'बाप' नसला तरी या 'जन्मात' एकदा तरी बघा!
 महा त भा  02-Oct-2017


यंदाच्या वर्षातला आता दहावा महिना चालू आहे. ' ती सध्या काय करते ने' सुरवात झालेल्या या वर्षात अजून हाताच्या दोन्ही बोटांची संख्या पूर्ण व्हावीत एवढे देखील चांगले चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. पण अशातही 'ती सध्या...', 'रिंगण', ' मुरंबा', ' कच्चा लिंबू' अशा काही उत्तम कलाकृती आपल्यासमोर आल्या. यातल्या शेवटच्या दोन चित्रपटात सचिन खेडेकरने 'बाप' काम केले होते, साहजिकच त्यामुळे त्याच्या सलग तिसऱ्या 'बापजन्म' या चित्रपटाकडून नेहमीपेक्षा अधिक अपेक्षा होत्या. कदाचित अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे असेल, पण हा चित्रपट तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यातल्या त्यात 'मुरंबा' मधून वरुण नार्वेकर असेल किंवा 'बापजन्म'मधून निपुण धर्माधिकारी असेल हे तरुण लेखक, दिग्दर्शक मराठीमध्ये वेगळे प्रयोग करू पाहतायतात याच समाधान मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. 
 
प्रशासकीय जबाबदारीतून निवृत्त झालेल्या व मृत्युच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपलेल्या पुण्यातील भास्कर पंडीत याची ही गोष्ट आहे. आयुष्यातील काही चुकांमुळे त्याची एक मुलगी व एक मुलगा त्याच्यापासून इतकी दुरावली आहेत की बाप मेल्याशिवाय ती त्याला भेटायला येण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. आपल्या मुलांना भेटण्यासाठी एका 'बापाने' आखलेले हे आगळे वेगळे मिशन आहे. आता अखेर बापाला भेटायला मुलं परत येतात का, त्यासाठी बाप काय-काय करतो आणि पुढे बापाचं होत काय हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला एकदा तरी 'बापजन्म' बघावाच लागेल. 

 
नव माध्यमाची उत्तम जाण असणाऱ्या निपुण धर्माधिकारीसारख्या तरुणाने हा चित्रपट दिग्दर्शित केला असल्याने 'टेक्नीकली' हा चित्रपट जास्तच 'साउंड' आहे. भास्कर पंडीतच्या नोकराच्या रूपात असलेल्या माऊलीच्या व्यक्तिरेखेमुळे मधे-मधे चित्रपटाला विनोदाची झालर प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी विशेषतः मध्यंतरानंतर चित्रपट जरा जास्तच भावनिक होतो. या चित्रपटाचे संगीत व पार्श्वसंगीत हि आणखी एक जमेची बाजू ठरलेली आहे. गंधार सांगोरामने 'बापजन्म'सारख्या भावनिक चित्रपटाला आवश्यक असणारं हळुवार संगीत अगदी योग्य प्रकारे दिलं आहे. 
 
'बापजन्म'मधून निपुणने वेगळा प्रयत्न नक्कीच केलाय, पण काही चित्रपटातील काही 'प्लॉट' आपल्याला पटत नाहीत. मध्यंतरानंतर पुढच्या अर्ध्या तासातील गोष्टीमध्ये अनेक 'लूप होल्स' आढळून येतात.  त्याचबरोबर काही प्रश्नांची उकल करायला कदाचित निपुण विसरला असणार किंवा तस जाणूनबूजूनच त्याने केलं असावं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर बाप मुलांमध्ये का दुरावा येतो ते त्याने स्पष्ट केलं पण भावा-बहिणीचं दूर जाण्याचं कारण काय असू शकतं याची उकल मात्र होत नाही. अर्थात आता मूळ विषय 'बाप' हा असल्याने त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं असेल, पण ते कुठेतरी एका वाक्यात का होईना नमूद करणं गरजेचं होतं. असे काही प्रश्न तुम्हालाही चित्रपट बघितल्यावर पडू शकतील. याशिवाय चित्रपटाचा शेवटही प्रत्येक प्रेक्षकाला रूचेलच याची खात्री नाही. एवढा सगळा आटा-पिटा करून जर बापाच्या नशिबी हेच येणार होतं तर त्या सगळ्याचा काय उपयोग असाही काही प्रेक्षकांना वाटू शकेल. पण शेवटी काय दाखवायचं आणि चित्रपट कुठे संपवायचा याचे सर्व अधिकार दिग्दर्शकाकडे असतात व निपुणने ते तसेच वापरले आहेत. 

 
हे वर्ष सचिन खेडेकरसाठी अतिशय चांगलं आहे असच म्हणावं लागेल. आत्तापर्यंत आलेल्या त्याच्या तीनही चित्रपटात त्याला नवख्या दिग्दर्शकांबरोबर काम करता आलं आणि प्रत्येक चित्रपटात त्यानी चांगलाच अभिनय केलाय. पण गेल्या दोन चित्रपट जो दर्जा दिसला होता, त्याची थोडी कमतरता 'बापजन्म' मधून दिसून आली. सत्यजीत पटवर्धन हा एक नवा कलाकार या चित्रपटाने आपल्याला दिलाय पण तो फार काही वेगळा ठसा वैगेरे यातून उमटवू शकला नाहीये. दुसऱ्या बाजूला शर्वरी लोहकरेला सुद्धा मोठ्या पडद्यावर चांगली संधी मिळाली होती पण तिचाही काम ठीकच झालं आहे. पण या सर्वांमध्ये आपल्या अभिनयाने व संवादफेक कौशल्याने अनेक वेळा टाळ्या मिळवणारा पुष्कराज चिरपुटकर आपल्या चांगलाच लक्षात राहतो. निपुणनेही दिग्दर्शनाच्या त्याच्या पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. बहीण-भावांमधले काही दृश्य किंवा मुलगा आणि बापामधला अखेरचा सीन दिग्दर्शनाच्या दृष्टीने खूपच जमून आलाय. निपुणने लिखाणावर अजून थोडं काम केलं असतं किंवा रिअलिस्टिक गोष्टींवर अधिक भर दिला असता तर या वर्षातला कदाचित हा सर्वोत्कृष्ट चित्रपट बनला असता. 
 

 
हा चित्रपट वाटतो तितका रडका अजिबात नाहीये. पण नाही म्हणालं तरी काही सीन मधून नकळत तुमच्या डोळ्यातून पाणी येईल एवढी भावनिक क्षमता त्यामध्ये नक्कीच आहे. एकूणच काय तर, एक 'बाप' कलाकृती होता होता राहिली असली तरी या जन्मात एकदा हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघण्यास काहीच हरकत नाही.