'रॉयल इनफिल्ड'चे स्वप्न पूर्ण होणे सोपे नव्हते... 

    12-Oct-2017
Total Views |


धुळे जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातून पुण्यासारख्या शहरात आलो तेव्हा शहराची काहीच माहिती नव्हती. कॉलेजला प्रवेश घेतला आणि मग खोलीपासून कॉलेजपर्यंतचे विश्व परिचित झाले. हळूहळू रस्ता ओळखीचा झाला. कधी कधी मग रात्री मेसवर जेवण झाल्यावर फेरफटका मारायला जाण्याच्या निमित्ताने फिरण व्हायला लागलं. पहिले काही महिने असे गेल्यानंतर मग कधी मित्राच्या खोलीवर जाताना, कधी सुट्टीच्या दिवशी फिरायला लांब जाताना, तर कधी रस्ता चुकल्यामुळे पत्ता शोधत शोधत जाताना पण हळूहळू या शहराची ओळख व्हायला लागली. सर्व प्रवास प्रामुख्याने तेव्हा बसने होत असे. पैसे कमी असायचे त्यामुळे रिक्षाचा तर काही प्रश्नच नव्हता. घरून दर महिन्याला आलेल्या पैशात  कसंबसं राहायचं भाडं, मेस आणि येण्याजाण्यासाठी बसचा पास हेच भागता भागायचे नाही. त्यातूनही कधी आजारी पडल्यामुळे पैसे संपलेच किंवा बसचा पास नवीन करायचा राहिला तर कित्येक दिवस चालतच खोलीवर यावं लागायचं.

 

आमच्या वर्गात बहुतेक सगळीच मुलं याच शहरातली. त्यामुळे सगळ्यांच्या घरीच परिस्थिती बऱ्यापैकी होती. आम्ही ४-५ जणंच होतो गावाकडून आलेले. बाकीचे सगळे इथलेच होते त्यामुळे त्यांच्याकडे भारी भारी दुचाकी गाड्या असायच्या. आम्हाला त्याचे खूप अप्रूप वाटायचे. गावाकडे सायकल चालवून माहिती होती पण दुचाकी कधीच चालवली नव्हती. गावातल्या पुढाऱ्याच्या किंवा मोठ्या शेतकऱ्यांच्या मुलांकडे गाड्या होत्या पण आम्ही कधीच त्याला हात लावला नव्हता. त्यामुळे अशा भारी भारी दुचाकी गाड्यांचे आम्हाला खूप वेड होते. घरी एक जुनी फटफटी होती पण ती बरेच वर्ष धूळ खात पडून होती. ती दुरुस्त करायचा खर्चच खूप होता त्यामुळे वडिलांनी ती तशीच ठेवली होती. लहानपणी कधीतरी त्यावरून वडील आम्हाला घेऊन गेल्याचे आठवते पण त्यानंतर मात्र कधीच ती जागेवरून हालली नाही. वडिलांची खूप इच्छा होती ती दुरुस्त करून फिरवायची. पण तशी परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांचे ते स्वप्न स्वप्नच राहिले होते.


कॉलेज संपल्यावर १०-१२ ठिकाणी मुलाखती देऊन झाल्या आणि अखेर एका ठिकाणी नोकरी लागली. पहिला पगार हातात आला आणि मग ठरवलं की वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवून रॉयल एन्फिल्डची बुलेट गाडी घ्यायचे ठरवले. पगार तसा फार नव्हता त्यामुळे ऑफिसमधील सहकाऱ्यांना सांगितल्यावर त्यांनी माझी खूप चेष्टा केली. आपल्या झेपणार नाही, आत्ताही नाही आणि नंतरही नाही अशी माझी समजूत त्यांनी काढली. बर त्याची किंमत ऐकल्यावर माझीही छाती दडपली. तब्बल १ लाख ४० हजार रुपये !!! मी विचारच सोडून दिला. पण तरीही मनातून ती गाडी काही केल्या जाईना. शेवटी एकदा मनाचा हिय्या केला आणि शोरूममध्ये गेलो. त्यांना टेस्ट राईड मागितली. ती घेतल्यानंतर तर ती गाडी अजूनच मनात बसली. आणि तिथेच निर्णय झाला की या दिवाळीला तीच गाडी घ्यायची. पण कशी? हा प्रश्न मनात होताच.

 

शेवटी एका मित्राने सांगितले की बँकेतून यासाठी कर्ज काढ आणि घे गाडी. त्यानेही तशीच स्वतःची गाडी घेतली होती. पण कर्ज म्हटल्यावर मी जरा घाबरलो. कर्ज, व्याज, हप्ते हे शब्द ऐकून नाही म्हटले तरी त्यावेळी घाबरायला झाले. मग जरा चौकशी केली की नेमके किती व्याज असते. तर व्याज पाहून डोळेच विस्फारले. राष्ट्रियीकृत बँकांचे कर्जाचे दर बघून तर हादरून गेलो आणि असे वाटायला लागले की हे प्रकरण काही आपल्याला जमणार नाही. पण मग तोच मित्र पुन्हा मदतीला धावून आला आणि त्याने सांगितले की जनता सहकारी बँकेतून कर्ज काढले तर ते स्वस्त पडते.  ही बँक तगादा लावत नाहीत, त्यांचे काही छुपे चार्जेस नसतात आणि मुख्य म्हणजे ते आपल्याला समजून घेतात. मला जरा बरं वाटलं. मग थोडा विचार करून निश्चय केला आणि जनता बँकेतून कर्ज उचलायचं ठरवले. आश्चर्य म्हणजे बँकेने मला खूपच चांगली वागणूक दिली. माझे म्हणणे ऐकून घेतले आणि मला ताबडतोब कर्ज देण्याची तयारी दाखवली. माझ्या मनावरचा ताण हलका झाला. पुढचे सगळे व्यवहार फार थोड्या काळात झाले आणि माझ्या खात्यावर पैसे जमा झाले देखील. हे सगळेच खूप अनपेक्षित, अनाकलनीय पण सुखद होते


एवढे सगळे होईपर्यंत मी घरी काहीच सांगितले नव्हते. कारण मला माहिती होते की घरी सांगितले तर ते भितीपोटी नाहीच म्हणतील. पुन्हा शोरूममध्ये गेलो आणि त्यांना सांगितले की मला गाडी घ्यायची आहे. त्यांनी विचारले की कशी घेणार, कॅश का हप्त्यावर. मी त्यांना बँकेचे नाव सांगितले आणि त्यांच्याकडून कर्ज घेणार असल्याचे सांगितले. बँकेचे नाव ऐकून त्यांनी ताबडतोब होकार दिला आणि माझ्या पसंतीचा रंग निवडायला सांगितला. अखेर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हव्या त्या रंगाची बुलेट गाडी घेतली. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. मी आणि माझा गावाकडचा एक मित्र दोघेच गेलो होतो गाडीची डिलिव्हरी घ्यायला. जाताना फुलं, हळद-कुंकु, लिंबू आणि बरच सामान घेऊन गेलो होतो. गाडी ताब्यात घेतली, गाडीचे बारीक बारीक तपशील त्यांनी मला समजावून सांगितले. तशीच गाडी घेतली आणि थेट बँकेत गेलो. साहेबांचे आभार मानले. आख्ख्या ब्रँचला पेढे वाटले. आनंदच तेवढा झाला होता.

 

संध्याकाळी घराच्या दारात डग्-डग्-डग्-डग् असा खास बुलेटच्या फायरिंगचा आवाज ऐकून बाबा बाहेर आले आणि मला गाडीवर असं बघून त्यांना खूप आनंद झाला. एका क्षणात त्यांना कळले की आपल्या मुलाने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. घरातले सगळेच आले, आईने गाडीला ओवाळले, गावातले मित्र गोळा झाले आणि कौतुकाने बघायला लागले. बाबांना लगेच गाडीवर बसवून गावातून फिरवून आणले. इतकेच नव्हे तर त्यांनीही लगेच गाडी चालवून पाहिली. शहराकडे जाताना एसटी महामंडळाच्या बसने गेलेला आपला मुलगा थेट बुलेट घेऊन घरी आला यामुळे आई-बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि समाधान दिसत होते. माझे स्वप्न पूर्ण झाले होते. या स्वप्नपूर्तीत जसा माझ्या त्या योग्य सल्ला देणाऱ्या मित्राचा वाटा होता तितकाच किंबहुना जास्तच पण जनता बँकेचाही वाटा होता. माझी स्वतःची दुचाकी मिळवण्याचा माझा हा प्रवास त्यामुळेच खूप अविस्मरणीय ठरला. माझे स्वप्न पूर्ण होण्याचा तो कालावधी दिवाळीचाच होता आणि त्यानिमित्तानेच पुन्हा एकदा त्या क्षणाची आठवण झाली. तुमचे देखील असे काही स्वप्न असेल आणि ते केवळ आर्थिक बाबींमुळे मागे पडले असेल तर तडक उठा आणि पुण्यातील नावाजलेल्या सहकारी बँकेला भेट द्या, तुमची ही दिवाळी नक्कीच संस्मरणीय ठरेल याची मला खात्री आहे! 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.