जर्मनीचा जोसेफ
 महा MTB  12-Oct-2016
 
आपल्या संस्कृतीचा जितका आपल्याला अभिमान असतो, कौतुक असते, तितकीच विदेशी संस्कृती किमान जाणून घेण्याची इच्छा. हल्ली इंटरनेट असल्यामुळे माहितीच्या या जंजाळात हे सर्व जाणून घेणे किंवा जगभरात कुठेही ऑनलाईन फ्रेण्डस्‌शी ‘व्हर्च्युअल मैत्री’ करणे तसे अगदीच सहज, पण त्यात तो आपलुकीचा गंध नाही आणि भावनांचे बंध नाहीत. तेव्हा, मुंबईच्या सफरीवर दुसर्‍यांदा आलेल्या जर्मनीच्या जोसेफशी प्रवासात भेट झाली आणि संस्कृती दर्शनाचा काहीसा परिचित, पण तरीही नाविन्यपूर्ण पैलू समोर आला. त्याविषयी...
 
"Execuse me, Will this bus go to Malad station?'' मुंबईत प्रवास करताना, ’’ये ट्रेन दादर ठेहेरेगी क्या?’’, ’’ये नंबर की बस इस स्टॉप पे रुकेगी क्या?’’ आणि अशा बर्‍याचशा पत्ता, प्रवास आधारीत ‘क्वेरीज’ची उत्तरे देण्याची प्रत्येक मुंबईकराला तशी रोजची सवयच. एखाद्दिवस कोणी तसे विचारणारा महाभाग भेटला नाही तरच नवल... पण मुंबईला भेट देणारे विदेशी पर्यटक सहसा तुम्हाला असे पत्ते विचारत फिरताना दिसणार नाहीत. ते भले आणि त्यांचे गुगल नॅव्हिगेशन. त्यातच ‘मुंबई आणि पर्यटक’ म्हटलं की, फक्त सीएसटी, फोर्ट, चर्चगेट परिसरात काय ती गोर्‍यांची वर्दळ... उपनगरात असे खांद्याला एखादा झोला लटकवून फिरणारा मुसाफिर विरळाच... धारावीची मात्र बातच काही और... गरिबीच्या पर्यटनाचे एकमेव केंद्र ते... असो... आमच्या उपनगरीय मालाडातही विदेशी चेहर्‍यांचे सहसा कधी दर्शन झाले नाही, पण परवाच बस स्टॉपवर बेस्टच्या प्रतिक्षेत असताना, असा प्रश्न कानी पडताच जरा चपापलो. मुंबईत विचारणा ती ही इंग्रजीत? मागे वळून बघितलं तर एक गोरापान, उंच आणि तपकिरी केसांचा, खांद्यावर एकच हलकी बॅग घेऊन फिरणारा परदेशी तरुण. त्याला स्मित करत ‘‘Yes, this bus will drop you at Malad station.'' असे उत्तर दिले आणि तोही बसमध्ये चढता झाला. सकाळची वेळ असल्यामुळे बसायला काही मिळाले नाहीच. दोघांचाही प्रवास उभ्या-उभ्या. त्यातच जणू काही कधी विदेशी पर्यटक पाहिले नसल्यासारखे अनेकांचे डोळे त्याच्यावरच खिळून होते. मलाही मालाडमध्ये असा विदेशी पाहुणा पाहून आश्चर्य वाटत होतेच, पण मी काही ते चेहर्‍यावर दाखवून दिले नाही. ट्रॅफिकमधून मार्ग काढत बस रस्ता कापत होती. काही वेळेच्या शांततेनंतर त्या विदेशी पाहुण्याने त्याला कुलाब्याला जायचे असल्याचे सांगितले आणि त्यासाठी चर्चगेटला जाणारी लोकल पकडावी लागेल, याचीही माहिती त्याला होतीच. पण, त्याला ही कल्पना नव्हती की, पीक अवर्समध्ये (सकाळी ९-१०) मालाड स्टेशनवरून मुंगीही आत शिरायला जागा नसते. मालाडकरांनी त्यावर लढवलेली शक्कल म्हणजे रिटर्न प्रवास. अर्थात, बोरिवलीला जाणार्‍या लोकलमध्ये चढायचे आणि बसायचेही. कारण, पुढे तीच लोकल चर्चगेटकडे मार्गस्थ होते. असो. त्यालाही याची कल्पना दिली. ऐकून जरा तोही थबकला, पण त्याला आम्हा मालाडकरांची आयडिया ‘इंटेलिजंट’ वाटली. मीही अशाचप्रकारे जाणार असून तूही माझ्याबरोबर ये, असे सुचवले व तो तयारही झाला.
 
असे काही वरवरचे बोलणे झाल्यावर मग मी माझे नाव सांगून त्या पाहुण्याला त्याचेही नाव विचारले. ‘जोसेफ फ्रॉम जर्मनी’ तो म्हणाला. दुसर्‍यांदा मुंबई भेटीवर आलेला जोसेफ मालाडला मित्राच्या घरी थांबला होता. (आणि म्हणूनच परदेशी पाहुणं उपनगरात कसं? याचं उत्तरही मिळालं.) कुलाब्याला त्याचे मित्रमंडळी त्याला भेटणार होते. बसमधून उतरताच स्टेशनकडे जाताना असलेल्या मार्गावर एमएम मिठाईवाल्याच्या खमंग पदार्थांचा वास घेत त्याने मला ‘‘मी वडापाव खाऊ की समोसा पाव की पोहे?’’ असा प्रश्न केला आणि मी उडालोच. कारण, त्याला ‘इंडियन ब्रेकफास्ट’ची पूर्ण कल्पना होतीच. त्यावर ‘हेवी’ हवं असेल तर समोसा पाव खाण्याचा सल्ला मी दिला. पण त्याने ‘‘कुलाब्यालाच खातो, आता एवढी भूक नाही,’’ असे सांगितले आणि आम्ही स्टेशनवर पोहोचला. रीतसर रांगेत उभे राहून चर्चगेटचे तिकीट काढले. प्लॅटफॉर्मवर ओसंडून वाहणारी गर्दी पाहता, त्याला मालाडकरांना लोकलमध्ये का चढता येत नाही, याचे साक्षात स्पष्टीकरण मिळाले. लगोलग त्याने मोबाईलमधून काही फोटोही टिपले. परदेशी पाहुणा आपले फोटो काढतोय म्हटल्यावर समोरच्या लोकलमध्ये लटकणार्‍या टोळीने हुल्लडबाजी करत ‘पोजा’ दिल्या. जोसेफनेही हात वर करत त्यांना टाटा केले. नव्याने रंगरंगोटी केलेल्या मालाड स्थानकाची नवलाई जोसेफलाही भावली. लोकल आली आणि मी सवयीनुसार संगीत-खुर्चीच्या खेळाप्रमाणे खिडकी गाठली. जोसेफही पाठून आला आणि हुश्श हुश्श करत बसला. मुंबईकरांची केवळ प्रवासासाठीची ही जीवावरची कसरत त्याला साहजिकच व्यथित करून गेली.
 
खिडकीतून हवा खात मग गप्पांचा ओघ सुरू झाला. पहिला विषय होता मुंबईची लोकसंख्या आणि सार्वजनिक प्रवासाचा उडालेला बोजवारा. जिथे बघावं तिथे गर्दी आणि वाहतूक कोंडी. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात असल्याचे सांगितल्यावर जोसेफला फारसे आश्चर्य वाटले नसले तरी इतकी लोकं दाटीवाटीने कशी राहतात, एकामेकाला चिकटून कसा प्रवास करू शकतात, याचे अप्रूप वाटले. जर्मनीच्या बर्लिनमधल्या जोसेफला इतके लोक ना एकावेळी बघण्याची सवय ना उभे राहून प्रवास करायची. हे बदललं पाहिजे, एवढंच बोलून तो थांबला नाही तर इथे लोक अजूनही लोकलच्या टपावर बसून प्रवास करतात का, असंही त्याने विचारलं. त्यावर मीही होकारार्थी मान डोलावली आणि हे प्रमाण मात्र अलीकडच्या काळात कमी झाल्याचं त्याला सांगितलं. गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. आजूबाजूचेही आमचे इंग्रजी संभाषण कळत नसले तरी निरखून ऐकत होते...
 
गप्पांच्या ओघात इंग्रजी, हिंदी, जर्मनचा अर्थात भाषेचा विषय निघाला. जोसेफचं इंग्रजी अगदी शुद्ध, स्वच्छ आणि अस्खलित आणि महत्त्वाचं म्हणजे ऍक्सेंट फ्री. त्यावर जर्मनीतल्या शिक्षण पद्धतीत इंग्रजीला फारसं महत्त्वाचं स्थान नसल्याचं कळलं. प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठातील सर्व शैक्षणिक कोर्सेस फक्त जर्मन भाषेत. जोसेफला इतर देशात फिरायची, इंग्रजी वाचनाची आवड असल्यामुळे त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व, अन्यथा जर्मन तरुणांना फारसा इंग्रजीचा गंध नसल्याचे जोसेफ सांगतो. आतापर्यंत युरोपियन युनियनमधल्या फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड या देशांमध्ये जोसेफने चकरा मारल्या आहेत. त्यातल्या त्यात भारत हा तुलनेने भटकंतीसाठी स्वस्त देश असल्याने आणि येथील सांस्कृतिक विविधता भावल्याने जोसेफने दुसर्‍यांदा ‘व्हेकेशन’साठी भारताची आणि त्यातही मुंबईची निवड केली. राहणीमानाविषयी बोलताना जोसेफ म्हणाला, ‘‘ इथे तुम्ही किती सहज हॉटेल, रेस्टोरंटस्‌मध्ये जाता, पण आमच्या जर्मनीत तसे नाही. एकदा हॉटेलमध्ये गेलो की तीन-चार हजार युरो गेलेच म्हणून समजा. इथे मी तेवढ्या रकमेत चक्क महिना-दीड महिना काढीन.’’ हे ऐकून काही क्षणापुरतं वाटलं, बरं झालं, आपण जर्मनीत नाही बुवा. फुकट बाहेरचे खायचे-प्यायचे वांधे! जर्मनी असो वा एकूणच पाश्चिमात्त्य संस्कृती, वयाची १८ वर्ष पूर्ण झाली की, मुलं-मुली आपसूकच पालकांपासून विभक्त होणे पसंत करतात. जोसेफही त्यातलाच. पेशाने इंजिनिअर. पण आयुष्यभर नोकरी करायची आहेच, मग शरीर साथ देतंय तोवर जगभ्रमंती केली तर बिघडतंय कुठे, हा त्याचा मुक्त दृष्टिकोन. जर्मनीत शिक्षण संपवून काही काळ त्याने नोकरी केली. थोडा पैसा कमावला आणि आज तोच पैसा त्याच्या भटकंतीचा मार्ग ठरलाय. जोसेफ अगदी स्वतंत्र आणि परिपक्व. पश्चिमेकडे मुलं फार लवकर पालकांपासून दुरावल्यामुळे त्यांच्यात ‘मॅच्युरिटी’ तर कमी वयात येतेच, शिवाय जेवण बनविण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत घरची सारी कामेही जोसेफ आनंदाने सांभाळतो. कोणाचं काही बंधन नाही की लग्नाची घाई नाही. घराचं भाडं परवडावं म्हणून मित्र-मैत्रिणींबरोबर भाड्याने अपार्टमेंटमध्ये राहणारा असा हा जोसेफ एकलकोंडा नाही. लोकांची, फिरण्याची त्याला भारी हौस. भारतातच त्याचं केरळ, कर्नाटक, गोवा, काश्मीर, मुंबई फिरून झालेलं आणि भारत पालथा घालायची अजूनही इच्छा... तो म्हणतो, ‘‘तुमच्या एकाच देशात एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेलो तरी दुसर्‍याच देशात आल्याचा भास होतो. भारतीय संस्कृतीची ही विविधता खरंच स्तिमित करणारी आहे.’’
 
दोन भारतीय बोलताना राजकारणावर चर्चा होणार नाही, हे अशक्यच. पण आम्ही दोन भिन्न देशांचे नागरिकही राजकीय चर्चेत गुंतलो. मोदींविषयी त्याची ऐकीव मते गुजरात दंगलीवर आधारीत असल्याचं जाणवलं. काहीशी नकारात्मक. त्यावर मोदींमुळे देशाचे चित्र पालटल्याची मी त्याला सोदाहरण माहिती दिलीच, पण जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी इराक-सीरियामधील विस्थापितांबद्दल दाखवलेला उदारमतवादी दृष्टिकोन जर्मनीच्या नागरिकांना खरंच कितपत रूचला, असे विचारल्यावर, जोसेफचे उत्तरही तितकेच मनमोकळं आणि उदार होतं. ’’त्या आश्रितांना आम्ही आधार दिला, त्यांच्यामुळेच जर्मनीच्या विकासात भर पडले,’’ या सकारात्मक मताचा जोसेफ. समाजात मुस्लिमांची घुसखोरी वाढेल, उपद्रव वाढेल याची त्यांना चिंता नाही, उलट त्यामुळे जर्मनीतील नोकरीच्या उरलेल्या हजारो रिक्त जागा भरल्या जातील, हा व्यापक विचार. म्हणजे, केवळ मर्केलबाईच दिलदार, उदार नाहीत, तर सामान्य जर्मनीचा माणूसही तेवढाच बडे दिलवाला...
 
‘पुढील स्टेशन वांद्रे’ची उद्घोषणा झाली आणि जोसेफला निरोप दिला. खरं तर भरपूर बोलायचं होतं, जाणून घ्यायचं होतं, पण पर्याय नव्हता. जोसेफशी बोलल्यावर एक मात्र प्रकर्षाने जाणवलं की, आजच्या काळात आपला दृष्टिकोन ‘मी आणि माझा देश’ एवढा संकुचित असून चालणार नाही. एक माणूस म्हणून अनुभवांतील प्रगल्भता आत्मसात करायची असेल तर जग फिरावेच लागेल!
-विजय कुलकर्णी