अर्पणमस्तु -  सोलापूरच्या पालामध्ये फिरताना... 
 महा MTB  19-Jan-2017

 
भटक्या विमुक्तांच्या पालांमधल्या  गुरुद्वारामध्ये आम्ही गेलो, तर  सोलापुरी मराठी फार्मात बोलणारे शीख बांधव बसलेले. ’’या या बसा वं’’ म्हणत त्यांनी आमचे स्वागत केले. ’सिकलगार’ समाजाचे लोक होते ते. पहिल्यांदा महिला शांतच होत्या, हे जे कोणी  आलेत ते आपल्या घरच्या पुरुषमंडळींना भेटायला आले  आहेत. आपल्याला बोलावले म्हणून बसायचे, असा खास भाव चेहर्‍यावर. सुवर्णा रावळांनी त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. काय समस्या आहेत, यावर पुरुषमंडळींनी ’’नोकरी मिळत नाही, शिक्षण परवडत नाही, सुविधा नाहीत, आम्ही दिवसभर चाकू, सुर्‍या, किसणी, झारे अशा घरगुती वापराला लागणार्‍या वस्तू बनवतो पण गुजारा होणे मुश्कील आहे,’’ असे सांगितले. यावर सुवर्णाताई म्हणाल्या, ’’घरातला महिलावर्ग काय करतो?’’ या प्रश्‍नावर पहिल्यांदा ते ओढणी ओढलेले  चेहरे सैल झाले. त्यातली प्रौढ महिला म्हणाली, ’’क्या करते जी, जेवण बनवायचं, घर सांबाळायचं, आन पोरांना बघायचं हे काम तर लई मोठं.  दिस कसा  जातो कळत नाय. पण त्यातून बी वाटतंय बगा, घरातल्या घरात काय काम मिळालं तर करायला काय हरकत नाय. तेवढंच चार पैसं भाजीबिजीला होत्याल.’’ घरातल्या घरात काय काम करणार? विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, ’’आम्ही कपडे शिवू शकतो, आमच्यात बाहेरच्या पुरुषाकडून (म्हणजे पुरुष टेलरकडून) कपडे शिवून घ्याची पद्धत नाय. घर सोडून बाहेर पडायचा रिवाज नाय. त्यामुळे आमची कापडं आमीच शिवतो. कापडचोपड शिवण्याचं उस्तरण्याचं काम असलं तर सांगा.’’ असलं काही काम मिळालं तर जरूर प्रयत्न करू. पण समजा घराच्या बाहेर कामाच्या ठिकाणी जाऊन काम करावे लागले तर? असा प्रश्‍न सुवर्णांंनी विचारला. यावर ताडकन ती प्रौढ महिला म्हणाली, ’’हमारे मे ये रिवाज नही है जी. घराची बाई घरातच सोभते. बाहेर पडून कसं चालंल? घरात काय काम द्याल तर ठिक नायतर नायलाज हाय.’’ 

 
 त्या प्रौढ स्त्रियांच्या सोबतीने छोट्या छोट्या मुलीही हौसेने बसल्या होत्या. यांच्या बाबतीतही हेच नियम  असतील का? अस्वस्थ होत आम्ही प्रश्‍न विचारला, ’’या मुली घराच्या बाहेर पडू शकतात म्हणजे शाळेत वगैरे जातात ना?’’ यावर किंचितशा खिन्न  चेहर्‍याच्या त्यातल्या ज्येष्ठ महिलेच्या चेहर्‍यावर  आशेची नव्हाळी दाटून आली. ती म्हणाली, ’’हमारी और बहुओंकी तो जिंदगी गयी. बच्चीओंको जिना है. उनको सकुलमे डाला है जी..’’ वर वर साधेसे उत्तर.. हे उत्तर देणार्‍या महिलेचे वय ६० वर्षांचे, तर तिच्या सुनांचे वय  ३०-३५ च्या घरातले. या वयात त्यांना वाटत होते, आपली जिंदगी संपली पण त्याचवेळी सुखद भावना ही होती की आपल्या मुली- नाती शाळेत जातात, आणि शाळेत जाऊन त्या जगायला शिकतील. जगणे, जिवंत असणे आणि जगायला शिकणे, हे प्रश्‍न आपल्याला कधी पडले असतील काय?  पण पिढ्यान्पिढ्या स्वयंपाकघरात, माजघरात आयुष्य रेंगाळलेल्या या महिलांना आपल्या मुली उंबरठ्याच्या बाहेर पडल्या, आणि चार बुकं शिकतात याचा किती आनंद होता, अभिमान होता. मनात आले, २०१७ सालीही असे दृश्य आहे की आपण बाहेरचे जग पाहिले नाही तरी आपल्या मुली ते पाहू शकतील यावर समाधान  मानणारी आजी, आई, काकी, आत्या...

सुवर्णा रावळांच्या, अप्पांच्या मनातही हेच विचार असतील का? कदाचित वर्षानुवर्षे भटके विमुक्त समाजाचे काम करत असल्यामुळे त्यांना हे नवीन नव्हते. पण तरीही सुवर्णा रावळ म्हणाल्याच की, ’’मुली शाळेत  जातात. अरे वा..! खूप शिकवा त्यांना..  स्वयंपाक-घरकाम हे सगळंसुद्धा शिकवा त्यांना. पण त्यासाठीच त्या जन्माला आल्या असं समजू नका बरं.. त्या पलीकडे काहीतरी करण्यासाठी त्या जन्माला आल्या आहेत. शिकून सवरून त्या तुमचे पांग पेडतील.’’ सुवर्णाताई मनापासूनं बोलत होत्या. समोर बसलेल्या महिलांना त्यातलं काही कळलं असेल का? पण त्यांना कळलं होते. रिबीन बांधून केस बांधलेल्या आपल्या मुलींना त्यांच्या आईने जवळ घेतले होते. आपली मुलगी कशी हुशार आहे, हे सांगताना त्यांची रसवंती बहरली होती. मोठे आशादायक चित्र होते.

 
’सिकलगार’ वस्तीत, पुरुष मंडळी भंगार  बाजारातून लोखंड, इतर धातू विकत घेतात आणि पारंपरिक कौशल्याचा वापर करत त्यातून विविध वस्तू बनवितात. चाकू, सुर्‍या, किसणी, झारे, चमचे, पसरट ताटली कितीतरी वस्तू. या वस्तू गावच्या आठवडी बाजारात विकायला ठेवल्या जातात. अर्थात या वस्तूंना मागणी असते. या वस्तीत फिरताना पुरुषांच्या बरोबरीने  महिलाही हा उद्योेग करताना दिसल्या. सध्या ’स्किल इंडिया’चा जोर आहे. या वस्तीत   कोणतेही तंत्रज्ञानाचे शिक्षण न घेताही स्किल जोरात होते. परंपरागत होते. जर यांना यांच्या कौशल्याचे आधुनिक तंत्रज्ञान शिकवले गेले तर? अप्पा म्हणाले, यांच्याकडे कौशल्य आहे. यांना जर सरकारी प्रमाणपत्र मिळाले तर यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकते किंवा उद्योगधंद्यासाठीच्या भांडवलासाठी हे सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात. यावर ’सिकलगार’ समाजाचे तरूण  म्हणाले, ’’असं जर झालं तर सोन्याहून पिवळं. कारण हा आमचा बापजाद्यांचा धंदा हाय. ज्यांनी हा धंदा सोडला त्यांची पोटभराची मारामार झाली. आम्ही तो टिकवला, त्यामुळे दोनवेळची रोटी तरी मिळते. जर धंदा वाढला तर आमची कला आमच्याबरूबर संपणार नाय. यातून पैसे मिळतात म्हटल्यावर पुढच्या पिढीतल्या ज्याला हौस आहे या कामाची तो पण हौसेने शिकेल. आमची कला तर वाचेल.’’ 

आपल्या व्यवसायाला कला आणि धर्म मानणार्‍या या ’सिकलगार’ समाजाच्या वस्तीतल्या त्यांच्या घरी गेले. चुलीसमोर भाकर्‍या भाजत एक आजीबाई बसली होती. तिचे केस फेसाळत्या लाटेसारखे पांढरेधोक. चेहर्‍यावर सुरकत्याच सुरकुत्या. तिथे उभा असेलला प्रौढ मनुष्य म्हणाला, ’’ही आमची आजी १०४ वर्षांची आहे. अजून पण नजर, वाणी आणि दिमाग तेज आहे. तुम्हीच बघा भाकरीची चवड तिनं बनवली आहे.’’ या आज्जीची कमालच होती. कारण गेले दहा वर्षे आजी काहीही खात नाही. दिवसातून दोनदा कपभर कॉफी पिते आणि तेव्हाच ग्लास दोन ग्लास पाणी पिते, पण तरीही ती ठणठणीत होती. चालत फिरत होती, इतकेच नव्हे तर स्वयंपाकासारखे मेहनतीचे कामही करीत होती.

 
या पालावर भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानची पालावरची शाळा सुरू होती. वस्तीतल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून हा प्रयत्न होता. सिकलगार समाजाचाच तरुण ’पालावरच्या शाळे’चा गुरूजी होता. इथे शाळा कशी सुरू झाली सांगताना भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यकत शालीवाहन म्हणाले, ’’सोलापूरच्या गावाकुसात फिरताना या माळरानात मला ही वस्ती दिसली. वस्तीच्या पुरुष मंडळींशी एक दोन वर्ष  नित्यनियमाने मैत्री वाढवली. वस्तीतल्या मुलांनी शिकले पाहिजे हे त्यांच्या मनावर ठसवले. पहिल्यांदा त्यांचा शून्य प्रतिसाद होता. एक-दोन वर्षात त्यांनी मला चुकूनही चहा काय पाणीही विचारले नाही. पण त्यांच्यात आणि माझ्यात इतके नाते जरूर जुळले की ते आपल्या समस्या मला सांगू लागले. यावर माझे उत्तर असे, तुमचे असे तर तुमच्या मुलांचेही जीवन असेच असणार काय? एक दिवस या समाजाच्या प्रमुखान आम्हाला संमती दिली की आमच्या गुरुद्वारात तुमची पालावरची शाळा चालवा. त्यानुसार इथे शाळा सुरू झाली, वस्तीतील सर्वच भटक्या विमुक्तांची मुलं या शाळेत येतात. त्यांच्यामुळे पालकही येतात. पालकांच्या विचारात सकारात्मक बदल होत आहे. खरी प्रगती, खरा विकास करण्याचा आपलाही हक्क आहे, असे त्यांनाही वाटू लागले आहे.’’ वाटले, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठाणचे निःस्वार्थी कार्यकर्ते निष्ठेने, ध्येयाने काम करतात, त्यांच्या कामाला फळ कसे येणार नाही? उशीर लागेल पण समाजात नक्कीच बदल होईल. 

  पुढे मदारी समाजाच्या वस्तीत गेले.  सापांचा खेळ करणे, जादू करून दाखवणे हा मदारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय. पण सापाला पाळणे हा गुन्हा ठरवल्यापासून या समाजाचा पारंपरिक व्यवसाय संपल्यातच जमा. आता या समाजाची सोलापुरातली लोक रंगीबेरंगी माळा, तोरण बनवतात. ट्रक, रिक्षा वगैरे वाहनांना जी रंगीत  झिरमळ लावलेली असते ती झिरमळ बनवतात. तिथे गेल्यावर एका टिपिकल चाचाजानसारख्या दिसणार्‍या व्यक्तीने नमस्कार केला. जादू दाखवतो, असं सांगून खरंच डोळ्यांवर आणि मनविचारांवरही विश्‍वास बसणार नाही अशा जादू दाखवल्या. भान हरपून आम्ही टाळ्या वाजवल्या तर त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. ’’जादूचे खेळ, सापाच्या कसरती करण्यात आमची जिंदगी गेली पण आता कायद्याने साप पाळू शकत नाही,’’ असे म्हणून चाचा दुःखी  झाले. ’’साप  जिवंत प्राणी आहे, त्याला पकडणे, कोंडून ठेवणे, त्याला खेळवणे हे कायद्याने आणि माणुसकीच्यानजरेतूनही पाप आहे,’’ असे  म्हटल्यावर चाचा म्हणाले, ’’आम्ही सापावर मुलासारखं प्रेम करतो. त्याला कापत नाय. कोंबड्या, बकर्‍याला लोक पाळतात, मन मानेल तसं कापून खातात मग त्यांना का कायद्यात घेत नाही. साप बी प्राणी आणि कोंबडं-बकरं काय प्राणी नायत.’’ पालावर राहणार्‍या चाचाचा हा सवाल मात्र नंबर वन होता. गावात, परिसरात कुठेही साप घुसला, दिसला की लोक चाचाला आजही सापाला पकडायला बोलवतात. चाचा म्हणतात, ’’मी सापाला पकडतो, त्याचे विष काढतो आणि मग सापाला सोडून देतो. काय काय लोक सापाचे विष मागायला येतात. त्यांना त्या विषाचा गैरवापर करायचा असतो. पण मी सापाचे विष विकत नाही. काढलेले विष मी जाळून टाकतो. तोच धर्म हाय.’’

 भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या सुवर्णा रावळ आणि अप्पा कारखानीस भेटायला आले म्हटल्यावर चाचा म्हणाले, ’’तुमच्याकडे मागण आहे. ते मागणं पुरं करा.’’ अर्थात मागणं म्हटलं की, ठराविक असतं घर, नोकरी किंवा तत्सम तसलेच काही. त्यामुळे मी बाजूला होऊन पालाचं निरीक्षण करू लागले. पण चाचाच मागणं ऐकून पुन्हा पाठी फिरले. चाचा म्हणत होते, ’’अल्ला कसम मला तेवढं आईचं माझ्या कोल्हापूरच्या अंबाबायचं मंदिर बांधून द्या. मला दुसरं काय बी नगं. इक्ती वरीस कसं सांबाळलं तिला ते माझं मला ठावं. तिला तिथं माळ्यावर ठिवली. मासमच्छर नाय चालत ना तिला. मी डोळं पांढरं करीपर्यंत माझ्या आईचं देऊळ झालं पायजे. मोठ्ठं देऊळ नाय तिची तसबीर, तिची मुरत ठेवण्याइतकं बी मंदिर बनवलं तरी चालंल. पण मंदिर बनवून द्या. मायमाऊली तुमच्याकडं हेच मागण हाय..’’मुस्लीम मदारी समाजाच्या चाचांचे गार्‍हाणे, ‘‘अल्ला कसम मला कायच नाय पायजे, माज्या देवीला मंदिर द्या बांधून..’’ सोलापूरच्या ’मुस्लीम मदारी’ समाजाच्या वस्तीत मी हे सगळं अनुभवत होते. देवाने विश्‍व बनवले. मात्र त्या देवाच्या नावावरच विषारी फाळणी करून ’जिहाद’चा भस्मासूर गेल्या काही दशकात फोफावला. आमची ज्याच्यावर श्रद्ा आहे तोच काय खरा देव बाकी सगळे थोतांड. आम्ही जो धर्म मानतो तोच काय खरा धर्म बाकी इतर धर्माला मानणारे संपण्याच्याच लायकीचे.  हा विचार चांगलाच जोर धरताना  पाहिला आहे.  या पार्श्‍वभूमीवर सोलापूरच्या चाचाची देवीचे मंदिर बांधण्याची इच्छा मला अजब वाटली. काय कारण असावे? तर चाचांनी सांगितले, ’’ते आता मुस्लीम मदारी असले तरी तीन पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज हिंदू होते. काही कारणाने त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. रहनसहन नमाज सगळं स्वीकारलं. पण न जाणो किती पिढ्या पूजलेली घरातली अंबाबाई तिच्यावरची त्यांची श्रद्धा मात्र ढळली नाही. मृत्यू डोळ्यासमोर असताना, एखाद्याने खजिना सोपवावा, तशी ही घरची कुलदैवता अंबाबाई चाचांच्या पणजोबाने, आजोबांना, आजोबांनी चाचांच्या वडिलांना आणि वडिलांनी चाचांना सोपवली.’’  या अंबामातेबद्दल चाचांची श्रद्धा तीव्र होती. धर्म म्हणजे काय? वेगवेगळ्या धर्मामधली समानता काय? यावर कित्येकवेळा घड्याळ विसरून कंठशोष होईपर्यंत चर्चा केल्या आणि ऐकल्याही. पण चाचांच्या गरीब, एकाकी जीवनात देवीला राहायचे हक्काचे ठिकाण असायला हवे. त्यासाठीची जिद्द पाहिली आणि वाटले आपण जो समजतो त्यापलीकडे मानवी मनाचा धर्म आहे.
 तिथून पुढे ’लमाणी’ वस्तीत गेलो. ’पालावरची शाळा’ चालवता चालवता भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानने इथे जगण्याची शाळा सुरू केलेली. वस्तीच्या बाहेर झाडाच्या सावलीत महिला बसलेल्या. त्या काहीतरी वस्तू बनवत होत्या. हं, त्या कागदी पिशव्या बनवत होत्या. ते पाहताना सुवर्णाताईंच्या चेहर्‍यावर आनंद मावत नव्हता. न राहवून मी विचारले, ’’तुम्हाला इतका का बरं आनंद झाला?’’ त्या म्हणाल्या, ’’आपली पालावरची शाळा या वस्तीच्या चर्चमध्ये भरते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानची शाळा या वस्तीत भरवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले, इथल्या लोकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी किती प्रयास पडले याची एक मोठी स्टोरीच होईल. आज शाळा तर भरतेच पण शाळेत येणार्‍या बालकांच्या माता पण आपल्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य शिकतात याचा आनंद आहे.’’ असं म्हणून सुवर्णाताई त्या महिलांनी बनविलेल्या कागदी पिशव्या बघण्यात गुंग झाल्या. हाताच्या पंजाच्या आकारापासून मोठ्या शॉपिंग बॅग्सच्या आकाराच्या त्या पिशव्या. त्या पिशव्या बनवून दाखवण्यासाठी महिलांची नुसती चढाओढ लागली होती. पिशव्या कशा विकणार, कुठे विकणार यावर सुवर्णा रावळांनी काही टिप्स दिल्या. उत्साहाच्या भरात पिशव्या बनवता पण त्या सुबक आणि लोकांच्या नजरेत कशा भरतील याचे त्यांनी मार्गदर्शन केले. या महिलांना ५०० कागदी पिशव्यांची ऑर्डरही दिली. मुंबईतल्या त्यांच्या डॉक्टर मैत्रिणीकडून त्यांनी या महिला बनवत असलेल्या कागदी पिशव्यांची ऑर्डर घेतली होती. पाचशे पिशव्या ती ही मुंबईहून ऑर्डर.. महिलांच्या आनंदाला आणि उत्साहाला पारावार नव्हता.

 मला मात्र वाटत राहिले की, कुठे मुंबई, कुठे सोलापूर, कुठे महाविद्यालयात प्रिन्सिपल असलेल्या सुवर्णाताई आणि कुठे ही कागदी पिशव्यांची ऑर्डर मिळवण्याची धडपड? हे जे सगळं समाजासाठी काहीतरी करण्याचं आतून आतून येतं ना ते पाहिलं की मन पावसानं गच्च भरलेल्या आभाळासारखं भरून येतं. ही तळमळ मनात घर करून जाते. विचार करत असतानाच लक्षात आले की, महिला आपसात काहीतरी बोलत आहेत. काय झालं? विचारल्यावर त्या म्हणाल्या, ’’आज ’धर्मजागरण’चा मातृशक्ती मेळावा आहे. थिथं आमच्या मुली आमच्या लमाणी समाजाचे पारंपरिक नृत्य करणार आहेत. त्यांना नटवलं आहे, त्यांना बोलवू का?’’  रूढ अर्थाने इसाई धर्म स्वीकारणार्‍या वस्तीत आज पुन्हा पूर्वीची पारंपरिक वस्त्रे घालून तरुण मुली सजल्या होत्या. लमाणी  पद्धतीचा बिलोरी काचा लावलेला तो डे्रस, त्यावर पारंपरिक पद्धतीचे मोठे झुमके, हातभर बांगड्या, दंडात वाक्या, पायात नाद करणारे घुंगरूवाले पैंजण. मुली खूप सुरेख दिसत होत्या. ’’इतके वजनदार सुरेख डिझायनर कपडे कुठे बनतात?’’ विचारल्यावर महिला म्हणाल्या,’’हे साधं परकर पोलकं असतं. त्यावर रंगीबेरंगी आरसं, टिकल्या आम्हीच लावतो. हे कानातले, बांगड्यावरची नक्षी, दंडातल्या बाजूबंदाची नक्षी आम्हीच करतो. हा डे्रस घातला की केसपण तसेच इचरायचे असतात. त्यासाठी खूप मेहनत करावी लागती. हे आमच्या समाजाच्या बायाबगैर कोणी बी करू शकत नाय.’’ पारंपरिक लमाणी पोषाखातल्या त्या सजलेल्या मुलींना पाहून वाटत होते की, त्या आताच कुठल्या तरी आधुनिक महागड्या ब्युटीपार्लरमधून जाऊन आल्या आहेत की काय?  पण तसे नव्हते. वस्ती, तांडा सोडून कधीही बाहेर न पडणार्‍या त्यांच्या आयांनी त्यांना पारंपरिक पद्धतीने सजवले होते. ही सुद्धा एक कलाच म्हणायची. सौंदर्यशास्त्राचं उपजत ज्ञान या समाजातल्या महिलांकडे होतं. इतक्यात तिथल्या एका महिलेने लक्ष वेधत म्हटले, ‘‘कुंकू का टिकली लाव. आपल्याकडं आपली कापडं घातली तर ते लावलच पाहिजे ना?’’ यावर मग  टिकली शोधून मुलींच्या कपाळाला लावली गेली. ’’माय गं मुली तर लई चांगल्या दिसतात टिकली लावल्यावर..’’ असा संवाद सुरू झाला. ’टिकली लावणे न लावणे’ आपलेे या विषयाकडे आता तसे लक्ष जातच नाही पण एकदोन पिढीमागे ख्रिश्‍चन झालेल्या या वस्तीत टिकली लावणे न लावणे महत्त्वाचे होते. 

 असो, समोर बसलेल्या महिलांकडे पाहत असतानाच जाणवले की, सगळ्यांचे राहणीमान, परिधान सारखे होते. फक्त एका तरुण मुलीच्या गळ्यात पांढरा धागा होता. काळा, लाल धागा फारच झाले तर इसाई धर्माची ती क्रॉस असलेली माळ इथे अपेक्षित होती. पण हा पांढरा धागा का? त्या मुलीला हलकेच विचारले, ’’हा कसला धागा आहे? कोणत्या देवाचा?’’ ती म्हणाली, ’’वावरात, वस्तीच्या बाहेर भुतंखेतं लई हायेत. मला किती वेळा त्यांनी घेरलं हुत. तरुण कुमारीकांना ते त्रास देतात. पुन्हा मला घेरू नये म्हणून हा मंतरलेला धागा घातलाय..’’  हं..! वाटले सुधारणा, बदल करण्यासाठी कोणताही धर्म स्वीकारला तरी जोपर्यंत अंधश्रद्धेपासून सुटका नाही तोपर्यंत बदल संभवेल कसा? दक्षिणेतले गुरूतुल्य समाजसेवक नारायण गुरू यांचे वचन आठवले, ’’हिंदू धर्मातून तुम्ही दुसर्‍या धर्मात गेलात, पण पूर्वीप्रमाणे इथेही तुमचा जन्म लाकडं फोडण्यात, विषमता, अंधश्रद्धा जगण्यात जात असेल तर त्या धर्मांतराचा अर्थ आहे का? त्यापेक्षा आहे त्या जन्मजात धर्मात राहून प्रगतीची कास धरलेली बरी..’’ विषयांतर होत आहे पण मला तसे वाटले..
 
बराच वेळ झाला होता सुवर्णाताईं, अप्पा कारखानीस यांना दुसर्‍या कार्यक्रमाला जायचे होते. त्यामुळे या पालातून बाहेर पडलो. सोलापूर शहराच्या दिशेने जाऊ लागलो आणि वाटले पालावरचे जिणे, त्याचे प्रश्‍न किती गुंतागुंतीचे आहेत. त्याचा उलगडा भटके विमुक्त विकास प्रतिष्ठाण यथाशक्ती करत आहेच. सोलापूरच्या पालांमध्ये हिंडताना आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने म्हणू शकते की, आपणही पालावरचे जगणे, हे जगणे होईल यासाठी प्रयत्न करायला हवेतच. मागचा पिळ सुटत नाही आणि पुढचा मार्ग सुचत नाही, या चक्रात भिरभिरणार्‍या  या आपल्याच समाजबांधवाना मुख्य जिवनप्रवाहात  आणायला हवेे.  कारण गरज आहे आज ’न हिंदू पतितो भव’ या विचारांच्या यशस्वी कार्यवाहीची.  
 
 - योगिता साळवी