विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ४०
 महा एमटीबी  21-Oct-2017


 

अवंती: मेधाकाकू...चिन्मयी, मोहिनी आणि मी मिळून या वर्षी कंदील बनवायला घेतले आहेत...!!..दिप्तीताईने मस्त संकल्पना दिल्ये...आणि आम्ही फक्त पतंगाचा कागद वापरणार आहोत...!!..कंदिलांचा आकार आणि रंगसंगती यावरून आम्ही त्याचा स्वभाव ओळखणार आणि आमच्या कंदिलाना नावे पण देणार आहोत...प्रत्येकीच्या कंदिलाला वेगळे नाव...कशी वाटत्ये कल्पना...!!

मेधाकाकू: अगदी पेटाऱ्याच्या बाहेरची कल्पना...!!..एकदम वेगळी, हे नक्की...!!..पण असे कसे काय सुचले बाई...तुम्हाला...!?!?!

अवंती: हे..हे..हे.. मेधाकाकू...म्हणजे तुला Out of the box…असे म्हणायचय का...!?!..चालतंय कि...एकदम सही...!!..अग...कंदिलाच्या नावाची कल्पना सुचल्ये...आपल्या या अभ्यासावरून...!!

मेधाकाकू : हं...मला समजतंय...तुझी गम्मत चालल्ये ते...!!...कधीतरी, मलाही चिमटे काढावेसे वाटतात...!!..आणि...व्वा...एकदम समेवरच आलीस बघ...आजच्या विषयाच्या...!!..आधुनिक मानसशास्त्राच्या अभ्यासात, मानवी क्षमता आणि व्यक्तिमत्व हे दोन महत्वाचे विषय आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, पहिल्या महायुद्धाच्या गरजेतून, असा अभ्यास सुरु झाला...!!..मात्र...आपल्या भारतिय समाजाने असा अभ्यास काही शतकांपासून केला आहे आणि त्याचा प्रभाव लोकसाहित्यातून निश्चितपणे जाणवतो. आपल्या म्हणीच्या अभ्यासात...हे मला सतत जाणवत राहिलंय...!!..आळस, अहंकार, आसक्ती, क्रोध, लोभी वृत्ती, मत्सर अशा नकारात्मक प्रवृत्ती आणि प्रेम, आपुलकी, उत्साह, श्रद्धा, भक्तीभाव, निश्चयी वृत्ती, समरसता, धैर्य, कणखरता अशा होकारात्मक प्रवृत्तींचा उल्लेख आपल्याला असंख्य वाकप्रचार आणि म्हणींच्या चार- सहा शब्दांत सापडतो...!!..आणि विशेष म्हणजे...याला दिल्या गेलेल्या उपमा-दृष्टांत- अन्योक्ती सुद्धा यातील गूढार्थ सहज स्पष्ट करतात...!!.. वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही. ‘वळचण’ म्हणजे पाणी सहज वाहून जावे म्हणून अंगणात केलेली हलकीशी जागा, ज्यामुळे पाणी एका जागी साठत नाही. ‘आढे’ म्हणजे घराच्या छपरावरचा, उंचावरचा उताराचा झालेला कोन. काही माणसे कुठल्याही परिस्थितीत पाय जमिनीवर घट्ट रोऊन खंबीरपणे उभी रहातात, धीर सोडत नाहीत. स्वाभिमानी असली तरी अहंकाराचा स्पर्शहि त्यांना होत नाही...!!..इतकी शांत असतात कि यांच्या रागाचा पारा कधीही चढत नाही...!!..अशा सर्व सहज आणि नैसर्गिक, सकारात्मक प्रवृत्तीचा परिचय या म्हणीतून दिला गेला...!!

अवंती: अरेच्या...मेधाकाकू...पार डोक्यावरू गेली होती...हि म्हण...पण त्याचा भावार्थ फारच रंजक आहे...!!

मेधाकाकू: अवंती...मनुष्य स्वभावाचा हा अभ्यास काही शतकांपासून केला गेला आणि...सुदैवाने...लोकश्रुतीच्या माध्यमातून आणि काही लिखित संहितेतून आज आपण हे समजाऊन घेऊ शकतो...!! सुवर्णाचे ताट कुडाचा आधार. परावलंबित्व, हा काही गुणवान मंडळीना मिळालेला शाप जणू. ‘सुवर्णाचे ताट’ हे संबोधन अशा सर्वगुणसंपन्न व्यक्तीसाठ वापरले आहे. असे सोन्याचे ताट साधारणपणे सधन हवेलीत असायला हवे. ‘कूड’ म्हणजे...वाळलेल्या बांबू-कारवी अश वनस्पतींच्या पातळ काड्यांपासून मातीने लिंपून बनवलेली कुठलीही मजबुती नसलेली झोपडीची भिंत. खूप हुशार, गुणवा असूनही हलक्या वृत्तीच्या-अयोग्य सवयींच्या-बेकायदा व्यवहा करणार्या व्यक्तीचा आधार घेतल्या शिवाय काही गुणवान व्यक्तींना यश मिळत नाही...याचे सहज उमगणारे हे वर्णन !!

अवंती: मेधाकाकू...मी फक्त चकीत होण्याचे काम करत्ये...ते खूप सहज आणि सोप्प आहे...!!..पण मराठी भाषेचे हे वैभव अफलातून आहे...चकीत होणे...याच साठी...!!

मेधाकाकू: आपले पहिल्या मजल्यावरचे साळवी आजोबा, ओळखतेस ना त्याना...!?!..कधी कधी त्यांची कडक शिस्त सर्वाना फार त्रासदायक वाटते...!!..मात्र त्या दिवशी आपल्या परिसरातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात झालेल्या वादात त्यांनी न्यायीवृत्तीने तरुण मुलांची बाजू घेतली आणि बेशिस्त वागणार्या वरिष्ठांनासुद्धा ...राष्ट्रध्वजाचे महत्व शांतपणे समजावून सांगितले आणि कार्यक्रमाला शिस्त लावली...!!...यासाठी एकच म्हण सांगता येईल...

मुसळाचे धनुष्य होत नाही.

असे बघ अवंती...मुसळ हे खूप मजबूत अशा शिसवी लाकडापासून बनवलेले असते...!!..याचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे...मजबुती...आणि कुठलाही बिघाड न होता, न वाकता वर्षानुवर्षे उखळीत घाव घालण्याची क्षमता...!!.जणू याची कणखरता आणि मजबुती आजन्म असते आणि याच्यावर वाकण्याची नामुष्की कधीच येत नाही...!!..याचा स्वभाव अगदी आपल्या साळवी आजोबांसारखा, कडक शिस्तीचा तरीही न्यायी, कायम ताठ कण्याचा, सर्वाना एकच शिस्त लावणारा...!!.. घरातल्या वस्तूशी उत्तम तुलना करून मनुष्य स्वभावाचा योग्य परिचय करून देणारी म्हण...!!

अवंती: मेधाकाकू...रोज नवी म्हण समजतेच...पण त्या बरोबरच...मनुष्य स्वभावाचा, त्याच्या अनेक कंगोर्यांचा परिचय होतोय...असा अभ्यास झाला नसता तर मी काय गमावले असते...विचारही करू शकत नाही मी...!!..

मेधाकाकू: जशा नैसर्गिक होकारात्मक स्वभावाचा परिचय मिळतो, तसाच फसव्या आणि लबाड प्रवृत्तीबद्दल, या चतुर पूर्वजांनी आपल्याला सावध सुद्धा केले...!!

बुधली वर आली.

चोरी करणार्ऱ्या लबाड माणसाला, चोरी लपवण्यासाठी अनेक क्लृप्त्या ठाऊक असतात, त्यातलीच हि एक...!!..तेलाने भरलेली, देवळातली अख्खी बुधलीच त्याने पळवली आणि तळ्याच्या पाण्यात लपवून ठेवली. वापर करून झाल्यावर हळूहळू त्यातले तेल संपले आणि ती रिकामी झालेली हलकी बुधली पाण्यावर तरंगू लागली आणि त्याची चोरी गावकर्यांच्या लक्षात आली. असे गैरकृत्य करू नका...एक दिवशी नक्की पकडले जाल, असा सावधगिरीचा हा सल्ला...!!

अवंती: मेधाकाकू...आता मात्र आम्ही आमच्या कंदिलाना नाव अगदी नक्की देणार...!!..मग तूच सांगायचा त्याची स्वभाव वैशिष्ठ्ये...!!..- अरुण फडके
-- ००—००—