संपलेल्या सत्तारेखा...
 महा एमटीबी  23-Oct-2017
 
 
 
 
जातीचे राजकारण झाले, 
लोकशाहीचे अवमुल्यन...
हा दलित, तो ओबीसी
हा सवर्ण, तो अल्पसंख्याक
अन् मतदार राजा झाला रंक...
 
 
गुजरात निवडणुकांचे पडघमवाजू लागले आणि विरोधी खुर्चीवर बसलेल्यांचे खायचे दात दिसून आले. त्याचे झाले काय की, ‘’आम्हीच खरे सेक्युलर आहोत. आम्ही धर्म-बिर्म तर सोडाच, पण जातपात पण मानत नाहीत. तो सत्ताधारी पक्ष आहे ना, तो धर्माचे, जातीचे राजकारण करत सत्तेवर आला. आम्ही तर जातीपातीचे राजकारण करतच नाही बाबा.’’ जवळजवळ सर्वच कॉंग्रेसी नेत्यांच्या तोंडची ही ठरलेली, पढवलेली काही वाक्यं. आता अर्थोअर्थी या शब्दांचा आणि त्या पक्षाच्या विचारसरणीचा किती संबंध आहे, हे जागरुक भारतीयांना माहिती आहेच. कुठचीही धार्मिक दंगल असू दे, देशाच्या साधन संपत्तीचे वाटप असू दे की देशाच्या सांस्कृतिक निष्ठेचा प्रश्न असू दे, ‘हात’ चिन्ह धारण केलेल्या या पक्षाने कायम ‘हात दाखवून अवलक्षण’च केले. पण, तरीही सर्वत्र वातावरण असे निर्माण केले की, आम्ही राजकारणातले सवर्ण! का तर म्हणे, ‘‘आम्ही धर्म, जातीपाती मानत नाही.’’
 
 
पण, २०१४ च्या सत्तापालटानंतरही कॉंग्रेससह राजकीय पक्ष काही शिकणार आहे की नाही ? मतदारांचे विभाजन सरळ ओबीसी आणि दलित या वर्गवारीत करून कधी पटेल समाजाच्या हार्दिक पटेलला चुचकारुन, तर कधी ओबीसी समाजाच्या अल्पेश ठाकोरला मधाचे बोट लावायचे, तर कधी दलित समाजाच्या जिग्नेश मेवानींना बाबापुता करायचे. का ? तर ते एका विशिष्ट समाजाशी निगडित आहेत. ते जर पक्षात आले, तर त्यांचा समाजही आपल्यासोबत येईल, हे त्या मागचे मुंगेरीलालचे हसीन सपने आहेत. आता प्रश्न असा आहे की, एक व्यक्ती म्हणजे एक समाज असते का ? गेले ते दिन गेले की, कुणी एक बापजी, ठाकूर, दादा, अण्णा आपल्या स्वत:च्या सात पिढ्यांचे येळकोट करण्यासाठी स्वार्थी निर्णय घ्यायचे आणि सगळा समाज ‘भले साबजी’ म्हणत त्याच्या पाठी मेंढरागत जायचा. गुजरात कॉंग्रेसला समजायला हवे की, ‘मेरा देश बदल रहा है’ आणि ‘मेरा समाज भी बदल रहा है.’ त्यामुळे जातीपातीचे राजकारण कितीही केले तरी, ‘ये पब्लिक है, सब जानती है’ हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे ‘सब घोडे बारा टक्के’ म्हणत समाजाला फक्त मतांच्या तागडीत तोलाल, तर त्याचा निकाल असेल-
 
जातीच्या कुंपणात सत्तेचा लेखाजोखा
निर्जीव हातावर कायमच्या
असतील संपलेल्या सत्तारेखा


 
संघटित हिंमत
 
काल मुंबईमध्ये दोन धक्कादायक घटना घडल्या. एक कुर्ल्याला, जिथे एका अल्पवयीन मुलीला एका सडकछाप मुलानेे छेडले आणि तिने जाब विचारताच त्याने तिला भररस्त्यात, भररहदारीत बेशुद्ध होईपर्यंत मारले. माणसं, रिक्षा, गाड्या, दुकारनदार असे सर्वच जण अक्षम्य असंवेदनशीलतेने तिथे वावरत होते. कोणत्याच माईच्या लालला त्या मार खाणार्‍या मुलीबाबत पाझर फुटला नाही. दुसरी घटना, विक्रोळीस्थित ऑफिसमधील एका महिलेवर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्याची. तिला हल्लेखोर ऍाफिसमधून खेचून बाहेर काढत होता. तिने नकार दिल्यावर चक्क कटरने त्याने तिच्यावर निर्घृणपणे वार केले. विक्रोळीसारख्या गजबजलेल्या वस्तीतले ऑफिस, पण तिथेही कोणालाही त्या स्त्रीला वाचवण्याची हिंमत का दाखविता आली नाही? मान्य आहे की, जिवाची भीती प्रत्येकाला असते. ‘तिला किंवा त्याला वाचवायला जायचो आणि आपण फुकाचे मरायचो’ हे अनेकांना वाटणे तसे रास्तही आहेच. पण सभोवती माणसांचा जत्था असताना, त्या संपूर्ण जत्थ्यामध्ये कोणालाही एकमेकांबद्दल विश्वास नाही की, ‘मी तिला किंवा त्याला मदत केल, तर बाकीचेही मदत करायला पुढे येतील.’ मग खरंच एक पाऊल पुढे टाकण्याची आपली हिंमत संपत चालली आहे का? आता यावर उत्तरं येतील की, ‘‘अहो हे बोलणे सोपे, हिमतीचे धडे देण्यासाठी पांढर्‍यावर काळं करायला तुमचं काय जातं? उपदेशाचे डोस पाजायला तुमचं काय जातं....’’ वगैरे वगैरे. पण यावर एकच प्रश्न आहे की, आज कुर्ल्याच्या रहदारीत बेशुद्ध होईपर्यंत मार खाणारी ती मुलगी, ऑफिसमध्ये जखमी होणारी ती महिला... यांच्या जागी उद्या कुणाचीही बहीण, मुलगी, अगदी आपल्या घरातली महिलाही असू शकते की...
 
 
‘मुंबई पुन्हा सुरू झाली... मुंबई कधी थांबत नाही’ अशी विशेषणं एरव्ही मिरवली जातात किंवा ‘जिंदादील मुंबईकर’ म्हणत असे मुंबईकरांच्या स्पिरीटचे कौतुकाचे इमरले उभारले जातात. काही अंशी हे खरंही असेल, पण परवा मुंबई उपनगरात घडलेल्या या घटना पाहिल्या की वाटते की, ’’मला काय त्याचे, मरूदेत ना, तो माझा किंवा ती माझी कोण लागते.’’ असा विचार करून माणुसकी, संवेदनशीलता मुंबईकर घरातून निघताना घरातबिरात खुंटीवर टांगूनच निघतो की काय? वैयक्तिक म्हणतच नाही, पण संघटित हिंमत तरी समाजाने शाबूत ठेवावी की नाही? की समाजमानाची संघटित हिंमत फक्त जातीच्या नावाने, व्यवसायाच्या नावाने नित्यनियमाने संघर्ष करण्यासाठी? हो, पण परवा आणखी एक संघटित शौर्य पाहिले बरं का... फुटपाथवरच्या हातावरती पोट असणार्‍या फेरीवाल्यांना संघटित होऊन मारहाण करण्याचे शौर्य. हे शौर्य, ही हिंमत भस्त्यात अत्याचार सहन करणार्‍या मायभगिनींच्या मदतीसाठी मग का वापरली जात नाही ? 
 
- योगिता साळवी