मुठ्ठीतूनही दुनिया बाहेर
 महा एमटीबी  28-Oct-2017


 

‘करलो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत रिलायन्सने २००२ साली भारतातील मोबाईल क्षेत्रात पदार्पण केलं आणि पाहता पाहता या क्षेत्रात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. सीडीएम तंत्रज्ञान वापरून रिलायन्सने नव्या तंत्रज्ञानाची ओळख भारतीयांना करून दिली. त्यातच मान्सून हंगामाच्या नावाखाली नव्याने मोफत इनकमिंग देण्यास सुरुवात. त्या काळी इनकमिंग कॉलसाठीही दर आकारला जात होता. मात्र, त्याला रिलायन्सने छेद देत नवा पायंडा आखला. रिलायन्समध्ये नवनव्या कल्पना आणण्यामागे ज्यांचा हात होता ते म्हणजे मुकेश अंबानी. रिलायन्सने सीडीएमए तंत्रज्ञानावर आणलेल्या मोबाईलने सर्वांना आपलेसे केले, मात्र त्याची जादू फार काळ काही टिकली नाही. २००६ साली मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी आपल्या व्यवसायाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आणि रिलायन्सची मोबाईल कंपनी अनिल अंबानी यांच्या वाट्याला आली. यावेळी त्यांनी पुढील १० वर्षे मुकेश अंबानी यांनी मोबाईल क्षेत्रात येऊ नये यासाठी कायदेशीर मदत घेतली, परंतु त्यानंतरही रिलायन्सचा आलेख सुधारताना दिसला नाही. २००८ मध्ये रिलायन्सने जीएसएम तंत्रज्ञान आत्मसात केले आणि दोन्ही तंत्रज्ञान असलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्सचे नाव गणले जाऊ लागले. बदलत्या वेळेत अनेक कंपन्यांनी निरनिराळ्या तंत्रज्ञानाची जोड घेत भारतात पाय रोवण्यास सुरुवात केली आणि त्या स्पर्धेत रिलायन्सला टिकाव धरण्यासाठी खूप खटाटोप करावा लागला. त्यातच निरनिराळ्या बाबींसाठी कर्ज काढत रिलायन्सचे पाय खोलवर रूतत गेले. आज रिलायन्स कम्युनिकेशन्सवर तब्बल ४० हजार कोटींचे कर्ज आहे. ते फेडण्यासाठीही रिलायन्सच्या नाकी नऊ आल्याचे दिसत आहे. तर रिलायन्स जिओच्या येण्याने कंपनीला होणारे नुकसान कईक पटीने वाढले आहे. त्यातच त्यांना बाजारात टिकाव धरणे कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स कम्युनिकेशने गुजरातमधील २ जी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आता संपूर्ण देशातीलच २ जी आणि वायफाय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला होणारा तोटा सहन होत नसल्याचे कारण पुढे करत फक्त ४ जी सेवेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे, तो म्हणजे कंपनीच्या १२०० कर्मचा-यांना त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याची ३० तारीख ही त्यांच्यासाठी अखेरची असणार आहे. ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ म्हणणा-या कंपनीची आज कंपनीही मुठ्ठीत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. 


 

 

सावधगिरी बाळगा...

इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. या इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले आहे, पण असे असले तरी साता समुद्रापलीकडे राहून सायबर हल्ला करून तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून तुम्ही अडचणीत येवू शकते ही बाब प्रत्येकांनी लक्षात घ्यायला हवी. तंत्रज्ञानाच्या युगात वावरणा-यांसाठी हा एक प्रकारचा धोका आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण सध्या जगाला सायबर हल्ल्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पाडण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या ‘मिराई’ या सर्वात सायबर हल्लाला तोंड दिल्यानंतर आता पुन्हा एका सायबर हल्ल्याचे संकेत देण्यात आले आहेत. हा सायबर हल्ला थेट इंटरनेटवर आधारित उपकरणांवर होणार असून त्यामुळे इंटरनेट सेवा पूर्ण बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा राज्य पोलीस दलाच्या सायबर विभागाने दिला आहे. साधारण दीड वर्षापूर्वी ‘मिराई’नावाचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे अनेक देशातील इंटरनेट सेवेवर त्याचा परिणामझाला होता. त्यावेळी हल्लेखोरांकडे पाच लाख वापरकर्त्यांच्या तपशील हल्लेखोरांकडे जमा झाला होता. खरंतर आजच्या काळात संगणक, मोबाईल, इंटरनेट यांचा वापर तसा अपरिहार्य झाला आहे. अनेक छोटी-मोठी कामे करण्यासाठी यांचा वापर हा करावाच लागतो. परंतु याचा वापर करत असताना सुरक्षा हा कळीचा मुद्दा बनला आहे. आपल्या संगणकातली माहिती चोरण्यासाठी काय काय केलं जातं, तो डेटा कधी चोरला जातो यांचा साधा आपल्याला थांगपत्ताही लागत नाही. आज नव्या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे स्मार्टफोनसुद्धा संपर्क आणि इंटरनेटद्वारे माहितीच्या आदान-प्रदानाचे साधन झाले. भारतासह सा-या जगभरात अब्जावधी लोक स्मार्टफोन आणि संगणकाचा वापर करतात. संगणकाचा वापर हा आधुनिक जगाचा मूलमंत्र झाला आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या नवनव्या तंत्रज्ञान आणि शोधांचा फायदा जगालाही झाला पण, संरक्षण क्षेत्रातील गुप्त माहितीही संगणकातच साठवली जाते. ती चोरली गेल्यास त्याचे दूरगामी परिणामहोऊ शकतात. बँकिंग क्षेत्रही याच तंत्रावर अवलंबून असल्याने त्याचा थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. तंत्रज्ञान जितके आधुनिक आहे तितकेच त्याचा गैरफायदा घेण्यासाठी बनविण्यात आलेले तंत्रज्ञान धोकादायक आहे. त्यामुळे या सायबर हल्ल्यापासून सावध राहायलाच हवे. 

 

- सोनाली रासकर/ जयदीप दाभोळकर