#ओवीLive - रिसायकलिंग
 महा MTB  16-Oct-2016

“काय तर अन् नवीनच सुरु करत्यात! आधी वल्ला कचरा अन् सुक्का कचरा वेगळा वेगळा करत व्हतो. आता काय म्हनत्यात प्लास्टिकचा कचरा पण वेगळा ठेवायचा!”, सुनिता मावशींची तक्रार वजा चिडचिड.

“अहो मावशी, प्लास्टिकचा कचरा वेगळा करणे ही काळाची गरज आहे. काय होते, प्लास्टिकचा कचरा वेगळा करून जर recycle केला नाही, तर तो बाकी कचऱ्या बरोबर एकतर जमिनीत पुरला जातो नाहीतर समुद्रात फेकला जातो. त्याने प्रदूषण वाढते, प्राण्यांना त्रास होतो म्हणून तो कचरा वेगळा द्यायला सांगतात.”, नंदिनीने समजावले.

“त्यांना कसला आलया प्लास्टिकचा त्रास? आपल्यालाच नसता त्रास!”, सुनिता मावशी.

“मावशी, रस्त्यावरची जनावरे प्लास्टिकच्या पिशव्यांसकट शिळे अन्न खातात. ते प्लास्टिक पचत नाही, पोटात त्याचा एक घट्ट गोळा होतो. आणि असह्य वेदना होऊन दर वर्षी हजारो जनावरे मरतात. लहान लहान प्लास्टिकच्या वस्तू खाऊन दर वर्षी हजारो पक्षी मृत्युमुखी पडतात. आणि समुद्रातले जीव तर लाखांनी मारतात. हत्ती पेक्षा मोठा  असलेला व्हेल मासा प्लास्टिक खाऊन मारतो! काय म्हणायचं याला?”, नंदिनीने आणखीन थोडी माहिती पुरवली.

“आरं देवा! म्हणजे ह्ये तर पापच झालं की हो! मंग प्लास्टिक जमिनीत गाढलं तर काय व्हतया?”

“जमिनीखालचे प्लास्टिकचे थर पावसाचे पाणी जमिनीत मुरु देत नाहीत. मग पाऊस पडला तरी आपल्या विहिरीत पाणी कसं येणार?”, नंदिनी म्हणाली.

“आसं व्हय! मंग ते कचरा वेगळा करून दिला की काय करत्यात त्याचं?”    

“प्लास्टिकचा कचरा एक संस्था गोळा करते. ते प्लास्टिक पासून ईंधन तयार करतात, जेणे प्लास्टिकची विल्हेवाट लागते, स्वयंपाकासाठी जळण मिळते आणि प्रदूषण टळते!”, नंदिनीने सांगितले.

“पन ताई, एवढं संमद करन्या पेक्षा, शान्या मानसाने प्लास्टिक वापरूच नये ना!” 

प्लास्टिकचा कचरा खाणारे हत्ती आणि गायी.  

PC: http://slwcsupdates.blogspot.in


आम्ही स्वतःला गोपाल भक्त म्हणवतो, दहीहंडीत गोविंद म्हणवून घेतो आणि आमच्या गायींना प्लास्टिक खाऊ घालतो.

ज्ञानेश्वर  म्हणतात –

हे अनुचित कैसेनि कीजे | अग्राह्य केवी इच्छिजे |

अथवा इच्छीलेही पाविजे | विचारी पा || ३.२२२ ||

जी गोष्ट योग्य नाही, तिची इच्छा का धरावी? अशी अयोग्य वस्तू जर प्राप्त झाली, तर ती उपभोगावी तरी का? ज्याचे परिणाम योग्य नाहीत असे अनुचित कर्म माणसाने करूच नये!

प्लास्टिक रिसायकलिंग संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-२५४४८९००

-दिपाली पाटवदकर