अनाथांचा आधार सागर रेड्डी
 महा त भा  01-Oct-2017

 
 
 
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ सांगणारा आतला आवाज ऐकून आत्यंतिक करूणेने समाजबांधवांमधील विशिष्ट घटकांच्या आयुष्याला मातीमोल न होऊ देण्यासाठी सागर रेड्डीने आपल्या आयुष्याच्या सर्वच वैयक्तिक भावभावना, लाभ, इच्छा यांचा होम केला. त्या यज्ञातून उभे राहिले ‘एकता निराधार संघ’. ही कहाणी आहे, आत्यंतिक दुखातून फिनीक्स पक्ष्याप्रमाणे झेपावणार्‍या दुर्दम्य आशावादाची, जिद्दीची. ती जिद्द, तो आशावाद वैयक्तिक नव्हता, तर त्याला सोनेरी व्याप्ती होती, ‘हे विश्वची माझे घर’ म्हणत दुखितांच्या आसवांना, लाचारीला समर्थ स्वावलंबनाचे जगणे मिळवून देण्याची... ही कथा आहे, ‘अपने लिये तो सब जिते है, जो दुसरो के लिये जिया वोही जिया..’’ असे म्हणत ठरवलेल्या ध्येयासाठी क्षण क्षण जगणार्‍या सागर रेड्डीची. केशवसृष्टी पुरस्काराने आज सागर रेड्डी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा...
 
‘‘येले रोटी और उसको ठोक दे... मार गोली उसको, असे म्हणून जर कोणी माझ्या हातात पिस्तूल दिली असती तर, मी नक्कीच ते काम केले असते. कारण, मला ना घर होते ना दार... पडलो, रडलो, अगदी मेलो तरी माझी दखल घेणारे कोण होते? मी भारताचा नागरिक आहे, याचा माझ्याकडे कोणताच सरकारी पुरावा नव्हता. अनाथाश्रमाच्या उपकाराच्या का होईना, चार भिंतींच्या तशा सुरक्षित वातावरणात मी जगलो होतो. अठरा वर्षे होईपर्यंत बाहेरचे जग काळे का गोरे हे सुद्धा मला माहिती नव्हते. पण एकेदिवशी अचानक मला बाहेरच्या जगात पडावे लागले. कारण होते, अठरा वर्षे झालेल्या मुलामुलींना अनाथाश्रम थारा देऊ शकत नाही. अनाथाश्रमातून दहावीला फर्स्टक्लास पास झालेला मी. अनाथाश्रमात कोणीही मोठी व्यक्ती आली की, आम्हाला विचारे, ‘बाळा तुला मोठेपणी कोण बनायचे आहे?’ त्यावेळी मी म्हणायचो, इंजिनिअर बनणार. पण इथे स्टेशनवर पशूपेक्षाही भयानक आयुष्य जगत असणारा मी इंजिनिअर बनू शकत होतो का? आयुष्य निरर्थक वाटले आणि मी शेवटी ठरवले मरून जायचे. मला या जगाचा भयंकर राग होता. जगाच्या, समाजाच्या रूढींनी मला अनाथ केले होते. माझे वडील आंध्रचे ब्राह्मण आणि महाराष्ट्रातली ख्रिश्चन. दोघांनीही समाजाच्या, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. देाघेही इंजिनिअर. मी जेमतेम वर्ष-दोन वर्षांचा झालो आणि माझ्या आईवडिलांच्या आंतरधर्मीय विवाहाला विरोध असणार्‍यांनी त्या दोघांचाही खून केला. मला अनाथ केले. ‘मला हे क्रूर जग नको’ या विचाराने त्या दिवशी रात्री डोळ्यात सर्व स्वप्ने आणि उशाखाली दहावीचं सर्टिफिकेट घेऊन उंदिर मारण्याचं औषध घेतले. समाधानाने झोपलो... वाटलं, या निर्दयी, परक्या जगापासून सुटका झाली. पण काय आश्चर्य, मी दुसर्‍या दिवशी जिवंत होतो. त्या क्षणी आतून वाटले की, मी भक्कम आहे. मला जगले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे... ’’
 
 आणि इथूनच सागरच्या जीवनाला नाट्यमय संघर्षात्मक वळण मिळाले. सागर तिथून मुंबईला आला. मुंबई सेंट्रल स्टेशनवर राहिला. त्याने मिळेल ते काम केले. मुंबईच्या रस्त्यावर शाळा-कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांना पाहून त्याच्या मनातली इंजिनिअर होण्याची लहानपणाची इच्छा उफाळून यायची. मग पुढे त्याने शिकायचे ठरवले. त्यासाठी पैसे साठवून शक्य ती माहिती मिळवू लागला. शेवटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेला. तिथे त्याला कळले की, शैक्षणिक सवलत मिळणार नाही. त्यांना पूर्ण फी म्हणजे ८० हजार रू भरावे लागणार होते आणि त्यांच्याकडे तर फक्त १७ हजार रूपये होते. सागर म्हणतो, ’’मला कॉलेजात प्रवेश मिळणे शक्य नव्हते. मी डोळ्यातले अश्रू आणि मनातल्या इच्छा मारून कॉलेजच्या बाहेर आलो. पण, तिथला एक शिपाईकाका देवासारखा माझ्या मदतीला आले. ते म्हणाले, शिक्षणासाठी काही माणसं तुला मदत करू शकतात. त्यांचा संदर्भ घेऊन मी माणसांना भेटत गेलो. त्यापैकी एक होते टी. शिवराम. त्यांच्या मदतीने मग मी इंजिनिअर झालो आणि माझे स्वप्न पूर्ण झाले.’’
 
      
     पुढे कॅम्पस मुलाखतीतून सागरला मोठ्या कंपनीत इंजिनिअरची नेाकरीही मिळाली. आपल्याला १८ वर्षापर्यंत वाढवणार्‍या अनाथाश्रमाला भेट देण्यासाठी सागर पुन्हा गेला. दिवाळी-दसरा असावा, अनाथाश्रमात राहून बाहेर पडलेली सगळी मुलं-मुली त्यादिवशी एकत्रित येतात. सागर आश्रमात पोहाचला तर त्याला धक्काच बसला. त्याच्यासोबत दहावीला फर्स्टक्लास मिळवणारे मित्र बाहेरच्या जगात जाऊन बुटपॉलीशवाला, मोलमजुरी करणारा, पाकीटमार, गुंड किंवा तत्सम काम करणारे झाले होते. मुलींपैकी अर्ध्या जणी मोलकरीण म्हणून काम करीत होत्या. काहीजणी कुणाच्या तरी दुसरी पत्नी बनून राहिल्या होत्या. तिथे एका मुलीने तोंडावर पदर घेऊन तोंड लपवले होते. सागर यांनी तिला विचारले, ‘‘तू का तोंड लपवत आहेस?’’ त्यावर तिचे उत्तर होते, ‘‘सागर बेटा, तू ठीक है ना?’’ तो आवाज सागरच्या ओळखीचा होता. ती तर अनाथाश्रमातली लहानपणी त्यांना राखी बांधणारी दीदी होती. त्यांच्यासारखीच अनाथ. तिचे लग्न झाले होते. तिला नवरा मारहाण करी. चेहरा, मान, खांदा जळाल्याच्या अमानुष खुणा लपवत ती कशीबशी म्हणाली, ‘‘ज्यांचे आई-बाप असतात, माहेर असते, त्या सासूरवाशिणीला पण त्रास भोगावा लागतो. आमच्यासारख्यांना ना माहेर ना कोणी नातेवाईक. बेसहारा मुलीवर कितीही अत्याचार केला, तर आमची बाजू कोण घेणार? तिच्या आवाजात भयंकर दुख: होते. सागर म्हणतो, ’’तिला पाहून दुसर्‍या दीदीची आठवण झाली. मला आठवलेली दीदी माझ्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठी असेल. मी अनाथ आहे याची तिच्यामुळे मला कधी जाणीव झाली नाही. ती माझी खूप काळजी घ्यायची. ती अठरा वर्षांची झाली आणि मग नियमाप्रमाणे तिला आश्रम सोडावा लागला. मी पुन्हा अनाथ झालो. ती काय करते, विचारल्यावर कळले ती वेश्या झाली. त्या दुर्दैवी गल्ल्यांमध्ये मी तिला वेड्यासारखा शोधत राहिलो. पण ती मला भेटली नाही. मला संताप आला, दु:ख झाले. मी तिला कधीही विसरू शकत नव्हतो.’’ सागर रेड्डींच्या डोळ्यात अश्रू तरळले. चेहरा वेदनेने पिळवटला. तिच्या आणि तिच्यासारख्याच लाखो मुलामुलींच्या दु:खाच्या वेदनेने, करपलेल्या जगण्याने सागर रेड्डींच्या आयुष्याला कल्पनातीत कलाटणी मिळाली. त्यांनी ठरवले की, अनाथाश्रमातून बाहेर पडणार्‍या पुन्हा खर्‍या अर्थाने अनाथ होणार्‍यांसाठी काम करायचे. मनात एक स्फुल्लींग फुलले. बस कुछ कर गुजरना है... आपल्या अनाथ भावाबहिणींसाठी काही करायचे तर पहिल्यांदा अनाथाश्रमातून ते बाहेर येतील त्यावेळी बाहेरच्या जगाशी सूत जुळेपर्यंत, स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांना सुरक्षित निवारा किमान, दोनवेळचे अन्न आणि योग्य मार्गदर्शन हवे. पण ही वाट सोपी नव्हती. त्यासाठी पैशांची गरज होती. सागर आपला पूर्ण पगार त्यावर खर्च करू लागले. पैसे कमी पडले, तर नव्या घरासाठी भरलेले पैसे परत घेतले. त्या पैशाने नवी मुंबईला तीन फ्लॅट भाड्याने घेतले. त्यामध्ये अनाथाश्रमातून बाहेर पडणार्‍या मुलांना दोन फ्लॅटमध्ये तर एका फ्लॅटमध्ये मुलींना ठेवले. त्यांच्या राहण्याचा, खायचा आणि शिक्षणाच्या व्यवस्थेचा पूर्ण भार सागर यांनी उचलला. वाचताना सोपे वाटते, पण त्यावेळी सागर यांचे चांगल्या घरच्या उच्चशिक्षित मुलीशी लग्न ठरले होते. दोघांनी नव्या घराचे, स्वत:च्या संसाराचे स्वप्न पाहिले होते. भावी सासरच्यांना हे कळले, त्यांचे म्हणणे होते, सागर यांनी ते काम तरी सोडावे किंवा आमच्या मुलीशी लग्न करण्याचा विचार तरी सोडावा. सागर सांगतात, ’’पण आता मी हे काम मेलो तरी सोडू शकत नव्हतो. अनाथाश्रमातून बाहेर पडल्यावर गुंड, भिकारी, चोर, वेश्या बनताना मी माझ्या भावाबहिणींना पाहून शकत नव्हतो. माझे लग्न होण्याआधी मोडले. त्यांनतर मनातून पुन्हा मी एकटा झालो. त्यावेळी मला साथ दिली, विश्वास दिला तो माझ्या कामाने आणि मग मला एक सत्य गवसले, समाजकार्य करायचे असेल तर त्याग करण्याची शक्ती हवी, लाभ सोडण्याचीही शक्ती हवी. त्यानंतर ’एकता निराधार संघा’ची स्थापना केली. हळूहळू वृत्तपत्र, दुरदर्शनच्या विविध चॅनेलवर माझ्या कामाची दखल घेतली जाऊ लागली.’’
 
मग सागर यांनी मागे वळून पाहिले नाही, देशभरातून लोक संपर्क करू लागले. त्या सर्वांच्या सहयोगातून सागर यांनी आतापर्यंत अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या १,१२८ जणांच्या आयुष्याला समर्थ बनवण्यासाठी रक्ताचे पाणी केलेे. यामध्ये ६० मुलींची अनुरूप वराशी लग्न ही लावून दिली. पुणे, सोलापूर, औरंगाबाद ते अगदी बंगळुरु आणि त्याहीपुढे कित्येक शहरात अशा प्रकारचे काम ’एकता निराधार संघा’ने सुरू केले आहे.
 
’एकता निराधार संघ’ देशभरातील अनाथ मुलांना यशस्वी आयुष्य देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरण्याचे कामही करत आहे. संघाने बेकार मुलामुलींना नोकरी देण्यासाठी प्लेसमेंट सर्विसही सुरू केली आहे. आज सागर यांच्या कामाला देशव्यापी स्वरूप प्राप्त होत आहे, इतके की त्यांच्या ‘एकता निराधार संघा’चे जवळ जवळ पाच हजारांच्या वर स्वयंसेवक देशभरात या कामी कार्यरत आहेत. सागर पुढे सांगतात, ’’कामाची व्याप्ती वाढली आहे, याकामी मला गुरूसारखे जर कोणी मार्गदर्शन करत असतील, तर ते आहेत रा. स्व. संघाचे सुनीलजी देशपांडे. त्यांनी केलेल्या अमुल्य मार्गदर्शन आणि सहाकार्‍यामुळेच ’एकता निराधार संघा’चे काम जनपातळीवर वाढण्यास मदत होत आहे. दुसरे माझी आई कल्याणी गुलगूलवार. यांनी मला माझ्या वयाच्या या टप्पयावर दत्तक घेतले आहे. का कारण, मी ‘एकता निराधार संघा’चे काम निर्वेधपणे करावे म्हणून. माझ्या या दुसर्‍या आईचा मला खूप आधार आहे.’’
 
 ‘एकता निराधार संघा’विषयी माहिती मिळवताना कळले की, ’एकता निराधार संघा’ला मुलांच्या निवार्‍यासाठी एक परिपूर्ण वास्तू हवी आहे. जी वास्तू, जी जमीन शहराजवळ, शिक्षण संस्थांजवळ असेल. आजपर्यंत कित्येक जणांनी सागर यांना वास्तूसाठी जमीन दान करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्या जमिनी घेतल्या नाहीत. कारण त्या जमीन, गावातली, दूर दुर्गम भागातल्या होत्या. सागर यांचे म्हणणे होते की, ’’मुलांना तर शिकायचे, काम करायचे आहे, नव्या जगाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे. त्यासाठी ती दुर्गम भागातली जमीन घेऊन तिथे वास्तू बांधण्यात काही अर्थ नाही म्हणून अशा दान देऊ केलेल्या जमिनी कशाला स्विकारायच्या.’’ इतकी निर्लोभी, नि:स्वार्थी वृत्ती सागर रेड्डी या तरूणाची आहे. दै. ‘मुंबई तरूण भारत’ परिवारातर्फे सागर रेड्डींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
 
 
 
आज केशवसृष्टी पुरस्कार
मानकरी : सागर रेड्डी
कार्यक्रमाचे प्रमुख: हणमंतराव गायकवाड
(भारत विकास ग्रुप, अध्यक्ष)
सुहासराव हिरेमठ
(अ.भा. कार्यकारिणी सदस्य, रा.स्व.संघ)
दिनांक : १ ऑक्टोबर २०१७,  
सायंकाळी : ५.३०  
स्थळ : रंगशारदा, वांद्रे पश्चिम
 
 
 
 
जे काम देशव्यापी स्वरूपाचे असून त्या कामाची अंत:प्रेरणा मानवी मूल्याधिष्ठीत राष्ट्र आणि समाजचिंतनावर आधारित आहे, त्या कामाला, ते काम करणार्‍या व्यक्तीला प्रोत्साहन आणि आपुलकीची साद देण्यासाठी केशवसृष्टी पुरस्कार दिला जातो. केशवसृष्टी पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत सागर रेड्डी. अनाथाश्रमामधून बाहेर पडणार्‍यांना जगण्याचा मार्ग देणार्‍या सागर रेड्डी यांचे काम खरचं काळाची गरज आहे.

वैजयंती आपटे, अध्यक्ष, केशवसृष्टी पुरस्कार निवड समिती २०१७
 
- योगिता साळवी