’हस्तस्य भूषणं दानं’
 महा एमटीबी  21-Oct-2017'हस्तस्य भूषणं दानं' असं एक सुभाषित आपल्याकडे सांगितलं जातं, आणि ते खरंच आहे. दान करणारे हात नेहमीच आदरास पात्र असतात. पण हल्लीचा काळ फ़ार विचित्र झालाय. द्यायला तयार असणारे अक्षरश: हजारो जण भेटतात, परंतु या दात्यांच्या दानाकडे थोडे डोळसपणे पाहिल्यास त्यामागचे हेतू आपल्याला भासतात त्यापेक्षा फ़ारच निराळे असल्याचे ध्यानात येते. आपल्या कंपनीचा सेल वाढविणे, समाजामध्ये आपले राजकीय वजन वाढविणे, आपल्या काळ्या पैशाचा भार कमी करुन त्या बदल्यात त्यापेक्षा जास्त तोलामोलाचा नावलौकिक पदरात पाडून घेणे हे आणि यांसारखे हेतू जर दानाच्या मागे असतील तर या दानाला ’दान’ म्हणायचे का, हा एक प्रश्नच आहे. पण आपल्याला असा प्रश्न पडला तरी ही लोकं राजरोसपणे ’दानशूर’ म्हणून मिरवत असतात. अशा तथाकथित दानशुरांच्या भाऊगर्दीत खरे दातेच झाकोळल्यासारखे होतात. परंतु आजुबाजुला इतकं ग्लॅमरस वातावरण असूनदेखील कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी भरभरून दान देऊ करणारा एक फ़ार मोठा वर्ग आजच्या काळातही अत्यंत शांतपणे पडद्याआड कार्यरत आहे. जनकल्याण रक्तपेढीसारख्या संस्था समाजाला आपल्याशा वाटतात यामागे या अशा दात्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी दिलेली रक्कम किंवा उपकरणादी वस्तू हा यातला महत्वाचा भाग नव्हे, तर त्यामागचा त्यांचा भावइतका शुद्ध असतो की केवळ त्यामुळे देखील इथे काम करणाऱ्यांचा आपल्या कामावरील विश्वास वाढावा आणि अजून काम करण्याची प्रेरणा मिळावी. सहकारनगर, पुणे येथील निवासी - निवृत्त वकील बाळकृष्ण महादेव आपटे हे अशाच दात्यांपैकी एक.

 

मी सर्वप्रथम बा. म. आपट्यांना भेटलो ते सहकारनगरमधील त्यांच्याच घरी. तो २०१२ सालातला डिसेंबर महिना होता. रक्तपेढीला नुकतीच त्यांनी सुमारे दीड लाखांची देणगी दिली होती. त्याबाबतच बोलण्यासाठी त्यांनी मला बोलावले होते. ठरलेल्या वेळेची स्वत: आपटे काकांनीच सकाळी दोन वेळा फ़ोन करुन मला आठवण करुन दिली. त्यावरुनच हा एकंदर ’कडकशिस्तीचा मामला’ असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जरा ठरवूनच वेळेच्या पाच मिनिटे आधीच मी त्यांच्या घरी पोहोचलो. मी घरासमोर गाडी लावत असतानाच आपटे काका त्यांच्या दाराशी येऊन उभे राहिले. जुन्या पद्धतीचं बैठं बंगली वजा घर. घराभोवती थोडी रिकामी जागा. रस्त्यालगत असलेल्या छोट्याशा गेटमधून मी आत प्रवेश करता झालो आणि ’केवळ’ ८५ वर्षे वय असलेल्या आपटे काकांनी हात पसरुन ’या sss’ असे म्हणत माझे स्वागत केले. बसल्या बसल्या प्रथम मी त्यांना माझी थोडक्यात ओळख करुन दिली आणि रक्तपेढीच्या वतीने या देणगीच्या विनियोगाबाबत बोलण्यासाठी आल्याचे सांगितले. आधारासाठी अपरिहार्य असलेली हातातली काठी, वयोमानामुळे सर्वांग सुरकुत्यांनी व्यापलेले, श्रवणेंद्रिये निष्प्रभ, तोंडात दात नसल्याने एकेक शब्द बोलताना त्यांना पडणारा ताण लगेच लक्षात येण्याजोगा - अशा शारीरिक स्थितीत असलेल्या आपटे काकांचे म्हणणे नीटपणे समजावून घेणे माझ्यासाठी जरा अवघड काम होते. पण मी लक्ष देऊन ऐकत होतो. वार्धक्याने त्यांच्या शरीरास विकल बनविले असले तरी त्यांचे विचार मात्र तरुण आहेत, कालसुसंगत आहेत हे त्यांच्या बोलण्यावरुन माझ्या लक्षात येत गेलं. त्यांनी दिलेल्या देणगीबाबतचा त्यांचा प्रस्ताव ऐकून मी ही अचंबित झालो, कारण त्यांच्या वयाच्या व्यक्तीने रक्तपेढीस देणगी देणं आणि रक्तपेढीने त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करुन, त्याची पावती देऊन त्या देणगीचा योग्य तो उपयोग करणं, इथवर ठीक होतं. पण आपटे काका इथेच थांबले नाहीत तर या देणगीच्या आधारे एक नवीन योजना सुरु करण्याचा आग्रह त्यांनी रक्तपेढीला केला. काय होती ही योजना ? बोलता बोलता त्यांनी मला विचारलं,

’आपल्या रक्तपेढीत रुग्ण म्हणून रक्त घेण्यासाठी लहान मुलेही येत असतील ना ?’

 

’हो, येतात ना.’ – मी उत्तरलो.

 

’किती प्रमाण आहे अशा मुलांचे ?’ – पुन्हा आपटे काकांचा प्रश्न.

 

’साधारणपणे एकूण मागण्यांच्या पाच ते सात टक्के.’ – मी माहिती दिली.

 

’बरं. मग या सर्व मुलांना सवलतीच्या दरामध्ये रक्त आणि रक्तघटक मिळावेत अशी माझी इच्छा आहे. त्याकरिता माझ्या या देणगीचा विनियोग व्हायला हवा. यासाठी मी दिलेली रक्कम पुरेशी नाही, हे मला माहितीयं, पण आपली संमती असेल तर एक योजना माझ्या मनात आहे.’ – आपटे काकांनी आपली कल्पना उलगडण्यास सुरुवात केली.

 

रक्तपेढीची सुरुवातच सामाजिक संवेदनेतून झाली असल्याने जी भावना आपटे काकांनी व्यक्त केली होती, त्यावर संमतीचा प्रश्नच येत नव्हता. ’त्यांनी दिलेली देणगी एक बीजनिधी म्हणून बॅंकेत ठेवून त्यात छोट्या छोट्या रकमांची भर घालण्याचे आवाहन सर्व समाजालाच करावे आणि वाढत जाणाऱ्या या निधीवरील व्याजाच्या आधारे बाल रुग्णांना कायमसाठी सवलती देण्यात याव्यात’ असे आपटे काकांनी सुचविलेल्या योजनेचे स्वरुप होते. केवळ ही योजना सुचवूनच ते थांबले असे नव्हे, तर यात बॅंकेची भूमिका काय असावी, रक्तपेढीने काय काळजी घ्यावी, पैसे भरणे सर्वांनाच सोयीचे कसे ठरेल इथपासून ते या योजनेचा प्रचार आणि प्रसार कसा करावा, अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचावे इथपर्यंतच्या कल्पना त्यांच्या मनात तयार होत्या. सर्वसामान्य नागरिकांस असे आर्थिक योगदान देण्याचे स्वहस्ताक्षरांत लिहिलेले एक आवाहनही त्यांनी यावेळी मला दाखविले. याचा अर्थ, ही देणगी देण्यामागे संवेदना तर होतीच पण हे दान सत्पात्री होण्यासाठीची एक ब्लूप्रिंट त्यांच्या मेंदुत तयारच होती, जी त्यांनी मला सांगितली. भावना आणि व्यावहारिकता यांचा अचूक समतोल मला पहायला मिळत होता. अर्थातच मी रक्तपेढीच्या वतीने या योजनेचे आनंदाने स्वागत केले.

 

या चर्चेचे फलित म्हणून पुढे जनता बॅंकेच्या मदतीने ’बालसंजीवनी’ या योजनेचा प्रारंभ झाला. आपटे काकांच्या सूचनेप्रमाणे प्रचार-प्रसिद्धीसाठी आम्ही निरनिराळ्या योजना आखल्या, साहित्य तयार केले. याचा परिणामही हळुहळु दिसु लागला. ’बालसंजीवनी’ला समाजाचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. या योजनेच्या निमित्ताने समाजातील अनेक चांगल्या-चांगल्या व्यक्तींशी आणि घरांशी रक्तपेढीचे ऋणानुबंध जुळून आले. या योजनेचा लाभ अनेक बालरुग्णांना झाला हे सांगायला नकोच. पण इतके सर्व सुरळितपणे चालू झाल्यानंतरदेखील आजपर्यंत आपटे काकांचे मला नियमित फ़ोन चालुच आहेत. या फ़ोनवरुन ’बालसंजीवनी’ची प्रगती काय म्हणतेय ?’ या प्रश्नाबरोबरच ’रक्तपेढीत सध्या नवीन काय चालु आहे ?’, ’डॉ. कुलकर्णी काय म्हणताहेत ?’ यांसारखेही प्रश्न त्यांच्याकडून येत असतात. मी ही अधुनमधुन वेळ काढून त्यांना भेटुन येतो आणि याबाबतची अद्ययावत माहिती त्यांना देतो. आपटे काका आणि काकू दोघेही खूप थकले आहेत, पण तरीही माझ्या हातात खाऊ आणि चहाचा कप दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

 

 

आपटे काकांनी किंवा काकूंनीही मला कधी सांगितलं नाही. पण मध्ये एका वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल आलेला एक छोटासा लेख मला वाचायला मिळाला. त्यातून हे समजलं की, वकीलीचं शिक्षण घेतलेल्या आणि उत्तम व्यवसाय केलेल्या आपटे काकांनी आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभापासूनच समाजातील ’गरजवंतांना भरपूर मदत करता यावी’ या एकाच कारणासाठी आपली जीवनशैली अत्यंत साधी ठेवली. स्वत:ची हौस - मौज, कपडेलत्ते, मोठं घर या सर्व बाबींशी आयुष्यभर तडजोड करीत सातत्याने गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदती देऊ केल्या. आताही ज्या देणगीचा वर उल्लेख आला आहे, ती म्हणजे त्याच सुमारास अन्यही अनेक संस्थांना दिलेल्या देणग्यांपैकी एक होती आणि बाकीच्याही देणग्यांबाबत अशाच योजना त्यांनी बनविल्या असून त्याचा पाठपुरावाही ते सातत्याने करतात, हेही मला नंतर समजले. बरे, या सर्व पाठपुराव्यामध्ये स्वत:चे नाव व्हावे, प्रसिद्धी मिळावी अशा विचारांचा लवलेशही नसतो. असते ती दिलेल्या पै अन पैचा विनियोग योग्य कारणासाठी व्हावा आणि या कामात 

समाजही सहभागी व्हावा ही मनापासूनची तळमळ. ही तळमळच या वयातही त्यांच्याकडून अशी कामे करुन घेते. अशा प्रकारे केलेलं दान हे हाताचं भूषण असतं तर असे दाते हे समाजाचं भूषण !

 

- महेंद्र वाघ