खाद्यभ्रमंती- टर्को-डेझी
 महा MTB  05-Jan-2017


आपण बऱ्याचदा पंचतारांकीत हॉटेल्समध्ये जात येत असतो, इथला बुफ़े जेवणं हा खरतरं एक विलक्षण अनुभव असतो माझ्यासाठी,

पण त्यातल्या त्यात म्हणालं तर इथे गेल्यावर इतर सगळ्या पदार्थांसोबत एक सेक्शन मात्र नेहेमीच माझे लक्ष वेधून घेतो आणि तो सेक्शन म्हणजे दुसर तिसर काही नसून तो विभाग असतो रंगारंग स्वादिष्ट डेझर्टस चा सेक्शन…

 

कुठल्याही व्यक्तीचा मूड फुलवण्याचा, आसमंतात आनंदी वातावरण दरवळवण्याचा, द्रुष्टीसुखच नव्हे तर अमर्याद जिव्हासुखही पोचवण्याचा, अदभूत रंगसंगतीची मर्मभेदी उधळण आणि जोडीला विविध चवींचा आधी तोंडात आणि नंतर तिथून थेट मेंदूमध्ये स्वादांचा प्रसन्नचित्त आनंदी निधान पेरणारा असा हा डेझर्टस चा सेक्शन…

चला तर मग, जास्त वर्णन नको, आता या भन्नाट टर्को-इटालियन डेलीकेसीची रेसिपीच पाहुया….

विलक्षण टेस्टी होते हे क्यूझिन मित्रांनो आणि मैत्रिणींनो….

मी केलं आहे आणि आम्ही सर्वांनी मस्त चाखलही आहे फक्त एकच नम्र विनंती आहे की आधी ही  पूर्ण  रेसिपी एकदा, दोनदा, तीनदा नीट वाचा, परत परत वाचा, नीट  समजून घ्या, काही अडलच तर बेझिझक थेट मला विचारा आणि नंतरच करा…प्लीज प्लीज प्लीज

चला तर मग समजावून घेऊया

(या डिशमध्ये कटर ही एक महत्वाची वस्तू आहे मित्र मैत्रिणींनो, भांड्यांच्या दुकानात मिळते हि साधारण ७० रुपयांना, नक्की घेऊन या ही वस्तू, खूप उपयोगाची असते हे साधन. )

 

साहित्य-

स्ट्रॉबेरीज - २५ छान लालबुंद टपोऱ्या स्ट्रॉबेरीज, या चांगल्या मस्त पिकलेल्या आणि गोड घ्या, जितक्या स्ट्रॉबेरीज गोड तितकी आपली डीश भन्नाट (बाजारात स्ट्रॉबेरीजचे प्लास्टिक डबे मिळतात बघा चौकोनी, त्या एकात साधारण १२ स्ट्रॉबेरीज असतात अस म्हटलं तरं साधारण दोन ते तीन स्ट्रॉबेरीजचे डबे होतात),

काळी द्राक्षे - साधारण ८ ते १० मोठी टपोरी, लहान असतील तर सरळ १५ घ्या. ही द्राक्षे आधी २-४ वेळा छान वाहत्या पाण्यातून धुवून घ्या आणि नंतर पाण्यात बुडवून ठेवा आणि प्रत्यक्ष वापरण्या आधी कोरड्या कपड्याला व्यवस्थित पुसून घ्या. हल्ली या द्राक्षांना खूप केमिकल्स मारलेली असतात म्हणून ही काळजी घेतलेली बरी. 

द्राक्ष अजिबात जास्त घेऊ नका "काय फरक पडतो" म्हणतं, फक्त ८-१० च घ्या,

लाल रंग जाइल नाहीतर डीशचा आणि अकारण काळपट रंग  येईल, जो बोअर दिसेल, चवीत फरक पडत नाही विशेष पण जे खातो ते छान तर दिसले पाहिजे ना यार?

पाणी - १५० मिलीलीटर

साखर - १५० ग्राम

काळी मिरी - चार (जास्त नको, याची आधीच पूड करून ठेवा )

वेलदोड्यांची पावडर - २ (वेलचीची सालं नका घेऊ, ती चहाच्या बरणीत टाका, चहाला छान वास येतो मागाहून, वेलची सोलल्यावर काळ्या बिया असतात आत, याची आधीच पूड करून निराळी ठेवा) पुदिना - चार ते पाच हिरवीगार पाने व्यवस्थित धुवून ठेवा

३ स्लाईस पांढरा ब्रेड (व्हीट ब्रेड अजिबात नको... किंचित वापरतो आपण इथे हा नेहेमीचा मैद्याचा साधा व्हाईट ब्रेड... त्यामुळे हाच मैद्याचा साधा व्हाईट ब्रेडच वापरावा)


पाककृती

सर्वप्रथम सर्व साहित्य तयार ठेवा. आता घेतलेल्या सगळ्या स्ट्रॉबेरीज पैकी अर्ध्या स्ट्रॉबेरीजचे तुकडे करून ठेवा, सगळच्या सगळ पाणी एका नॉन -स्टिक पसरट भांड्यात घ्या आणि मोठ्या  विस्तवावर पाण्याला एक उकळी आणा आता उकळी आल्यावर विस्तव लहान करा.

घेतलेल्या साखरेचे तीन भाग करा.

आता लहान विस्तवावर असलेल्या या पसरट भांड्यात तीन पैकी एक भाग साखर टाका आणि सतत ही साखर लाकडी चमच्याने ढवळत रहा, आता ही साखर विरघळल्यावर पुढचा भाग टाका आणि हा भाग विरघळल्यावर आता शेवटचा भाग टाका आणि व्यवस्थित हलवा.

सगळी साखर विरघळून गेली की आता भांड्याच्या तळाशी पांढऱ्या रंगाचे बुडबुडे फॉर्म होऊ लागतात, अजिबात घाबरू नका, हे होतंच आणि असंच होत, नॉर्मल आहे, फक्त पेशंस ठेवून साखर असलेलं हे द्रावण अजूनही असाच ढवळत रहा.

आपल्याला मूळ असलेलं द्रावण साधारण निम्म्या मापाचं करायचं आहे. पूर्ण साखर विरघळली की नंतर साधारण लहान विस्तवावर १० मिनिटे लागतात हे पाणी बरोबर अर्धे व्हायला.

आता मूळ जे पाणी आपण घेतलं होतं ते अर्ध झाल आहे अस आपण समजूया.

आता या साखरेच्या द्रावणात अर्ध्या स्ट्रॉबेरीजचे मगाशी केलेले तुकडे घाला आणि सगळ्या द्राक्षांचे केलेले तुकडे नंतर घाला आणि आता विस्तव लहान ठेवून आता हे सगळे मिश्रण साधारण १० मिनिटे ढवळत रह.

द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीज पूर्णपणे विरघळून बर्यापैकी एकजीव होतात आणि या दोन्ही फळांचा साधारण दृश्य स्वरूपात लगदा तयार होतो.

आता हे सगळे मिश्रण पंख्याखाली ठेवून बऱ्यापैकी गार करा आणि आता एका मोठ्या चाळणीत हे सगळ मिश्रण घेऊन साखरेच्या पाकातला ज्यूस जाडसर गाळून घ्या.

 

आता आपल्याकडे असलेल्या एखाद्या गोलाकार कटरच्या सहाय्याने ३ ब्रेडचे तुकडे कट करून घ्या. 

आता या कापलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर चमच्याच्या सहाय्याने आपल्या जाडसर ज्यूस व्यवस्थित पसरून घ्या. 

हा ज्यूस ब्रेडने व्यवस्थित शोषून घेतला पाहिजे, हा ब्रेड आता थोडा थोडा ज्यूस पुन्हा पुन्हा शोषत जाईल, जेव्हढा जेव्हढा ज्यूस ब्रेड शोषत जाइल तितका तितका हळुवार मुरवत चला.


आता उरलेला ज्यूस पुन्हा मगासच्या पसरट भांड्यात घ्या.  यात अजून एक २५ मिली पाणी घाला आणि आता यात उरलेली अर्धी स्ट्रॉबेरी यात घाला आणि व्यवस्थित शिजवून घ्या. 

 

मिश्रण मगासच्या सारखे साधारण एकजीव झाले की आता विस्तव बंद करा आणि आता यात काळी मिरी पावडर घाला, वेलची पूड घाला आणि पुदिन्याची पाने कुस्करून पसरून  घाला. 

 

आता पुन्हा हे सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि आता अगदी जर वेळ म्हणजे साधारण २-३ मिनिटे पंख्याखाली थंड करायला ठेवा. 

 

आता मगासच्या कटर मध्ये खाली ज्यूस मध्ये भिजवलेला ब्रेड ठेवा, थोडा दाबून ठेवायला लागतो कारण आता या ब्रेडच्या तुकड्याने ज्यूस मुरवून घेतला आहे. 


आता थंड केलेले मिश्रणाचा, या ब्रेडच्या तुकड्यावर एक लेअर चमच्याने घाला.

आता दुसरा ब्रेडचा तुकडा या कटर मध्ये सरकवा आणि पुन्हा आपले तयार मिश्रण यावर घाला आणि आता शेवटचा तुकडा वर ठेवा आणि वरून अजून ज्यूस घाला.

 

आता आपली स्वादिष्ट जादू ९०% तयार झाली आहे.

आता हा कटर अलगद उचला आणि ही डीश आता अशीच्या अशी फ्रीजर मध्ये फक्त ५ मिनिटांसाठी ठेऊन द्या, फक्त पाच म्हणजे फक्त पाच मिनिटांसाठी बर.

जास्त ठेऊ नका नाहीतर चव बदलेलं.

 

चला तर मग...झटपट रेसिपी आहे...मुलांनाच नाही तर आपणा मोठ्या माणसांना ही भन्नाट आवडेल बघा ही जबऱ्या डीश नक्कीच.

आता मस्त ही डिश समोर ठेवा आणि करा सुरुवात हाणायला, इथे डिशचे जे साहित्य दिले आहे यामध्ये साधारण एक डिश तयार होते.

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा... आणि ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

 

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा

-मिलिंद वेर्लेकर