कष्टाच्या मार्गातून होणार स्वप्नपूर्ती
 महा एमटीबी  24-Oct-2017

  

तसं म्हणायला गेल्यास आजची तरुण पिढी खूपच नशीबवान आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण, तरुणांना आज विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी, वेगळ्या वाटा उपलब्ध झाल्या आहेत.त्यामुळे एका विशिष्ट चौकटीमध्ये राहून करिअर करण्यापेक्षा वेगळ्या वाटा निवडण्याचे स्वप्न काही तरुण-तरुणी उराशी बाळगतात. विशेष म्हणजे, आजच्या काळातले पालकही आपल्या पाल्यांनी निवडलेल्या करिअरच्या वेगवेगळ्या वाटा निवडताना त्यांना प्रोत्साहन देत असल्यामुळे तरुणाईला उंच झेप घेण्यासाठी मोठा आधार मिळू लागला आहे. असेच काहीसे स्वप्न पुण्यातल्या रूचा सियाल हिने लहानपणापासून मनी बाळगले. २५ वर्षांच्या रूचाने भारतीय हवाई दलामध्ये काम करण्याचे स्वप्न रंगवले होते. मूळची पुण्याची असलेल्या रूचाचे शालेय शिक्षण पाषाण येथील सेंट जोसेफ या शाळेत झाले. शालेय जीवनामध्ये रूचाला अभ्यासाबरोबरच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये होणार्‍या नाटकांमध्ये आवर्जून भाग घेत असे. अभिनयामध्ये चुणूक दाखवण्याबरोबरच तिने अभ्यासामध्येही खूप चांगली प्रगती केली. रूचाला दहावीमध्ये ८८.९१ टक्के, तर १२ वीमध्ये ८०.८१ टक्के गुण मिळाले. बारावीनंतर रूचाने पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली.

 

भारतीय हवाई दलात सहभागी होण्यासाठी द्यावा लागणार्‍या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी तिने बंगळुरू येथील प्रसिद्ध कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. सकाळी आणि संध्याकाळी दोन तास रूचाने अभ्यासासाठी राखीव ठेवला. महत्त्वाची बाब म्हणजे, रूचाने एका वर्षाच्या आत परीक्षेची तयारी पूर्ण केली. सध्या रूचा हैद्राबादमध्ये असून तिथे ७८ आठवड्यांचे प्रशिक्षण घेत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रूचाने लहानपणापासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हवाई दलाच्या तांत्रिक विभागात रूचा रूजू होणार आहे. शालेय जीवनापासून रूचाचा सुरू झालेल्या या स्वप्नांच्या प्रवासामध्ये रूचाच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासून चांगला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे हे सर्व काही शक्य झाले. याचा आवर्जून रूचा उल्लेख करते. रूचाचे वडील एक व्यावसायिक असून आणि आई केंद्रीय अबकारी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षी याच काळात, बिहारच्या भावना कांथ, राजस्थानच्या मोहना सिंह आणि मध्य प्रदेशाच्या अवनी चतुर्वेदी या तिघींनी भारतीय हवाई दलाच्या फायटर वुमेन पायलट म्हणून दाखल झाल्या असून त्यांनी इतिहास घडवला आहे. सध्या त्या पश्र्चिमबंगालमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. भारतीय हवाई दलामध्ये करिअर करू इच्छिणार्‍या तरुणी,महिलांनी ‘सुखोई-३०’च्या फायटर स्क्वार्डनमध्ये जावे. जे हवाई दलातील सर्वात अत्याधुनिक फायटर म्हणून ओळखले जाते.ज्याची कार्यपद्धती महिलांनी लवकरात लवकर शिकून घ्यावी, असा सल्ला निवृत्त एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी दिला आहे. १२ महिन्यांच्या आत रुचाने एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (एएफसीएटी), इंजिनिअरिंग नॉलेज टेस्ट (ईकेटी) यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. रूचाच्या भारतीय हवाई दलामध्ये तिचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, तसेच तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

 

- सोनाली रासकर