नागरिकांच्या समस्या त्वरीत सोडवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
 महा एमटीबी  31-Oct-2017अकोला : मे, जुन आणि जुलै या कालावधीमध्ये पालकमंत्री कार्यालयामध्ये दाखल झालेल्या तसेच जनता दरबारा दरम्यान प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी तातडीने निकालात काढून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांनी दिले आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात जनता दरबारनंतर पाटील यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी प्रत्येक विभागाकडे आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच जनता दरबारात असलेल्या सर्व तक्रारी त्यांनी संबंधित विभागांकडे सुपूर्द केल्या. तसेच नागरीकांची कामे करतांना ती काम होतील का ? तसेच किती दिवसात होईल याची शहानिशा यावेळी त्यांनी संबंधीत अधिका-यांकडे केली.


यावेळी कलाशिक्षक, निगुर्णा प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी शेतक-यांना उपलब्ध होईल का, वृध्द कलावतांचे मानधान, हिवरखेड येथील रस्ते तसेच जॉब कार्ड धारकांना रोहयो अंतर्गत काम, अकोट शहरातील राहूल नगर येथील पिण्याचे पाईप लाईन टाकणे, पाणलोट विकास पथकाच्या सेवा खंडीत केल्याबाबत तसेच गांधीग्राम येथील घरकूल योजनेचा लाभार्थ्यांना नमुना ड मिळणे बाबत आदीचे निवेदने जनता दरबारात पाटील यांना देण्यात आले. या निवेदनांवर त्वरीत कार्यवाही करून संबंधीतांच्या तक्रारीचे निरासरण करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.