‘भारतीय स्त्री शक्ती’
 महा MTB  11-Jan-2017

 
स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, ’’स्त्रीला शिक्षणाची संधी मिळाली तर ती स्वतःचा आणि समाजाचा विकास करेल.’’ हा विचार भारतीय स्त्री शक्तीची अंतःप्रेरणा आहे. १९८८ साली भारतीय स्त्री शक्तीची स्थापना झाली. शिक्षण, आरोग्य, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य आणि समानता या पंचसुत्राच्या आधारावर भारतीय स्त्री शक्ती विविध उपक्रम राबवते. समाजाच्या सर्वच स्तरावर आपल्या राष्ट्रीय कल्याणकारी विचारांचा ठसा उमटवणार्‍या भारतीय स्त्री शक्ती चा परिचय...
 
कोर्टात वकिली करत असताना मी पाहायचे की बहुतेकदा कोर्टाची पायरी चढलेली महिला तिची चूक नसतानाही घाबरलेली, गोंधळलेली असायची. मुला समोरून माहिती असे की, अरे या स्त्रीची केस तर चुटकीसारखी सुटू शकते, तिचा वकील सांगतोय तितके काही गंभीर प्रकरण नाही. पण मी तसे करू शकत नव्हते. विनामूल्य आणि खरा कायदेशीर सल्ला जर पीडित महिलेला मिळाला तर माझ्या मते स्त्रियांचे अर्धे प्रश्न मिटतील. मनात कायम रूखरूख असे. अरेरे! मी अशा भगिनींना कायदेशीर मदत करायला हवी होती. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. वर्षाताई पवार, नयनाताई सहस्रबुद्धे या ‘भारतीय स्त्री शक्ती’च्या पदाधिकारी. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ’भारतीय स्त्री शक्ती’च्या माध्यमातून त्यांचे चालले अथक आणि यशस्वी प्रयत्न मी पाहत होते. ’भारतीय स्त्री शक्ती’चा एक कार्यक्रम होता. विषय होता ’तुमच्या खाऊच्या डब्यात काय आहे?’ वर्षाताईंनी मला त्या कार्यक्रमाला आमंत्रित केले. मी त्या कार्यक्रमाला गेले. ’भारतीय स्त्री शक्ती’ला जवळून पाहिले आणि या संघटनेच्या विचारप्रणालीने, कार्य प्रविणतेने मला जिंकले. त्या दिवसापासून मी भारतीय स्त्री शक्तीची सदस्य झाले. कायदेशीर सल्लागार झाले. आता मुंबईची जॉईन्ट सेक्रेटरी आहे.’’ प्रतिमा शेलार अत्यंत नम्रतेने सांगत होत्या.

 
याआधी महिलांसाठी कामकरणार्‍या अनेक संस्थांचा परिचय असल्याने या संस्थांची ध्येये, कामाची शैली ही त्यांनी न सांगताही वेगळ्या रूपात मी पाहिली होती. जसे महिलांना कायदेशीर सल्ला द्यायचा. त्यांना कोर्टात केस टाकायला लावायची. महिलांनी केस टाकली की संस्थेने तिचे कायदेशीर वकीलपत्र घ्यायचे. तारीख पे तारीख देत मग पीडित महिला संस्थेच्या वकिलाची फी ऐपत असो नसो भरत राहते आणि इथे वकिलाचा पर्यायाने संस्थेचा मीटर सुरू राहतो. या सूत्रावर कामकरणार्‍या महिलांच्या हक्कासाठी कामकरणार्‍या संस्था मी पाहिल्या होत्या. ’भारतीय स्त्री शक्ती’ची कौटुंबिक विषयांवर सल्ला देणारी केंद्रे आहेत. न्यायालयातही मदतकेंद्रे आहेत. मग भारतीय स्त्री शक्तीचे याबाबतीत वेगळेपण आहे का? यावर प्रतिमा म्हणाल्या, ’’मी माझ्या नैतिक अधिष्ठानाला स्मरून एक नियमकेला आहे की, आमच्या ’भारतीय स्त्री शक्ती’कडे ज्या महिला कायदेशीर सल्ला मागायला येतील त्यांना विनामूल्य आणि खरा सल्ला द्यायचाच द्यायचा. जर एखाद्या महिलेच्या केसमध्ये कोर्टात केस उभी करणे गरजेचे असेल तर तिला तसे सांगितले जाते. पण मी ती केस घेत नाही. कारण उद्या असे कुणाला नको वाटायला की विनामूल्य सल्ला देण्याच्या नावाआड ’भारतीय स्त्री शक्ती’वाल्या व्यवसाय करीत आहेत. वकिली हा पेशा माझ्यासाठी खूप पवित्र आहे. पैसा ही आमच्यासाठी कधीही मुख्य गरज नव्हती आणि नाही. पीडित महिलेला जेव्हा न्याय मिळतो तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचे हास्य, समाधान माझ्या मनाला शक्ती देते. समाधान देते. ती शक्ती ते समाधान माझे ध्येय आहे आणि ही प्रेरणा मला ’भारतीय स्त्री शक्ती’च्या कामातून मिळत राहते’’ ऍडव्होकेट प्रतिमा शेलार अत्यंत तळमळीने बोलत होत्या. प्रतिमा शेलारांच्या चेहर्‍यावर सात्विक समाधान आणि डोळ्यात प्रामाणिकतेचे तेज विराजमान झाले होते. कदाचित वाटू शकते की, हे शब्दांचे विभ्रम आहेत? तर अजिबात नाही. अत्यंत साधी राहणी असलेल्या आणि उच्च विचार असलेल्या प्रतिमा शेलारांची भेट आठवून आताही मला हेच वाटते.
 
पुढे ’भारतीय स्त्री शक्ती’ची माहिती देताना स्नेहा पंडित म्हणाल्या, ’’ निर्मलाताई आपटे यांच्याकडून संस्थेची अधिक आणि चांगली माहिती मिळाली असती. ’भारतीय स्त्री शक्ती’च्या उभारणीत अनेक विचारवंत आणि कर्तृत्वशील महिलांचा सहभाग आहे. स्त्रीचे प्रश्न हे कधीही तिचे एकटीचेे नसतात. तर ते त्या कुटुंबाचे आणि समाजाचे प्रश्न असतात. यावर संस्थेचा विश्वास आहे. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात स्त्रीला विश्वासाचे हक्काचे स्थान मिळवून देणे, महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समान हक्क मिळवून देणे, स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध उभे राहणे, तिच्या हक्कासाठी लढणे, समाजकल्याण आणि राष्ट्रीय पुनरूत्थानासाठी महिलांच्या सक्रिय सहभागासाठी जागृती करणे या विचारकार्यासाठी ’भारतीय स्त्री शक्ती’ कामकरते. ’भारतीय स्त्री शक्ती’ही या विचारकार्यासाठी काम करते पण कशी? याला उत्तर देताना प्रतिमा म्हणाल्या, ’’संस्था समाज आणि देशासमोरील विविध समस्यांचा अभ्यास आणि सर्वेक्षण करते. आपल्या समाजात स्त्रीला जरी शक्ती मानले असले तरी कित्येकदा कौटुंबिक हिंसाचारात तिचे शोषण होते. कुटुंब जपणे, कुटुंबसंस्थेचे संवर्धन करणे हा ही आपला प्रमुख विचार असल्यामुळे संस्थेतर्फे कौटुंबिक सल्ला केंद्रे चालवली जातात. कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे आपल्याकडे म्हटलेच जाते. त्यामुळे न्यायाची गरज असलेल्या पीडितांनाही न्यायालयाची मदत घेताना पार दडपण येते. त्यासाठी न्यायालयात मदत केंद्रे निर्माण केली आहेत. भारतीय स्त्री शक्तीचे बचतगट आहेत. वाचक गट आहेत. तसेच विधी हक्कांसाठी जाणीव जागृती शिबीर, आरोग्य शिबिरांचे आयोजनही केले जाते. या शिबिरांचा किंवा आंदोलनाचा विषय जरी महिलांना केंद्रबिंदू मानून केलेला असेल तरी त्याचा थेट परिणामसमाजावर आणि देशावर होतो. ’भारतीय स्त्री शक्ती’ने विविध विषयांवर चर्चासत्र, सकारात्मक आंदोलने उभी केली, जसे धार्मिक स्थळांमध्ये समानता, महिला सुरक्षितता, बालकांच्या लैंगिक शोषणाविरोधात जागरण, पुरुषांचा हिंसाचाराला नकार, लैंगिक शोषणाविरूद्ध जागृती, महिला आरक्षण बिल, इ.सी. पिल्सचा साईड इफेक्ट, महिला शौचालय आणि हायजिन, सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट इत्यादी विषयांवर आपण समाजात जागृती निर्माण करण्याचे कामकरतो. या सर्व कामांमधून संस्थेला अभिप्रेत असलेल्या भारतीय विचारधारेला प्रमाणभूत मानून आपल्या प्रगतीबरोबरच समाजाची प्रगती करणार्‍या स्त्रीचा आणि पर्यायाने तिच्या कुटुंबाचा, समाजाचा विकास होण्यास मदत होते. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, ’’तुम्ही कोण स्त्रियांचा विकास करणारे? त्या त्यांचा उद्धार स्वतः करतील, त्यांच्याकडे तशी ईश्वरी शक्ती आहे.’’ आम्ही पीडित, शोषित स्त्रीचा उद्धार करतो किंवा कल्याण करतो, असा दावा करतच नाही. तर आमचे ध्येय हेच आहे की त्या मुलीला, त्या स्त्रीला वास्तव कळावे, तिने शिकावे आणि शिकून त्याचा उपयोग स्वतःचे जीवन घडवावे, समाजाला प्रेरणा द्यावी.’’

 
यावर स्नेहा पंडित म्हणाल्या, ’’आजही मुलींना शिक्षणाची संधी सहज उपलब्ध होत नाही. त्यासाठी संस्था कामकरते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनीचा शैक्षणिक खर्च संस्था करते. आज मला त्या मुलीची आठवण येते. तिचे आईवडील वारलेले. आजीकडे ती राहायची. दहावी-बारावी आर्थिक ओढाताणीत पास झाली पण फी भरायला पैसे नाही म्हणून पुढचे शिक्षण थांबवावे, असा निर्णय घरच्यांनी घेतला. तिला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. संस्थेने तिचा खर्च उचलला. तिला नर्सिंगचे शिक्षण दिले. आताही सांगायला इतका आनंद होतो आहे की, ती मुलगी नर्सिंगच्या परीक्षेत पहिली आली. तिच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास आज परिसरातल्या हजारो मुलींच्या जीवनाची प्रेरणा बनला आहे. हे जे आहे ना हेच आम्हाला, ’भारतीय स्त्री शक्ती’ अभिप्रेत आहे.’’ ’भारतीय स्त्री शक्ती’ची माहिती घेताना मला मागच्या निवडणुकांची आठवण झाली. कितीतरी महिला निवडणूक लढविण्यासाठी पहिल्यांदाच उंबरठ्याच्या बाहेर पडल्या होत्या. काही राजकारणात सक्रिय होत्या पण त्यालाही ’रिकाम्या जागा भरा’ असे स्वरूप होते. अशावेळी अचानक महिलांना राजकीय क्षेत्रात आरक्षण मिळाले यावर अपवाद वगळता सगळ्यांचे मत होते, ’आता सत्ता कशी चालणार’? नेमक्या त्याचवेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महिलांनी राजकीय क्षेत्रात कुठल्याही बाबतीत कमी पडू नये म्हणून ’भारतीय स्त्री शक्ती’ने ’मी नगरसेविका’ म्हणून अभ्यासवर्गाचे आयोजन केल्याचे स्मरते. तसेच ’भारतीय स्त्री शक्ती’ने विविध प्रश्नांवर पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. जसे, ’भारतीय स्त्री शक्तीची भूमिका’, ’हिंदू वारसा कायद्यातील १९९४ ची दुरुस्ती’, ’बारमध्ये कामकरणार्‍या महिलांचे प्रश्न’, ’इलेक्टोरेट प्रोसेस इन कॉर्पोरेशन इलेक्शन- ए जन्डर स्टडी’, ’कळी उमलताना’, ’कहाणी एड्‌सच्या विळख्याची’, ’जागर स्त्री आरोग्याचा’, ’उडाण’, ’विश्वमानसी’, ’मी नगरसेविका’ आणि इतरही विषयांवरची पुस्तके. हे सगळे आठवून वाटले, ’भारतीय स्त्री शक्ती’ कामतरी किती आणि कोणत्या, कोणत्या क्षेत्रात करते?
 
यावर प्रतिमा आणि स्नेहा म्हणाल्या, ’’जी क्षेत्रे मानवी मूल्यांना आणि समाजधारणांना प्रभावित करतात अशा सर्वच क्षेत्रात ’भारतीय स्त्री शक्ती’ कामकरते. सर्वच स्त्रिया या समान आहेत पण वेगवेगळ्या पातळींवरचे त्यांचे प्रश्न त्यांचे जीवन आणि त्यातून काढलेला त्यांनी मार्ग किंवा मिळविलेले यश हे ‘भारतीय स्त्री शक्ती’ वेगवेगळ्या परिमाणातून पाहते. त्यामुळेच शोषित पीडित स्त्री, शोषित नाही पण आपल्या हक्कांची जाणीव नसलेली स्त्री, आपल्या वैचारिक मानसिक क्षमतांचा वापर करून आपल्या क्षेत्रात ठसा उमटविणारी स्त्री या सर्वजणी स्त्रियाच आहेत. पण त्यांंचा दायरा वेगळा. या सगळ्या दायर्‍यांना त्या त्या स्तरावर विकासमान करण्याचे काम’भारतीय स्त्री शक्ती’ करते. ’हमभी कुछ कमनही’ म्हणत प्रचंड सर्जनशीलतेने समाजविकासासाठी नाविन्यपूर्ण शोध किंवा कामकरणार्‍या महिलांना ‘भारतीय स्त्रीशक्ती’तर्फे ‘वुमेन ऍण्ड टेक्नॉलॉजीकल इनोव्हेशन नॅशनल ऍवार्ड (वाटी)’ हा पुरस्कार दिला जातो. पुढे बोलताना विषय निघाला की सध्या महिलांसमोरील सगळ्यात मोठा प्रश्न कोणता? यावर उत्तर आले, ’’महिला सुरक्षितता हा मोठा प्रश्न आज महिलांसमोर आणि समाजासमोरही आहे. जोपर्यंत समग्र समाजघटकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा प्रश्न गंभीरच आहे. पालकांनी तू मुलगी आहेस म्हणून मुलीला वाढवताना मुलांना, ती मुलगी माणूस आहे, ही शिकवण देत वाढवले पाहिजे. मुलगा-मुलगी भेदाचे अतिशय भेदक आणि विदारक वास्तव आहे. त्यावर यशस्वीरित्या आणि वास्तविक कामकरणे हे आमचे ध्येय आहे. पुढचा उपक्रमकाय हे विचारल्यावर स्नेहा पंडित म्हणाल्या, ’’डिजिटल स्त्री शक्ती हा आमचा उपक्रमआहे. आज मोबाईलने क्रांती केली आहे. त्या तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर जर स्त्रियांनी केला तर त्यांचा खूप वेळ आणि उर्जा वाचेल. नेटमुळे सगळ्यांचेच संपर्कक्षेत्र वाढले आहे. सायबर गुन्ह्यांचा मागोवा घेताना, असे आढळले की, यामध्ये निष्पाप मुली अज्ञानामुळे फसतात तर यासाठी ’रिस्पॉन्सिबल नेटिझन’ असा उपक्रमआम्ही राबवत आहोत. आम्ही महिलांना, मुलींना सांगतो, ’’बाई गं तू नेट वापर, चॅट कर पण त्याची काही पथ्ये पाळ. सुरक्षा बाळग.’’

 
प्रतिमा आणि स्नेहा यांच्याकडून ’भारतीय स्त्री शक्ती’ची पुरेशी ओळख झाली होती. स्त्रियांसाठी कामकरणे म्हणजे काय हे भारतीय स्त्री शक्तीला भेटून कळले. तरीही एक प्रश्न होताच की, इतकी सगळी कामे करताना या संस्थेचा आर्थिक भार कोण सांभाळतो? हा विचार येताक्षणीच मनात चोरदाराने विचार आला, वर्षा विनोद तावडे किंवा प्रतिमा आशिष शेलार यांनी संस्थेसाठी देणगी मागितली तर कुणी देणगी देणार नाही का?तसे म्हटल्यावर प्रतिमा म्हणाल्या, ’’नाही, ’भारतीय स्त्री शक्ती’ला एक वैचारिक आणि राष्ट्रीय विचारांचे अधिष्ठान आहे. स्त्रियांनी स्वतःचा विकास करत स्वाभिमानाने समाजाचाही विकास करावा, हा विचार आमच्या रक्तात भिनला आहे. त्यामुळे झटकन विनाकारण मिळणार्‍या देणगी आम्ही कधीही स्वीकारत नाही. या उलट आम्ही वेगवेगळ्या इतर सेवाभावी संस्थांच्या मदतीने उपक्रमराबवतो. संस्थेचा खर्च आम्ही आमच्या महिलांनी केलेल्या कुटीरोद्योेगातून मिळालेल्या उत्पन्नातून भागवतो. कुणी शंभर रुपये जरी देणगी देणार असेल तरी जोपर्यंत त्या व्यक्तीला प्रत्यक्ष आमच्या संस्थेचे काममनापासून कळत नाही तोपर्यंत ती देणगी आम्ही स्वीकारत नाही. कारण आम्हाला समाजकार्यासाठी माणूस कमवायचा असतो. पैसे नाही. सांताक्रुझ वाकोल्याला असलेल्या संस्थेच्या कार्यालयाचा साधेपणा आणि पदाधिकारी तसेच स्वयंसेवकांची साधी पण ध्येयप्रेरित वृत्ती यातून त्यांच्या म्हणण्याची सत्यता पटत होती
 
असो! जगणे हा जरी सर्वच मानवांचा पायाभूत अधिकार असला तरी त्यापलीकडे भावनिक सुरक्षा, कार्याच्या साफल्याचा आनंद आणि मुख्य म्हणजे आत्मभान असलेले आत्मिक समाधान स्त्री काय किंवा पुरुष काय या सगळ्यांच्या जीवनाच्या अर्थाचा हा शोधबिंदू आहे. या शोधबिंदूला भारतीय विचारधारेतून दिप्तीमान करणार्‍या ‘भारतीय स्त्री शक्ती’च्या कार्याला मनापासून शुभेच्छा!
-योगिता साळवी