मधुमक्षिका संवर्धनाचे ‘गोड’से मॉडेल
 महा MTB  04-Nov-2016

 


आपल्या आसपास एखादी जरी मधमाशी गुणगुणायला लागली की, आपली चलबिचल होते. त्या माशीला कसे दूर हाकलता येईल, यासाठी मग हातात सापडेल त्या वस्तूने त्या मधमाशीला हाकलले जाते. आसपास पोळं लागलं असेल, तर वेळीच त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी शोधाशोध सुरू होते, ती पोळी काढणार्‍या माणसाची किंवा मग थेट पेस्ट कंट्रोलवाल्यांना पाचारण करून वेळीच ही पोळी मधमाशांसह समूळ नष्ट केली जातात. कष्टाने मध गोळा करणार्‍या मधमाशा मानवी अत्याचाराच्या अज्ञानामुळे हकनाक बळी पडतात. मधमाशांची ही व्यथा पुण्यातील एका मेकॅनिकल इंजिनिअरला केवळ जाणवली नाही, तर त्याला आयुष्याची दिशा देऊन गेली. तेव्हा, मधमाशांना तसूभरही इजा न पोहोचविता त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा वसा घेऊन काम करणार्‍या एका मधमाशीवेड्या तरुणाची ही मधुगाथा...


मधमाशा... नावात सुरुवातीचा ‘मध’ हा शब्द जरी गोेड असला, तरी अनेकांना ‘माशा’ म्हटलं की, काही तरी किळसवाणा कीटक डोळ्यासमोर येतो. त्यात मधमाशा म्हणाल, तर मधापेक्षा त्यांच्या दंशाची, टोळीने शत्रूवर तुटून पडण्याच्या त्यांच्या आक्रमक स्वभावाचीच चर्चा अधिक. त्यामुळे आदिम काळापासून मानवाला मधमाशांपासून मिळणार्‍या शुद्ध मधाची हाव असली तरी आजतागायत मधुमक्षिकांच्या अस्तित्वाची खरी किंमत मात्र आपल्याला समजलेली नाही. परिणामी, मधमाशांची संख्या ही दिवसागणिक कमी कमी होत असून त्याचे निसर्गचक्रावर पर्यायाने कृषी व्यवस्थेवर विपरित परिणाम जाणवू लागले आहेत. जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन तर त्याकाळीच धोक्याची सूचना देऊन गेले होते. ते म्हणतात, ''If the honeybees disappear of the surface of the globe, then man would have only four years of life left. No bees… no pollination, no plants, no animals…no man.'' अर्थात, मधमाशांच्या अस्तानंतर मानवी जीवन हे पुढील चार वर्षेच तग धरू शकेल. कारण, जर मधमाशा नसतील तर परागीभवन होणार नाही, त्यामुळे वनस्पती नाही, प्राणीही नाही आणि परिणामी मानवही नाही. आईनस्टाईन यांनी वर्तविलेली ही गंभीर भविष्यवाणी खरी ठरू नये आणि मधमाशा या पृथ्वीतलावरून नामशेष होऊ नये, यासाठी एका तरुणाने मधमाशांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी पुढाकार घेतला. नागरिकांचाही त्याच्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि आज जर पुण्यात मधमाशांची पोळी काढायची असतील, तर पुणेकरांचा ‘प्रेफरन्स’ आता पेस्ट कंट्रोलवाल्यांना नाही, तर अमितला मिळतोे. कारण, मधमाशांना अजिबात धक्का न लावता अमित त्यांचे पोळ्यांसकट शास्त्रीय पद्धतीने पुनर्वसन करतो. त्यामुळे घरोघरी वृत्तपत्रांतून ‘मधमाशांचा रक्षक अमित गोडसे’ याचे हे अनोखे अभियान आणि त्याचा दूरध्वनी क्रमांक पुणेकरांपर्यंत पोहोचला आणि पाहता पाहता अमित पुण्याचा ‘बी-मॅन’ ठरला. 

दिवसभरात मधमाशांची पोळी काढण्यासाठी एक-दोन कॉल्स स्वीकारणारा अमित आणि त्याचे सहकारी सर्वप्रथम पोळी काढण्याची मागणी करणार्‍यांना मधमाशांचे, पोळ्यांचे शास्त्रीय-नैसर्गिक महत्त्व विशद करतात. मधमाशांमुळे कोणतेही नुकसान होणार नाही, हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्नही केला जातो. कारण, प्रत्येकाच्या मनात घर करून असतात, मधमाशांविषयीचे केवळ आणि केवळ गैरसमजांचे ऐकीव कटू अनुभव. त्यामुळे मधमाशांची हल्लेखोर, जहाल अशी खलनायकाची सरसकट लेबलबाजी करून, मधमाशांचं पोळं आपल्या खिडकीबाहेर पाहूनच अनेकांची पाचावर धारण बसते. त्यामुळे मधमाशांविषयी जनजागृती हीच त्यांच्या बचावाची पहिली पायरी. म्हणून मग, एक जरी मधमाशी तुम्हाला चावली, तर आम्हाला फोन करा, असे सांगून अमित आणि मंडळी समोरच्याला फोनवरूनच आधी आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. पोळं आहे तिथेच सुरक्षित ठेवण्याचा त्यांचा मानस असतो. याविषयी अमित सांगतो की, ‘‘आम्हाला पोळी काढण्यासाठी येणार्‍या कॉल्समध्ये आम्ही मधमाशांची, पोळ्यांची माहिती देऊन सर्वप्रथम लोकांना पोळ्यांचे जतन करायला सांगतो. पण, बहुतेक जण घाबरून आम्हाला पोळी काढायला बोलावतात आणि मग पर्यायी या पोळ्यांचे आम्ही दुसर्‍या उचित ठिकाणी पुनर्वसन करतो.’’ अमितच्या बोलण्यामध्ये मधमाशांविषयीची कळकळ, त्यांच्याविषयीची आस्था अगदी स्पष्टपणे जाणवत होतीच. पण प्रश्‍न नेमका हा होता की, अमितसारखा एक होतकरू तरुण मुलगा असा इंजिनिअरिंगच्या ऐन उमेदीच्या करिअर काळात कसा बरं मधमाशांच्या पोळ्यांकडे आकृष्ट झाला असेल? त्याच्या आयुष्यात असं काय बरं घडलं असेल की, अमितला आयटीच्या यांत्रिक जगापासून चक्क फारकत घेत मधमाशांच्या गुंतागुंतीच्या जगात रस निर्माण झाला... एक इंजिनिअर ते मधपाळ... दीर्घ आणि विचार करायला लावणारा अमितचा वेगळ्या वाटेवरचा हा प्रवास...

मेकॅनिकल इंजिनिअर ते 

 मधमाशांचा अभियंता

गेल्या तीन-चार वर्षांपासून अमित जरी मधमाशांना वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असला तरी पेशाने मात्र तो मॅकेनिकल इंजिनिअर. अमितचं लहानपण रायपूरमध्ये गेलं. वडील केंद्र सरकारमध्ये ‘कोल इंडिया’मध्ये अधिकारी असल्यामुळे मासलेवाईक सरकारी वसाहतींच्या हिरवळीतच अमित लहानाचा मोठा झाला. चपळाईने झाडावर चढणं, त्या झाडांवरील फळांवर मस्तपैकी ताव मारणं आणि वनराईत मनसोक्त बागडण्यापासून अमितचं निसर्गाशी एक अतूट नातं घट्ट होतं गेलं. लहानपणी एकदा कधी तरी आईने माणसाला बोलवून पोळं काढल्याचं अमितला आजही आठवलं की वाईट वाटतं. त्यामुळे पर्यावरण आणि प्राणिमात्रांविषयी संवेदनेचं-भूतदयेचं मूल्य बालपणीच अमितच्या मनी नकळत रुजलं. नंतर इंजिनिअरिंगही त्याने रायपूरमधूनच पूर्ण केलं. पुढे आयटी क्षेत्रात करिअरच्या संधी लक्षात घेता, अमितने मायानगरी मुंबईत प्रवेश केला आणि एका नामांकित कंपनीत त्याचं इंजिनिअरचं काहीसं यांत्रिक आयुष्य सुरू झालं. नोकरी-घर-नोकरी या चक्रात तो कालांतराने अडकला. पुढे इंजिनिअरिंगबरोबर एमबीए करण्याची महत्त्वाकांक्षा मनी बाळगत २००६ साली अमितने पुणं गाठलं. पण, आयटीतील स्पर्धात्मक कॉर्पोरेट जॉब आणि एमबीए शिक्षण एकत्र ‘मॅनेज’ करायचे अमितचे गणित काही जुळेना. त्यातच आयटीमध्ये त्याचं मनही फारसं रमतं नव्हतं. यातून बाहेर पडावं, आपल्या मनाला आवडेल-पटेल असं काहीतरी वेगळं करावं, ही इच्छा त्याला मनोमन बैचेन करत होती पण नेमकं काय करावं हे मात्र कळत नव्हतं. निश्‍चित दिशा सापडत नव्हती. अशा मन:स्थितीत तडकाफडकी नोकरी सोडण्याचा निर्णयही स्वीकार्ह नव्हता. दिवसामागून दिवस सरत होते. सोमवार ते शुक्रवारचा कामाचा ताण काहीसा हलका करण्यासाठी शनिवार-रविवार अमित पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हायचा. मग कधी सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकिंग, तर कधी ऐरोलीच्या कांदळवनात फुलपाखरू निरीक्षण... व्हिकेंडचा हा निसर्गस्पर्श अमितला मनोमन सुखावत होता. पुढे आठवडाभर काम करण्याची नवीन उमेद जागृत करून जगण्याचे बळ देत होता. त्यातच २०११ साली अमितने मुंबईत ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या सामाजिक संस्थेसाठी पूर्व उपनगर संयोजकपदाची जबाबदारीही लीलया पार पाडली. त्या अनुभवाने जीवनाचे बाळकडू दिल्याचे अमित आवर्जून सांगतो. पण, पुढे एक घटना अशी घडली की, ज्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा अमितचा दृष्टिकोनच पुरता बदलून गेला. त्याच्या जवळच्या मित्राचं अकस्मात निधन झालं आणि तेव्हा अमितला जाणवलं की, आयुष्य हे अनिश्‍चित आहे आणि कुठल्या क्षणी काय घडेल, हे सांगता येत नाही. तेव्हा, घाबरून जीवन जगण्यात अजिबात अर्थ नसून प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याचे बळ अमितला हा प्रसंग नकळत देऊन गेला. घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत होते पण अमित मात्र अजूनही ध्येयाच्या शोधात होता.  


पुढे पुण्यात वारजेजवळ एका इमारतीत अमितने फ्लॅट घेतला. या इमारतीत मधमाशांचं एक मोठं पोळं लागलं होतं. पण, पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलावून लोकांनी त्या पोळ्याची लगेच विल्हेवाट लावली. दीड ते दोन लाख मधमाशा क्षणार्धात मानवी भीतीपोटी नाहक जीव गमावून बसल्या. मेलेल्या मधमाशांचा सडा पाहून अमितचं मन छिन्नविछिन्न झालं आणि या मधमाशांना जीवनदान देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भावना त्याच्या मनात खोलवर घर करून गेली. पुढे अमितचा मालेगावमधील मित्राच्या वडिलांच्या सेंद्रीय शेतीच्या प्रयोगादरम्यान पेट्यांमधील मधुमक्षिका पालनाशी परिचय झाला. मधमाशा कसं, किती मध गोळा करतात, पोळी कशी बांधतात याविषयी उत्सुकताही निर्माण झाली. नंतर मधमाशांविषयीची काही प्राथमिक माहिती अमितने रितसर जाणून घेतली आणि नंतर आंतरजालावरुन मधमाशांच्या जगात पहिला कटाक्ष टाकला. त्यातच सेंटर बी इन्स्टिट्यूट पुण्यातच असल्याची माहिती मिळाली आणि तिथूनच पाच दिवसांचा मधमाशांची तोंडओळख करून देणारा कोर्स त्याने पूर्ण केला. एवढ्यावर न थांबता महाबळेश्‍वर आणि केरळमध्येही मधुमक्षिका पालनाचा अमितने अभ्यास केला. पण यापैकी कुठेही निसर्गातील मधमाशांच्या संवर्धनाचे काम होत नसल्याचे त्याला प्रकर्षाने जाणवले. मग पुण्यात परतल्यावर मधमाशांच्या संवर्धनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचा धाडसी निर्णय अमितने घेतला. २०१२ साली अमितने त्याच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वत:ला पूर्णपणे मधमाशांच्या संरक्षण कार्यात झोकून दिले. 

पण साहजिकच अमितचा चांगल्या पगाराची आणि तीही आयटीतील नोकरी सोडण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांना सुरुवातीला पटला नाही. घरातून प्रचंड विरोध झालाच, शिवाय नातेवाईकांनीही याबद्दल शंका उपस्थित केली. अमितचं पुढे काय होणार, तो कुठे जाऊन पोहोचणार याची काहीही कल्पना नसताना, अमितच्या प्रेमाखातर आणि त्याची या कामाप्रती निष्ठा बघून कालांतराने त्याचे कुटुंबही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. एकीकडे त्याचे सोबती, मित्रमंडळी त्यांच्या नोकरीधंद्यात उन्नतीच्या पदांचे जिने चढत होते, तर अमित मात्र मधमाशांना वाचविण्यासाठी वाटा तुडवत होता. त्याला त्याच्या जीवनाचे ध्येय गवसले होते आणि पुढे ‘बी-बास्केट’ या त्याच्या नोंदणीकृत एनजीओच्या माध्यमातून मधमाशांच्या संवर्धनाची ही अभिनव मोहीम अधिकाधिक व्यापक होत गेली.

आज अमित आणि त्याचे सहकारी केवळ मधमाशांच्या पुनर्वसनाचेच नाही, तर आदिवासींना मधुसंकलनाच्या शास्त्रीय पद्धतीचे प्रशिक्षणही देतात. त्याचबरोबर, आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेल्या शुद्ध, भेसळमुक्त मधाची विक्रीही केली जाते. तेव्हा मधमाशांना जीवनदान देण्यापासून ते आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या या अनोख्या मधुमोहिमेतील मधमाशांच्या पुनर्वसनाचे  ‘गोडसे मॉडेल’ समजून घेऊया.

मधमाशांच्या पोळ्यांचे पुनर्वसन

एखादी इमारत मोडकळीस आली, पुनर्बांधणीसाठी गेली की, तेथील रहिवाशांचे विकासक किंवा सरकारकडून पुनर्वसन केले जाते, एवढीच काय ती आपली ‘पुनर्वसना’ची व्याख्या मर्यादित. त्यात प्राण्यांचे-पक्ष्यांचे पुनर्वसन अर्थात ‘रिहॅबिलिटेशन’ क्वचित वाचनात येतेही. पण पोळ्यांचे मधमाशांसकट पुनर्वसन करण्याचा महाराष्ट्रातील कदाचित भारतातील हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. कारण, मध गोळा करणारेही बरेचदा केवळ स्वार्थापोटी मधमाशांची पोळी लुटून काढतात आणि सर्रास मधमाशांना लक्ष्य केले जाते. शेतामधील युरिया व इतर फवारणी, तसेच पोळ्याजवळ धूर देणे, पेस्ट कंट्रोल करून मधमाशांना पोळ्यापासून हुसकावून लावणे अशा अनैसर्गिक आणि अशास्त्रीय पद्धतीने मधमाशांचा नाश केला जातो. त्यामुळे साहजिकच मधमाशांची संख्या रोडावली आहे. मधमाशांची ही दयनीय स्थिती केवळ भारतापुरती मर्यादित नसून जगभरात याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतही एक तृतीयांश मधमाशांचा खात्मा झालाय. कीटकनाशकांची फवारणीही याला तितकीच जबाबदार आहे. त्यातही महाराष्ट्रात मधुमक्षिका पालनाचे प्रमाणही तसे नगण्य आहे. प्राथमिक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालनाकडे बघणारे तसे कमीच आणि जोडधंदा म्हणून शेतकरीही फारसा रस घेताना दिसत नाहीत. म्हणजे, एकीकडे बाजारात मधाची मागणी वाढत असली तरी मध बाजारात उपलब्ध नाही, अशी ही विसंगती. तेव्हा, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर मधुमक्षिका पालनाला प्रोत्साहन दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम निश्‍चितच दिसून येतील, असा विश्‍वास अमितला वाटतो.

पण अमितचे मॉडेल मात्र मधुमक्षिका पालनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. मधुमक्षिका पालनात पेट्यांमध्ये मधमाशांना पोळी तयार करण्यास अनुकूल वातावरण तयार करून मधसंकलन केले जाते. शिवाय, शेतात या पेट्या ठेवून डाळिंब, संत्री यांसारख्या पिकांची उत्पादन क्षमता परागीभवनाच्या माध्यमातून वाढविता येते. त्यामुळे मधपाळांना शेतात पेट्या ठेवल्यास त्यातूनही पैसे मिळतात आणि मध विकून उत्पन्नाला हातभार लागतो. खरंतर मधुमक्षिका पालनाकडे केवळ एक जोडधंदा म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून त्याचा विचार केल्यास नफा शाश्‍वत आहेच. तरीही अमितने मधुमक्षिका पालनाच्या या पेट्यांपलीकडे जाऊन नैसर्गिक अधिवासात वावरणार्‍या लाखोमधमाशांचा विचार केला. शहरातील, गावाकडील, असो वा जंगलातील, पोळी ही निर्दयीपणे ओरबाडून मधमाशांना बेघर केले जाते. तेव्हा, अशा मधमाशांची पोळी वाचविण्यासाठी अमितने पुढाकार घेतला. निसर्गत: आढळणारी ही पोळी आग्या माशांची असतात. पेटीवाल्या मधमाशांपेक्षा या आग्या माशा आकाराने मोठ्या (५.२ मिमी) आणि त्यांच्या पोळ्यांचा आकारही तुलनेने अधिक (४ फूट-४ फूट) असतो. सहसा, मोठ्या फुलांमधील पराग गोळा करून आग्यामाशा मध तयार करतात. त्यांच्या पोळ्याच्या ५ किमी परिक्षेत्रात त्यांचा वावर असतो. तेव्हा, अमित केवळ या आग्यामाश्यांवरच काम करतो. तसेच फ्लोरिया माशीच्या पंजाच्या आकाराची छोटी पोळीही आढळल्यास तीही स्थानांतरित केली जातात.

‘पोळं जगलं तर मधमाशा जगतील’ या एका तत्त्वाभोेवती ‘बी-बास्केट’ची संपूर्ण कार्यप्रणाली केंद्रित आहे. म्हणूनच, कुठलंही पोळं काढताना ते मधमाशांसकट वेगळं केलं जातं. विशेष म्हणजे, सूर्यप्रकाशात हे काम केलं जात नाही. कारण, अनेक कामकरी मधमाशा या दिवसभर पोळ्याबाहेर असतात. सूर्यास्तापूर्वी त्या पोळ्यावर परततात. तेव्हा, सकाळी केवळ क्लिप लावून दोन काड्यांच्यामध्ये पोळं फिक्स केलं जातं आणि मग रात्री सगळ्या मधमाशा परतल्यावर पोळं कापून जाळीत टाकून त्याचे इच्छित स्थळी पुनर्वसन केले जाते. मधमाशांना कुठलाही त्रास न देता, त्यांचे पोळे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्याचे हे कसब अतिशय शास्त्रीय पद्धतीने केले जाते. पोळं काढताना नारळाच्या शेंड्या व इतर ऑर्गेनिक पद्धतीने धूर करून तो योग्य मात्रेत, योग्य दिशेने दिला जातो. कारण, कमी धूर दिला तर मधमाशा अंगावर येतात आणि जास्त धूर दिल्यास त्याचा मधमाशांना त्रासही होऊ शकतो. 

मधमाशांच्या पोळ्यांजवळ वावरणार्‍या लोकांना एका विशिष्ट प्रकारच्या पोशाखात आपण बंदिस्त पाहिलं असेल. कारण, मधमाशा बिथरल्यास त्या पोळं वाचविण्यासाठी शत्रूवर तुटून पडतात. त्यामुळे अमित आणि त्याचे सहकारीही जाळीदार पोशाख चढवून मधमाशांच्या पोळ्यांचे पुनर्वसन करतात. अमितला मधमाशा किती वेळा चावल्या याची खरं तर गणतीच नाही. पण आता त्याला मधमाशा चावल्या तरी त्याचा अजिबात त्रास होत नाही. उलट अमित उत्साहाने म्हणतो, ‘‘एकदा-दोनदा मधमाशीनं चावणं चांगलंच आहे. कारण, त्यामुळे भविष्यात कधीही पॅरालिसिस किंवा संधिवाताचा त्रास होत नाही आणि अशा या बी-वेनमवर सध्या परदेशातही संशोधन सुरू आहे.’’

मधमाशांच्या पुनर्वसनासाठी आसपासच्या सुरक्षित स्थळांचा शोध घेतला जातो. जवळपासच्या शेतात, जंगलात, फार्महाऊसवर, बंगल्यांमध्ये मधमाशांची ही पोळी स्थानांतरित केली जातात. व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून अशा ठिकाणांचा आणि पर्यावरणस्नेही मंडळींचा शोध घेऊन बाईकवरून ही पोळी इच्छित स्थळी पोहोचविली जातात. सध्या अमितचे हे स्टार्ट-अप आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत आहे, जेणेकरून मधमाशांच्या पुनर्वसनासाठी अधिक तंत्रज्ञानपूरक स्मोकर, जाळ्या यांसारखे साहित्य वापरता येईल, तर मोेठ्या पोळ्यांच्या पुनर्वसनासाठी टेम्पो, मिनी ट्रक व इतर आवश्यक साधनांचा वापर करता येईल. त्याचबरोबर मोठमोठ्या कंपन्यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून या मोहिमेला आर्थिक बळ दिले, तर निश्‍चितच ‘बी-बास्केट’चा मधमाशांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा हेतू सफल होईल.

पावसाळ्यात सहसा कॉल्स येत नसले तरी उन्हाळ्यात मधमाशांची पोळी हटविण्याची मागणी करणार्‍यांची संख्या तुलनेने अधिक असते. अमित आणि मंडळी मधमाशांच्या संरक्षणासाठी झटत असले तरी संस्थेचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक हातभार लागतोच. म्हणूनच, पोळ्याचा आकार, ते कुठल्या परिसरात आहे, यावरून या कामासाठीचा मोबदला ठरवला जातो. एक हजार ते दीड हजार रुपये या सेवेसाठी आकारले जातात. अमितच्या मते, ‘‘साधारण मधमाशांची पोळी काढण्यासाठी हजार-दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. पण, हे करताना मधमाशा मात्र मारल्या जातात. आम्ही मात्र त्यांचे योग्य पुनर्वसन करतो. शिवाय, केवळ पोळी काढून त्यांचे पुनर्वसन करण्याबरोबरच प्रत्येक पोळ्याची, त्यातील मधमाशांची माहितीही संकलित केली जाते.’’ पोळी कशी लागतात, कुठल्या भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे, ही सगळी इत्थंभूत माहिती अमितकडे उपलब्ध असते. आगामी काळात या माहितीचा संशोधनासाठी उपयोग करून मधमाशांविषयी अधिकाधिक जनजागृती करण्याचाही त्याचा विचार आहे. सध्या ‘बी-बास्केट’मध्ये अमितसह त्याचे चार सहकारी पूर्णवेळ कार्यरत असून आदिवासींचा सहभाग वाढवून त्यांना या मोहिमेत प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही अमित प्रयत्नशील आहे.

मधसंकलनाचे आदिवासी प्रशिक्षण

ग्रामीण भाग असो वा शहरात, मधमाशांचं पोळं काढायला येणारे हे सहसा घोंगडीवाले आदिवासी बांधव. त्यांचं पोट या पोळ्यांवरच भरतं. पोळं काढायचे पैसे घेणे आणि पोळ्यातील मध विकणे, हाच अनेकांचा एकहाती व्यवसाय. कित्येक वनवासी तर मधाच्या बदल्यात अजूनही केवळ क्षुल्लक वस्तूंची देवाणघेवाण करून आपला कसाबसा उदरनिर्वाह भागवतात. बरेचदा शुद्ध महागड्या मधाच्या मोबदल्यात त्यांना फळे-भाज्या, अन्नधान्यावरच समाधान मानावे लागते. त्यातच पोळं काढण्याच्या हव्यासापोटी अनेकदा अशास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यामुळे मधमाशा मरतात. म्हणजे, पोळं काढण्यासाठी झरझर झाडावर चढणे, धूर देणे यांसारख्या प्राथमिक बाबींमध्ये आदिवासी त्यांचा पिढीजात वारसा घेऊन स्वयंप्रशिक्षित असतातच. तेव्हा गरज होती ती केवळ मधमाशांना न मारता मधसंकलनाच्या पद्धतींशी आदिवासींचा परिचय करून देण्याची. हीच बाब अमितने ध्यानी घेत, आदिवासींनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. आज ‘बी बास्केट’तर्फे वनवासी पाड्यांमध्ये जाऊन आदिवासी बांधवांना मधसंकलनाच्या या शास्त्रीय पद्धतीचे रीतसर प्रशिक्षण देऊन मधमाशांना वाचविण्याचा संदेश दिला जातो. 


आदिवासी बांधव निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहेतच, शिवाय त्यांची शहरी माणसापेक्षा निसर्गावर, प्राणिमात्रांवर दृढ दैवी श्रद्धा. मधमाशांची संख्या ही दिवसागणिक कमी होत असल्याची त्यांनाही जाणीव आहेच. फक्त त्यासाठी त्यांना नेमके काय करता येईल, याची शास्त्रोक्त माहिती नाही. तेव्हा मधमाशांचा जीव न घेता मधसंकलनाची ही पद्धत ते लगेच आत्मसात करतात. यामुळे जंगलातील पोळी सुरक्षित राहिल्याने मधमाशांची संख्याही कालांतराने वाढते. त्याचबरोबर आदिवासींच्या रोजगाराचा गंभीर प्रश्‍नही मार्गी लागतो. तेव्हा, आदिवासींच्या क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक संस्थांशी संपर्क साधून ही मोहीम अधिकाधिक व्यापक करण्याचा ‘बी-बास्केट’चा मानस आहे.

‘बी-बास्केट’ची मधुक्रांती

मधमाशांच्या पोळ्यांच्या पुनर्वसनाचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग जसा सुज्ञ पुणेकरांनी उचलून धरला, तितकाच गोड प्रतिसाद ‘बी-बास्केट’च्या शुद्ध मधानेही अल्पावधीतच कमावला. कुठलीही प्रक्रिया न केलेले १०० टक्के शुद्ध मध आकर्षक बाटल्या आणि पॅकेटस्मधून मागणीनुसार पुरवले जाते. ५०० ग्रॅम मधाची किंमत केवळ ३१० रुपये. सध्या महिन्याला ३०० कि.ग्रॅम मधाची विक्री होत असल्याचेही अमित अभिमानाने सांगतो आणि आगामी काळात या मधाची ऑनलाईन विक्री करण्याचाही त्याचा विचार आहे. पण एक मात्र आहे, इतर ब्रॅण्डेड मधांप्रमाणे ‘बी-बास्केट’च्या मधाची चव दरवेळी सारखी लागणार नाही. कारण, मधमाशांचे प्रकार, फुलांची निवड, ऋतुचक्र, मध गोळा करण्याचे ठिकाण यानुसार ही चव आणि दर्जा वेगवेगळा असतो. म्हणजे, पुण्यातून गोळा केलेल्या मधापेक्षा मुंबईतून गोळा केलेल्या मधात जलांश अधिक असतो. त्यातच मध हे मधमाशांनी आधीच पचवलेले असते आणि त्यात १८-२० टक्के जलांश असल्याने त्यावर कुठलीही शास्त्रीय प्रक्रिया करावी लागत नाही. तेव्हा, मधमाशांच्या संरक्षणापासून ते त्यांच्या मधाचा पुरेपूर आस्वाद घेण्यापर्यंत अमितने ‘बी-बास्केट’च्या निमित्ताने या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकून मधुक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आहे. 

मधसंकलनाच्या क्षेत्रातील असा हा ‘बी-बास्केट’चा गोड प्रयोग सध्या पुणे, मुंबईपुरता मर्यादित असला तरी आगामी काळात याला अधिक सर्वसमावेशक बनविण्याचा अमितचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच मधाप्रमाणेच मधनिर्मात्या मधमाशांना, त्यांच्या पोळ्यांना गोड मानून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा ध्यास घ्यायला हवा. तेव्हाच, हे जग सुंदर आणि तितकेच गोड लागेल.

 

१) मकरंदापासून मध

 परागीभवनाच्या प्रक्रियेत मधमाशा फुलांमधील मकरंद गोळा करतात. मधमाशांच्या दोन उदरांपैकी एका उदरात मकरंद, तर दुसर्‍या उदरात मध साठवले जाते. मकरंद गोळा करून आणणार्‍या कामकरी मधमाशा पोळ्यावर परतताच तो मकरंद दुसर्‍या मधमाशांकडे सुपूर्द करतात. त्या मधमाशा मकरंदामध्ये एन्झाईम मिश्रित करून पुन्हा पुढील फळीतील मधमाशांना देतात. अशा पद्धतीने मकरंदापासून मध तयार करताना पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे मध हे मधमाशांनी पचवलेले असल्यामुळे त्यावर वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही. मधाव्यतिरिक्त पोळं, मेणही आपल्याला मधमाशांपासून उपलब्ध होते.

 

 २) त्या चावतात अन् मरतात...

मधमाशांचं आयुष्य जेमतेम तीन ते चार महिन्यांचं... पोळी बांधण्यासाठी, मधसंकलनासाठी आणि राणीमाशीच्या संरक्षणासाठीच त्यांचं आयुष्य सगळं समर्पित. मधमाशा स्वत:हून हल्ला करीत नाहीत. त्यांना किंवा त्यांच्या पोळ्याला नुकसान पोहोचेल याची जाणीव होताच त्या शत्रूवर हल्ला चढवतात. एका मधमाशीच्या दंशाने माणसाचा मृत्यू ओढवत नसला (१५०-२०० मधमाशा चावल्या तरच मृत्यू) तरी त्या माशीची जीवनयात्रा मात्र अवघ्या काही मिनिटांत संपते. कारण, मधमाशांनी दंश केल्यावर त्यांची नांगी (स्टिंगर) आपल्या शरीरात रुतते, जी निघू शकत नाही. मधमाशांच्या शरीरातून नांगी वेगळी झाल्यामुळे त्यांचे पोट फाटते आणि अवघ्या काही मिनिटांत त्या मरण पावतात. म्हणजेच, पोळ्यासाठी मधमाशा स्वखुशीने बलिदान देतात.

३) घरात मधमाशी शिरली तर...

१. सूर्यास्तानंतर संधिकाळात लगेच घरातले दिवे लावू नका. कारण, संधिकाळात मधमाशा पोळ्याकडे परतत असतात आणि प्रत्येक कीटकाच्या गुणधर्माप्रमाणे मधमाशाही प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि पोळ्याकडे जाण्याचा मार्ग विसरतात. म्हणून प्रकाशाकडे आकृष्ट होऊन मधमाशा घरात शिरतात.

 २. घरात शिरल्यास त्या ट्यूबलाईटवर आपटतात आणि जखमी होऊन सकाळपर्यंत मरून जातात. तेव्हा संधिकाळात घरात दिवे न लावता बाहेर काळोख झाल्यावर एक-दीड तासांनी दिवे लावावे. समजा, सूर्यास्त संध्याकाळी ६.३० ला होत असेल, तर साधारण ७.३०-७.४५ ला दिवे लावावे.

 ३. मधमाशा बाहेर दिसल्यास दारं-खिडक्या बंद करून घ्या.

 ४. डास घरात येऊ नये म्हणून जर जाळ्यांचे खिडकी-दरवाजे असतील, तर मधमाशाही घरात प्रवेश करू शकणार नाहीत.

 ५. मधमाशी घरात शिरल्यास त्या खोलीतील सर्व दिवे, पंखे बंद करा. खिडकी उघडी ठेवून खोलीचे दार बंद करा.

 ६. दाराच्या खाली फट असेल, तर तीही झाकून घ्या. कारण, फटीतून दुसर्‍या खोलीतील प्रकाशाकडेही मधमाशा आकर्षित होतात. 

 

 ४) अमितचं कार्य हे देशासाठीच...

‘‘अमितच्या एका निर्णयामुळे त्याची लाईनच बदलून गेली. त्याचं काम बरं वाटतं होतं, पण मनातून त्याने नोकरी करावी, ही भावना काही केल्या जात नव्हती. भवितव्य अधांतरी होतं. आज जेव्हा लग्नासाठी लोक विचारणा करतात की, तुमचा मुलगा काय करतो, तर मला नेमके काय उत्तर द्यायचे, तेच कळत नाही. माझा मुलगा इंजिनिअर आहे की जॉबमेकर... कारण, आता मी त्याला इंजिनिअरही म्हणू शकत नाही. आज जर अमित आयटीमध्ये कार्यरत असता, तर मोठ्या पदावर पोहोचला असता, पण आज असं वाटतं, तो हे कार्य देशासाठीच करतोय. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.’’            

 - पद्मिनी गोडसे, अमितची आई

५) मधमाशीने दंश केल्यावर काय करावे?

एखाद्या मधमाशीने दंश केल्यास घाबरून जायचे अजिबात कारण नाही. त्यावर औषधोपचार केले नाही तर कालांतराने त्रास कमी होतो. पण, डोकेदुखी, उलट्या, ताप यांसारखी लक्षणे जाणवल्यास, जास्त प्रमाणात वेदना होत असल्यास डॉक्टरकडे त्वरित जाणे कधीही योग्य.

६) भेसळयुक्त मधापासून सावधान

बाजारातील एकूण उपलब्ध मधापैकी तब्बल ७५ टक्के मध हे भेसळयुक्त असते. मधामध्ये गूळ, काकवी यांची भेसळ करून लोकांना अशुद्ध असे मध आरोग्यदायी म्हणून दिले जाते. मधसंकलन करताना पोळं अशास्त्रीय पद्धतीने पिळल्यामुळे बरेचदा मधमाशांच्या अंड्यांचा अंशही मधामध्ये नकळत मिसळला जातो व ते मध खराब होऊन जाते. त्यामुळे मध विकत घेताना ते शुद्ध आहे, याची खात्री करून घ्या.

 

 - विजय कुलकर्णी