भय ‘तिथले’ संपत नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2019   
Total Views |




स्त्रियांवरील हिंसक घटनांच्या विरोधात मध्य फ्रान्सच्या रस्त्यांवर शनिवारी शेकडो नागरिकांनी एकत्र येत निदर्शने केली. आंदोलकांनी यावेळी मागणी केली की, स्त्रियांविरोधातील गुन्ह्यात सामील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.
 

जगाच्या पाठीवर सातत्याने स्त्रिया मानसिक, भावनिक आणि शारीरिक हिंसेला, अन्यायाला, अत्याचाराला बळी पडत आल्या. किंबहुना, स्त्रियांवर वर्चस्व गाजवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यातूनच आपल्याला ताकदवान आणि हिंमतवान म्हणून ओळखले जाईल, असे समजणार्‍यांची संख्याही काही कमी नाही. म्हणूनच देश-विदेशात जिथे कुठे संधी मिळेल तिथे स्त्रियांवर अंकुश लावण्याची, त्यांना धाकात ठेवण्याची वृत्ती बळावलेली पाहायला मिळते. स्त्रियांविरोधातील हे दमनतंत्र घरगुती स्तरापासून ते कार्यालयीन स्तरापर्यंतही कार्यरत असते. सोबतच युद्ध, आणीबाणीसदृश्य परिस्थिती, नैसर्गिक वा मानवी आपत्ती आल्यास तिथेही स्त्रियाच भरडल्या जातात. तालिबान, इसिससारख्या दहशतवादी संघटना अफगाणिस्तान, सीरियासारख्या देशांत स्त्रीविरोधी कृत्ये करण्यात आघाडीवर असतात

 

यझिदी मुली-महिलांना दहशतवाद्यांनी लैंगिक गुलाम केल्याच्या बातम्याही अनेकदा माध्यमातून येतातपण, या सर्वांत आपल्या घरातल्याच माणसांनी एखाद्या स्त्रीवर अन्याय केल्यास तिला कसे वाटत असेल? असा अत्याचार माहेरी कमी आणि सासरीच अधिक होतो. ज्या घरात आपल्या आई-वडिलांना सोडून मुलगी विश्वासाने येते, तिथेच विश्वासघात होतो. पतीवर, सासू-सासर्‍यांवर भरवसा ठेवत ती नव्या घरी पाऊल टाकते, पण तो भरवसाच या ठिकाणी बर्‍याचदा तुटतो. अशावेळी स्त्रीची अवस्था किती विदारक होत असेल? घरातल्यांच्या अत्याचाराने व्यथित, हतबल झालेल्या स्त्रिया ही जगातील अनेक समाजातली वस्तुस्थिती आहे. पण, मग आपल्या याच दयनीय स्थितीचा विरोध करत स्त्रिया त्याविरोधात उभ्याही ठाकतात. अर्थात तेही नैसर्गिकच आहे म्हणा, कारण एखादी गोष्ट सहनशक्तीच्या पलीकडे गेली की, ती झुगारून, धुडकावून लावणेच शहाणपणाचे असते.

 

सध्या असाच प्रकार समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा धडा देत राज्यक्रांती घडलेल्या फ्रान्समध्ये सुरू आहे. स्त्रियांवरील हिंसक घटनांच्या विरोधात मध्य फ्रान्सच्या रस्त्यांवर शनिवारी शेकडो नागरिकांनी एकत्र येत निदर्शने केली. आंदोलकांनी यावेळी मागणी केली की, स्त्रियांविरोधातील गुन्ह्यात सामील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. सोबतच निदर्शकांनी यावेळी हिंसाचारात जीव गमावलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहत मौनही पाळले. ही सगळीच मंडळी स्त्रियांवरील घरगुती अत्याचाराविरोधात एकत्र आली होती. त्याला कारणही तसेच ठरले. फ्रान्ससारख्या पुढारलेल्या देशात गेल्या सहा महिन्यांत घरगुती हिंसाचारामुळे सुमारे ७४ महिला प्राणास मुकल्या आहेत. परिणामी, भडकलेल्या समुदायाने याविरोधात आंदोलन पुकारले. उल्लेखनीय म्हणजे विकसित, उदारवादी वगैरे समजल्या जाणार्‍या फ्रान्समध्ये अशा स्त्रियांवरील अन्यायाच्या घटना घडत असून त्याला आळा घालण्यासाठी आता नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे.

 

फ्रान्सच्या डी ला रिपब्लिक स्क्वेअरमध्ये एकत्र आलेल्या महिला आणि पुरुषांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत घरगुती हिंसाचाराचा आणि सरकारच्या भूमिकेचाही निषेध केला. घरगुती हिंसाचार बंद करा आणि पृथ्वीवर स्त्रियांचे जीवित राहणे गरजेचे आहे, अशी नारेबाजी केली. निदर्शनांत स्त्रियांच्या अधिकारासाठी झगडणार्‍या अनेक स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेतला होता. फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात चार महिलांची, तर २०१७ मध्ये १३० आणि २०१६ मध्ये १२३ महिलांची हत्या त्यांच्या पतींनी केली. हा आकडा धक्कादायकच म्हटला पाहिजे. यावरच फ्रेंच अभिनेत्री ज्यूली गेएट यांनी मत व्यक्त करत म्हटले की, "हा एक नरसंहारासारखाच प्रकार आहे. आज जे काही होताना दिसते, त्याविरोधात जनजागृतीची गरज आहे. आपण प्रगतीची नवी शिखरे गाठत आहोत, पण स्त्रियांच्या हत्येमुळे समाज मागे आणि मागेच जात आहे."

 

दरम्यान, फ्रेंच मंत्री मार्लिन शियाप्पा यांनी सप्टेंबरपर्यंत घरगुती हिंसाचाराविरोधात एक व्यापक मसुदा तयार करण्यात येईल, असेही सांगितले. परंतु, त्यापुढे जात, "जगात असा कोणताही देश नाही, जिथे स्त्रियांवर अत्याचार होत नाही," असे तारेही तोडले. शियाप्पा यांचे हे विधान म्हणजे दुसरा चिखलात लोळतोय तर आपणही लोळूयासारखाच असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत फ्रेंच स्त्रियांवरील अन्यायाला लगाम बसेल का, हाच प्रश्न उपस्थित होतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@