जिल्ह्यातून चौदा कोटी रुपयांची कीटकनाशके जप्त
 महा त भा  12-Oct-2017


अकोला : यवतमाळ येथे शेतकऱ्यांना झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर काल जिल्ह्यातून चौदा कोटी एकतीस लाख रुपये किमतीची कीटकनाशके कृषी विभागाने जप्त केली आहेत. तसेच या कीटकनाशकांच्या विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


शहरातील विविध भागात काल कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आदेशानंतर आवश्यकतेहून अधिक तसेच निम्न दर्जाच्या कीटकनाशकांच्या जप्तीसाठी जिल्हाभर ही कारवाई केली जात आहे. यातून काल पाच ते सहा ठिकाणी छापे टाकून कृषी विभागाने ही कीटकनाशके जप्त केली. यासर्वांचे बाजारमूल्य चौदा कोटी रुपयांहून अधिक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगिलते आहे.


कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेमुळे यवतमाळ आतापर्यंत २० हून अधिक शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश गेल्या दोन दिवसांपूर्वी कृषिमंत्री फुंडकर यांनी दिले होते. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.