वेध- घटता घोट घोट...
 महा MTB  03-Jan-2017

काही हौशी आणि वेगस्वार मद्यपींना नववर्षाचे स्वागत पोलिसांचा दंड भरून किंवा कैदेच्या कोपर्‍यात कण्हत करण्याची जुनी खोडच! यावर्षीही अशा ५६५ महाभाग मद्यबाजांना मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्तात ‘ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह’च्या केसखाली पकडलेच. ही चिंतेची बाब असली तरी गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता, हे प्रमाण साधारण ३०-४० टक्के घटल्याचा निष्कर्ष काढता येईल. गेल्या वर्षी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ७५० मद्यपींना मुंबई पोलिसांनी इंगा दाखविला होता, तर यंदा हा आकडा ५६५ वर येऊन स्थिरावला आहे. यासाठी लोकांच्या अगदी तोंडाजवळ जाऊन मद्यसेवनाची चाचणी करणार्‍या ट्रॅफिक पोलिसांपासून ते बंदोबस्तात नव्या वर्षाचे स्वागत करणार्‍या सर्व पोलीसमित्रांचे कौतुक आणि अभिनंदन करावे, तितके कमीच.
 
वाहतूक पोलिसांनी आणि अनेक सामाजिक संस्थांनी वेळोवेळी राबविलेल्या जनजागृती मोहिमांमुळे दारू पिऊन वाहनं बेदरकारपणे पळविण्याच्या बेशिस्त आणि जीवघेण्या प्रकारांना वेसण घालण्यात बर्‍यापैकी यश आले आहे. यापूर्वीही इतके वर्ष २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरच्या काळात असाच कडेकोट बंदोबस्त आणि बक्कळ दंडवसुली व्हायची, तरी म्हणावे तसे ‘ड्रंक ऍण्ड डाईव्ह’च्या केसेसचे प्रमाण घटले नव्हते. मद्यधुंद अवस्थेत स्वत:च्या जीवाची तर अजिबात पर्वा न करणारी ही नशेत बुडालेली तरुणाई रस्त्यावरील पादचार्‍यांचा, इतर वाहनचालकांचा विचार करणे तर दुरापास्तच! मात्र, यावर्षी मामूची भीती आणि ऐन नोटाबंदीमध्ये दंडाचा फटका यापासून तरुणाईने चार हात दूर राहणेच पसंत केलेले दिसते. त्यातही मुंबई पोलिसांनी हॉटेल आणि बार व्यावसायिकांना ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मद्यपींना घरी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही अनेक ठिकाणी अमलात आणली गेली. त्यात सध्या ‘ओला’ आणि ‘उबेर’च्या जमान्यात मोबाईलवरून एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या आरामदायी टॅक्सी सेवेचाही अनेकांनी लाभ घेतला.
 
तेव्हा, धमाल-मस्ती आणि ‘न्यू ईयर पार्टी’च्या मूडमध्ये असलेल्या युवा मुंबईनेही थोडा फार समजूतदारपणा दाखवत आपल्या हातून काही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. पुढच्या वर्षी बेधुंद मद्यपींची संख्या अधिक घटेल, अशी नववर्षाच्या निमित्ताने आशा करूया...
 ------------------------
 
शामीचे शालजोड्यातले...

 
समाजामध्ये अधून-मधून फूत्कार सोडणारी धार्मिक कट्टरता आता सोशल मीडियावरही वळवळू लागली आहे. त्यातही स्वयंघोषित इस्लामचे रखवाले म्हणून इंटरनेटवर मिरविणार्‍या हिरव्या फौजांमधून भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शामीही सुटला नाही. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी हसीन आणि मुलीसोबत टाकलेल्या फोटोवर अशाच काही प्रतिगामी धर्मरक्षकांची बुरी नजर पडली अन् त्यांनी शामीला बायकोला बुरख्यात बांधून ठेवण्याचा, हिजाब परिधान करण्याचा फुटकळ सल्ला दिला. या मोफतखोर कट्टर सल्लेबाजांना शामीनेही लागलीच प्रत्युत्तर देऊन त्यांची तोंड बंद केली. ‘‘मी, माझ्या पत्नीने कोणते कपडे घालायचे हा आमचा वैयक्तिक प्रश्न असून त्यामध्ये तुम्ही नाक खुपसणारे कोण?’’ असा बाऊन्सर टाकत टीकाकारांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. शामीच्या समर्थकांनीही त्याची बाजू लावून धरत या कट्टरतावाद्यांची तोंड बंद केली. इतक्यावर थांबेल तो शामी कसला. त्याने पुन्हा एकदा बायकोसोबतचा एक सुंदर फोटो नववर्षानिमित्त ट्विटरवर ट्विट केला आणि अशा धर्माच्या ठेकेदारांना जोरदार चपराक लगावली. अशा धर्मांधांच्या उथळ सूचनांना आपण अजिबात भीक घालत नसल्याचे टीकाकारांना दाखवून देत शामीने चांगलेच शालजोड्यातले लगावले. इस्लामिक देशांपेक्षा कैक पटीने भारतीय मुसलमान आज ‘लिबरल’ वातावरणात वावरत आहेत. त्यांना वेशभूषा परिधान करण्याचे, वावरण्याचे घटनेने इतर भारतीयांइतकेच मुक्त स्वातंत्र्य दिले आहे. ना इथे सौदीप्रमाणे बुरख्याची सक्ती आहे आणि ना ही जर्मनीप्रमाणे बुरखा बंदी! तेव्हा, मुद्दामअशी शेरेबाजी करून, धार्मिक टीकाटीप्पणी अथवा फतवेबाजीने काहीही साध्य होणार नाही, उलट मुस्लीमसमाजाला असे धर्माच्या, समाजाच्या आखाड्यात बांधून त्यांची विचारसरणी संकुचित होण्यामागे हीच कारणे आहेत. त्याऐवजी मुस्लीमसमाजातील ‘त्रिवार तलाक’ची पद्धत आणि मुस्लीमसमाजातील महिलांवर त्यामुळे होणारे अत्याचार यावर मात्र हे सोशल मीडियावर चंद्रमुखी झेंडे मिरविणारे मात्र मूग गिळून बसतात. त्यामुळे धर्माभिमान आणि धर्मांधळेपणा यातील फरक वेळीच समजून समाजाच्या सामाजिक, धार्मिक मूल्यांना दिशा देणे अधिक गरजेचे आहे. खरं तर हा मुद्दा फक्त इस्लामकिंवा अमूक एका धर्मापुरता मर्यादित नसून कट्टरतावादी मानसिकतेचा आहे. कोणी कोणते कपडे घालावे आणि घालू नये, हा सर्वस्वी प्रत्येकाचा खाजगी प्रश्न. निश्चितच, सार्वजनिक आयुष्यात वावरताना तारतम्य बाळगणे अपेक्षित आहेच. पण तरीही एखाद्याची वेशभूषा लागलीच धार्मिक चौकटीत बसत नाही, म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करून तोंडसुख घ्यायला किमान भारतात तरी मोगलाई नक्कीच नाही!
-विजय कुलकर्णी