भुसावळात आहे महाराष्ट्रातील एकमेव भगवान धन्वंतरी मंदिर
 महा एमटीबी  18-Oct-2017
  
 
अमृतप्राप्तीसाठी देव आणि दानव समुद्राचे मंथन करीत असतांना भगवान धन्वंतरीचा जन्म झाला. आरोग्याची देवता म्हणून भगवान धन्वंतरींचे पूजन केले जाते. प्रत्येकच रुग्णालयात भगवान धन्वंतरीची प्रतिमा पाहण्यास मिळते. धन्वंतरीचे दक्षिण भारतात बरीच मंदिरे आहेत. पण महाराष्ट्रात धन्वंतरीचे एकमेव मंदिर भुसावळ शहरात आहे. येथील प्रसिध्द वैद्य स्व. तात्या (श्रीकर) जळूकर यांनी ते तयार केले. त्यासाठी  सार्वजनिक जागेऐवजी त्यांनी स्वत:च्या खासगी जागेत या मंदिराचे निर्माण केले हे विशेष !
 
भगवान धन्वंतरीचे पुजन वैद्यकिय क्षेत्रातील वैद्य आणि डॉक्टर्स यांच्याव्दारे संपूर्ण भारतभरच केले जाते. देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत उत्तर भारतात धन्वंतरीच्या मंदिरांची संख्या अल्प आहे. दक्षिण भारतात मात्र तामिळनाडू आणि केरळमध्ये खूप मंदिरे आढळतात. केरळच्या नेल्लुवायीमध्ये सर्वाधिक विशाल आणि आकर्षक धन्वंतरी मंदिर आहे. याशिवाय अन्नकाल धन्वंतरी मंदिर (त्रिशूर), धन्वंतरी मंदिर रामनाथपूरम (कोयम्बतूर), श्रीकृष्णधन्वंतरी मंदिर (उडूपी), येथेही आहेत. तामिळनाडूच्या वालाजपत येथील धन्वंतरी आरोग्यपीठम मंदिरातील मूर्ती ग्रेनाईटची आहे. गुजरातच्या जामनगर आणि मध्यप्रदेशातील तक्षकेश्वर मंदिर, मंदसौर येथील धन्वंतरी मंदिरेही प्रसिध्द आहेत.
 
महाराष्ट्रात भगवान धन्वंतरींचे एकही मंदिर न आढळल्याने भुसावळ येथील वैद्य श्रीकर उर्फ तात्या जळूकर यांनी पुढाकार घेवून  महेश नगरमध्ये २२ नोव्हेंबर २००९ ला धन्वंतरी मंदिरासाठी भूमीपुजन केले. आणि २०११ ला मंदिर पुर्ण झाल्यावर त्यांनी चैन्नई येथील महाबलीपूरम येथून विशिष्ट अखंड पाषाणातील ही विशाल मुर्ती आणली. तिचे वजन सुमारे 400 किलो आहे. सध्या वैद्या उषाताई जळूकर या मंदिराच्या ट्रस्टच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. वैद्य स्व.तात्या जळूकर यांच्या हयातीत दरमहा आयुर्वेदावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येई. मंदिर परिसरात  दर रविवारी सायंकाळी रुग्णांची नि:शुल्क तपासणी करून उपचार केले जातात. १९६९ मध्ये दत्तात्रयशास्त्री जळूकर यांनी आयुर्वेद सेवा संशोधन मंडळ भुसावळ या ट्रस्टची स्थापना केली होती. तेव्हापासून जळगाव जिल्हयात प्रभावी काम करणा-या डॉक्टरांना धन्वंतरी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
 

यावर्षीचा पुरस्कार जळगाव येथील वैद्य नरेंद्र गुजराथी यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रमण भोळे आणि भुसावळ न.पा.चे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर हे प्रमुख पाहुणे असतील. दत्तात्रयशास्त्री यांच्यानंतर तात्या जळूकर यांनी ही परंपरा जोपासली. त्यांच्यानंतर वैद्या उषाताई ही परंपरा जोपासत आहेत.

 
 
निलेश वाणी
8888877610