पुस्तक परीक्षण: महाराजा यशवंतराव होळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2019   
Total Views |



इतिहास हा विषय संवेदनशील तरीही प्रेरणादायक असल्याचे बहुतेकांना वाटत असते. महाराष्ट्रीय जनांना तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सेनापती संताजी घोरपडे, सेनापती धनाजी जाधव, पेशवे बाळाजी विश्वनाथ, पेशवे थोरले बाजीराव, पेशवे थोरले माधवराव, रघुनाथराव, सदाशिवरावभाऊ, मल्हारराव होळकर या मराठेशाहीच्या पूर्वार्धातील दिग्गजांचा प्रचंड अभिमान! वीरांच्या याच प्रभावळीतील नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांचे कौशल्यही वाखाणण्याजोगेच. परंतु, याच कालखंडातील बहुधा अखेरचे धडाडीचे आणि धडपडीचे नाव म्हणजे यशवंतराव होळकर!

निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळुणकरांनी ‘आपला इतिहास या अत्यंत प्रसिद्ध अशा निबंधात भारतातल्या सर्वात पराक्रमी, शूरवीर, नामवंत योद्ध्यांच्या नामावलीत पोरस, शिवराय, विक्रमादित्य, बाजीराव, रणजितसिंग यांच्याबरोबरीने घेतलेले नाव म्हणजे यशवंतराव होळकर! थोर इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांना तर यशवंतरावांवर महाकाव्य लिहावेसे वाटले. कारण, हिंदूंनी तसेच सर्वच एतद्देशीयांनी एक होऊन ब्रिटिशांना समुद्रापल्याड पिटाळून लावावे, हा यशवंतरावांचा असलेला आग्रह! भारतीय इतिहासाच्या उत्तरार्धात देशातील एक राज्यकर्ता, संस्थानिक ब्रिटिशांपुढे माना तुकवत असताना त्याला विरोध करणारे यशवंतरावच होते.

मराठेशाहीच्या अस्तकाळात यशवंतरावांनी स्वातंत्र्ययुद्धाला नवसंजीवनी दिली. तत्पूर्वी वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी रणांगणात समशेर चालवली. निजामाविरुद्धच्या खर्ड्याच्या लढाईत यशवंतराव होळकरांनी आपल्या ८० हजार फौजेनिशी शत्रुपक्षाला मात दिली. पेशव्यांचे दोन आधारस्तंभ असलेल्या होळकर आणि शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे हडपसर येथे लढाईही झाली. येथील लढाईनंतर पेशवा पुणे सोडून पसार झाला, तरीही यशवंतराव होळकरांनी त्यांच्यापुढे नम्रतेचेच धोरण स्वीकारले. आपले दोन्ही बंधू सवाई मल्हारराव आणि विठोजींचा बळी गेल्यानंतरही यशवंतरावांनी दुसर्‍या बाजीरावाशी समेटाचे प्रयत्न केले. पण, त्याला फळ मिळालेच नाही. मध्यंतरीच्या काळात ब्रिटिशांनी मोठ्या हुशारीने देशभर पसरलेल्या मराठेशाहीच्या पाईकांना संपवून, पोखरून अटकेत टाकले. शिंदे पराभूत झाल्याने दिल्लीचा बादशहाही ब्रिटिश अधिपत्याखाली आला. बुंदेलखंडात मराठे सरदार, हिंमतबहाद्दर, समशेरबहाद्दर दुसरा, झाशीचा सुभेदार शिवरामभाऊ नेवाळकर, अवधचा नवाब, निजाम सारेच मुठभर ब्रिटिशांपुढे लीन झाले. पण या सर्वांतही वेगळे उठून दिसले ते यशवंतराव होळकर! यशवंतरावांनी जीवाच्या आकांताने महाराष्ट्रापासून पार पंजाबपर्यंतचा प्रदेश तुडवला. सर्वच एतद्देशीयांना एकजुट करण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन वर्षे यशवंतराव यासाठी देश तुडवत होते. पण एकी झालीच नाही.

पेशवे, शिंदे, होळकर, भोसले, निजाम सगळेच एकत्र झाले असते तर ब्रिटिशांना भारताबाहेर हुसकावून लावणे सहज शक्य झाले असते. कारण, देशातील सर्वच राज्यकर्ते संख्येने, शौर्याने, गुणाने वरचढ होते. पण ब्रिटिशांच्या एकेकाला बाजूला काढण्याच्या, फूट पाडण्याच्या षड्यंत्राला ते बळी पडले आणि हा खंडप्राय देश परकीयांच्या हातात गेला. परंतु, ‘घोड्याचे जीन हेच माझे सिंहासन असे मानणार्‍या यशवंतरावांनी प्रतिकार सुरूच ठेवला. देशभर सार्‍यांनी ब्रिटिशांच्या ताकदीपुढे मुत्सद्देगिरीपुढे मान टाकली, पण यशवंतराव होळकरांच्या कहाणीचे वेगळेपण हेच आहे की, इतरांना ब्रिटिशांनी जसे सहजी नमवले तसे यशवंतरावांबाबत करता आले नाही. कोणीच साथ द्यायला तयार नसताना हा हताश झालेला योद्धा ब्रिटिशांशी तह करायला राजी झाला. पण, त्यांच्याच अटी, शर्ती ब्रिटिशांना मान्य कराव्या लागल्या.

ज्याने संकटांची असंख्य वादळे झेलली, अंतःकरणात विजयाची आस धरली, आपली मायभूमी परकीयांच्या तावडीत सापडू नये म्हणून आपली सगळी क्षमता पणाला लावली, अशा अफाट नेतृत्व कौशल्य, पराकोटीचे युद्धनैपुण्य, दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या या रणधुरंधराची-यशवंतराव होळकरांची हीच कथा लेखक अनंत शंकर ओगले यांनी आपल्या शब्दांतून मांडली आहे. यशवंतराव होळकरांच्या शौर्याची आणि जाज्ज्वल्य इतिहासाची साक्ष हा इतिहास वाचताना पानापानवर जाणवते. सोबतच यशवंतरावांची एकट्याची धडपड पाहून वाईटही वाटते. का ही माणसे आपापसात भांडत होती? का त्यांना परकीयांचा कावा कळला नाही? ब्रिटिशांविरोधात उभ्या ठाकणार्‍या यशवंतरावाला का कोणी मदत केली नाही? याची खंतही वाटते.

अनंत शंकर ओगले यांनी आपल्या लेखनातून हा सगळाच घटनापट अतिशय बोलक्या पद्धतीने शब्दबद्ध केला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुंदर असून आतील पाने, विविध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची चित्रे आदी गोष्टीही उत्तम आहेत. अनंत शंकर ओगले यांनी याआधीही अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची चरित्रे आणि घडामोडींवर पुस्तके लिहिली आहेत. त्याचप्रकारे ‘महाराजा यशवंतराव होळकर हे पुस्तकही वाचकांना फारशा परिचित नसलेल्या घटनाक्रमाची माहिती देते. वाचक या पुस्तकालाही पसंत करतील, असे वाटते.

पुस्तकाचे नाव : महाराजा यशवंतराव होळकर

लेखक : अनंत शंकर ओगले

प्रकाशक : व्यास क्रिएशन्स

आवृत्ती : प्रथम (२०१९)

पृष्ठे : १२८

मूल्य : १६०

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलोकरा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@