वेध- केजरींची किरकिर...
 महा MTB  11-Jan-2017
 
 
ट्विटरवर फक्त नकारात्मकता, टीका-टिप्पणी आणि शेरेबाजीच्या भरार्‍या घेणारे दिल्लीचे स्वैर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातृभेटीचीही विनाकारण थट्टा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण ट्विटरवासीयांनी मात्र केजरींची ही किरकिर त्यांच्या जुन्या कौटुंबिक ट्विट्‌सचा दाखला देत उडवून लावली. पण त्याचे त्यांना काय, आपली कितीही निंदानालस्ती झाली तरी चालेल, पण पंतप्रधानांना सुनावल्याशिवाय काही घशातून घास उतरत नाहीच यांच्या!
 
‘व्हायब्रंट गुजरात’साठी गांधीनगरमध्ये असलेल्या मोदींनी सकाळी आपल्या ९५ वर्षीय मातोश्री हिराबेन यांची नाश्त्याच्या वेळी भेट घेतली. योगसत्र चुकवून मोदी मातोश्रींच्या चरणी लीन झाले. योगामुळे मिळणार्‍या मानसिक आणि भावनिक समाधानापेक्षा कित्येक पटीने अधिक समाधान या प्रदीर्घ मातोश्री भेटीने मोदींना मिळाले असणार, यात शंका नाहीच. पण राजकारण करताना नातेसंबंधांचा विचार करतील ते केजरीवाल कसले! पंतप्रधानांच्या कुठल्याही निर्णयावर बरसायला हे आपले मोकळे. त्यांचा जणू काही पहिला हक्क आणि जन्मसिद्ध अधिकारच तो. विरोधकांहूनही वरचे असे हे नतद्रष्ट, सदैव पंतप्रधानांचे अहित चिंतणारे केजरीवाल! ‘‘मोदी आईला भेटले, तर त्याचा एवढा ढिंढोरा पिटायची गरजच काय,’’ असा नाठाळ सवाल केजरीवालांनी उपस्थित करताच त्यांच्यावरही टीकांचा वर्षाव सुरू झालाच. पंतप्रधानांनी काय ट्विट करावे, तो त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न. त्यात देशाचा कारभार हाताळणारे पंतप्रधान आपल्या दिवसाची सुरुवात जर आईचा आशीर्वाद घेऊन आणि घरच्यांसोबत करत असतील, तर यांना एवढी पोटदुखी का? उलट, ‘‘पत्नी-आईसोबत राहणे ही भारतीय संस्कृती आहे. त्यात पंतप्रधान आवासही मोठे आहे, मग मोदीजी तुम्ही आईला दिल्लीला का नेत नाही?’’ असा खोचक प्रश्न विचारण्याचा सरकारी सेवासुविधांवर सहकुटुंब संसार पोसणार्‍या केजरीवालांना अधिकार दिला तरी कोणी? दिल्लीच्या गादीवर बसण्यापूर्वी कुठलीही सरकारी सुविधा स्वीकारणार नाही म्हणून मिरवणारे केजरीवाल नंतर सरकारी बंगल्यात कसे बरे विराजमान झाले? लाल दिव्याची गाडी नाही नाही म्हणता दिमतीला घेतलीच ना... तेव्हा, केजरीवालांनी पंजाब, गोवा जिंकण्याची स्वप्नं बघण्यापेक्षा दिल्लीच्या कारभारावर लक्ष केंद्रित केले तर ठीक, नाही तर, दिल्लीवाले तुम्हाला तुमची योग्य ‘जागा’ निश्चितच दाखवून देतील. 
 
 
केजरींची फिरकी
काही पहिल्यांदाच नाही बरं का की, जिथे केजरीवालांना ट्विटरवासीयांनी चांगलेच झापले असेल. त्यांना कदाचित सवयच झालीय त्याची. काहीबाही बरळायचे आणि प्रसिद्धी मिळवायची. या कामात अगदी अव्वल हे मुख्यमंत्री साहेब... बाकी दिल्लीचा कारभार झेपो, न झेपो... हे बडबोले नेते मात्र अगदी बिनधास्त...
 
मोदींच्या मातोश्री भेटीवर उगाच टिवटिवाट करणार्‍या केजरींना ट्विटरवासीयांनी त्यांनी यापूर्वी केलेल्या त्यांच्याच कौटुंबिक आणि वैयक्तिक ट्विटस्‌ची आठवण करून दिली. त्यापैकी केजरीवालांनी उमेदवारी अर्ज भरायला जाताना ‘‘पालकांबरोबर, मुलांबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर उमेदवारी अर्ज भरायला जात आहे. पण बायको मात्र सोबत नाही. ती सरकारी कर्मचारी आहे ना...’’ असे ट्विट केले होते. त्यावेळी केजरीवालांना त्यांच्या ज्येष्ठ आईला असे निवडणुकीच्या मैदानात उतरविताना दया आली नाही का? केजरीवालांच्या मातोश्रींनी तर आम आदमीची शुभ्र टोपी चढवत निवडणुकीत आपल्या मुलाचा मुक्तकंठाने प्रचारही केला. तेव्हा केजरींवर ‘निवडणुका जिंकायला आईला रस्त्यावर उतरवले’ वगैरे फुकटची शेरेबाजी कोणी केली का? तर नक्कीच नाही, मग यांनाच एवढी जीभेची खाज का?
 
चला हे सोडा, ’’मला १०२ डिग्रीचा ताप आहे, मला जुलाब झाले आहेत, त्यामुळे कार्यालयात हजर राहू शकत नाही,’’ असे बालीश ट्विट करणार्‍या केजरीवालांना काय म्हणावे? म्हणजे, एकीकडे ’मी कार्यालयात नाही’ यासाठी ट्विट करायचे अन् इतकी वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद व आता देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळणार्‍या नरेंद्र मोदींनी ‘मी सुट्टी घेतली नाही,’ हे सांगितल्यावर त्यांची मात्र विनाकारण खिल्ली उडवायची, हा कुणीकडचा न्याय?
 
तेव्हा, केजरीवालांनी खरंच पंजाब व गोव्यामध्ये तळ ठोकून निवडणुका जिंकता येतील, अशा आविर्भावात न वावरता जरा दिल्लीवासीयांवर दया करावी. त्यातच पूर्व दिल्लीमध्ये सफाई कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेल्यामुळे कचरा विल्हेवाटीची उद्भवलेली भीषण समस्या अधिक उग्र रूप धारण करू शकते, तेव्हा त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी. कारण, दिल्लीमध्ये आधी केलेली आश्वासनांची घोषणाबाजी आणि नंतर काहीही न करता केवळ मोदीद्वेषाची टेप वाजवून लोकांची दिशाभूल करण्याचा तुम्ही चालवलेला प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही. त्यातच तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, पंजाब, गोव्याच्या निवडणुका लढविण्यासाठी पैसे नाहीत तुमच्याकडे? मग आता निवडणुकीतून पैसे हद्दपार करण्याची भाषा करणार्‍या तुम्हाला पैशांची गरज का भासली? कारण, मुळात चारित्र्यच शुद्ध नसेल तर पैशाने तरी किती घासून किती मळ काढणार? 
 
-विजय कुलकर्णी