यांचा वाली कोण?- आचार्य नगर, चेंबूर
 महा MTB  14-Jan-2017
 
 
 
१९६४ साल होतं. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीला लागूनही एक वस्ती वसण्याच्या बेतात होती. त्यावेळी एक रीतच होती की, गावाकडून मुंबईत वसण्यासाठी कोणी व्यक्ती एकटी येत नव्हती, तर सोबत आपल्या जातीच्या लोकांना घेऊनच यायची. कारण सरळ आहे, मुंबई ओळखीची नाही. परक्या नगरीत आपण सुरक्षितपणे जगावे, एकमेकाला धरून जगावे. त्यामुळे मुंबईमध्ये १९७५ पूर्वीच्या ज्या ज्या म्हणून वस्त्या वसल्या त्यांना विशिष्ट समाजाचा, जातीचा, गावांचा, प्रातांचा, भाषेचा एक ठसा आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून चेंबूरच्या आचार्य नगर कडे पाहता येईल. हायवेला लागून असेलेले ’आचार्यनगर’. या वस्तीशी ’आचार्य’ नाव कसे जोडले गेले याचाही एक नवइतिहास आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे, मुंबईत विशिष्ट समाजाच्या व्यक्ती एकत्र येऊन मुंबईतील मोकळ्या जागा सामुदायिकरित्या अडवत. तिथे आपल्या वस्त्या उभारीत. सिद्धार्थ कॉलनीच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत कोकण, नाशिक वगैरे भागातले मराठा लोक येऊन वसू लागले. तो काळच तसा होता. जमिनीवर कब्जा करणार्‍या दादा-भाईलोकांचा. त्यामुळे नोकरी-धंदा करणार्‍या लोकांनी अशा दादा लोकांचे पाय धरून राहावे. तरीही दादाला त्यांना तिथून हाकलावेसे वाटले तर तो बिनदिक्कत रातोरात लोकांना घराबाहेर काय वस्तीबाहेर काढे. सिद्धार्थ कॉलनीच्या पाठी नव्याने वसलेल्या या वस्तीवर अशा दादा-भाईंची नजर पडणार नाही, असे होणार का? शक्यच नाही. त्यामुळे या जागेवर वस्ती करून राहणार्‍या या तरुणांना अनेक दादा-भाईंशी संघर्ष करावा लागला. दिवस उगवायचा तोच कुणा ना कुणा दादाच्या आव्हानाने. आचार्य नगरमधल्या समस्यांविषयी दिनेश पराड, अनिल पाटिल, दिपक पाडळ,यांनी सांगितले होतेच. तीथे गेल्यावर कळले की, या वस्तीमध्ये सर्वात प्रथमवस्ती करणारा मराठा समाजाचा तरुण, रामचंद्र चव्हाण हा जात्याच आक्रमक. वस्तीत हातावर पोट घेऊन जगणार्‍या आणि दररोजच्या संघर्षाने पिळून निघणार्‍या समाजाची वणवण त्याला सहन होत नव्हती. मुंबईत राजकीय समिकरणे बदलत होती. अशावेळी मुंबईत आपल्यापाठी कोणीतरी भक्कमउभे असायला हवे, असा विचार रामचंद्र आणि वस्तीतले लोक करू लागले. त्याचवेळी कोकणी मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून एक राजकीय पक्ष प्रसिद्ध होत होता. शरद आचार्य त्यावेळी त्या पक्षामध्ये कार्यरत होते. शरद आचार्यांचा रामचंद्र चव्हाणशी संपर्क झाला. रामचंद्र यांनी आपल्या वस्तीला होणार्‍या त्रासाबद्दल शरद आचार्यांना सांगितले. तोपर्यंत वस्तीला नाव नव्हते. शरद आचार्यांनी या वस्तीला आपल्या वडिलांचे नाव दिले ’नारायण ग. आचार्य नगर.’ त्यावेळी चलती असलेल्या त्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या वडिलांचे नाव दिले तर वस्ती उठवू पाहाणारे अथवा वस्तीला त्रास देणारे तसे करण्यापूर्वी दहादा विचार करतील, असा त्यामागचा हिशोब. (हे म्हणणे तसे तर्कदृष्ट्या खरेही आहे, कारण मुंबईतल्या काही वस्त्या आंबेडकरनगर, महात्मा गांधीनगर, जवाहरलालनगर, इंदिरानगर, राजीवनगर, संजयनगर, राहुलनगर या नावाने आणि बाकीच्या देवादिकांच्या नावाने वसवलेल्या आहेत.) पुढे शरद आचार्य राजकारणात स्थिरावले, नावारूपाला आले. साहजिकच ’नारायण ग. आचार्य नगरा’ला अभयदान मिळाले.
 
तर असे हे ’आचार्य नगर’, या आचार्य नगरामध्ये गेले. सुरुवातीलाच बसकी, तुटकी, त्वचेच्या आतून हाडं दिसावीत किंवा खपाटीला गेलेल्या पोटातून आतड्याच्या जाळ्या दिसाव्यात तशा सिमेंटचे पोपडे उडालेल्या मातकट कळकट रंगामागे भसकन डोळ्यात भरणार्‍या भिंती दिसतात. त्यांना ओलांडून गेले की जरा बर्‍या चाळी दिसतात. वातावरण टिपिकल निम्नवर्गीय मराठी. घरांच्या दारांवर शुभ-लाभ, देवदेवतांचे फोटो लागलेले. हे तर अपेक्षित होतेच. पण या वस्तीमध्ये एक वेगळेपण दिसले. या देवादिकांच्या फोटोसोबतच तथागत गौतमबुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र असलेले छोटे छोटे स्टिकरही लावलेले दिसले. ’मराठा मोर्चा,’ ’संविधान मोर्चा’ आणि कसले कसले मोर्चे यामुळे सध्या थंडी असली तरी राजकीय-सामाजिक वातावरण तसे तापलेलेच आहे, म्हणजे वरवर आलबेल दिसत असले तरी आतून ती धग चांगलीच जोर पकडत आहे. या पार्श्वभूमीवर या ’मराठा समाजा’च्या वस्तीमध्ये ही स्टिकर्स पाहून मला तरी थोडे आश्चर्य वाटले. ’’हे काय?’’ असे विचारल्यावर लोक म्हणाले, ’’मग काय झालं? देव तर आमचे आहेतच. पण आम्ही कुठे बाबासाहेबांना नाकारतो?बाजूच्या सिद्धार्थ कॉलनीतले लोक आमचे यारदोस्त आहेत. ही गोष्ट वेगळी की काही वर्षांपूर्वी नामांतराच्या वेळी किंवा ’सवर्ण’ विरुद्ध ’दलित’ दंगली झाल्या त्यावेळी आमचं काही देणंघेणं नसताना आमच्या वस्तीवर दगडी पडत होत्या, पण त्यानंतर वातावरण बदलत गेलं. नव्या पिढीची दोन्ही समाजाची मुलं मोकळ्या विचारांची आहेत. त्यामुळे परिस्थिती बदलली. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आमच्या आचार्य नगरामधल्या घराघरातून वर्गणी दिली जाते. वर्गणी घेतल्यावर त्या मंडळाची मुलं हक्काने घरावर बाबासाहेबांचे आणि गौतमबुद्धांचे स्टिकर पण चिटकवतात. त्यामुळे होते काय की, पुन्हा कोणी दुसरे येऊन वर्गणीचे पैसे मागत नाही. आचार्य नगरातल्या लोकांना त्रास नको म्हणून ते तसं करतात. स्टिकर लावल्यामुळे आमच्याकडे प्रूफ असतो की आम्ही वर्गणी दिली.’’
 
आमचा वाली कोण प्रश्न विचारताना आचार्य नगरमधले नागरिक
 
या ’मराठा समाजा’च्या वस्तीतल्या तरुणांचे ’मराठा मोर्चा’बाबत मत काय असेल? मुद्दाम विचारले तर उत्तर आले, ’’या वस्तीत ४०-५० वर्षे राहून आम्ही हेच शिकलो की, सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलो तरच जगू शकू. आपले वेगळेपण आपल्या घरात, दाराबाहेर आणून आपली कोणी किंमत करत नाही. असेन मी मराठा म्हणून बाजूचा दुसरा समाजाचा माणूस असेल तर त्याला काय पडलंय? त्याला काय करायचंय? तसंही मोर्चाबिर्चाला जायला वेळ कुणाला आहे? टीव्हीवर पाहिलं होतं का आमच्या समाजाच्या लोकांनी मागण्या केल्या की, आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून. ते मात्र खरं आहे. आम्ही पण गरीब आहोत. आम्हाला पण समस्या आहेत. मग आम्हाला सवलती का नकोत? आम्ही काय पाप केलं? बाकी त्या मोर्चात ते ऍट्रोसिटी, संविधान वगैरे जे मुद्दे आहेत त्याचा आमच्याशी आतापर्यंत संबंध आला नाही. आता ज्याचा संबंधच नाही त्या मुद्द्यावर आम्ही काय बोलणार?’’
 
लोकं रोखठोक उत्तर देत होती. आरक्षण का असावे याचे समर्थन करताना रघुनाथ धुमाळ म्हणाले, ’’मला पोलीसमध्ये भरती व्हायचे होते. त्यासाठी मी खूप सराव करत असे. पोलिसांची भरती निघाली तेव्हा मला नुकतेच २४ लागले होते. प्रत्यक्ष सराव परीक्षा ज्या दिवशी होती त्या दिवशी मी खुशीत होतो कारण मला पूर्ण खात्री होती की मी सिलेक्ट होणारच. सिलेक्ट झाल्यावर दोन दिवसांनीच माझा वाढदिवस होता. सिलेक्शनच्या खुशीत मी जोरदार बर्थडे सेलिब्रेट करणार होतो, पण नशिबाने दगा दिला, त्या दिवसाची परीक्षा सरकारने काही कारणास्तव रद्द केली. ती परीक्षा तीन दिवसांनी पुढे ढकलली गेली. दोन दिवसांनी मला २५ वर्ष पूर्ण होणार होते म्हणजे सराव परीक्षा ज्या दिवशी होती त्या दिवशी माझे वय २५ वर्षे १ दिवस असणार होते. वयोमर्यादेच्या बाहेर गेलो म्हणून मी सराव परीक्षा देण्यास अपात्र ठरलो. मी संबंधित सर्वांना विनवले, चर्चा केली, वाद घातला की परीक्षा पुढे ढकलली. यात माझा काय दोष? पण मला उत्तर एकच मिळत होते. ओपन कॅटेगिरीची वयोमर्यादा तुम्ही ओलांडली आहे. आम्ही काही करू शकत नाही. त्या दिवशी पहिल्यांदा मला माझ्या ओपन कॅटेगिरी असण्याचा भार वाटला होता. कारण त्यानंतर ओपन कॅटेगिरीला टाकलेल्या वयोमर्यादेत बसत नाही म्हणून मी पुढे कधीही पोलीस भरतीसाठी प्रयत्न करू शकत नव्हतो. जर मला आरक्षण असते तर? म्हणून मराठा मोर्चाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचं मी समर्थन करतो.’’ हे सांगताना आताही रघुनाथांंच्या चेहर्‍यावर निराशेचे जाळे पसरले होते. विषयांतरासाठी विचारले, ’’छत्रपती शिवाजी महाराजांचे किंवा धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव लावणार्‍या काही संघटना आहेत त्यांचे कुणी इथे सदस्य आहेत का?’’ असे विचारल्यावर लोकांच्या चेहर्‍यावर आश्चर्य उमटले. त्या एकदोन संस्थांची नावं घेतल्यावर लोक म्हणाले, ’’नाही नाही, अशा कोणत्या संस्था आमच्यापर्यंत आल्याच नाहीत.आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो. त्यांनी अठरापगड जातींच्या कल्याणाचे कामकेले. हा ब्राह्मण, तो मराठा, तो अमुक तो तमुक असा भेद त्यांनी केला नाही. त्यामुळे जातीजातीत भेद करणार्‍या लोकांशी आम्हाला काहीही करायचे नाही.’’ या लोकांना विचारले,’’ यापैकी काही संघटना तर यावेळी निवडणूक लढवणार आहेत?’’ यावर तर लोकांनी अफलातून उत्तरे दिली. वाटले, खरंच जातीपातीच्या बाहेर पडून ’मेरा देश बदल रहा हे’. लोक म्हणाले, ’’खरं म्हणजे शहरात राहताना आम्ही मराठा, आम्ही मराठा असं बोलून चालत नाही. अंगात धमक असेल तरंच तो इथे टिकू शकतो. जातीच्या राजकारणाने आमच्या आचार्य नगरात चूल पेटणार आहे का? नाहीच पेटणार. तसेही आमच्या वस्तीला मराठा म्हणून जातीच्या राजकारणातले किडे बनायचे नाही आपसात भांडून मरायचे का?’’ निवडणूक जवळ येत आहे. त्या अनुषंगाने ’मराठा समाजा’चे आपणच ठेकेदार असा आव आणणार्‍या काही संघटना आणि त्यांचे अजेंडे यांनी प्रसारमाध्यमांना चांगलेच खाद्य पुरवले आहे. पण या प्रसिद्धीझोतामागे वस्तीपातळीवर या संघटनांचे अस्तित्व काय आहे याची झलकच या आचार्य नगरात पाहायला मिळाली.
 
 
असो, दुपारचे रणरणते ऊन, त्या उन्हातही खूप महिला आणि पुरुष एकत्र झाले होते. ’आमची खबर छापूक हवी,’ ही रूखरूख तर सगळ्यांनीच व्यक्त केली. रघुनाथ धुमाळ, स्थानिक युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनिल चव्हाण, किशोर चव्हाण, नवनाथ धुमाळ यांच्याशी बोलले. तर असे कळले की, १९९० साली मुंबईभरच्या झोपडपट्‌ट्यांचा विकास व्हावा म्हणून सरकारतर्फे काही प्रयत्न केले गेले. त्यावेळी असे जाहीर करण्यात आले होते की, लोक सामुदायिकरित्या अर्ज करून कलेक्टरची जमीन विकत घेऊ शकतात. त्यानंतर लोक विकासक नेमून एसआरए अंतर्गत त्या जमिनीवर इमारती उभारू शकतात. आचार्य नगरच्या २२९ रहिवाशांनी सामुदायिकरित्या वर्ल्ड बँकेकडे अर्ज करून, त्याचा पाठपुरावा करून आचार्यनगरच्या समोरची जागा कलेक्टरकडून विकत घेतली. प्रत्येकाने त्यावेळी ३५०० रुपयेही भरले. लोकांची ऐपत नव्हती. गळ्यातल्या काळ्या मण्यांच्या आड दिसेल न् दिसेल असं असणारं डोरलं विकून, घरातली जुनी तांब्या पितळेची भांडी विकून लोकांनी पैसे भरले. मुंबईत जागा विकत घेतली.आपलं हक्काचं घर बिल्डिंगमध्ये होणार याचा किती आनंद झालेला. लोकांनी एसआरएसाठी सोसायटी बनवली. सोसायटी उभारण्यासाठी सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी युवा मित्र मंडळाने दिवसरात्र एक केला. सोसायटीने विकासक निवडला ’घरौंदा बिल्डर’. ’घरौंदा बिल्डर’ने कामाला सुरुवात केली. कलेक्टरची जमीन विकत घेण्यासाठी पैसे भरणार्‍या सगळ्यांना सरकारी पावती देण्यापासून ते एसआरएमध्ये आवश्यक असलेल्या ऍग्रिमेंटची सर्व कागदपत्रे सर्व रहिवाशांना मिळाली. त्यानंतर ’घरौंदा बिल्डर’ने काही चाळी पाडल्या आणि तिथल्या लोकांना बाजूलाच ट्रान्झिस्ट कॅम्प बांधून दिले. (ओ हो म्हणजे ज्या मी तुटलेल्या फुटलेल्या बसक्या चाळी पाहिल्या होत्या त्या या ट्रान्झिस्ट कॅम्पच्या चाळी होत्या तर.) त्यानंतर काही वर्षांनी ’घरौंदा बिल्डर’ने हात वर करत विकासक म्हणून ’मिडास बिल्डर’ला नेमले. त्यावेळी लोकांना वाटले, चला आपले कामहोते आहे ना? मग आपल्याला काय करायचे आहे. या बिल्डरने दोन सात माळ्याच्या इमारती तयार केल्या. त्यामध्ये लॉटरी सिस्टिमकाढून ट्रान्झिस्ट कॅम्पमधल्या दहा जणांना इमारतीमध्ये घर दिले. लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. मग अचानक काय झाले तर ’मिडास बिल्डर’ हटला. त्याच्या जागी ’रूपारेल बिल्डर’ विकासक म्हणून आला. त्यावेळी सोसायटीचे इलेक्शन होते. लोकांना वाटले, विकासक बदलला तर आपल्याला काय? घर मिळण्याशी मतलब. पण या इलेक्शनमध्ये ४२ घरांना सांगितले गेले की, तुम्ही सोसायटीचे मेंबर नाही आहात त्यामुळे एसआरए स्कीममध्ये नाही आहात. तुम्ही मतदान करू शकत नाही. अरे हे काय नवीन? असं कसं होऊ शकतं? एसआरए स्कीममध्ये नाव गेल्याचे आणि बिल्डरशी ऍग्रिमेंट करण्याचे कागदपत्र तर या ४२ लोकांकडे होते मग हा विकासक असं काय बोलतोय? यावर या लोकांना सांगितले गेले की तुम्ही जिथे सध्या राहता ती जागा बागेसाठी रिझर्व्ह आहे. त्यामुळे तुम्ही सोसायटीच्या एसआरए स्कीममध्ये नाही. भरीस भर ज्या दहा जणांना आधीच्या बिल्डरने इमारतीत घरे दिली होती. त्यांना सांगितले गेले की, नवा बिल्डर नव्या नियमानुसार २२५ फूट एवजी २६९ फुटाची जागा देणार आहे. या इमारती तोडाव्या लागतील. तुम्ही निघा इथून. या लोकांना घर खाली करायला लावले. त्यांना पुन्हा ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये टाकले. नंतर यांनाही सांगितले गेले की, तुम्हीही एसआरएच्या यादीत समाविष्ट नाही. सगळं ऐकलं ते सगळंच गुंतागुंतीचं होतं. सुनिल चव्हाण म्हणाले, ’’तुम्हीच सांगा असे कसे होऊ शकते? पहिल्या बिल्डरच्या एसआरएमध्ये आमचे नाव आहे. आणि या तिसर्‍या बिल्डरच्या यादीत नाव नाही? आम्ही माहिती काढली तर कळाले की, एसआरएकडे नवीन प्लॅनसाठी या नव्या विकासकाने जी यादी पाठवली होती, त्यात आमच्या ४२ जणांची नावे कट होती. त्या जागी दुसर्‍या वस्तीतल्या ४२ जणांची नावे टाकली गेली होती. आम्ही सोसायटीच्या मेंबरला भेटलो. ते म्हणाले, आम्ही काय करणार? बिल्डरला विचारा. कोणाशी बोलावे? काय करावं काही कळत नाही. आमचा राहता प्लॉट राखीव झाला असला तरी आम्ही १९९० साली घरांसाठी कलेक्टर जमीन विकत तर घेतली होती ना? त्याचं काय?’’
 
यावर लोकं म्हणाली, ’’सोसायटीवाल्यांना काय पडलंय? आम्हाला इथं दररोजची भाकरी मिळवायची मारामार, पण आमच्या सोसायटीवाल्यांची आर्थिक परिस्थिती आता अचानक चांगली झाली आहे. सगळे जण चांगल्या एरियात फ्लॅट घेऊन राहतात. त्यांच्या घरात हे मोठाले टीव्ही आहेत. कुठून आलं हे? सगळ्यांना माहिती आहे. दूरचं कशाला, या आचार्यनगरमध्ये जे बिल्डरचे गुप्तहेर म्हणून कामकरतात, त्यांची डबल माळ्याची घर झाली. आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचे नाही पण आपल्याच जातभाईंवर अन्याय होत असताना हे लोक असं कसं वागू शकतात? ’’
 
यावर रघुनाथ म्हणाले, ’’आमच्या वस्तीत जाण्यायेण्यासाठी पूर्वी एक रस्ता होता. पण ज्यावेळी एरिया वाढविण्यासाठी बिल्डरने बिल्डिंग तोडल्या, त्यावेळी दगड-विटा वस्तीतल्या घरावर पडल्या. बिल्डरने हा धागा पकडून त्या इमारतींमध्ये आणि वस्तीमध्ये पत्रे टाकले. त्या पत्र्यांमुळे वस्तीतला येणारा जाणारा रस्ता कायमचा बंद झाला. कुणाचे प्रेतही बाहेर काढायचं असेल तर ते तिरपं करून बाहेर काढावं लागतं. मग रस्त्यावर नेऊन तिरडी बांधावी लागते. कालच बिल्डरचे नाव घेऊन काही माणसं आली. त्यावेळी घरी पुरुषमंडळी कोणी नव्हती. ते आले आणि म्हणाले, रस्ता बनवण्यासाठी इथली पाण्याची टाकी आताच्या आता तोडायची आहे.’’

 
यावर चव्हाणबाई म्हणाल्या, ’’आता पाण्याची टाकी कशी तोडू देणार? आधीच मागे बिल्डरने इमारतीचं कामकरताना आमच्या नळाचा पाईप तोडला होता. तो भरून पण दिला नाही. आम्ही पुन्हा मग पैसे काढून पाण्याची लाईन घेतली. आता ही पाण्याची टाकी काढली तर पुन्हा ती बांधून मिळेलच, असा विश्वास नाही.’’ यावर नवनाथ म्हणाले, ’’आमच्या वस्तीचं शौचालय आहे. रस्ता करून देण्यासाठी ते शौचालय तिथून हटवून दुसरीकडे बांधतो, असे बिल्डरने म्हणजे त्याच्या माणसांनी सांगितले. आता बिल्डर समोर येतच नाही. त्याच्या नावाने काही लोक येऊन वस्तीतल्या लोकांना घाबरवतात आणि असे काहीबाही ठरले आहे, असे सांगतात.’’ विकासक काही तरी विचार करूनच असे करत असेल असं म्हटल्यावर लोक म्हणाली, ’’त्याची माणसं म्हणतात तुमच्या भल्यासाठी हे करतो आहोत. पण आमचं भलं कशात आहे हे आम्हाला एकदातरी विचारायचं. प्लॅन जर आमच्यासाठी आहे तर तो काय आहे हे आम्हाला कळलं तर पाहिजे ना? आम्हाला रातोरात किड्यामुंगीसारखं एसआरएमधून बाहेर फेकलं. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत तरीही...आम्ही जमिनीचे मालक आहोत तरीही..’’
 
समस्या सांगताना महिला
 
यावर एक महिला म्हणाली, ’’जास्त बोलू नका. रघुनाथ कसा फसला  माहिती आहे ना?’’ ’’काय झाले?’’ विचारल्यावर म्हणाले, ’’आमची वस्ती १९९० सालापूर्वीपासून गणपती उत्सव साजरा करते. यावर्षी बिल्डरने त्याच्या नावाचे टीशर्ट मंडळासाठी पाठवले. पण त्यावर आमच्या मंडळाचे नाव नव्हते आणि बिल्डर कधीही आमच्या समोरासमोर आलाही नव्हता. त्यामुळे मुलांनी ते टीशर्ट नाकारले. ११ व्या दिवशी आम्ही गणपती विसर्जनाची मिरवणूक काढली. त्यावेळी बिल्डर टीशर्ट देत होता तर तुम्ही का घेतले नाहीत? असे म्हणून दोन जण मिरवणुकीत भांडू लागली. यावेळी त्यांची मंडळाच्या मुलांशी बाचाबाची झाली. बाचाबाचीत त्यापैकी एकाची पत्नी मध्ये आली. चुकून तिला धक्का लागला, थोडे लागले. पण खरंच त्यांना धक्काबुक्की करायचा आमचा हेतू नव्हता. त्या आमच्या समाजाच्या, लहानपणापासून त्यांना आम्ही ओळखतो. त्यांच्याशी जाणूनबुजून असं कधी करूच शकत नाही. पण त्यांनी आमच्यावर केस केली. त्या दिवशी मंडळ, सगळी वस्ती आमच्या गणपतीबाप्पासकट पोलीस स्टेशनमध्ये गेलो पण आमच्यावर केस झाली.’’
 
यावर एकजण म्हणाला, ’’त्यात काय नवीन, बिल्डर, बिल्डरची माणसं, त्यांनी केलेली कोणतीही कामं, याचा आम्हाला त्रास झाला आणि आम्ही त्याच्या पोलीस कम्प्लेंट केल्या तर आम्हाला पोलीस बोलतात एसआरएमध्ये जा. आम्हाला काय सांगता. पण, बिल्डरच्या नावाने आमची कोणी तक्रार केली तर पाच मिनटात आमच्यावर कारवाई होते. का?’’ त्याला थांबवत लोकं म्हणाली, ’’हे सगळं असंच चालेल का? आम्ही घरं मिळण्याची स्वप्न बघत तरण्याचे म्हातारे झालो. आमचे आईबाप पण हे स्वप्न घेऊन मेले. आम्ही या मुंबईचे कायदेशीर रहिवाशी असून आमची काही चूक नसताना आता तर आम्हालाच घर मिळणार नाही का?’’ यावर बाजूच्या वस्तितले दिनेश पराड, अनिल पाटिल, दिपक पाडळ, ईश्वर धायवट यांचे म्हणणे होते, ’’ आज आमच्या समाजाच्या वस्तीत धडाक्यात सुविधा मिळतात. नाही मिळाल्या तर आम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊन रस्त्यावर उतरतो आणि आमचे हक्क मिळवतो. आमचा नेता होताच तसा, बाबासाहेब आंबेडकर. तुमचा पण कोणी नेता असेलच ना?’’

 
यावर आचार्य नगरच्या अन्यायग्रस्त लोकांच्या चेहर्‍यावर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे होते, छत्रपती शिवाजी महाराज या आराध्य दैवतानंतर कोण? सध्या आपला वाली कोण हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. जातनिहाय समस्या सोडली तर खरोखरच मलाही वाटते की, या आचार्यनगरच्या पीडित लोकांचा वाली कोण आहे??
-योगिता साळवी