यभर करण्याचे काम आहे या विचाराने तारुण्यातच झपाटलेल्या वैद्यकपदवीधर शरदभाऊंनी आजन्म ब्रह्मचर्यव्रताचेपालन केले. आयुष्यभर चिंता केली ती केवळ संघकार्याचीच. संघातील ’शारीरिक शिक्षण’ या विषयात त्यांचा विशेष हातखंडा. रक्तपेढीचे काम हातात घेण्यापूर्वी महाराष्ट्र प्रांताचे ’शारीरिक शिक्षणप्रमुख’ अशी संघातील महत्वाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. संघाचेव्दितीय सरसंघचालक श्री. मा. स. गोळवलकर म्हणजेच श्रीगुरुजी आणि तृतीय सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस यांचा जवळून सहवास लाभलेले शरदभाऊ या महान विभूतिंबद्दल बोलताना आत्यंतिक भावूक झालेलेही आम्ही पाहिलेले आहेत. श्री. बाळासाहेब देवरस यांच्याचशुभहस्ते रक्तपेढीचा शुभारंभ झाला, ही शरदभाऊंच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आणि कृतार्थतेची बाब. आयुर्वेद आणि होमियोपॅथी या वैद्यकीय शाखांच्या आधारे त्यांची अनेक संशोधने या वयातही चाललेली असतात. सामान्य माणसाचे जीवन सुखकर कसे होऊ शकेल, हात्यांच्या नित्य चिंतनाचा आणि अभ्यासाचा विषय असतो. आजही रक्तपेढीत आल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला हाताशी धरुन इंटरनेटवरुन विविध विषयांची माहिती जमवणे, त्याचा अभ्यास करणे हेच काम करताना ते सर्वांना दिसतात. विविध विषयांवर त्यांच्याशी केवळ बोलणेहा देखील आपले विचारविश्व समृद्ध करणारा अनुभव असतो. म्हणूनच या प्रशिक्षणार्थी मुलींनी शरदभाऊंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मलाही मनापासून आनंद झाला.


ठरलेल्या दिवशी मी स्वत:च शरदभाऊंना त्यांच्या प्रभात रोडवरील घरी आणण्यास गेलो. रक्तपेढीत जाताना मिश्कीलपणे ’या मुली फ़ार अवघड प्रश्न नाही ना विचारणार ?’ असेही त्यांनी मला विचारले. मी नुसताच हसलो, कारण मीच या मुलींना ’संधीचा उपयोग करुन घ्या, भरपूरमाहिती विचारा’ असे सांगुन आलो होतो. रक्तपेढीतील ही भेट अर्थातच खूप अविस्मरणीय अशी झाली. नि:स्वार्थीपणाची, साधेपणाची आणि परिश्रमांची परिसीमा म्हणजे काय असते याचे प्रात्यक्षिकच जणू शरदभाऊंच्या रुपात या मुलींना पहायला मिळत होते. जनकल्याणरक्तपेढीची सुरुवात कशी झाली हे खूपच सोप्या भाषेत शरदभाऊंनी समजावून सांगितले. ज्या काळात सामान्य निरोगी लोक भीतीमुळे रक्तदानासाठी पुढेच येत नसत आणि अनेक डॉक्टर्सना शेवटी रक्त मिळविण्यासाठी तुरुंगातील कैदी अथवा रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनाही बोलवावेलागे. रक्तदानाच्या बदल्यात मोठमोठ्या रकमा दिल्या आणि घेतल्या जात. बरे, एवढे करुनही रक्ताच्या सुरक्षिततेविषयी खात्री मात्र काहीच नसे. मात्र याही काळात नित्यसिद्ध असलेली संघस्वयंसेवकांची फ़ौज हा अनेक रुग्णालयांसाठी मोठा दिलासाच असे. म्हणूनच रक्तदात्यांचीआवश्यकता असेल तर पुण्याच्या संघ कार्यालयातील म्हणजेच मोतीबागेतील फ़ोन सातत्याने खणखणत असे. याच वातावरणात जनकल्याण रक्तपेढीचे बीजारोपण झाले आणि ’केवळ स्वेच्छा रक्तदान’ हा एकच मंत्र आणि ध्यास घेऊन रक्तपेढी उभी राहिली. निरोगी, सुदृढ आणिकेवळ कर्तव्य म्हणून कुठल्याही अपेक्षेविना रक्तदान करणारे असंख्य रक्तदाते आपल्या रक्तपेढीशी जोडले गेले. रुग्णांना सुरक्षित रक्तघटकांची हमी मिळू लागली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजघटकांची तर रक्तपेढी मोठाच आधार बनली. रक्तदान शिबिरे आयोजितकरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या कामाचे खऱ्या अर्थाने समाधान मिळु लागले. स्वेच्छा रक्तदान चळवळीत संपूर्ण भारत म्हणून विचार करायचा झाला तरी आपल्या रक्तपेढीने अमूल्य असे योगदान दिलेले आहे.


प्रत्यक्ष रक्तपेढी चालु करताना झालेला त्रास, उद्घाटनाच्या दिवसापर्यंत सरकारी कारभारामुळे न मिळु शकलेला रक्तपेढी चालवायचा परवाना, त्यापायी दिल्लीत करावी लागलेली पायपीट, सुरुवातीच्या काळात काचेच्या बाटल्यांमुळे होणाऱ्या अडचणी, रक्तपेढीला स्वत:ची जागा मिळविण्यासाठी झालेला त्रास अशी सर्व माहिती प्रत्यक्ष शरदभाऊंच्या तोंडून ऐकताना सर्वच जण भारावून गेले होते. मुलींनी भरपूर प्रश्न शरदभाऊंना विचारले. त्यांनीही अगदी छोट्या-छोट्या आणि काही वेळा तर बालिश वाटतील अशाही प्रश्नांची उत्तरे खूपच चांगली दखल घेत, अगदी सुलभ भाषेत दिली.

या मुलाखतीच्या शेवटी एक गोष्ट मी सर्वांच्या मुद्दाम ध्यानात आणून दिली. मी म्हणालो, ’तुमच्या एक लक्षात आले का ? आज शरदभाऊंचे वय ८८ वर्षे आहे आणि ३३ वर्षांपूर्वी जनकल्याण रक्तपेढीच्या उभारणीचे दायित्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले. म्हणजेच त्यावेळी त्यांचे वय होते ५५. हे वय म्हणजे सामान्यत: निवृत्तीच्या जवळचे समजले जाते. या वयात रक्तपेढीसारखा एखादा प्रकल्प हाती घेणे आणि तो यशस्वी करुन दाखविणे यातले विशेष तुमच्या लक्षात येते का ?’ हे ऐकल्यावर तर मुली अक्षरश: अवाक झाल्या. निरोप घेताना शरदभाऊंबद्दलचा आदर कसा व्यक्त करावा, हेही त्यांच्या लक्षात येत नव्हते. अर्थात स्वत: शरदभाऊंच्या देहबोलीत मात्र तोच नम्रपणा, साधेपणा कायम होता. ’इथे आलात तर भरपूर शिकून घ्या, खूप काही घेऊन जा’ असा संदेश हसतमुखाने देऊन शरदभाऊ गेलेसुद्धा.

या एकाच भेटीत डॉ. शरदभाऊ जोशींचे संपूर्ण व्यक्तिमत्व मुलींना कळले असेल असे नव्हे, पण ’आज आपली भेट योगी अथवा संन्यासी परंपरेतील एका व्यक्तीशी झाली’, हे मात्र त्यांच्या चांगलेच लक्षात आले. आपल्या वास्तव्यात या सर्वच मुलींनी मला अनेकदा हे बोलुन दाखवले. शरदभाऊंच्या व्यक्तिमत्वातील दिव्यत्वाची प्रचीती माझ्यासारख्य़ा सामान्यास पूर्वीच आलेली होती. या भेटीच्या निमित्ताने प्रशिक्षणार्थी मुलींनादेखील ही प्रचीती आली आणि प्रशिक्षणाबरोबरच दिव्यत्वाचा एक स्पर्शही या मुली सोबत घेऊन गेल्या.

 
- महेंद्र वाघ