वेध- ‘सायकल’हट्टाचे गतिरोधक
 महा MTB  06-Jan-2017
 
एकीकडे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी समाजवादी पक्षातील ‘सायकली’चे झालेले दोन तुकडे काही दुरुस्त व्हायची अजूनही चिन्हे नाहीत. ‘नेताजीं’नाही जिव्हाळ्याची ‘सायकल’च हवी आणि मुलगा मुख्यमंत्री अखिलेशलाही पुन्हा ‘सायकल’ सफरीनेच उत्तर प्रदेश काबीज करायचाय. ही ‘सायकल’ जणू गादीसाठी लक्की चार्मच! अशा या उत्तर प्रदेशातील यादवीच्या युद्धवार्‍यांनी केवळ तिथलाच माहोल गरमझालेला नाही, बरं का... मुंबईतही समाजवादीची ‘सायकल’ कोणाकडे जाणार, मार्गदर्शक बापाकडे की मुख्यमंत्री बाबूकडे, या चर्चांना उधाण आले आहे. म्हणा, मुंबई ही हजारो उत्तर भारतीयांची कर्मभूमी असली तरी जन्मभूमीच्या राजकारणाचे रंजक फड इथेही रंगतातच की...
 
लोकलमध्ये बसायला मिळाले नाही म्हणून आधीच त्रासलेले चाचाजी बनारसी हिंदीमध्ये अगदी उद्विग्नपणे म्हणाले, ‘‘ पता नाही अखिलेस बाबू को ‘सायकल’ ही क्यूं चाहिए... अब सायकल का जमाना गया ना भय्या. उन्हे चुनाव आयोग से मोटारसायकल मॉंगनी चाहिए. उनके इमेज को भी सूट करेगी. सायकल अब पुरानी हो गयी. कब पंक्चर हो जाए, क्या पता...’’ चाचाजींचे हे वैयक्तिक राजकीय मत असले तरी त्या उत्तर भारतीय घोळक्यातील प्रत्येकाच्या एकूणच प्रतिक्रिया कमी-अधिक प्रमाणात अखिलेशला ‘बढावा’ देणार्‍या आणि नेताजींना ‘बुढापा’ आलाय, हे सांगण्यासाठी पुरेशा होत्या.
 
म्हणजे उत्तर प्रदेश असो वा मुंबई, समाजवादी पक्षाची धुरा अखिलेशकडे असावी, ही सर्वसाधारण जनभावना. त्यातच अखिलेशनी पाच वर्षांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचा कायापालट करण्याचा केलेला प्रयत्नही सूक्ष्मजनदृष्टीतून सुटलेला नाही. नेताजींचे बोट पकडूनच खरं तर अखिलेश ‘सायकल’ शिकले, पण नवखे होते तोवर नेताजींचा आधार हवाहवासा होता, पण हीच ‘सायकल’ सुसाट सुटली आणि आधाराची जागा तिने आत्मविश्वासाने घेतली. पण तरीही ‘सायकल’वर आणि अधिकारवाणीने पक्षावर हक्क सांगणार्‍या अखिलेशने आपली स्वतंत्र चूल मांडून आणि ‘सायकल’चा नाद सोडून ‘मोटारसायकल’चे गिअर हाती घ्यावे, या म्हातार्‍या चाचाजींच्या विचारांमध्येही खरं तर सर्व काही आलेच. आता अखिलेश ‘सायकल’ सावरतात की, खरंच ‘मोटारसायकल’ मिरवतात, हे येणारा काळच ठरवेल.
 
--------
 
निगरगट्ट लालूंचे आलोचक
 
उत्तर भारतातील राजकारणाची खमंग चर्चा आणि लालू यादवांचा उल्लेखापुरताही उद्धार नाही, हे कसे शक्य होईल म्हणा! चाचाजींची गाडी उत्तर प्रदेशवरून मग बिहारकडे घसरली. लालू केंद्रात रेल्वेमंत्री असताना त्यांच्याकडून येऊन विदेशींनी गिरवलेले मॅनेजमेंटचे धडे हा अजूनही तितकाच आश्चर्याचा अन् आलोचनाचा विषय. त्यावर कडक कोरडे ओढल्यावर चाचाजींनी एक किस्सा सांगितला. म्हणे, लालू विद्यार्थीदशेत असताना त्यांनी बस किंवा रेल्वे प्रवासासाठी कधी एक दमडीही मोजली नाही. उलट दंबगाई करत दादागिरीने लोकांना मुठीत ठेवले. इतकेच काय, आज लालूचा मुलगाही तेच करतोय. लालूने रेल्वेमंत्री असताना ओरबाडलेला ‘प्रसाद’ कमी की काय, त्याच्या खानदानानेही रेल्वेचे तिकीट कधी काढले नाही. लालूच्या नातेवाईकांना विनातिकीट प्रवास करताना पकडले तर त्यांनीही ‘रेल्वेमंत्री के रिश्तेदार है’ सांगत म्हणे चुकवेगिरी केलीच. चाचाजींचा मुद्दा हाच की, लालू श्रीमंत, नातेवाईकही गडगंज यादव, मग यांची तिकिटाचे चार पैसे मोजायला हरकत का बरं असावी? चाचाजींनी उपस्थित केलेला प्रश्न उचित होताच, पण उत्तरेकडील ‘मै किसका बेटा/बेटी/रिश्तेदार हूँ’ ही महत् माजोरडेपणाची, मोठेपणाची संस्कृती तिथे नखशिखांत भिनलेली. त्यामुळे ज्याचा सरकार दरबारी बाप, तोच नोटछाप, अशी स्थिती. त्यात चारा घोटाळ्यातले चोर असलेले लालू यांचे बिहार म्हणजे चराऊ कुरणच. पण, आज याच लालूंनी स्वत:चे गोठे दुधदुभत्यांनी काठोकाठ भरले, पण बिहारी जनतेला मात्र परराज्यात जाऊन दारोदारी दूध विकण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे लालू नावाचे बिहारच्या प्रगतीतील गतिरोधक नितीशकुमारांच्या आगमनाने काही अंशी का होईना दूर झाल्याचे या गंगा किनारेवाल्यांना वाटते.
 
पण निरीक्षणाचा भाग म्हणजे, चाचाजी असोत वा त्यांच्या पिढीतले ज्येष्ठत्वाकडे झुकलेले मतदार, त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारमधलं जातीय मतपेटीचं राजकारण जवळून अनुभवलंय आणि म्हणूनच आज त्यांच्यासारख्या मुंबईत आपल्या घरादारापासून हजारो किमी दूर राहणार्‍या उत्तर भारतीयांनाही शिक्षण आणि विकासाची किंमत समजली आहे. कारण, या दोन मूलभूत सुविधा त्यांना कदाचित त्यांच्या राज्यात तेवढ्याच सहजतेने उपलब्ध झाल्या असत्या तर आज मुंबईचे उंबरठे झिजवून उदरनिर्वाह उरकण्याची वेळही त्यांच्यावर आली नसती. चाचाजींच्या डोळ्यात या राजकारण्यांनी उत्तर भारतीयांच्या उद्ध्वस्त केलेल्या पिढ्यांचा रोष स्पष्टपणे जाणवत होता. आज चाचाजी जरी सत्तरीच्या उंबरठ्यावर असले तरी उत्तर प्रदेशचे मतदान त्यांनी आजवर एकदाही चुकवलेले नाही. तिकडची काय आणि इकडची काय, त्यांना ही राजनीती श्रीमंतांचा जुगारच वाटते.
 
 
-विजय कुलकर्णी