ये पब्लिक सब जानती है|
 महा त भा  04-Oct-2017
 
 
 
ठिकाण कळवा रेल्वे स्थानक... वेळ सकाळची... चाकरमानी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर केलेली एकच गर्दी... आणि अशातच राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांचे काही मोजके कार्यकर्ते थेट कळवा रेल्वे स्थानकाच्या रूळावरच येऊन धडकले. रेल्वे प्रशासनाविरोधात, सरकार विरोधात एक-दोन घोषणा दिल्या आणि ‘रेल रोको’ असे खुद्द नामकरण केलेले आंदोलन यशस्वी झाले म्हणून पाठ थोपटवून घेतली. पण रेल्वे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा रेल रोकोचा पोरखेळ अवघ्या काही क्षणात उधळवून लावला. कदाचित रेल रोकोच्या आंदोलनातील हे सर्वात कमी काळ चाललेले आंदोलन ठरावे. असो. (त्याचाही रेकॉर्ड होऊ शकतं बरं का...)
 
 
त्यामुळे राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी जमवलेल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या अल्पावधीच्या ‘रेल रोको’ आंदोलनाचा मंगळवारी असा चांगलाच फज्जा उडाला. एलफिन्सटन रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने म्हणे हे ’रेल रोको’ आंदोलन करण्याचा घाट घातला होता. मुख्य म्हणजे, बॅनरबाजी, पोस्टरबाजी करण्यामध्ये एरवी धन्यता मानणारे आ. जितेंद्र आव्हाड यांचे ’रेल रोको’ आंदोलनाचे बॅनर्स, पोस्टर्स रेल्वे स्थानकाच्या परिसरात, तसेच सोशल मीडियावर झळकत होतेच, परंतु या आंदोलनामध्ये काही दम नसणार, ही बाब बहुधा प्रवाशांना आधीच समजली आणि त्यामुळे कुणीही आव्हाडांचे आंदोलन फारसे मनावर घेतले नाही. त्यामुळे साहजिकच रेल रोखण्यासाठी पुरेसे संख्याबळही म्हणा आव्हाडांना उभे करता आले नाही. त्यामुळे रुळावर उतरलेले कार्यकर्ते कमी आणि पोलिसांची संख्याच जास्त! कारण, या ’रेल रोको’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. रेल्वे स्थानकात आव्हाडांचे ‘रेल रोको’ ‘कव्हर’ करण्यासाठीही पत्रकारांनी गर्दी केली होती. पण त्यांचाही भ्रमनिरास झाला म्हणायचा. अशा या ’रेल रोको’ आंदोलनाच्या नावाखाली झालेल्या फुकटच्या तमाशात एकही रेल्वे एक मिनिटही कळव्यात थांबली नाही. त्यामुळे इथून पुढे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांविषयी पुळका असल्याचे सोंग आणणार्‍या राष्ट्रवादीच्या आमदारांनी असे आंदोलन करण्यापूर्वी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याचा विचार करावा. कारण, अशा ‘रेल रोकों’नी जनतेचे कधीही भले झालेले नाही. त्यामुळे आव्हाडांनी असे रुळावर उतरुन स्टंटबाजी करण्यापेक्षा कळवावासियांच्या मूलभूत समस्यांच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न करावे.
 

 

अफवांचा घातकी बाजार

 

कधी कधी आपल्या क्षुल्लक सवयी आपल्याला खूप महागात पडतात. त्यांची किंमत आपल्याबरोबरच इतरांनाही मोजावी लागते. काही शब्द कानांवर पडतात, आपण भलतंच काही ऐकतो, त्यात काही अज्ञानी मंडळी त्यात आपले तर्क-वितर्क लावून गैरसमज, अफवा पसरवतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे घडलेला प्रकार हा वेगळाच असतो. असाच काहीसा प्रकार दसर्‍याच्या आदल्या दिवशी एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेत घडला. या दुर्घटनेमधून बचावलेल्या एका २२ वर्षीय तरुणीने त्या दिवशी नेमके काय घडले, याची माहिती समोर आली. २९ सप्टेंबरला पुलावरील गर्दीत भारा वाहणार्‍या व्यक्तीची ‘फुले पडली’ हे दोन शब्द त्यावेळी काहींनी ’पूल पडला,’ असे ऐकले आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि पुढचा अनर्थ घडला.

  
नेमके काय घडले आहे, याची कुठलीही शहानिशा न करता पसरवलेल्या या अफवेमुळे इतकी मोठी दुर्घटना होत असेल, तर आज प्रत्येक मुंबईकराने यावर गांभीर्याने विचार करायची गरज आहे. अर्थात, या अफवांमुळे उडणारा गोंधळांचा धुरळा, गैरसमजांची दवंडी तशी काही नवीन नाही. यापूर्वीही बरेचदा असे प्रकार घडले आहेत. १६ ऑक्टोबर २०१६ मध्ये वाराणसी आणि चांदौली या दरम्यान असलेल्या राजघाट पुलावर एका धार्मिक कार्यक्रमासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळून झालेल्या चेंगराचेंगरीत पसरलेल्या अफवांमुळे २४ जणांचा मृत्यू होता. ऐरवीदेखील बॉम्बस्फोट झाला, शहरात दहशतवादी घुसले, अपघात झाला, अमुक ठिकाणी दरड कोसळली, भूकंप झाला, ढगफुटी झाली... यावरुन अफवांचा पाऊस कोसळतो आणि जीवितहानी उद्भवते. ताजं उदाहरण द्यायचचं झालं तर मुंबईत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी काही अफवेखोरांनी मुंबईत वादळ येणार असल्याचे पिल्लू सोडले आणि मुंबईकरांना नाहक चिंतेच्या गर्त्यात ढकलून दिले. त्यानंतर ही अफवा असल्याचा खुलासा खुद्द महापौरांना करावा लागला आणि मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. आता तर व्हॉट्‌सऍपच्या जमान्यात अफवांच्या साथीची गती अधिकच वाढली. त्यामुळे कुठल्याही माहितीची शहानिशा न करता उगाच गैरसमजांचे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे अशा घटनांचा पोलीस यंत्रणेबरोबरच इतर यंत्रणांनाही खूप मनस्ताप सहन करावा लागतो. सर्व परिस्थिती नियंत्रणात आणेपर्यंत कुठेतरी नको त्या घटना घडून जातात. मग एल्फिन्स्टनसारखी दुर्देवी घटना घडते. त्यामुळे प्रत्येकाने अशा या घटना, प्रकार कानावर पडले की, संयमठेवून त्यामागची सत्य परिस्थिती जाणून घेतल्यास होणारा अनर्थ निश्चित टळू शकतो.
 
 
-सोनाली रासकर