‘पुनश्च’मुळे दर्जेदार साहित्य वाचायला मिळेल : किरण भिडे
 महा एमटीबी  30-Oct-2017

 

नव्या माध्यमांमधून नवा आशय वाचकांना भरपूर प्रमाणात उपलब्ध झाला आहे. जुना पण दर्जेदार आशय हा आधुनिकीकरणाअभावी लोकांपर्यंत पोहोचत नाही, अशी सल किरण भिडे यांना आहे. म्हणून त्यांनी ‘पुनश्च’ची निमिर्ती केली. काय आहे पुनश्च?, पुनश्चच्या माध्यमातून काय आशय मिळेल, हे जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत

 

‘पुनश्च’ का सुरू करावंसं वाटलं?

मी जेव्हा जुनी मासिके, दिवाळी अंक चाळायचो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवायचं की इतकं चांगलं लेखन हे किती जणांनी वाचलं असेल, किती जणांपर्यंत पोहोचलं असेल? एक व्यावसायिक म्हणून मला एक गोष्ट माहीत आहे की, उत्पादन चांगलं असून भागत नाही. ते लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कलाकृती निर्माण करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, हे मी दिनकर गांगल आणि भानू काळे यांच्यासोबत काम करताना अनुभवलं आहे. एखादा लेख लिहीत असताना लेखकाची आणि संपादकाची किती मेहनत असते, हे मी जवळून पाहिले आहे. प्रत्येक उत्कृष्ट लेख वाचकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून अशा लेखांचे डिजिटायझेशन करणे गरजेचे आहे, असे लक्षात आले आणि ते लोकांपर्यंत पोहोचणे सुद्धा गरजेचे आहे. दस्तऐवजीकरणामुळे त्याचे संवर्धन होईल. म्हणून त्याचे चॅनेल करणे गरजेचे आहे. मग त्याचे वेबसाईट किंवा मोबाईल ऍप तयार करणे गरजेचे आहे. दुसरा पर्याय होता छापील मासिक काढणे, परंतु ते फार खर्चिक होते. म्हणून नवमाध्यमाचा वापर करण्याचे ठरले. एका बाजूला लेख शोधून त्याचे डिजिटलायझेशन करणे ही एक प्रक्रिया आणि हे पोहोचविण्यासाठी नवमाध्यमाचा वापर करावा म्हणून ‘पुनश्च’ सुरू करावेसे वाटले. ‘पुनश्च’च्या माध्यमातून आपण जुने लेख लोकांसमोर आणतोय, ज्या लिखाणावर संपादकीय संस्कार करण्याची गरज नाही. जेव्हा एखादा आशय निर्माण होतो तेव्हा तो अनेक शक्यतांना जन्म देतो. माध्यम बदलल्याने आशयाचा अनुभव पंचेंद्रियांनी घेता येतो. त्यात अजून काय भर घालता येईल याचाच विचार मला आता करायचा आहे. जुने लेख हे नव्या माध्यमाच्या स्वरूपात आता वाचकांना उपलब्ध होणार आहेत. आमच्या नियोजनानुसार आठवड्याला दोन लेख उपलब्ध होतील आणि ४ आठवड्याला ८ लेख वाचकांना मिळतील. त्यातला एक लेख सद्य काळात किती समर्पक आहे, त्यावर त्या लेखाची निवड ठरेल. विज्ञान, तंत्रज्ञानातील संशोधनात्मक लेख आता लागू होणार नाही म्हणून ते टाळले जातील. ‘पुनश्च’मुळे दर्जेदार साहित्य लोकांना वाचायला मिळेल.

 

‘पुनश्च’ सशुल्क ठेवण्याचे कारण?

निशुल्क आशय भरपूर उपलब्ध असल्याने वाचकांचा गोंधळ उडालेला आहे. लेखकाने लिहिलेल्या आशयाला योग्य मानधन मिळाले पाहिजे. माझ्या निरीक्षणानुसार विशिष्ट माध्यमातला एखादा आशय लोकांना आवडतो आणि इतर आशय बरा असतो. आवडलेला आशय लोक जास्त वाचतात. लोकप्रिय लेखाच्या लेखकाला इतर लेखकांइतकंच मानधन देणे कितपत योग्य आहे? म्हणून लेखाच्या वाचनप्रियतेवर लेखकाला मानधन मिळाले पाहिजे. हे तंत्रज्ञानाने शक्य आहे आणि ते सशुल्क ठेवल्यानेच होऊ शकतं. ‘पुनश्च’ सशुल्क ठेवण्याचे दुसरे कारण असे की, पैसे दिल्यावर त्यांची किंमत लोकांना असते. सध्या आम्ही एका लेखामागे एक रुपयाहून कमी पैसे घेतो. तेव्हा वाचकाला ते पैसे वसूल झाले, असे समाधान मिळाले पाहिजे. जेव्हा लोक पैसे देऊन आशय वाचतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया मिळते ती सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही असते. पण त्यामुळे मला लोकांची रूची कळते. तसेच हा उपक्रम मला खेडोपाडी राबवायचा आहे. माझ्या निरीक्षणानुसार साहित्य, साहित्यनिर्मिती ही नवमाध्यमापूर्वी पांढरपेशा आणि शहरी भागात केंद्रित होते. ‘माणूस’ आणि ‘अंतर्नाद’ सारखी मासिके ही त्याची उदाहरणे. मोबाईलमुळे ग्रामीण भागातील लोकांकडे हा आशय पोहोचणे गरजेचे आहे. यात लोकानुनय न करणे गरजेचे आहे.

 

जुन्या नव्या लेखांचे प्रमाण कसे असणार?

२१ प्रकारचे ललित साहित्य प्रकार आम्ही ठरवले आहेत. त्यातले ७ लेख जुने असतील आणि एक लेख नवा असेल आणि पुढे जशी लोकांची मागणी असेल त्यानुसार पुरवठा करू.

 

‘पुनश्च’ सुरू करताना काय काय अडचणी आल्या?

जुन्या लेखांच्या उपलब्धतेचं मोठं आव्हान माझ्यापुढे होतं. ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय आणि बदलापूरमधील ‘ग्रंथसखा’ मधून लेख मिळाले, पण तरीही कुठल्या मासिकातून लेख घ्यायचे हा सुद्धा प्रश्न होता. नंतर योग्य लेखांच्या निवडीचा प्रश्न सुद्धा होता. तसेच जिथे ही मासिके जतन करून ठेवली आहेत त्यांचा दर्जा हा एक प्रश्न होता. ती मासिके हाताळताना हातमोजे वापरूनच हाताळावी लागायची कारण त्यात जीव जंतू होते आणि त्याचा धोका होता, हे एक आव्हान होतं. उपलब्ध मासिकांची दुर्दशा झाली होती. आपल्याकडे जुन्या वस्तूंचे लोकांना मोल नाही. हौशीखातर वाचनालय चालवणाऱ्या व्यक्ती ज्या पद्धतीने वाचनालय चालवतात त्याच मानसिकतेने सरकारी किंवा कामावर ठेवलेली व्यक्ती काम करत नाही. पाट्या टाकण्याची कामं कर्मचारी करतात. पण यातून मार्ग काढणं गरजेचे आहे. सशुल्क आशय देण्यासाठी नवे तंत्रज्ञान उभे करण्यात काही अडचणी आल्या. विनय सामंत यांनी यासाठी भरपूर मेहनत घेतली. यामुळे आपण ऍमेझॉनच्या किंडलसारखी सेवा देतोय. वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर अजून चांगले तंत्रज्ञान वापरून चांगला आशय आपण देऊ. या तंत्रज्ञानामुळे आपण लेखक आणि वाचक यातले अंतरच पुसून टाकले आहे. पुढे वाङ्‌मयचौर्य अर्थात पायरसीचे मोठे आव्हान आमच्यापुढे आहे.

 

एका महिन्यात वाचकांचा काय प्रतिसाद आहे?

उत्तमप्रतिसाद होता. मला वाटले की, लोक प्रतिसाद देणार नाहीत पण मोठ्या प्रमाणात वाचकांनी तो दिला. लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. लोकांनी आपापले आवडते साहित्य प्रकार उपलब्ध करून देण्याचे सांगितले. सध्या आम्ही लेखांची शब्दमर्यादा ही एक हजार ते पंधराशे अशी ठेवली आहे. दीर्घ शब्दांचे लेख लोक किती वाचतील याबाबत मी साशंक आहे. लोकांच्या प्रतिसादावर शब्द मर्यादा आपण ठरवू. पुन्हा ऑफलाईन वाचण्याची सोय आम्ही या मोबाईल ऍपमधून करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

पुनश्च ही वेबसाईट पाहण्यासाठी http://punashcha.com/  इथे क्लिक करा