खाद्यभ्रमंती- पडवळ ट्विस्ट
 महा MTB  12-Jan-2017
 
बऱ्याच लोकांना कुणास का ठाऊक का पण पडवळ विशेष आवडत नाही..
May be...पडवळ या भाजीला स्वतःची अशी विशेष टेस्ट नाहीये... किंवा या भाजीमध्ये पाण्याचा कंटेंट तसा जास्त आढळतो म्हणून असेल...कदाचीत
 
पण....  पण बऱ्याच लोकांना  पडवळ विशेष आवडत नाही.. हे मात्र खर.. 
 
मी इटर्नल इटरी ब्लॉग सुरु केल्यावर, माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने मला सकाळी सकाळी फोन केला आणि म्हणाली,"अरे मित्रा, माझी मुलगी पडवळ, कारलं, दुधी भोपळा अश्या अत्यंत बहुगुणी भाज्या खाण तर दूर राहिलं या भाज्यांकडे साध ढुंकूनही पहात नाही... तुझ्या पंचतारांकीत रेसिपीज समवेत काहीतरी भन्नाट कर रे रेसिपी या आणि असल्या भाज्यांसाठी...म्हणजे तरी माझी मुलगी या भाज्या आवडीने खायला सुरुवात करेल."
 
मी लगेच म्हणलं, " ठीक आहे...नक्की करतो...सगळ्यांनाच याचा फायदा होईल."
 
आणि मग मी बरेचं प्रयत्न करून ही पडवळच्या भाजीची रेसिपी तयार केली.
घरात सगळ्यांना खायला घातली...
अर्थातच सगळ्यांनाच ती आवडली आणि आता म्हणूनच "नावडत्या भाज्यांच्या आवडत्या सेक्शन" मध्ये आज मी पहिली भाजी सादर करतोय...
 
पडवळ ट्विस्ट 
 

साहित्य 

पडवळ - अर्धा किलो (पडवळ जितका ताजा, कोवळा आणि लुसलुशीत घ्याल तेवढी ही भाजी भन्नाट लागेल)

तेल - ४ चमचे 
जिरे - २ चमचे 
कांदापात - १२ कांदे (कांदापात घेताना एकदम कोवळी घ्या...म्हणजे कांदा अगदी लहान असतो आणि पाने पण लहान, कोवळी आणि हिरवीगार असतात...कांदापात घेतल्यावर धावत्या पाण्याखाली धुवून नंतर एकदम बारीक चिरून घ्या आणि वेगळ्या भांड्यात काढून घ्या)
टोमॅटो - ५ मध्यम आकाराचे लालबुंद 
आलं - २ इंच लांब बारीक किसलेलं 
लसूण - ५ मध्यम आकाराच्या पाकळ्या ठेचलेल्या 
हिरव्या मिरच्या - ४ बारीक चिरलेल्या 
मीठ - एक चमचा 
लाल तिखट - एक चमचा 
जिरे पावडर - २ चमचे
धने पावडर - २ चमचे 
साखर - ३ चमचे 
बेसन पीठ - ४ चमचे
कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरलेली
हिंग - चिमुटभर 
 

पाककृती 

जरा जास्त  वेळ लागला तरी हि डिश शक्यतो मंद अग्नीवर करा...जास्त छान लागते 
 
१) पडवळ चिरून आतल्या बिया काढून टाका आणि आपण नेहेमी करतो तश्या बारीक काचऱ्या करून घ्या. बाजूला ठेवून द्या.
 
२) या कृतीमध्ये नंतर आपल्याला भांड्यावर मोठे ताट ठेवून त्यावर पाणी ओतून वाफेवर ही भाजी शिजवायची आहे... तेव्हा भांड्यावर ताट व्यवस्थित बसेल असे भांडे ही भाजी करण्यासाठी निवडा....
मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात २ चमचे तेल घालून, मध्यम अग्नी करून, तेल तापल्यावर त्यात चिमुटभर हिंग घाला आणि हलकेच परता... आता जिरं घालून जिरं तडतडे पर्यंत परता.
 
३) जिरं तडतडल्यावर अग्नी मंद करून आता पूर्ण कांदा आणि पात घालून ५/६ मिनिटे पूर्ण परतून घ्या...
कांदा पात परतून झाल्यावर पूर्ण निम्मी होईल....
आता यात हिरव्या मिरच्या घाला.... व्यवस्थित परता....
आलं आणि लसूण ठेचा घाला आणि व्यवस्थित परता...
आणि सर्वात शेवटी टोमाटो घालून नीट परता....
(हिरव्या मिरच्या घातल्यापासून ते टोमाटो घालून परते पर्यंत सतत हे मिश्रण हलवत राहा...
अजिबात आळस नको...
हे मिश्रण जर खाली लागले अथवा करपले तर पडवळच्या या भाजीचे 'कल्याण' होईल)
 
३ नंबर ची ही परता परती साधारण एकंदर ६/८ मिनिटे चालते...
हे मिश्रण तयार झाल्यावर आता जरा दम घ्या... आणि या मिश्रणाचा वास घ्या... काय जबरा येतो आहे ना वास...
 
४) आता या मिश्रणात मीठ घालून परता...
आता यात धने-जिरे पावडर, लाल तिखट आणि सर्व साखर घाला आणि अजून किमान ३/४ मिनिटे परता.
आता हे मिश्रण साधारण सरसरीत होईल...
आता यात चिरलेला पडवळ घालून हे मिश्रण या पडवळला सगळीकडून नीट लागेल असे व्यवस्थित परतून घ्या.
 
५) आता या भांड्यावर भांडे व्यवस्थीत झाकले जाईल असे ताट ठेवा , या ताटात सर्व कडा व्यवस्थित भरतील येव्हढेच साधे पाणी ओता...आणि अग्नी मंद आहे ना हे चेक करून हे मिश्रण असेच साधारण ५ मिनिटे अग्नीवर न हलवता ठेवा.
 
६) आता ताट चिमट्याने अलगद बाजूला उतरवून ठेवून आतली भाजी पुन्हा एकदा व्यवस्थीत हलवून घ्या...आणि मगास सारखेच पुन्हा तेच गरम पाणी असलेले ताट भांड्यावर ठेवा...अजून ४/५ मिनिटांसाठी 
 
७) आता ताट बाजूला काढून भाजी शिजली आहे ना हे एक पडवळाचा तुकडा खावून बघा आणि आता भाजी शिजली असेल तर एक चमचा बेसन कोरड्या चमच्याने सर्व भाजी वर भुरभुरवा...भाजी खाली वर नीट परतून घ्या...२ मिनिटे थांबा......पुन्हा एक चमचा बेसन सर्व भाजी वर भुरभुरवा...भाजी खाली वर नीट परतून घ्या...२ मिनिटे थांबा...आणि आता पुन्हा एकदा सर्व उरलेले बेसन भुरभुरवा...आणि भाजी पुन्हा एकदा खाली वर नीट हलवून घ्या...
 
८) आता ही भाजी तयार झाली आहे फक्त मंद अग्नीवर ही भाजी आता अशीच अजून साधारण ३/४ मिनिटे राहू द्या....
 
घरातल्या ज्या ज्या मेंबर्स ना पडवळ आवडत नाही त्यांना लगेच टेबलावर बोलवा... मस्त ताटे वाढा आणि भोजन मंत्र म्हणून जेवायला सुरुवात करा... गरमागरम आणि थेट अग्नीवरून ताटात
 
फक्त ही भाजी अग्नीवरून उतरवून थेट ताटात गेली पाहिजे... जशी जशी ही भाजी थंड होत जाईल तसे या भाजीतले आपल्या मिश्रणाचे तयार झालेले नैसर्गिक ज्युसेस नष्ट पावू लागतील हे ध्यानात ठेवा...
 
एक विनंती...
ही भाजी डब्यात घेवून जावू नका...
गरमागरमच छान लागते...
आणि टीव्ही पाहात पाहात ही भाजी खावू नका...
एक घास घेतल्यावर जो काही स्वाद ही भाजी तोंडामध्ये तयार करते त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टीव्ही बंद करा...
आणि आता सावकाश जेवा......
 
वेडे व्हा.. वेडे करा
खुप खा... खूप जगा   
 
रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....
 

भरपेट खा... आरोग्यदायी रहा.. खूष व्हा... मस्त जगा

 


देव बरा करो.........